Login

आय मिस्ड यु! (भाग १)

Untold Love Story
आय मिस्ड यू! (भाग १)


काल चैत्रालीने फोन केला , "नमिता किती वर्षांनी आपले गेट-टुगेदर होणार आहे, मस्तपैकी भेटू आपण!"

"अगं, पण गेट-टुगेदर फक्त मैत्रिणींचे असेल तर मी येईन पण कॉमन असेल तर येणार नाही."

" हे नवीन काय? आणि कॉमन म्हणजे. . मित्र आणि मैत्रिणी ? आपण एकाच क्लासमध्ये असणारे सगळेजण भेटणार आहोत ना. अनोळखी कोण आहे त्यात ग?"

" चैतु, इतक्या वर्षानंतर भेटल्यावर ती वर्गमित्र मुलं तेव्हाची मुले नसतात अनोळखी माणसंच असतात ना! पण म्हणजे काय पूर्वीसारखं राहतं सांग? सगळं बदललेलं असतं." नमिता टाळत होती.

"हा विचार चूक आहे बरं का! मला तर असं वाटतं की आपण मित्र मैत्रिणींना भेटतो तेव्हा निर्व्याजपणे भेटतो आणि आपण बालमित्रांमध्ये ओरिजिनल असतो नाही का! मित्रांमध्ये आपण कुठे दिखावा करत नाही."

"पण , इतक्या वर्षानंतर एकदम भेटल्यावर आपण तेवढे कम्फर्टेबल असू का? मुलं सुद्धा आता मोठी माणसं झालेली आहेत ना, आपल्या मुलीसोबत किंवा बायका आणि मैत्रिणींसोबत थोडसं शेअरिंग होऊ शकतं पण मुलांसोबत नाही बाई!"

" नमिता , हे काय?किती फ्री आणि निवांत होतीस गं शाळेत असताना. . . बघ ,जग कुठे चालले आहे आणि तू अजून किती जुन्या विचारांमध्ये अडकली आहेस? बरं, मुलींचे गेट-टुगेदर झालं तर येशील का?"

" हो , नक्की विचार करेन. खरं तर मला ते गेट टुगेदर आवडत नाही आणि माझ्या नवऱ्याला तर मुळीच आवडत नाही, त्यामुळे मला पण त्यात काय विशेष इंटरेस्ट राहिला नाही आता ."

"जुन्या बालमित्राना भेटण्यात इंटरेस्टची काय गोष्ट आहे? कळत नाही. स्वतः नोकरी करून देखील असा विचार करते? असो. ठरले तर नक्की कळवेन तुला. विचार बदलला तर सांग. थोडी बाहेर पड यासगळ्यातून."
चैत्राली विचारातच पडली.

**********


नमिता कारीडोरमध्ये वह्या तपासत बसली होती.
मानसी आसपास घुटमळत होती.

" मानसी क्लास नाही का तुला?"

"अहो मॅडम सध्या गेम्स क्लास आहे आणि सगळे गेम्सला गेलेत पण मी नाही गेले ."

" का गं, काही अभ्यास अपूर्ण आहे का?"

" नाही मॅम, मी आज खूप डिस्टर्ब आहे, माझं मन कुठेच लागत नाही."

नमिताने लक्ष देऊन विचारलं," तब्येत बरी नाहीये का?"

" नाही मॅम, म्हणजे बोलते तुमच्याशी पण इथे नको ना, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही खूप फ्रेंडली राहता आणि मला खूप आदर आहे तुमच्याबद्दल म्हणजे. . .
म्हणजे मी तुमच्याशी बोलण्यासाठीच थांबले इथे."


" मानसी, शांत हो , पण आज काय विशेष आहे सांगशील?"

