पण अंबिकाचा वाढदिवस जवळ आला तेव्हा अंकुरला राहवलं नाही. त्याने दिवस रात्र कामात स्वतःला झोकून दिलं. प्रोजेक्ट पूर्ण करून कंपनीला सोपवला व आईला भेटायला मायदेशी आला. बघतो तर घराला कुलूप. सईचे आई बाबा तिच्या मामाकडे लग्नाला गेलेले असल्याने तिचं पेंडिंग काम पूर्ण करून दोन तीन दिवसांनी येणार होती.
अंकुरला अंबिका बद्दल समजताच तो पांडे काका काकू सोबत दवाखान्यात तिला बघायला गेला. योगायोग असा कि अंबिकाला त्याच दवाखान्यात भर्ती करण्यात आले होते जिथे मिस्टर आनंद जाईवर उपचार सुरु होते. अंबिका शुद्धीत आलेली नव्हती. अंकुर डॉक्टरशी बोलला. डॉक्टर त्यांच्या प्रयत्न करत आहेत म्हणाले. पण अंकुरला काही गप बसवेना. त्याने पटपट काही मित्रांना फोन लावून अंबिकाची माहिती दिली. चांगल्यात चांगला डॉक्टर कोण, कुठे, कधी मिळेल? वगैरे चौकशी करून त्यांना संपर्क साधायला सांगितलं. मित्रांनी त्याला अपेक्षित आश्वासन दिलं. ते त्यांच्या कामाला लागले.
सतत अंकुरच्या अवती भवती फिरणाऱ्या अंबिकाला असं निपचित पडलेलं बघून अंकुरला स्वतः वर खूप राग आला. चिडचिड होऊ लागली, रडूही येत होतं. तो डोक्याला हात लावून बसला. त्याच्या मनात आलं,
"ती, कितीही वाईट बोलली तरीही आपण जायला नको होतं तिला सोबत घेतल्या शिवाय. पण केदारनाथला गेली तेव्हा तर खूप आनंदी होती. मग एकाएकी काय झालं असेल? कशाचं टेंशन आलं असेल तिला? सई काही बोलली असेल का किंवा तिचे आई बाबा?"
अंकुरने सईला व्हॉइस कॉल केला.
"हां अंकुर बोल. पोहचलास तर फोन सुद्धा केला नाहीस. आई भेटताच विसरलास बायकोला." सई अनावधानाने बोलून गेली. अंकुरला तिचा खूप राग आला. फोन मधे घुसून तिला ठोकून काढावं असं त्याच्या मनात आलं. पण परिस्थितीचे भान राखून त्यानं शांततेत तिला विचारलं,
"ते जाऊ दे आधी मला सांग तु किंवा तुझे आई बाबा माझ्या आईला काही बोलली होतीस का कशाबद्दल?"
"काय झालं अंकुर? असं का विचारतोय? मी काय बोलणार त्यांना? आणि महत्वाचे म्हणजे मी मागील सहा महिन्यात एकट्यात बोललीच नाही त्यांच्याशी. जे काही बोलणे झाले ते तूझ्या समक्षच झाले. बाकी माझ्या आई बाबा बद्दल म्हणशील तर ते मामाकडे लग्नात व्यस्त आहेत." सई म्हणाली. अंकुरला चांगला अभ्यास झाला होता सई केव्हा खोटं बोलते आणि केव्हा खरं. त्याला तिच्या बोलण्यात खरेपणा जाणवला.
"अंकुर काय झालं?" सईने त्याला काळजीत विचारलं.
"आई दवाखान्यात भरती आहे. काय झालं कोणालाच माहित नाही. पण डॉक्टर म्हणतात तिला कोणत्या तरी गोष्टीचा खूप धसका बसला. म्हणून मला वाटलं..... " पुढचं सई समजून घेईल म्हणून बोलता बोलता तो थांबला.
"तुला वाटलं कि मी काहीतरी बोलले त्यांना. नाही रे तसलं नाही काही. आईने मला फक्त इतकं सांगितलं कि आपण इकडे आल्यावर अंबिका आईने स्वतःला सामाजिक कार्यात पूर्णपणे गुंतवून टाकलं. म्हणून मग माझ्या आईने उगाच फोन करून त्यांना डिस्टर्ब् करणं बंद केलं. जाऊदे, तु बघ त्यांना. मी तर येतेच दोन दिवसांनी. आई बाबालाही पाठवते. तुला सपोर्ट होईल."
"थँक्यू !" अंकुर
"सी यु आणि लव्ह यु !" सईने फोन कट केला.
