या वर्षी रोजी 31मे 2025 राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती. यानिमित्त मी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे काही शब्द लिहून त्यांच्या पायी माझे लेखन अर्पण करत आहे. सर्व प्रथम पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांना माझा प्रणाम.
राजमातेचा शिवलिंग हाती असलेला एकच फोटो मी लहानपणापासून घरी पाहिलेला. त्यामुळे अहिल्यादेवी ह्या खूप धार्मिक असतील असेच मला वाटायचे. पुढे ही फक्त माझीच नाही तर इतरही बऱ्याच लोकांची धारणा असल्याचे मला कळून आले. तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी जागोजागी महादेवाची मंदिरे बांधल्याचेहि मी ऐकून होते त्यामुळे ही मानसिकता आणखीच प्रबळ झाली. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी फक्त मंदिरं बांधण्यावर, इतर पडित जुन्या मंदिरांचा जिर्णोद्धार करण्यावर त्या काळात आपली संपत्ती नको तिथे मोठ्या प्रमाणात खर्च केली असे बऱ्याच लोकांच्या मनात घर करून असल्याचेही माझ्यासमोर आले. तेव्हा माझ्या मनात नक्की खरं काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली.
मात्र यावर प्रकाश टाकणारे, सविस्तर इतिहास संशोधन झालेले वाचन केले असता असे लक्षात येते कि अहिल्यादेवी ह्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. जशी त्यांची महादेवाच्या ठायी भक्ती होती तशीच त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीवहि होती. सर्वधर्म समभाव त्यांच्या हृदयीं होता. म्हणून त्यांच्यावर प्रजेचे प्रेम होते. त्यामुळेच त्यांना लोकमाता असे म्हटले जाते. वेळ पडली तेव्हा त्या आपल्या प्रजेच्या रक्षणार्थ तलवार घेउन रणांगणातहि उतरल्या, त्यांनी स्त्रियांना शिक्षित केले, त्यांची फौज निर्माण केली. अन बंडखोरांचा बंदोबस्त केला.
राजमाता अहिल्यादेवी यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्याशा खेड्यात धनगर समाजातील माणकोजी व सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला. माणकोजी शिंदे यांची परिस्थिती तशी सर्वसामान्य होती. तेव्हा अठराव्या शतकामध्ये आजच्या सारखी शिक्षणाची साधने उपलब्ध नव्हती. शिक्षक स्वतः घरी जाऊन शिकवायचे. त्यातही मुलींना शिकवणे तर अगदी दुर्मिळ. तरीही विद्वान व दूरदर्शी असलेल्या माणकोजी शिंदे यांनी राजमाता अहिल्या देवीच्या शिक्षणाची घरीच व्यवस्था केली. अहिल्या मातेचे जीवन घडविण्यात त्यांचा फार मोलाचा वाटा म्हणावा लागेल. त्यांच्यासारखे पिता नसते तर माता अहिल्यादेवी इतक्या निर्भिड नसत्या असेच म्हणावे लागेल.
पुढे राजमाता अहिल्यादेवी अवघ्या आठ वर्षाच्या असतानाच होळकर घराण्याचे संस्थापक राजर्षी मल्हारराव होळकरांच्या बारा वर्षाच्या एकुलत्या एक शूरवीर मुलाशी, खंडेराव यांच्याशी राजमाता अहिल्यादेवीचा विवाह 20 मे 1733 रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे संप्पन्न झाला. इतक्या मोठ्या घराण्याची सून झाल्यावरही त्यांच्यातील करुणा जराही कमी झाली नाही. उलट लग्न झाल्यानंतर माता अहिल्यादेवीने आपल्या सुशील, क्षमाशील व शांत स्वभावाने सासरी सर्वांची मने जिंकली. त्यांची कुवत त्यांचे सासरे श्री मल्हारराव जाणून होते. म्हणून त्यांनी राजमाता अहिल्यादेवीला त्या पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या त्या काळात तत्कालीन दरबाराची मोडी लिपी लिहायला व वाचायला शिकवली. तसेच त्यांना इतरही गणितीय व्यवहाराचे ज्ञान देण्यात आले. इतकेच नाही तर घोडसवारी करणे, दांडपट्टा फिरवणे, युद्ध करने, राजकारणाचे डावपेच आखणे, लढाई करणे, पत्रव्यवहार व न्याय पद्धती याचेही प्रशिक्षण दिले. परिणामी आधीच हुशार असलेल्या अहिल्यादेवी यांची सामाजिक व राजकीय बुद्धी परिपक्व झाली. माणकोजी यांच्यासारखे पिता व मल्हारराव यांच्यासारखे सासरे लाभले तर घरोघरी आपल्याला राजमाता अहिल्यादेवी यांचा अंश पाहायला मिळेल इतकेच मी इथे बोलू इच्छिते.
पुढे इ. स. 1754 मध्ये कुंभेरीच्या लढाईत राजमाता अहिल्यादेवी यांचे शूरवीर पती खंडेराव यांना वीरमरण आले. वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी त्या विधवा झाल्या. जुन्या रूढी परंपरेनुसार त्यांच्यावर सती जाण्यासाठी दबाव देण्यात आला. परंतु राजमाता अहिल्यादेवी यांचे सामर्थ्य लक्षात घेऊन मल्हारराव होळकर यांनी त्यांच्या सती जाण्याला नकार दिला व त्यांना लोककल्याणासाठी जग असा संदेश दिला. सती न जाणे म्हणजे आयुष्यभर लोकनिंदा व चारित्र्यावर शिंतोडे हे माहिती असूनही सती जाणे तहकूब करण्यात अहिल्यादेवी यांनी जे मनोधैर्य दाखवले ते अद्वितीय आहे. आपण सती गेलो तर स्वर्ग मिळेल किंवा नाही कोण जाणे. परंतु जगलो तर लाखो प्रजाजनांना सुख देता येईल असा विचार करून अहिल्यादेवी यांनी प्रजेच्या हितासाठी जगण्याचा निर्णय घेतला व धर्म ,रूढी ,परंपरा यापलीकडे कर्तव्य महत्त्वाचे माणून रयतेला कल्याणकारी राज्य दिले.
पुढे रामायण किंवा महाभारतात किती युद्ध झाली, पुरुषांचे देहावसान झाले व स्त्रिया विधवा झाल्या पण कोणीही विधवा स्त्री सती गेल्याचा कुठेच उल्लेख नाही मग आपणच का अशी प्रथा पाळतो? अशी उदाहरनं देऊन सती प्रथेला शास्त्राचा आधार नाही हे माता अहिल्यादेवी यांनी जनतेला पटवून दिलं. त्या काळात विधवा बाईला पतीच्या मिळकतीवर हक्क दाखवता येत नव्हता. मुलगा असेल तर तिच्या पतीची मिळकत मुलाला जात होती नाहीतर घरातील इतर पुरुष सदस्याला ती मिळायची. तेव्हा विधवांना जगायला आधार म्हणून पतीची मिळकत स्वतः जवळ ठेवता येईल अशी तरतूद अहिल्यादेवी यांनी केली. तसेच विधवांना जीवन आधार, ममतेचा भाव जपण्यासाठी मुलं दत्तक घेता येणं सोपं केलं. अहिल्या मातेने परदा पद्धत कधीच पळाली नाही. त्या रोज जनता दरबार भरवीत असत, प्रजेची गाऱ्हाणी ऐकण्यास हजर असत. त्यांनी जातपात मानली नाही याचं मोठं उदाहरण म्हणजे त्यांच्या कन्येचा विवाह यशवंतराव फणसे या इतर जातीच्या पण गुणी व शूर तरुणाशी त्यांनी करून दिला होता. इथे मी भर देऊन सांगू इच्छिते हो त्या धर्मपारायण होत्या पण केवळ मंदिरांचा जीर्णोद्धार करूनच त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी अन्नछत्रे उघडली, विहिरी खोदून त्या चिरेबंद बांधून दिल्या. उन्हाळ्यात राज्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी पाणपोया, धर्मशाळा, आश्रमशाळा बांधल्या. लोकं त्यांना तत्वज्ञानाची राणी म्हणून ओळखू लागले.
पुत्र मालेरावांच्या देहावसना नंतर अहिल्यादेवी खऱ्या अर्थाने राज्यकर्ती झाल्या. बाई काय राज्यकारभार करणार? ही दरबारीं मंडळींची अटकळ त्यांनी सपशेल खोटी ठरवली.
एकापाठोपाठ सासरे व मुलाच्या मृत्यूनंतर दुःखाने घेरलेल्या राजमाता अहिल्यादेवी यांनी खचून न जाता इंदोर वरून संस्थानाची राजधानी महेश्वर या ठिकाणी आणून कारागीर ,मजूर, विणकर, कलावंत ,साहित्यिक अशा गुणी लोकांच्या विकासासाठी जमीन, पैसा, घर इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या. आजही महेश्वरी साड्या, पैठणी, धोतर प्रसिद्ध आहेत. राज्यात पशुपक्षी यांना चरण्यासाठी मातेने जागोजागी कुरणे राखली.
मुंग्यांना साखर, माश्यांना कणकेचा गोळा, उन्हाळ्यात वाटसरूंना पिण्यासाठी पाणपोया, हिवाळ्यात गरजूंना गरम कपडे यांची सोय केली. आपल्या राज्यात सूक्ष्म जीवही उपाशी राहू नयेत यासाठी दक्षता घेतली. दिव्यांग, अनाथ व असहाय्य लोकांचे पुनर्वसन केले. गोरगरिबांसाठी अन्नछत्रे व सदावर्ते चालविली. वस्त्रांचे वाटप केले. प्रवाशांसाठी मार्गावर अरण्यमय प्रदेशातही आंबराई, बगीचे ,वृक्षारोपण विश्रांतीसाठी ओटे व धर्मशाळा बांधल्या. घाट बांधतांना केवळ तज्ञांची मतं विचारात न घेता प्रत्यक्ष त्या भागातील स्त्रियांशी बोलून घाटाच्या पायऱ्या कशा हव्यात , कपडे धुताना बाळ कुठे ठेवायला सोयीस्कर पडेल, कपडे बदलताना खोल्या कुठे असाव्यात? इतक्या बारीक तपशिलासह घाट बांधून घेतले.
अशा कर्तव्यदक्ष स्त्रीच्या एका हातात तलवार तर दुसऱ्या हातात पुस्तक किती शोभेल ! कल्पना करा अशा त्यांच्या चित्राची, खूप छान वाटतं ना.
मला वसंतराव सोनोने (संदर्भ - 31/05/2016 सकाळ वृत्तपत्रात त्यांच्या लेख) ह्यांनी लिहिलेल्या काही ओळी खुपच भावल्या. त्या अशा कि ,
'सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करणाऱ्या टिळकांच्या हातात गणपती किंवा त्यांना गणपतीची पूजा करतांना कोठेही दाखवलेले नाही. परंतु आपल्या तलवारीच्या बळावर व बुद्धिमत्तेच्या जोरावर सुखाचे राज्य टिकवणारी रणरागिणी अहिल्याबाईंना जाणीवपुर्वक दुर्लक्षित ठेवले गेले. त्यांना त्या फोटोच्या चौकटीत जणु कैद केले. असे मला मनापासुन वाटते."
इंग्रज लेखक लॉरेन्स यांनी राजमाता अहिल्यादेवीची तुलना रशियन राणी कॅथरीन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे. ती अशीच नाही ना.
नुकतंच विजया जहागीरदार यांचं 'कर्मयोगिनी' हे पुस्तक वाचलं. अप्रतिम व्यक्तिमत्व राजमाता अहिल्यादेवीचं डोळ्यांसमोर उभं राहिलं. प्रत्येक स्त्रीनं अंगिकारावं असंच.
राजमाता अहिल्यादेवीच्या चरणी आपल्या आवाजाची श्रद्धा सुमनं अर्पित करावी म्हणून यु ट्यूब वर गाणं शोधलं. तेव्हा अहिल्याफिल्म्सचं, "मी अहिल्या होणार गं !" हे गाणं मिळालं. खूपच सुंदर शब्दांकन. लेखकाचा व गायिकेचा उल्लेख नाही तिथं म्हणून इथेही नावं लिहिली नाहीत.
शेवटी दोन ओळी या गाण्याच्या लिहायचा मोह मला आवरत नाही आहे त्या अशा,
नारी जातीत जन्म घेतला, अहिल्या होणार गं
पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊनि भंडारा लेणार गं
मी अहिल्या होणार गं
मी अहिल्या होणार गं !
पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊनि भंडारा लेणार गं
मी अहिल्या होणार गं
मी अहिल्या होणार गं !
(नोट : माझा या लेखाद्वारे कोणावर टीका टिपणी करायचा मुळीच उद्देश नाही. तरीही एखाद्याचं मन दुखलं असेल तर क्षमस्व असावे.)
©®अर्चना सोनाग्रे