" खरं तर तुमच्याशी बोलण्यासाठीच मी इथे थांबली आहे, तुम्ही आज शिकवताना क्लासमध्ये मुलांच्या वागण्याला आणि हसण्याला पाहून म्हणालात की आम्ही पण नववी दहावीत होतो. . .सगळेजण त्यावेळी हसले. मॅम पण मी विचारात पडले, खरच ना , तुम्ही नववी दहावीत होतात तेव्हा तुम्ही हे सगळे प्रॉब्लेम कसे हँडल करायचा? मला राहून राहून वाटलं की माझं हे टेन्शन तुम्हीच समजून घेऊ शकता."

" बोल ना मानसी , प्रस्तावनेची गरज नाही. सध्या मी तुझी काय मदत करू शकते?"

" सांगते मॅडम, पण?

" हो हो, थोडं बाजूच्या वर्गामध्ये मध्ये बसुयात का? चल आलेच."

बाजूच्या क्लास रूम मध्ये गेल्यानंतर तिने हातातला एक पेपर नमिताला दिला आणि अचानक रडायला लागली .

पेपर वरती 'मानसी' असे लिहिलेले होते शिवाय त्यात एक लाल बदाम काढलेला, त्यात बाण होता आणि खाली 'मनोज' असे लिहिलेले होते .

नमिता विचारात पडली.

"हे काय ,कोणी लिहिले ?"

"माहित नाही पण हे असंच चाललं आहे आज काल . परवा पण बेंच वरती खडूने काहीतरी घाणेरडे लिहिलं होतं माझ्याबद्दल, मग त्या दिवशी मी खूप रडले. काय करू मला कळत नाहीय. माझी काय चूक आहे?"

"मग कुणा शिक्षकांना सांगायचं ना, दाखव बरं कुठे?"

"मॅम मी बेंचवरचं सगळं रुमालाने पुसून स्वच्छ केलं. कालच्या प्रश्न पत्रिकेत सुद्धा कोणीतरी असेच दोघांचे नाव लिहिले होते."

" मला एक सांग, तिन्ही वेळेला मनोजच नाव होतं का?"

" हो ना मॅम, म्हणूनच तर. . . "

" अगं पण मनोजचं नाव का? तो तर दुसऱ्या सेक्शन मध्ये आहे ना !"

"हो मॅडम, दुसऱ्या सेक्शन मध्ये असला तरी तो आणि मी एकच बसमध्ये येतो ना ! आम्ही बोलत असतो मग काहीतरी. मी आठ दिवस शाळेत आले नव्हते तर त्याने मागच्या महिन्यात माझी अभ्यासात खूप मदत केली, मी जर कधी अनुपस्थित असेल मदत तो नोट्स देतो, कदाचित म्हणूनच ! पण तो खूप चांगला आहे मॅम."

" ठीक आहे ना, असेल पण तुम्ही मित्र आहात ना? आजकाल तर सर्रास अशी मैत्री चालते, मुलगा आणि मुलगी बोलले म्हणजे काय लगेच असं काही नसतं?"

" पण दुसऱ्यांना तर तसंच वाटतं ना!"

" नाही मानसी, अगं तुम्ही कसे बोलता ,काय बोलता ? हे लक्षात येतं, म्हणजे लोक पाहत असतात. पण एक सांग हे कोणी लिहिले हे कल्पना आहे का तुला?"

"बहुतेक क्षिप्रा ने लिहिले आहे, मी तिचे अक्षर ओळखते. तिने की नाही आठवड्यापासून माझ्याशी बोलणं बंद केले आहे. आम्ही चांगल्या मैत्रिणी आहोत पण ती म्हणाली की मनोज आणि तुझं हे काहीतरी चालू आहे त्यामुळे पूर्ण वर्ग तुमच्या दोघांबद्दल काहीबाही बोलतो आहे. बहुतेक तिच्या आईने तिला सांगितले की माझ्याबरोबर मैत्री नाही ठेवायची."

"असं काय हे?" नमिता विचारात पडली.

"मी चांगली मुलगी नाहीये म्हणे . . आणि . . "
ती पुन्हा रडायला लागली.

