Login

आय मिस्ड यू! ( भाग ३) अंतिम

Untold Love Story
आय मिस्ड यु ! (भाग ३)

दोन महिन्यांनी मुला आणि मुलींचे कॉमन गेट टुगेदर झाले. चैत्रालीने दोन-तीन वेळा नमिताला आग्रह केला, घरातली परिस्थिती पाहता किंवा तिच्या मनातल्या त्या भीतीपोटी तिला जायचं नव्हतं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या असूनही मिताने सासऱ्यांच्या तब्येतीच कारण देऊन टाळलं. नमिताने कारण असं दिलं की मैत्रिणी काहीच म्हणू शकल्या नाहीत. मनात वाटलं कोण कोण आला असेल कोण भेटला असेल वगैरे पण तिने तो विचार बाजूला ठेवला.


त्यानंतर आठ दहा दिवसात अचानक एक दिवस चैत्राली घरी आली आणि आल्यावर , खोलीत बसून गप्पा मारताना नमिताच्या हातात एक रुमाल आणि चिठ्ठी दिली. रुमाला वरती तिच्या नावाचं अक्षर लिहिलं होतं.

चिठ्ठी बद्दल विचारलं तरीही ती काहीच सांगेना , उघडून पाहिलं त्यात लिहिलं होतं ,"आय मिस्ड यु!"

" कोणी दिली?" नमिताचा टोन बदलला. तिने पटकन बेडरूमच दार लावून घेतलं. घरात या गप्पा कुणी ऐकलं तर काय म्हणतील.

चैत्राली म्हणाली ," आणखी कोण? अंकुश! बिचारा अंकुश केवळ तुला भेटण्यासाठी तिथे आला होता. बारावी नंतर दोन तीन वेळा मला ते भेटला होता आणि सतत तुझी चौकशी करायचा. आपण बीकॉम झालो त्यानंतर एकदा बाजारात अचानक भेटला होता मला रस प्यायला घेऊन गेला त्यावेळीही तुझ्याबद्दल विचारलं होतं तुझं लग्न झालं हे सांगितलं मग त्यानंतर माझा आणि त्याचा काहीच संपर्क नव्हता तुझ्या घरातलं वातावरण आणि तुझं वागणं पाहून मला हे काहीच कधी तुला सांगावं वाटलं नाही नेहमी भेटला तेव्हा बाकीच्या सगळ्या गप्पा मी मारायचे पण तुही कधी त्याचा विषय काढला नाहीस पण आज मला वाटलं की आयुष्याच्या या टप्प्यावरती तरी किमान आपल्याला या गोष्टी कळायला हव्यात. किंवा त्याचा निचरा व्हायला हवा."

" चैतु त्याने काय होईल? काय उपयोग?"

" सगळ्या गोष्टी काही उपयोगासाठी नसतात नमु, काही भावनिक गरज असतात काही माणसे गरज असतात सगळं काही पैसा आणि आर्थिक सुबत्ताच नसते. तुला माहितीये गेट-टुगेदर मध्ये काय झालं?"

" मला कसं माहित असणार? तू सांगशील तरच कळेल ना! बरं सांग काय झालं?"


" दुसऱ्या सगळ्यांचा सोड. आम्ही खूप मजा केली. एकत्र वेळ घालवला, गाण्याच्या भेंड्या खेळल्या, तुझी खूप आठवण काढली आम्ही सगळ्यांनी . . पण मला अंकुश बद्दल सांगायचे आहे . दुपारी जेवणानंतर तो माझ्याशी बोलण्यासाठी आला आणि माझ्याजवळ तो तुझ्यासाठी रडला. नमु, तू त्याला किमान त्यावेळी नाही असं सांगायला पाहिजे होतं, तुझं काहीच न बोलणं त्याच्या खूपच जिव्हारी लागलं होतं. त्याच्या मनात त्याची गरिबी खोलवर रुतली होती. तो सांगत होता की खूप मेहनतीने केवळ तुला मिळवण्यासाठी त्याने धडपड केली आणि आज तो मंत्रालयात खूप मोठ्या पोस्ट वर आहे."

" काय सांगतेस? इज इट?" नमिता तर उडालीच.


' आणि हो तुझं लग्न झाल्यावरही पाच सात वर्षे त्याने अविवाहित राहण्याचे ठरवले होते पण आईसाठी आणि मामांसाठी आता दोन वर्षापूर्वी त्याने लग्न केलेआहे . . . आयुष्यात आज सगळं आहे पण मी नमिताला गमावलं!' असं तो माझ्याजवळ म्हणाला. केवळ तुला एकदा भेटण्यासाठी तो आला होता. बाकी शांतच बसून होता. मला वाटतं त्याचं खूप खोलवर प्रेम होतं तुझ्यावर आय मीन आहे, ते तुला सांगण्यासाठीच त्यांने ही चिठ्ठी दिली."

नमिताला आता प्रेमाचा अर्थ कळत होता, या क्षणी तिला काहीच बोलायचं नव्हतं पण त्याच्या त्या समर्पणामुळे तिच्या डोळ्यातून दोन अश्रूंच्या धारा निघाल्याच . ते आकर्षण नव्हतं, प्रेम होतं तर! चैतुच बोलणं ऐकून ती खोलवर हलली होती. ते पण केवढा सुंदर होता, गोरा गोमटा. . . पण त्या एका वाक्याने मी त्याचा तिरस्कार करत राहिले. असा विचार मनात डोकावला. तोही आवडायचा का आपल्याला? तिने स्वतः लाच विचारलं.

आपण कुणासाठी तरी इतके महत्त्वाचे होतो की वाईट परिस्थितीत ही त्याने त्याचे आयुष्य घडवले या भावनेने मनात पीळ पडला.

ती चैत्राली ला म्हणाली "येस,ही मिस्ड मी. तेव्हा पण आता गेट टुगेदर मधे पण. . काय करणार? काही गोष्टी भाग्यात नसतात."

"तुला तर त्याच्याबद्दल काहीच वाटत नव्हतं, मग आता का डोळे इतके भरून आलेत?" चैत्रालीने हळूच विचारलं.

"इतक्या कोवळ्या वयापासून कुणी कुणावर इतकं प्रेम करू शकते यावर माझा विश्वास नव्हता. ते मत आज बदललं आणि आता या क्षणी चैत्राली असं वाटतं आहे की त्याने मला मिळवलं, मी सतत सोबत होते, त्याची प्रेरणा बनून . . . खरं पाहिलं तर गमावलं मी, नाही का! माझ्यावर इतके प्रेम करणारा कुणी या जगात आहे ही भावनाच किती सुखावह आहे. ऍक्च्युली आय मिस्ड हिम!"

चैत्राली ने तिला मिठी मारली आणि तिची पाठ थोपटली.

***********
समाप्त

©®स्वाती बालूरकर, सखी
दिनांक १५.०२.२५

🎭 Series Post

View all