अंकुरला त्याच्या मित्राचा फोन आला. तो काही कॅश आणि अंकुरसाठी जेवणाचा डबा घेऊन येतोय म्हणाला. अंकुर त्याला घ्यायला हॉस्पिटलच्या रिसेप्शन आवारात आला. अंबिकाच्या विचारातच इकडे तिकडे फेऱ्या मारताना त्याचं लक्ष मोबाईलवर बोलणाऱ्या एका साठीत असलेल्या स्त्री कडे गेलं.
"काय? अंबिकाच्या घराला कुलूप आहे." ती खूप काळजीत बोलली, "अरे मग शेजारी विचारपूस कर. तेही मीच सांगू?"
तिने चिडून फोन कट केला. आपल्या आईचं नाव तिच्या तोंडून ऐकून अंकुर लगेच तिच्या जवळ गेला.
"नेहा मॅडम का तुम्ही?" अंकुरने तिला नीट बघून विचारलं.
"हो ! तु कोण?" तिला अंकुर ओळखू आला नाही.
"मी अंकुर, अंबिकाचा मुलगा !" तो बोलला.
नेहाने डोळ्यावरचा चष्मा व्यवस्थित करून त्याला निरखून बघितले. किंचित हसून म्हणाली, "किती मोठा झालास रे? पण नाक नक्ष आताही आई सारखेच."
"आई...." अंकुरला आईची आठवण झाली, "तुम्ही फोन वर माझ्या आई बद्दलच विचारत होत्या ना?"
"अरे हो, बघ. म्हातारपणी काही सुचत नाही, आठवतही नाही. तुला बघितलं अन तिला विसरली." नेहाने त्याला विचारलं, "कुठे आहे ती? दोन दिवस झाले फोन लावतेय. त्या आधी भेटली तेव्हा आनंदी होती. मला तिने सांगितलं तूझ्याबद्दलही. फॉरेन मधे मोठा प्रोजेक्ट मिळाला म्हणे तुला. आणि आता वाढदिवशी गायब."
अंकुरचा चेहरा पडला. त्याला कळत नव्हतं काय बोलावं? काय सांगावं? त्याच्या मनात आलं,
"या इथे हॉस्पिटलमधे आल्यात. यांना काही हेल्थ इशू असेल तर त्रास होईल चांगलाच. काय करू मी?"
"काय रे? काय झालं?" नेहाने परत विचारलं.
"काही नाही. म्हटलं तुम्ही इथे हॉस्पिटलमधे कशा?" त्याचा प्रश्न.
"आई सारखाच आहेस. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं सोडून मलाच प्रश्न विचारतोय." नेहा त्याला म्हणाली, "माझे बॉस, तुझ्या आईचे जुने सर मिस्टर आनंद जाईचा अपघात झाला. म्हणून आली मी त्यांना बघायला. आता तर सांग अंबिका कुठे आहे?"
"आई... आईला कशाची तरी धास्ती बसली म्हणतात डॉक्टर. मायनर अटॅक आला. पण ती शुद्धीतच येत नाहीये." अंकुर म्हणाला, "विंग C, पहिला मजला, रूम नंबर 112 मध्ये आहे ती."
नेहा लगबगीनं रूम नंबर 112 कडे गेली. अंकुर मात्र तिथेच रिसेप्शन मधे बसला आपल्याच विचारात गुंग. कारण त्याला अंबिकाला बसलेल्या धक्क्याचं कारण, तिने घेतलेल्या ताणाचंकारण समजलं होतं. त्याला लहानपणी कळत नव्हतं पण जसजसा मोठा होत गेला त्याला अंबिकाच्या भावनिक गुंतागुंतीची जाणीव होऊ लागली. पण आपल्या आईला बरं नाही वाटणार म्हणून त्यानं कधीच बोलून नाही दाखवलं कि त्याला माहित आहे तिची मिस्टर आनंद जाई प्रति असलेली ओढ.
अंबिकाने बाळ मिसेस जाईला दिलं तेव्हा त्याला एक बरं वाटलं कि आपली आई आपलीच राहणार. आपल्याला तिचं प्रेम आणखी कोणा सोबत वाटून घ्यावं लागणार नाही. पण दुसऱ्याच क्षणी त्याला खूप वाईटही वाटलं. कितीतरी दिवस तो विचार करत बसला कि आईने असं का केलं? आई लोकं तर आपल्या बाळाला आपल्या जवळच ठेवतात, मग आपल्या आईने का दिलं त्यांना बाळ? आता ते बाळ कोणाचं दुध पिणार? कोणाच्या कुशीत झोपणार? त्याला आईची आठवण नाही येईल का? वगैरे वगैरे !
