Login

मी नवरा आहे

मी नवरा आहे
समजत नाही कुठून सुरवात करायची. पण मनातली गोष्ट कोणाला तरी सांगितल्यावर मनाला हलकं फुलकं वाटतं. सांगायला तर हवीच ना !
तर मी सांगत आहे माझ्या कथेची व्यथा.ज्याचा अंत कधी होणारच नाही. याची सुरवात कधी पासून झाली मला माहीत नाही. पण काळ किती ही बदलला तरी परिस्थिती जैसे तेच आहे.

मी त्याच्या दुःखा बद्दल लिहायचं म्हणलं तर पुलं च्या म्हणण्या प्रमाणे शाई आणि कागदांचे असंख्य कारखानदार जागतील. अगदी सुखाचा संसार करतील. मी सांगत आहे त्याच्या बद्दल ज्याच्या मनातील राग कर उष्णता निर्माण करत असेल तर एखाद्या शहराला इंधनाची कमतरता जाणवणार नाही. त्याचे अश्रू जर गोळा केले तर शहराचा पाण्याचा प्रश्न सुटून जाईल. खूप झाली अतीश्योक्ती. अहो मी लिहीत आहे त्या मनुष्य प्राण्या बद्दल ज्याचं नाव आहे न व रा ss ! सगळ्यात दुखी कष्टी मनुष्य तिचे अहो !

बरोबर वाचलत. मी व्यथा मांडत आहे एका नवऱ्याची. ज्याच्या कष्टांची ना सुरवात कधी झाली हे माहीत आहे ना शेवट निश्चित आहे.

त्यागाचं दुसर नाव आहे नवरोबा. जो कुटुंबाच्या पालन पोषण करण्याच्या जबाबदारी पायी त्याच शरीराचा देखील त्याग करतो.

सर्वात आधी तर आई वडीलांच्या डोक्यावरची मुलीची जबाबदारी लग्न करून स्वतःच्या शिरारवर घेतो. आनंदाने स्व खुशीने. कुमारी कन्येशी विवाह करुन आधी तर त्याची अक्कल हुशारीचा त्याग करतो. त्यानंतर त्याचे सखे सोबती म्हणजे मित्र हो ss, त्यांचा त्याग करतो. कधी चुकून एखाद्या मित्राचा चेहरा आठवला की लगेचच त्याला त्याच्या बायकोचा चेहरा आठवतो, मग काय ? त्याच्या जिवलग मित्राचा चेहरा पण धुसर होऊन जातो. बायकोच्या पुढे कोणीच दिसत नाही , सगळं काही आपोआप विसरल जाते.

लग्न झाल्यावर तो आपल्या आई वडीलांना पण काही अंशी विसरतो. आई वडीलांशी असलेलं आयुष्य भराच नातं मागे पडत. आपल्या मनाच्या शांती साठी तो सत्याचा त्याग करतो. त्याला तर बायको बोलते तेच खरं वाटू लागतं. बाकीचं सगळं खोटं फसव वाटू लागत. बायको ने कधी विचारल आज मी कशी दिसते, तर त्याचं उत्तर चतुर पणे तयार असतं.
तु आजही कालच्या सारखीच सुंदर दिसते. बिचारा दुसरं बोलणार तरी काय !

आज तर त्या नवऱ्याची व्यथा ऐकायला कोणीच तयार नाही. इतकचं काय तर त्याला बनवणाऱ्या विधात्या कडे देखील त्याचं गाऱ्हाणं ऐकायला वेळ नाही. नवरा कधी दुखी होऊ शकतो, हेचं मुळात कोणाला पटतं नाही. तर त्याचं गाऱ्हाणं कोण ऐकणार ?

एखाद्या न्यूज चॅनलकडे पिडीत बायकोच दुखं ऐकायला वेळच वेळ आहे. तिन सोसलेला त्रास ऐकून चॅनलची ब्रेकिंग न्यूज होते तिथंच एका नवऱ्याच दुःख चॅनल वर दाखवण म्हणजे चॅनेलचा टी आर पी घटवणं आहे.

पती पिडीत पत्नीचं गाऱ्हाणं ऐकायला हजारो लाखो लोक मिळतील पण बिचाऱ्या नवऱ्याचे काय ? त्याचं म्हणणं कोण ऐकणार रे ?
नवऱ्याला तर फक्त त्याच्या बायकोचंच बोलणं ऐकायची सवय झाली असते. किंबहुना त्याला बाकी कोणाचं काहीही ऐकायला येत नाही. म्हणायला घर त्याच्या वर चालतं. घरात त्याचा हुकूम चालतो. पण खरी परिस्थिती असते का तशी ? त्याला तर त्यांच मत पण ठाम आवाजात मांडता येत नाही.

बरं यात कसं ? बायकोची बाजु घ्यावी तर आई म्हणते बायकोच्या तालावर नाचतो. आईचं म्हणणं ऐकलं तर बायको म्हणते अजुन आईच्या पदरा पाठी दडतो. आता काय बोलायचं ?

बहुदा नवरा हा कायम विद्यार्थी असतो. बायकोला वाटतं नवऱ्याला आई शिकवते. तर आईला वाटतं मुलाला बायकोची शिकवणी चालु आहे. आता काय बोलायचं ? कसं वागायचं ? माझी व्यथा कोणाला सांगायची ?

लग्न झाल्यावर बायको खुप सारी स्वप्न बघायला सुरवात करते. ती स्वप्न साकारण्याच कर्तव्य तर त्या बिचाऱ्या नवऱ्या वर पडत. बायको तोंडाने कधी स्पष्ट नाही बोलणार, पण वागण्या बोलण्यातून तिची स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी त्याच्या वर आहे याची जाणीव करून देणार. त्यात कधीही चुकणार नाही.

पण त्या नवऱ्याच काय ? जशी तिची स्वप्न आहेत तशी त्याची ही स्वप्न असतात. लग्नानंतरची जबाबदारी, कुटूंब, त्याचा संसार याची कर्तव्य पूर्ण करण्याच्या पाठी त्याला त्याची स्वतः ची स्वप्न विसरावी लागतात. बायको तर तिची स्वप्न सांगून मोकळी होते, पण त्याचं काय ? तो कोणाला सांगणार त्याचं तुंटलेल स्वप्न ? कोण ऐकणार त्याची व्यथा ?

त्यात बायकोच्या अपेक्षा म्हणजे न उलगडणार कोडं आहे.

नवरा साध राहणं पसंत करणारा असेल तर तो गबाळा दिसतो. जर थोड मॉडर्न स्टाईल करायला लागला की बायको त्याच्या कडे संशयाच्या नजरेने बघते.

घरात त्याने कुठल्या विषयावर मत मांडल तर ते तिला कधीचं पटतं नाही. आणि जर बोलणं टाळलं तर हा मनुष्य किती शिष्ट आहे ! हे ऐकून घ्यावं लागतं.

आता मला सांगा या नवऱ्याने त्याची व्यथा कोणाला सांगावी ? कोण ऐकेल त्याचं गाऱ्हाणं ?

समाप्त.

©® वेदा

पहिल्यांदा पुरुषवादी लेख लिहिला आहे. थोड त्याच्या मनातलं. वाचुन सांगा. जमलय का ?

तुमचं मत कमेंट मध्ये सांगा.
0

🎭 Series Post

View all