Login

तुझ्याच आयुष्याची वाटेकरी व्हायचे आहे भाग ५५

खूप सार्‍या अडचणीनंतर आज सायली आणि विजय एकत्र झाले होते. यावेळेसही त्यांना खूप साऱ्या सरप्राईज ला सामोरे जावे लागले.

मागील भागात. 

“खुप वाईट आहात तुम्ही, मला रागावू पण देत नाही.” विजयच्या हातात तिचा हात गुंफवत सायली बोलली.

थोड्यावेळाने दोघ तिथुन निघाले. परत येता येता दुपार झाली. मग दोघांनाही कल्याणमध्ये लंच केल. सायलीला तिच्या ऑफीस मध्ये सोडुन तो शॉरुमवर निघुन गेला. 

थोड्यावेळाने टिनाने सायली ला फोन केला. 

“आज फिर से काट लिया क्या तुझे??” टिना

आता पुढे. 

“चुप न, क्या बके जा रही है “ सायली

“अरे, आज तो कुछ अलग ही नुर है साहब का. मुझे देखके दो तीन रॉमंटीक शायरी बोली. हर किसी की टांग खिंच रहा है. आज तो साजिद सर को भी नही छोडा उसने. वो भी पागलों की भांती हस रहे है. मैं कंप्लेन्ट नही कर रही उसकी. बट बहोत अच्छा लगा की वो खुल के जी रहा है” टिनाचे डोळे भरून आले. 

“समझ, सारे गिले शिकवे, दर्द दुर हो गये है.” सायली

“गॉड ब्लेस यु डिअर. ऐसेही हसते मुस्कुराते रहो.” बोलुन टिनाने फोन ठेवला. 

आता दोघांच्या लग्नाचे वेध लागले होते सगळ्यांना. ग्रुपला तर काहीतरी हटके करायच होत. म्हणून त्यांनी त्या म्युझिकल ग्रुपला बोलावल होत. कारण ह्या वेळेला कोणीही विजय पासुन लांब राहील तर लगेच त्याला कळुन जाईल आणि त्यांच्या सरप्राईजचा बँड वाजला असता. 

कोर्ट मॅरेज असल्याने, बाकी खर्च तर नव्हता. सायलीसाठी मंगळसुत्र घेतलेल होत. तर सायलीच्या वडीलांनी विजय साठी अंगठी. बाकी कपडे तर आधीच होते. सोनालीच्या साखरपुड्यात घेतलेले. आदल्या दिवशी हळद लावून दुसऱ्या दिवशी ते मॅरेज रजिस्ट्रार कडे जाणार होते.

प्राजक्ता तर तिथेच होती, आता राधीकाही येऊन पोहोचली होती. गावावरुन काका काकु, आत्या, मामा मामी त्यांचा मुलांसोबत आले होते. विजयला पुर्वीच्या रुपात पाहुन सगळ्यांनाच बर वाटल होत. विजयच्या नकळत तर ते सायली आणि रुद्रला भेटुन ही आले होते. 

ह्यावेळेस सोनाली, आरती, आराध्या, प्रणाली सायलीकडे गेल्या तर बाकी तिघ विजय कडे आले. हळदीच्या विधी तर घरातल्या घरात केल्या. घरातल्या घरात काय, सगळी चाळ जमा झाली होती. सगळ्यांच जेवण विजयच्या घरी झाल. 

घरातलेच मोठे स्पीकर बाहेर काढले आणि त्याचा ग्रुप, चाळीतले बाकीचे नाचायला भिडले. प्राजक्ता ही खुर्ची वरुन हलणार तोच विजय बोलला. 

“ह्या अवस्थेत जर भाऊजींनी तुला नाचताना पाहील न, तर पहीले ते माझा गळा धरतील.” विजय बारीक तोंड करत बोलला. 

“मी असताना बर धरु देईल.” प्राजक्ता

“नको न ताई. तुला आरामाची गरज आहे. एकदा का मी मामा झालो की पाहीजे तेवढ नाचुया.” विजयने प्राजक्ता चे गाल हातात घेत बोलला. 

“ठिक आहे. बसते मग.” प्राजक्ता. विजय परत आत गेला. 

नाचता नाचता जिया तिच्या वडीलांना फोन करायला जरा बाजुला गेली. ते उद्या येणार होते. तेवढ्यात जियाला कोणतरी बाजुला खेचुन घेतल. तिला ओढताना संदेशने पाहील होत. तिच्या सोबत जयेशने जे केल होत ते सगळ्या ग्रुपला कळल होत. त्यामुळे संदेशला शंका आली आणि तो तिच्या मागे आला होता. 

“अरे, बधीर झालास का?? एकदा सांगितले न तुला. माझा निर्णय फायनल आहे.” जिया मोठ्या आवाजात बोलली. 

“पण आयुष्य तुला काढायच आहे, त्यासाठी तुझ्या त्या दादाचा का विचार करतेयस? असा कोण लागुन गेला तो??” हेमंत जरा चिडून बोलला. 

“तुला जर तुझी हाड निट हवी असतील तर दादा बद्दल काही बोलायचे नाही” जियापण चिडून बोलली. “आणि दादाच्या ग्रुप समोर तर नाहीच नाही.”

“आधी तर तु त्याला भांडायचीस, मग आता काय झाल? मी त्याला काही बोलत नाहीये. उलट तु तुझ्या दादाचा विचार करतेयस याच नवल वाटल. पण एकदा माझ्या मनाचा विचार कर न” हेमंत. 

“नाही. मला दुसर काहीच बघायच नाहीये सध्या. मला आमच घर बँकेकडुन सोडवायच आहे. उद्या वहिनी येईल घरी. त्यांच बघाव लागेल. तु माझा विचार सोड. दादा ने सांगितल्याशिवाय मी काहीच बोलणार नाही.” जिया.

हेमंत जियाच्या आत्याचा मुलगा. जियाच बदलेल वागण बघुन त्याला ति आवडायला लागली होती. पण प्रेमात मिळलेला वाईट अनुभवामुळे ति आता या फंद्यात पडणार नव्हती. तिने आता सगळ विजय वर सोडल होत. कारण तो चुकीच्या हातात तिला जाऊ देणार नाही याची जाणीव तिला झाली होती. शेवटी तिची लाईफ पण विजयनेच सेट केली होती न. हेमंत वाईट मुलगा नव्हता. बँकेत नोकरीला लागला होता. पण त्याच अस डायरेक्ट येउन जियाला विचारण जियाला आवडल नव्हत. 

पण हेमंतच बोलण संदेशाच्या कानी पडलच. तो दोघांजवळ गेला. जियाला टेन्शन आल. कारण विजयला हलता येणार नव्हत आणि तिच बोलण काही संदेशने ऐकल नसत. संदेश जाऊन हेमंत ला पकडणार तोच जिया हिम्मत करुन बोलली. 

“दादा नको न.” जिया जरा चाचरली. संदेश थांबला. पण चिडला नाही. 

“तो दादाला नव्हता काही बोलत. माझ्या आत्याचा मुलगा आहे तो. मला लग्नासाठी विचारत होता. मी नाही बोलतेय तरी ऐकत नाहीये” जिया

संदेश “तिची इच्छा नाहीये तर तु का जबरदस्ती करतोय??”

संदेशचा आवाज ऐकून हेमंत जरा वरमला. “आता विषय सोड, लग्न झाल की बोलूया. तोवर हिच्या आसपासही दिसायच नाही” संदेश ने त्याला दम दिला. 

हेमंतने मनातच विचार केला ‘त्यांचही बरोबर आहे, मी अस डायरेक्ट विचारल तर कोणालाही रागच येईल. आता डायरेक्ट आई आणि मामांसोबतच बोलु म्हणजे विजयचा विषयच येणार नाही.' असा विचार करत तो निघुन गेला. 

“थँक्यू दादा” जिया हळुच बोलली. 

संदेशने हसुन तिच्या डोक्यावर हात ठेवला. इकडे विजय ही सायलीला फोन लावत होता. पण ती काही उचलत नव्हती. बाकी चौघींना फोन लावला तर त्या बोलुच देत नव्हत्या. 

सायलीच्या घरी ही हळद लावताना थोडा रडायचा कार्यक्रम झाला होता. मेहंदी पण काढली होती. सायली विजयला व्हिडीओ कॉल लावणार तेवढ्यात सोनालीने तिचा फोन काढुन घेतला. तिला तिची मेहंदी दाखवायची होती विजयला. 

“आता त्यांचा चेहरा उद्याच बघायला भेटेल. हळद लागली की एकमेकांना बघायच नसत.” सोनाली

“चल, उगाच काहीही बोलु नकोस. दे फोन मला.” सायली

“अय्यो, इतनी बेकरारी??” प्रणाली फुल नौटंकी मध्ये घुसली. 

“दे ना, सोना” सायली ओठ काढुन बारीक मुली सारखी बोलली. 

तोवर आरती आणि आराध्या पण येऊन बसल्या सायलीच्या बाजुला. 

“आरु मोबाईल दे ग तुझा.” सायली

“का?? तुझा कुठे आहे??” आराध्या

“नको देऊस ग. विजयला कॉल करायचा आहे तिला” सोनाली

“मग करु दे न” आराध्या सायलीला फोन देणार तोच सोनालीने तिचा हात पकडला. प्रणालीने डोळे मिचकावले. आराध्याला डाऊट आला. 

“अस काय करतेयस, मावशीच बोलल्या न की आता हळद लागलीये तर साहेबांच दर्शन उद्याच” प्रणाली

“आरु.” सायलीची ट्रिक सुरू झाली

“आता मावशीच बोलली तर मी कसा देऊ??” आराध्या

“नका देउ, बघेल मी माझ काय ते” सायली नाराज होऊन बोलली. “आज बोलण तर होणारच. मी नाही लावला तर त्यांचा नक्की येईल.” 

बाकी चौघी फक्त गालातल्या गालात हसत होत्या. तेवढ्यात सायलीचे वडील तिथे आले. 

“काय ग, तुझा फोन कुठे आहे?? विजय फोन करतोय कधीचा. घे माझ्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल केलाय.” सायलीच्या वडीलांनी सायलीकडे मोबाईल दिला. 

सायलीच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली. चौघी तर सायली कडे बघतच राहील्या. 

“काय ओ सरकार, तुमचा मोबाईल कुठे आहे??” विजय

“विचारा तुमच्या मैत्रीणींना” सायली तोंड वाकड करत बोलली. विजय हसला.

“म्हणे आता उद्याच बोलायच, हळद लागली म्हणून” सायली

“तुम्हाला तिची काळजी घ्यायला पाठवल आहे, त्रास द्यायला नाही” विजय चौघींकडे बघत बोलला. 

“बरोबर आहे, आता आमची काळजी कशाला करशील न?” प्रणाली तोंड पाडुन बोलली. 

“अय नौटंकीची दुकान, तुमची काळजी नसती तर तुम्हाला तुमचे लव्ह बर्ड्स तुम्हाला भेटले असते का?? आता माझ्या लव्ह बर्ड ची काळजी घ्यायला लावली तर लगेच नौटंकी करतेस का??” विजयने हसतच चौघींची नस पकडली. “तुमच्या सगळ्यांचे एक एक सिक्रेट मी तुमच्या नव-यांना सांगून देईल ह.”

तिघींनी त्यांची तोंड बारीक केली. 

“म्हणजे?? ह्या तिघींची असेल. पण माझ तर नसेल न?” आराध्या कॉन्फिडन्सने हसत बोलली. 

“हो का?? लहानपणी आंबे खुप आवडायचे न तुला?? इतके की….” विजय पुढे काही बोलणार तोच आराध्या बोलली. 

“दादा. मी माझ्या वहिनीची खुप चांगली काळजी घेईल” आराध्याने नरमाईचा सुर लावला. 

“हो, आम्ही आमच्या वहीनीची चांगली काळजी घेऊ” तिघी एकत्रच बोलल्या. तशी सायलीने तिची कॉलर ताठ केली. मग दोघांनी ब-याच गप्पा मारल्या. फोन ठेवल्यावर आराध्या ने सायलीकडे रोखुन बघायला सुरवात केली.

“काय??” सायली

“विजयला आंब्याच कोणी सांगीतल??” आराध्या

“मी तर नाही. कारण कधी विषयच नाही झाला न” साायलीलाही कळल नव्हत.

“पण मग आता कळलच आहे तर सांगूनच टाक न” सोनाली

“आम्ही नाही चिडवणार तुला प्रॅामीस” प्रणाली मासुम चेहरा करत बोलली. 

“ओओओ, हाऊ क्युट न” आराध्याने ओठांचा चंबू केला “माझ्या चेहऱ्यावर काही लिहील आहे का तुम्हाला सांगु मी.” तसा सगळ्याच हसायला लागल्या. मग सायली ने चौघींकडुन चांगलीच सेवा करुन घेतलेली होती.

“चला झोपा लवकर. उद्या लवकर उठायच आहे” सायलीच्या आईने येऊन मुलींच्या बोलण्याला ब्रेक दिला.

पाचही जणी सायलीच्या रुममध्ये पळाल्या. झोपताना ही चौघींनी सायलीला हनीमुनच्या विषयावरुन बरच पिडल होत. तिचा तो गोरा रंग अगदीच लाजेने लाल होऊन गेला होता. ब-याच वेळाने त्या झोपल्या होत्या. गप्पा मारता मारता जशा पडल्या होत्या तशाच त्या झोपून गेलेल्या होत्या. 

इकडे विजयला प्रत्येक घराच्या बाजुला बांबू लावलेले दिसले. विजय विचारात पडला. कारण मंडप तर सांगीतलेलाच नव्हता. 

“तुमच काही चालु तर नाही न??” विजय बारीक डोळे करत बोलला. तसे तिघ जरा चपापले. पण तस जाणवु दिल नाही.

“नाही, का रे काय झाल??” राहुल

“मग ते प्रत्येक घराला बांबू का लावले आहेत??” विजय

“आता ते आम्हाला काय माहीत. अजुन कोणाकडे काही असेल उद्या, परवा” संदेश

“अरे परवा आमच्याकडे पुजा आहे, म्हणून मंडप घालतोय.” शेजारच्या मावशींनी एन्ट्री घेत बाजु संभाळली. तेव्हा कुठे तिघांनी सुटकेचा श्वास सोडला. 

“मधुबाला जी, तुम्ही पण जर यांना सामील झाल्या न, तर तुमच गोड खाण तुमच्या लेकाला सांगुन देईल ह” विजय

“गप रे तु, आला मोठा धमकी देणारा. आणि मी काय यांच्या एवढी आहे त्यांच्यात सामील व्हायला” मावशी. तेव्हा कुठे विजयने तो विषय सोडला. तिघांनीही नजरेनेच मावशीचे आभार मानले. ते सगळे बराच उशीरा झोपले. 

दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीची आई जशी सायलीच्या रुममध्ये आली. तसा त्यांनी डोक्यालाच हात लावला. कारण पाचही जणी लहान मुली झोपतात तशा आडव्या तिडव्या एकमेकांवर हात पाय टाकुन झोपल्या होत्या. 

“गळ्यात मंगळसूत्र आहे म्हणूनच कळतय की लग्न झालय. नाहीतर कोण म्हणेल यांना की यांच लग्न झालय म्हणून.” सायलीच्या आईने हसतच त्यांचा फोटो काढला आणि त्यांच्या त्यांच्या आयांना पाठवला. प्रणालीचा फोटो अश्विनीच्या आईला पाठवला होता. सोबत कॅप्शन होत “माहेरवाशींणींचा माहेरवास.”

सायलीच्या आईने सगळ्यांना उठवल. सायलीला सकाळीच झापल. तिला झापताना बघुन चौघी हसत होत्या.

“खुप हसायला येतय न. जरा वेळ थांबा” सायलीची आई गुढ हसली. चौघी एकमेकींना बघायला लागल्या. चौघींचे फोन वाजायला लागले. त्यांच्या त्यांच्या आईचा फोन होता. आता ऐकुन घेण्याकडे दुसरा पर्याय नव्हता. 

“फोन स्पिकरवर टाका” सायलीची आई

मग चौघींनी फोन स्पिकरवर टाकला. त्यांनी ओरडायला सुरवात केली. पण जास्त वेळ त्यांना ते नाटक करायला जमले नाही. मग सगळ्या हसायला लागल्या. पाचही जणी आपल्या आईकडे बघुन गोंधळल्या होत्या. 

“माहेरी आहात म्हणून करतेय माफ. करा मजा करा. फक्त सासरी अस नका वागु म्हणजे झाल.” सायलीची आई जेव्हा अस बोलली तेव्हा पाचही जणींच्या जिवात जीव आला. शेवटी त्याही त्यांच माहेर सोडूनच आल्या होत्या न. माहेरची ओढ त्यांना चांगलीच माहीती होती. मग सगळ्या आवरायला पळाल्या. 

घरातुन निघताना सायलीनेही तिच्या सगळ्या घरावर हात फिरवला होता. सगळ डोळ्यात साठवुन घेत ती घराबाहेर पडली होती. विजयला आवडत म्हणून लाईम ग्रीन रंगाची पैठणी तिने नेसली होती. आराध्या ने तिच्या नेहमीच्या मेकअप आर्टीस्ट ला बोलावून सायलीचा छानसा मेकअप केला होता. 

इकडे विजयचा मेकअप जियाने करुन दिलेला होता. ति प्रोफेशनल मेकअप आर्टीस्ट पण होती. बाकी घरातल आवरुन मग ते सगळेच निघाले मॅरेज रजिस्ट्रार कडे जायला. राहुल, संदेश, महेश जरा जास्तच बिझी होते फोनवर. विजय त्या तिघांकडे बारीक डोळे करुन बघत होता. तिघांना कळल की विजयला शंका यायला सुरवात झालीये. 

“अग आरु, किती वेळ लागेल तुम्हाला पोहोचायला??” राहुल

“आई तुम्ही पोहोचलाय का??” संदेश

“हा बाबा, मिठाईचे बॉक्स घेऊन या” महेश

तिघेही मुद्दाम मोठ्याने बोलले. पण विजय शेवटी विजय होता. एवढ्याने विजयच काही समाधान झाल नव्हत. त्याच विचारात ते सगळे मॅरेज रजिस्ट्रार कडे पोहोचले होते. सायली पण तिच्या आई वडिलांसोबत येऊन पोहोचली होती. रुद्र ने नेहमीसारखी धावती भेट दिली होती. मोहीते साहेबांनीही आजचा दिवस राहून ठेवला होता. राजेश, संकेत सोबत त्यांच्या आईवडीलांना ही घेऊन आला होता. सगळ्या ग्रुप मेंबर चे आई वडील येऊन पोहोचले होते. फक्त आरतीची आई नव्हती. कारण प्राजु जवळ दुसर कोणी नव्हत. तिला यायच होत पण विजयनेच मनाई केली होती. तिला त्रास नको म्हणून. एवढा गोतावळा पाहुन चे मॅरेज रजिस्ट्रार ऑफीस मधले सगळेच गांगरून गेले होते. 

सायलीला त्या पैठणीमध्ये बघुन विजय पुर्ण ब्लँक झाला. 

“दादु, अरे चल. एकदा का सही झाली की तिलाच बघायच आहे.” जियाने विजयला भानावर आणल होत. 

सही करताना विजय आणि सायली एकमेकांकडे बघत होते. दोघांच्या चेह-यावर एक समाधान होत. दोघांनी एकमेकांचे हात घट्ट धरुन ठेवलेले होते. सगळ्या प्रोसिजर पार पडल्या. दोघांनी एकमेकांना हार घातला. आज सायली आणि विजय ऑफिशियली एकत्र झाले होते. सायलीच्या आईच्या, आजोबांच्या, आज्जीच्या पापण्या ओलावल्या होत्या. बाहेर पडताना सायलीने परत विजयचा हात पकडुन घेतला. ते जसे त्या रुमच्या बाहेर पडले तसे दोघही शॉक झाले. कारण रुमच्या बाहेर पासुन खालच्या पायरीपर्यंत रेड कार्पेट अंथरलेला होता. त्यावर गुलाबाच्या पाकळ्या पसरवलेल्या होत्या. दोन्ही बाजुंनी सुंदर अशी सजावट केलेली होती. दोघांना प्रश्न पडला की हे सगळ एवढ्या लवकर कस काय झाल म्हणून.

बाहेर बॅडबाजाचा आवाज येऊ लागला होता. सगळ्यांनी तिकडे पाहील तर तो म्युजिक ग्रुप राहुल, संदेश आणि महेश सकट स्वतः ते बँड वाजवत होते. तसा बाकी ग्रुप पण नाचायला भिडला. थोडा वेळ नाचुन, विजयची गाडी आणली गेली. जी खुपच सुंदरपणे सजवली गेलेली होती. राहुलने दोघांसाठी गाडीचा दरवाजा उघडला. 

एवढा सगळा खर्च बघुन विजय त्याच्या ग्रुप कडे बघतच राहीला होता. पण राधीका सोबत असल्याने तो काहीच बोलु शकत नव्हता. 

“आज तु कितीही रागावला न, तरी तुझी यातुन सुटका नाही” सोनाली “ये तो बस ट्रेलर है.”

“खुप मजा वाटली होती न, आमच्या फर्स्ट नाईटलाच आम्हाला घाबरवताना.” राहुल

“आम्हाला माहीतीये, आम्ही तुमच्या रुममध्ये येऊन बसलो, तर तुम्ही खुशाल आमच्याशी रात्रभर गप्पा मारत बसाल. त्याने तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. म्हणून मग आम्हाला अस कराव लागत.” संदेश

विजय आणि सायली दोघांनाही डोक्यालाच हात लावला. तिथुन ते सगळे एका हॉलवर गेले. जिथे सायलीच्या वडीलांनी छोटस रिसेप्शन ठेवल होत. 

“ईथे काय आहे आता??” विजय

“हे बघा, जावईबापु. तुम्ही तुमच्या मर्जीने लग्न केले न. आता आम्हाला आमच्या पद्धतीने करु द्या.” सायलीची आई “छोटसं आहे रिसेप्शन.” 

सगळे आत पोहोचले. स्टेजवर सुंदर डिझाईन होती, दोघांच्या नावाची. खुप गर्दी झाली होती. विजयच्या ओळखीच तेवढ्या होत्या. 

स्टेजच्या पायरीपर्यंत पोहोचल्यावर सायलीने एका पायरीवर तिचा पहिला पाय ठेवला आणि दुसऱा हात विजय पुढे केला. विजयने त्याचा हात तिच्या हातात दिला. सायली विजयला स्टेजवर घेऊन गेली. 

“म्हणजे याच तुला माहीती होत??” विजय सायलीच्या कानात पुटपुटला. 

“धमकी आली होती मातोश्री कडुन. ऐकल नाहीस तर कधीच बोलणार नाही म्हणून.” सायली एक उसासा टाकत बोलली. 

मग केक कटींग सेरेमनी पार पडला होता. नंतर सगळ्यांनीच दोघांना विश करण्याची आणि फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती.

मॅरेज सर्टीफिकेट यायला थोडे दिवस जातात. पण दोघेच मॅरेज सर्टीफिकेट द्यायला तो मॅरेज रजिस्ट्रार स्वतः रिसेप्शन ला आला होता.

“अहो साहेब, मी आलो असतो उद्या किंवा परवा. तुम्ही कशाला कष्ट घेतले. एकतर तुम्हाला कामाचा इतका लोड असतो.” विजय त्यांना पाहुन बोलला. 

“तुझ्या मुळेच तर या खुर्चीवर आहे. मला कसला त्रास. तु तर काही आमची मदत घेत नाहीस. मग म्हटल आता चान्स भेटलाय तर मारुन घेऊ. हे तुमच मॅरेज सर्टीफिकेट. वीश यु हॅपी मॅरेज लाईफ.” मॅरेज रजिस्ट्रार. 

“खुप खुप धन्यवाद” विजयने हसतच ते सर्टीफिकेट घेतल. 

“जेवुन जा, बरका “ सायली चे वडील. मॅरेज रजिस्ट्रार ने होकारार्थी मान हलवली. 

सायली विजय कडे बघतच राहीली होती. विजयला तिच्या मनातल कळुन गेल होत. 

“अग एकदा न, एका जोडीने त्यांच वय लपवुन ह्यांच्या कडुन लग्न रजिस्टर करुन घेतल होत. जस ते उघडकीस आल. तस ह्यांच्यावर चौकशी बसली. मग त्या मुलांना शोधून काढल. ज्यांच्याकडून कागद बनवली त्यांना पकडल, तेव्हा कुठे हे सुटले. आपल्या वर्गातला राकेश होता न. त्याचे वडील हे.” विजय

“राकेश म्हणजे तोच न, ज्याने माझे केस पकडुन कमेंट पास केली होती. मग मी त्याला वाजवली होती” सायली विजय कडे रोखुन पहायला लागली. 

“आता मुलाच्या चुकीसाठी वडीलांना काय दोष द्यायचा.” विजय. तरी सायलीचा चेह-यावर थोडा राग होताच. 

“आता हसतेस की किस घेऊ” विजय. सायलीचे डोळे विस्फारले. “आताचा विजय वेगळा होता हे सायलीला माहीती होत. जो सगळ्यांसमोर किस घेऊ पण शकतो. मग सायली हसली. 

यथावकाश सगळ्यांची जेवण आटपली. ह्यावेळेसही सायली आणि विजय एकमेकांना चारतच जेवत होते. दुसरा हात एकमेकांना पकडुन ठेवलेला. एकाच वर्षाचा कालावधी गेला, पण या वर्षभराच्या कालावधीत सायलीला ब-याच अडचणींना सामोर जाव लागल होत. त्या अडचणींमधुन मार्ग काढत तिला तिच प्रेम मिळाल होत. 

नाकारलेल्या प्रेमाला

प्रेमानेच जिंकल होत,

या वेगळ्या वाटाड्यांना

प्रेमाने बांधल होत… 

तिथुन ते घराकडे निघाले. रिसेप्शनच्या हॉलमधुनच सायलीची पाठवणी केली होती. कितीही मन आवरल तरी सायलीचे डोळे भरून येत होते. 

“अर्ध्या तासावर तर आहे घर. मग आली आठवण की घरी या, नाहीतर मीच येईल. रडायच कशाला उगाच” सायली

“हो का?? हे तु आम्हाला समजते की स्वतः ला.?? सायली ची आई. 

मग सायलीची आई विजय जवळ आली. 

“अजुनही नादान आहे ती. काही चुकलच तिच तर घ्या संभाळून.” सायलीच्या आईने हात जोडले. 

“पुष्पा आय हेट टिअर्स” विजयने वातावरण हलक करायचा प्रयत्न केला. त्याने त्यांच्या हात पकडून खाली केला आणि त्यांचे डोळे पुसले. त्यांच्या कानाजवळ गेला. 

“उलट तिच्यापासून मला वाचण्याचे उपाय सांगा” विजय पुटपुटला. 

सायलीच्या आईला हसायला आल. सायली दोघांकडे बघत राहीली. 

“ते तिला जेव्हा इथे सोडायला याल न तेव्हा सांगेल.” सायली ची आई

सायली ने मग तिच्या वडीलांना मिठी मारली. आज त्यांना अश्रु रोखण कठीण झाले होत. एवढी वर्ष अंगाखांद्यावर खेळुन काही दिवसांनी ती दुसऱ्या घराची लक्ष्मी म्हणून जाते. कोणत्याही बापाला भरुन तर येणारच न. 

“जावईबापु, संभाळा माझ्या पोरीला” सायली च्या वडीलांना ही विजय चे हात पकडले. 

“अहो अस काय करतात, मला अरे तुरेच करा. नाहीतर सायलीला इथे पाठवणारच नाही.” विजय लटक्या रागात बोलला. 

“बोललो होतो न मी, त्याला आवडणार नाही. तुझ्या सासूने मला ब्लॅकमेल करुन बोलायला लावल.” सायलीच्या वडीलांनी सरळ सरळ सायलीच्या आईवर लोटल.

विजयला कळुन गेल होते की ते खोट बोलत आहेत. ह्यावेळेस ते मनापासुन बोलले होते. पण विजयने ही जास्त काही विचारल नाही. 

घरी पोहोचल्यावर पण तिथे दोघांना शॉक बसला. कारण चाळीच्या दोन्ही बाजूच्या घरांच्या मधला पॅसेज हा, डिझायनर मंडपाने सजवलेला होता. एन्ट्री पासुन घरापर्यंत लाल कार्पेट अंथरलेला होता. त्यावर परत गुलाबाच्या पाकळ्या होत्या. सगळा ग्रुप परत दोघांच्या समोर आला. 

“अजुन काही बाकी आहे??” विजय

क्रमशः

0

🎭 Series Post

View all