तेव्हा किती प्रयत्नाने तिने स्वतःला काढलं होतं बाहेर या सर्व गोष्टीतून. आता कसं काय आली ही मंडळी इथे? म्हणजे ते बाळ, ती मुलगीही आली असेल? आईने तिची तर धास्ती घेतली नाही ना? मिस्टर आनंद जाई. तुम्हाला आताच अपघात व्हायचा होता का? तुम्ही खूप संकटातून काढलं आहे आईला. या संकटातूनही तुम्हालाच काढावं लागेल तिला.
या विचारात अंकुरने रिसेप्शनवर मिस्टर आनंद जाईच्या रूमची विचारपूस केली आणि त्या विभागात गेला.
इकडे त्याचा मित्र अमोल हॉस्पिटलच्या पार्किंग मधे त्याची बुलेट लावून अंकुरला फोन करण्याच्या धुंदीत समोरून मोबाईलवर मैत्रिणीशी बोलत येणाऱ्या समिधाला धडकला. तो तोल जाऊन खाली पडणार पण समिधाने त्याचा हात घट्ट पकडून ठेवला आणि त्याला नीट उभं व्हायला मदत केली. तो तिला एकटक बघू लागला. दिसायला इतकी नाजूक पण हातात किती ताकत?
"अशीच मुलगी हवी आपल्याला." त्याचं मन त्याला म्हणालं.
"डोळे फुटलेत का?" तिने विचारलं.
"हो!" तो अनावधानाने उत्तरला. मग लगेच म्हणाला, "सॉरी ते मित्राची आई ऍडमिट आहे इथे. त्यालाच कॉल करत होतो."
"अच्छा. पण हातात इतकं सामान असतांना बघून चालायचं जरा." ती म्हणाली.
"हो हो. लक्ष ठेवेल मी." तो बोलला आणि त्याला मोबाईलची आठवण झाली. खाली पडलेला मोबाईल उचलून बघतो तर तो कामातून गेलेला. त्याची स्क्रीन फुटली.
"शीट, आता मी अंकुरला कॉल कसा करू? आणि हे इतकं मोठं सहा सात इमारतीचे हॉस्पिटल... कुठे शोधू त्याला?" तो डोक्याला हात लावून म्हणाला.
समिधाला त्याची कीव आली. तिने त्याला अंकुरला फोन करायला स्वतःचा मोबाईल देऊ केला.
"थँक्यू ! पण नंबर लक्षात नाही माझ्या. म्हणजे आजकाल कोण पाठांतर करतं मोबाईल नंबर?" तो समिधाच्या कपाळावर पडलेल्या आठ्या बघून म्हणाला.
"चला मी रिसेप्शन कडेच जातेय. तुम्हाला मदत होईल तिथे तुमच्या मित्राला शोधायला." समिधा त्याला शंकेनं बघत म्हणाली. अमोलच्या ओठांवर स्मित पसरलं.
"तुमचं कोण आहे इथे? कि तुम्ही डॉक्टर आहात?" त्याने विचारलं.
"इतकी मोठी दिसते का मी?" तिने चिडून विचारलं.
"सॉरी, तुम्ही तर सोळाच्याच दिसताय. मलाच वाटलं कारण डॉक्टर स्मार्ट असतात ना दिसायला असा अनुभव माझा." तो जीभ चावून म्हणाला.
"आर यु ट्रायिंग टू फ्लर्ट विद मी?" समिधाने दोन्ही हात कमरेवर ठेऊन त्याला विचारलं.
"सॉरी, माझा उद्देश तसा नव्हताच. जाऊदे ते माझा मित्र वाट बघत असेल."
"गुड !"
"पण तुम्ही का इथे हॉस्पिटल मधे?"
"माझे बाबा आहेत इथे. खूप मोठा अपघात झालेला त्यांना. सहा ऑपरेशन झालीत त्यांची. आजच त्यांना शुद्ध आली. म्हणून मी खूप आनंदात आहे." समिधाच्या चेहऱ्यावर बोलतांना गोड हास्य पसरलं आणि ते बघून अमोलचं हृदय घायाळ झालं.
धन्यवाद !
तळटीप :
या कथेचा लेखिकेच्या आयुष्याशी किंवा इतर कोणाशी काहीही संबंध नाही. ही निव्वळ काल्पनिक आणि आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाला बघून सुचलेली मनोरंजनपर, स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी लिहिलेली कथा आहे.
या कथेचा लेखिकेच्या आयुष्याशी किंवा इतर कोणाशी काहीही संबंध नाही. ही निव्वळ काल्पनिक आणि आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाला बघून सुचलेली मनोरंजनपर, स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी लिहिलेली कथा आहे.
लेखिका : अर्चना सोनाग्रे वसतकार
फोटो : साभार गुगल वरून
फोटो : साभार गुगल वरून
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा