मिसेस जाईने परत यायच्या आधीच ऑफिस मधे अंबिका बद्दल चौकशी केली. ती सोडून गेल्याचं समजल्यावर त्यांना खूप बरं वाटलं. पण आता समिधाला चक्क तिला आलिंगन देतांना बघून त्यांच्या पाया खालची जमीन सरकली. त्यांचं अत्यंत वाईट स्वप्न सत्यात अवतरलं असं त्यांना वाटलं.
"आपली पोर तीन दिवस आपल्या सोबत असूनही तिला ओळखलं नाही आपण!" अंबिकाला स्वतःचंच आश्चर्य वाटलं, "म्हणूनच कदाचित इतकी ओढ वाटत होती तिची. जेव्हा पहिल्यांदा आपल्याला बिलगली तेव्हा एकदम मिसेस जाईला दिलेल्या त्या दुध पित्या बाळाची आठवण झाली. किती गोड आणि लाघवी पोर आहे समिधा. तिला आपल्या बद्दल खरं कळलं तर काय होईल? तिला खूप वाईट वाटेल. कदाचित तिच्या मनावर परिणाम होईल. काय विचार करेल ती, पैसा मिळतोय म्हणून नऊ महिने पोटात वाढवून जन्मताच देऊन दिलं मिसेस जाईला. खूप तिरस्कार करेल ना ती माझा. चालेल, पण यामुळे तिचं मानसिक संतुलन बिघडलं किंवा तिच्या भविष्यावर परिणाम झाला तर?" या विचारांनी अंबिकाचं डोकं चांगलं पिकलं.
"नको माझं झालं ते झालं, मुलांनी ताण तणाव रहित निवांत आयुष्य जगायला हवं. मिसेस जाई रागाच्या भरात मिस्टर जाई किंवा समिधाला आपल्या बद्दल काही बोलायच्या आधीच त्यांना भेटून त्यांची काळजी दूर करावी लागेल. नाहीतर अनर्थ होईल. आधीच त्या दोघीत टेंशन आहे. माझ्या विषयाने ते विकोपाला नको जायला. मी आताच त्यांना फोन करून मिटिंग ठरवते."
अंबिकाला माहित होतं मिसेस जाईला नक्कीच उलट शंका आली असेल. म्हणून त्यांचा गैरसमज लवकरात लवकर दूर करण्यासाठी तिने फोन करून भेटायचं ठरवलं.
अंबिका जाई कन्स्ट्रक्शनचा जॉब सोडल्यावर पहिल्यांदा कोथरूडला गेली. काही वर्षातच खूप बदल झाला होता. वयाची पन्नास पार मिसेस जाई आजही तशाच एकदम पॉलिश्ड आणि परफेक्ट दिसत होत्या.
अंबिका त्यांच्या समोर जाऊन उभी झाली.
"हे काय गं लहान मुलासारखं शिक्षा दिली म्हणून उभी आहेस? बस." मिसेस जाई म्हणाल्या.
"कशा आहे तुम्ही?" अंबिकाने बसून विचारलं.
"काल पर्यंत मजेत होती." मिसेस जाई म्हणाल्या, "आता चिंता वाटतेय."
"तुम्ही कशाचीच चिंता करू नका प्लीज. समिधा तुमची मुलगी आहे आणि राहीलही. विश्वास ठेवा माझ्यावर." अंबिका
"कसा ठेऊ? तु तर मैत्रीही करून घेतलीस तिच्याशी आणि कमी वेळातच गहन मैत्री झाली तुमच्यात. कि आधी पासूनच नजर ठेऊन होतीस?" मिसेस जाई
"मी कसं समजावून सांगू तुम्हाला, तुमच्या सुखात मी आडकाठी होऊ नये म्हणून नऊ दहा वर्ष झालीत मला जाई कंस्ट्रक्शनला सोडून. त्यामुळे तुम्ही कधी पुण्यात आल्या, समिधा माझी मुलगी आहे वगैरे मला काहीच माहित नव्हतं. ते तर योगा योगाने चारधाम यात्रेत समिधाची भेट झाली आणि मग बोलता बोलता विचार जुळून आले. बस !" अंबिका कळवळून म्हणाली.
"का नाही जुळतील विचार. तिच्या नसा नसात रक्त वाहतंय तुझं. पण मी गेली विस वर्ष तळ हाता वरील फोडा सारखं तिला जपतेय तिला, तिला उत्तमातील उत्तम मिळावं यासाठी सतत प्रयत्नशील असते. त्याचं काय?" मिसेस जाई पोट तिडकीने म्हणाल्या, "तुला अंकुरला वाढवायचा अनुभव आहे म्हणून लहान मूल वाढवतांना तिला किती दिव्य पार करावी लागतात याची कल्पना आहेच तुला. त्या सर्व दिव्यातून मी गेली आहे. आनंद आणि माझ्या मधात आलीस तशी प्लीज माझ्या आणि समिधाच्या मधात नको येउस." मिसेस जाईने तिच्या पुढे हात जोडले.
"हे काय करताय मॅम तुम्ही? माहित आहे मला, तुम्ही खूप प्रेमाने, लाडात वागवलं तिला. खरंतर तुम्ही ते सर्व दिलं तिला जे मी काहीच नसते देऊ शकले." अंबिका
"तरीही तु आमच्या मधे यायला बघतेय?" मिसेस जाई.
"नाही हो तसं काहीच नाही." अंबिका
"मग तुझ्या संस्थेचे आणि तिचे नाव सारखेच का आहे?" मिसेस जाईने अंबिकाला विचारलं.