"बरं तू सांग ,तुला मैत्री सोडून आणखी काही भावना आहेत का मनोज बद्दल ?" मिताने तिला जवळ घेतलं.

"नाही ना!"

"अच्छा आणि त्याला ?"

"मला नाही माहिती. . त्याचं काही असेल तर ? "

नमिताने तिला पाठीवर थोपटले आणि म्हणाली," मानसी मला एक सांग की आता या सगळ्यात पडण्याचं वय आहे का? मला तूच सांग, पंधरा सोळा वर्षात या वयाला तुम्हाला काय कळणार? घरी पण . ."

" मॅम माझे बाबा खूप कडक आहेत. त्यांच्या कानावर जर हे गेलं तर ते माझं शिक्षण बंद करून टाकतील.त्यांनी माझ्या आईला अगोदरच बजावलं होतं."

" मानसी असं काही होणार नाही. दहावीची परीक्षा दोन तीन महिन्यांवरती आली आहे. अभ्यासवर लक्ष केंद्रित कर. मानसी फोकस कर बेटा, या सगळ्यात पडू नकोस. कॅन आय फाईंड चेंज इन यू?"

"येस मॅम, प्रॉमिस !"

प्रॉमिस देऊन ती हसत पळत गेली पुन्हा दोन मिनिटात परत आली आणि म्हणाली ,"मी मनोजशी बोलणार नाही पण तो बोलला तर. . मी काय करू?"

नमिताने तिच्या डोक्यावर टपली मारली आणि म्हणाली," "तो बोलायला लागला की त्याला माझ्याकडे पाठव."

ती निरागसतेने हो म्हणाली.

आठवी ते दहावी शिकवणाऱ्या शिक्षकांना अशा प्रसंगांना नेहमीच सामोरे जावे लागते. अगदी मागच्याच महिन्यामध्ये एक पेरेंट नमीताला म्हणत होते की 'आम्ही पालक म्हणून भेटायला येतो तेव्हा तुम्ही नेहमी पेपर दाखवता आणि अभ्यासाबद्दल बोलता, यावेळी माझ्या मुलीचे मार्क नका सांगू . ती क्लासमध्ये कशी वागते, बोलते? मुलांशी बोलते का ? खोटे बोलते का? काही बहाणे करते का? तिची वागणूक कशी आहे सांगा? मार्क काय ती मिळवेलच आता नाही तर पुढच्यावर्षी. तुम्ही मला तिच्याबद्दल बाकीचे सांगा ."

"आम्ही तर लक्ष देत आहोत, काही असेल तर आम्ही नक्की सांगू." असं म्हणून नमिताने त्यांना परत पाठवलं होतं.

आज या प्रसंगानंतर नमिता विचारात पडली होती की आपण या वयात किती बुजरे होतो, संस्कारांचा कसला पगडा होता आणि मोठ्या माणसांची किती भीती होती.
आपणही विचित्र वागलो होतो, असंच केलं होतं जेव्हा तो प्रसंग घडला होता. तेव्हा हे सगळं सांगायला कुणी नव्हतं इतकंच.

आज मनात राहून राहून दहावीत घडलेला तो प्रसंग पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत होता.

आज शाळेतून ती निघाली आणि घरी जेव्हा निवांत वेळ मिळाला तेव्हा ती मानसीचा विचार करू लागली .

मानसी सारख्याच वयात तिच्यासोबतही झालेली एक छोटीशी घटना, पण त्याचा प्रभाव इतके वर्ष तिच्या मनात दडून राहिला.

काल जेव्हा चैताली चा फोन आला तेव्हाही तिला सांगता येत नव्हतं की काय प्रॉब्लेम आहे , म्हणजे स्वतःलाच कळत नव्हतं किंवा अप्रत्यक्षपणे ती ते गेट-टुगेदर का टाळत होती!

*****************

क्रमशः
©® स्वाती बालूरकर, सखी
दिनांक
१५.०२.२५


🎭 Series Post

View all