Login

मी आहे… माझ्या संघर्षाचा, माझ्या जिद्दीचा, माझ्या अस्तित्वाचा प्रवासी

स्वतःमध्ये असेल जिद्द करता येते कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सिद्ध
शीर्षक : मी आहे… माझ्या संघर्षाचा, माझ्या जिद्दीचा, माझ्या अस्तित्वाचा प्रवासी

या जगात प्रत्येकाचा एक वेगळा प्रवास असतो. कोणी साधा, कोणी कठीण, कोणी चकचकीत तर कोणी संघर्षांनी भरलेला.
माझा प्रवास कधीच सरळ रेषेत नव्हता. तो खाचखळग्यांनी भरलेला होता,
आणि तरीही मी चाललो… मनाने.

हो… मी व्हीलचेअरवर बसतो.
पण मला जगण्याची खुर्चीची नाही,
जिद्दीची साथ आहे.

लोक मला पाहतात तेव्हा बहुतेकांना शरीरातील कमतरता दिसते,
पण मला मात्र माझ्या आतली धग, माझी ओढ, आणि माझ्या स्वप्नांचा आवाज ऐकू येतो.

मी आहे तो माणूस
ज्याचे पाय कदाचित कमी पडले,
पण ज्याचं मन कधीच तुटलं नाही.

मी स्वतःला ओळखायला शिकलेलो आहे…
दयेने नाही,
तर स्वाभिमानाने.

माझं आयुष्य संघर्षाचं नाही, तर उभं राहण्याचं प्रतीक

खूप लोक विचारतात
“कसं जमतं तुला एवढं सगळं?”

मी हसतो.
कारण त्यांना कळत नाही…
मी “सगळं” करत नाही,
फक्त हार मानत नाही.

प्रत्येक दिवस माझ्यासाठी नवी परीक्षा असते.
कधीतरी शरीर थकतं.
कधीतरी मनही थकून बसतं.
कधी आयुष्याच्या ओझ्याने श्वास जड होतो.
पण त्या क्षणी एक आवाज मला आतून उठवतो

“थांबायचं नाही…
तू चालत नसू शकतोस,
पण तुझी वाट तूच बनवू शकतोस.”

हेच माझं बळ आहे.
हीच माझी पर्वताएवढी हिम्मत.

माझी हिम्मत पायावर चालत नाही माझं मन मला पुढे नेतं

हो, माझे पाय माझी साथ देत नाहीत.
पण माझ्या हिम्मतीला त्यांची गरजही नाही.

लोकांना वाटतं सामर्थ्य म्हणजे शरीरातली ताकद.
पण मी शिकलेलो आहे
सामर्थ्य म्हणजे मनाची कणखरता.

मन मजबूत असेल तर पाय नसले तरी चालतं.
पण मन थकलेलं असेल तर पाय असूनही माणूस लंगडत जगतो.

माझ्या मनात एवढी आग आहे
की प्रत्येक दिवसाला मी नव्यानं सामोरं जातो.
अडथळे कितीही असले तरी मी स्वतःला सांगतो —

“पायांनी नाही…
हिम्मतीने चालायचं.”

आणि तेव्हाच माझा प्रवास सुरू राहतो.

जग मला पाहतं… पण मला पाहणाऱ्यांना मी सांगतो मी अपूर्ण नाही

लोकांच्या नजरा वेगवेगळ्या असतात.
काही जिज्ञासेने बघतात,
काही दयेने,
काही आदराने.

पण मला एका नजरेतूनही स्वतःची व्याख्या मिळत नाही.

कारण
मी कोण आहे हे मला माहीत आहे.

मी अपूर्ण नाही.
माझं शरीर जसं आहे, तसं आहे.
पण माझ्या मनातली शक्ती?
ती पूर्ण जगाला पुरेल.

मी स्वतःची कमी जाणवत नाही…
कारण मी माझ्या आयुष्याकडे
“काय नाही” म्हणून पाहत नाही,
तर
“काय आहे आणि काय करता येईल”
या दृष्टीने पाहतो.

मला मर्यादा आहेत…
पण त्यापेक्षा मोठी माझी इच्छा आहे.
आणि त्या इच्छेवर माझं आयुष्य आधारलेलं आहे.

माझ्या व्हीलचेअरमध्ये माझा पराभव नाही माझा उभारलेला किल्ला आहे

काहींसाठी व्हीलचेअर म्हणजे बंधन.
पण माझ्यासाठी ती माझी स्वातंत्र्याची गाडी आहे.

याच्यावर बसून मी जग पाहिलं,
माणसं पाहिली,
वेदना अनुभवल्या,
आनंद मिळवला,
आणि सर्वात महत्त्वाचं
स्वतःला समजून घेतलं.

ही खुर्ची मला कमी करत नाही…
ही खुर्ची मला तग धरणं शिकवते.
प्रत्येक चाक माझ्या संघर्षाची गोष्ट सांगतं,
प्रत्येक खडबडीत रस्ता मला आणखी मजबूत करतो.

या खुर्चीत मी बसतो…
पण या खुर्चीतूनच मी उभानं जगतो.

आयुष्याने मला पडवलं…पण प्रत्येक वेळी उभं राहण्याची हिंमत मी स्वतःत निर्माण केली

या प्रवासात मी खूप वेळा पडलो आहे.
शरीरानं, मनानं, परिस्थितीनं.

रडायला आलंय…
निराशाही वाटली आहे.
कधी वाटलं, आयुष्य एवढं कठीण का बनवलंय?

पण त्या क्षणी माझ्यात कुठेतरी एक आवाज जागा झाला

“तू लढण्यासाठी जन्मला आहेस,
हरण्यासाठी नाही.”

मी स्वतःला बाहेरून नव्हे,
तर आतून उचलायला शिकलो.

मी स्वतःच माझा आधार आहे.
माझी हिम्मत, माझा विश्वास आणि माझी आग
माझं जगणं याचं फळ आहे.

इतरांसारखा नाही…पण इतरांपेक्षा अधिक मजबूत आहे

हो, माझा मार्ग वेगळा आहे.
पण तोच माझी ओळख आहे.

मी जगाशी स्पर्धा करत नाही,
मी स्वतःशीच दररोज स्पर्धा करतो.

मी कधीही “बिचारा” नाही.
मी “भीम” आहे.
मी “बळकट” आहे.
मी “तगडा” आहे.

कारण माझं मन त्यांनी पाहिलं नाही,
जसं मी अनुभवलं आहे.

माझी कथा अजून सुरू आहे...मी अजून प्रवासात आहे

आज मी या पायवाटेवर बसलो आहे.
माझ्या मागे हिरवाई आहे…
समोर मार्ग आहे.
आणि माझ्या मनात भविष्य.

मी इथे थांबण्यासाठी नाही आलो.
मी इथे विचार करायला आलो
पुढचं पाऊल कुठे टाकायचं?

पायांनी नाही,
मनाने.

मी चालतो…
जिद्दीने,
विश्वासाने,
आणि स्वतःवरच्या अपार प्रेमाने.

मी वेगळा आहे…
आणि मला जसं बनवलं आहे,
ते मला मंजूर आहे.

मी एक प्रेरणा आहे…दयेची नाही, तर आदराची

मी आयुष्याला हरवू दिलेलो नाही…
आयुष्याने मला अजून मजबूत बनवलं आहे.
मी कोणाचं ओझं नाही…
मी स्वतःचा आधार आहे.

माझं जगणं सांगतं

“जिंकल्यासारखं जगायचं असेल…
तर शरीर नाही, मन मजबूत असलं पाहिजे.”

मी आहे तो माणूस,
ज्याचं हृदय पायांपेक्षा जास्त मजबूत आहे.
ज्याची स्वप्नं तुटलेल्या हाडांवर नाही,
तर न थकणाऱ्या मनावर उभी आहेत.
आणि ज्याचं आयुष्य
एक अद्भुत उदाहरण आहे.

मी पडलेलो नाही,
मी थांबलेलो नाही,
मी तुटलेलो नाही.

मी आहे
जिद्दीचा, आत्मविश्वासाचा, आणि आशेचा प्रवासी.

आणि माझा प्रवास अजून खूप लांब आहे…

©® सचिन कमल गणपतराव मुळे...
परभणी, ९७६७३२३३१५
0