"तो निव्वळ योगायोग झाला आहे मॅम." अंबिका उत्तरली, "माझ्या मनी मानसीही समिधा बद्दल काहीच नाही. तुम्ही निश्चिन्त राहा."
"आशा आहे तु आपल्या शब्दावर कायम राहशील. तसंही फक्त काहीच महिने समिधा इथे आहे. कॉलेज सुरु होताच ती जर्मनीला जाईल. तो पर्यंत सांभाळून राहा." मिसेस जाई अंबिकाला बोट दाखवून म्हणाल्या.
"हो नक्कीच !" अंबिका म्हणाली, "पण तुम्हाला काही सल्ला देतेय. प्लीज तो ऐकून घ्या आणि घरी गेल्यावर शांत चित्ताने त्यावर मंथन करा."
"बोल !"
"पालकांकडून मुलांना फक्त सुख सोयी हव्या नसतात. त्यांना त्यांच्या कला कलाने घेणारं, त्यांचा पॉईंटही समजणारं हवं असतं."
"म्हणजे तुला म्हणायचं आहे कि मी तिला समजून घेत नाही." अंबिकाचं बोलून पूर्ण व्हायच्या आधीच मिसेस जाई रागात बोलल्या.
"मॅम, आपल्याला जसं कोणत्याही गोष्टीचं कारण हवं असतं तसंच मुलांनाही हवं असतं. मी तीन दिवसात जितकं समिधाला ओळखलं त्यातून इतकंच जाणवलं कि तुम्ही आई म्हणून तिच्या भल्यासाठी तिला फक्त अमुक अमुक गोष्ट करायला लावता. पण ती करणं का गरजेचे आहे त्याची फोड करून कधीच सांगत नाही. त्यामुळे तिच्या मनात तुमच्या विषयी अढी निर्माण होतेय.
तिच्यावर तुमचे निर्णय लादायच्या आधी तिलाही विचारा की तिला काय हवंय? तुमच्या दृष्टीने ते चुकीचं असू शकतं आणि तिच्या दृष्टीने तेच बरोबरही. म्हणून त्यावर अभ्यास करून उदाहरण सहित तिला समजवा. कधी कधी तुम्हीही समजून घ्या."
"झालं तुझं." मिसेस जाई गॉगल डोळ्यांवर चढवून म्हणाल्या. "बाय !"
अंबिका थोडावेळ तिथेच बसली. स्वतःच स्वतः ला धीर देऊन उठ म्हणाली.
एका रविवारी सकाळी ती चहा पीत वर्तमान पत्र वाचत असतांना मधल्या पेज वरील बातमीने तिचं लक्ष वेधलं.
"जाई कन्स्ट्रक्शनच्या कर्ता धरता मिस्टर आनंद जाई यांचा मुंबई पुणे हायवे वर रोड अपघात."
तिच्या नकळतच तिचे डोळे घळाघळा वाहू लागले. हातपाय थिजून गेले. शरीरात तसूभरही त्राण उरला नाही. कसे असतील? किती लागलं असेल? कसा झाला असेल त्यांचा अपघात? मी जाऊ का बघायला त्यांना? या प्रश्नांनी तिच्या डोक्यात काहूर माजलं. समिधा, समिधा असेल का त्यांच्या सोबत की एकटेच होते? हे माहित व्हावे म्हणून ती पूर्ण बातमी वाचायचा प्रयत्न करू लागली. पण अश्रू भरलेल्या डोळ्यांनी समोरचे नीट वाचताही येईना.
कितीतरी वेळ ती तशीच रडत बसून होती. मग काहीतरी विचार करून अश्रू पुसून उठली. पर्स गळ्यात अडकवून पटकन पायात चप्पल सरकवली. दार उघडणार तोच तिचं मन तिला म्हणालं,
"नाही, नको, आपण नको जायला हवं मिस्टर आनंद जाईला बघायला. उगाच मिसेस जाईच्या मनात शंकांना उधाण यायचं आणि समिधा... तिला काय सांगणार? कोणत्या नात्याने तिच्या डॅड साठी आपण इतकं दुःखी होतोय?" तिने खांद्यावर अडकवलेली पर्स खाली ठेवली. मन लागत नव्हतं. जीव धडधड करत होता. ध्यान भरकटावं म्हणून तिने टीव्ही लावला.
"तुला पाहते रे" या मालिकेचं पार्श्व गीत सुरु होतं,
"पहिले मी तुला पाहतांना मला
पाहता पाहता हात हाती दिला
वेचताना वाटतो हा, पारिजाताचा सडा
आणि माझा स्पर्श ज्याचे नाव सांगे केवडा
तुला पाहते रे मी तुला पाहते रे!
पाहता पाहता हात हाती दिला
वेचताना वाटतो हा, पारिजाताचा सडा
आणि माझा स्पर्श ज्याचे नाव सांगे केवडा
तुला पाहते रे मी तुला पाहते रे!
धन्यवाद !
तळटीप :
या कथेचा लेखिकेच्या आयुष्याशी किंवा इतर कोणाशी काहीही संबंध नाही. ही निव्वळ काल्पनिक आणि आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाला बघून सुचलेली मनोरंजनपर, स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी लिहिलेली कथा आहे.
या कथेचा लेखिकेच्या आयुष्याशी किंवा इतर कोणाशी काहीही संबंध नाही. ही निव्वळ काल्पनिक आणि आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाला बघून सुचलेली मनोरंजनपर, स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी लिहिलेली कथा आहे.
लेखिका : अर्चना सोनाग्रे वसतकार
फोटो : साभार गुगल वरून
फोटो : साभार गुगल वरून
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा