Login

जगायचंय मला भाग १

जगायचंय मला
"चॅम्पियन्स ट्रॉफी 2025"

जगायचंय मला
भाग १.


"मुलगा असेल तर घराला आधार मिळेल. वंश पुढं जाईल. मुलगी म्हणजे फक्त खर्च! लग्न करा, हुंडा द्या, एवढं ओझं कोण उचलणार? ते काही नाही, सरळ तपासून घे आणि खाली कर!"

हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. डोळ्यांसमोर अंधार पसरला.

माझ्या उदरात एक जग आकार घेत होतं. अजून कुणी पाहिलं नव्हतं तिला, पण मी रोज अनुभवत होते. नाजूक हातपाय, बोटांवरचा मऊ थर, आणि सगळ्यात जास्त जाणवणारं तिचं छोटंसं हृदय ते ठोके, जणू माझ्याशी संवाद साधत होते. अजून ती माझ्या कुशीत आलेली नव्हती, तरीही तिच्याविषयी ओढ मला प्रत्येक क्षणी जाणवत होती.

दिवसागणिक पोट वाढत गेलं, आणि माझं मन गुपचूप तिच्या सहवासात रमायला लागलं. मी तिच्याशी बोलायचे, अंगाई गाऊन दाखवायचे, पोटावरून हलक्या हातांनी फिरवायचे. कधी ती हलक्या हालचालींनी उत्तर द्यायची. तिचं लहानसं जग जणू माझ्याशी जोडलेलं होतं. किती अद्भुत अनुभव होता तो!

पण हे जग इतकं अद्भुत नाहीये, लेकी. घरात कुणाचं ना कुणाचं वाक्य कानावर येतं,
"पुन्हा मुलगी असेल तर काय करायचं?"
हे शब्द ऐकले की अंगाचा थरकाप व्हायचा. तुझं अस्तित्व लोकांना प्रश्नचिन्हासारखं का दिसतं? मुलगी म्हणून तू दोषी कशी?

मी मात्र गप्प राहायचे कुणाशी वादही घालत नव्हते पण त्या शांततेत माझा हट्ट लपलेला असायचा. तू माझ्या पोटी आहेस, म्हणजे तू जगणारच. कुणाच्याही इच्छेनं, कुणाच्या कठोर शब्दांनी तुझ्या श्वासांवर मी गदा येऊ देणार नव्हतेच.

रात्र झाली की घर शांत व्हायचे, तेव्हा तू मात्र तुझ्या हालचालींनी मला जणू हेच सांगयचीस कि,"आई, मी आहे तुझ्यासोबत. काही झालं तरी मी तुला सोडून जाणार नाही. तू माझं जग आहेस."

तुझ्या या निःशब्द आश्वासनांनी माझ्या डोळ्यांतले अश्रू उशी ओली करायचे . रोज देवापुढं हात जोडून "देवा, माझ्या या लेकराला सुरक्षित ठेव. जगाच्या कठोर नजरेत, कठोर शब्दांत तिचं आयुष्य थांबू नको. एवढंच तुझ्या चरणी मागणं."

एके दुपारी घरात चांगलाच गोंगाट चालू झाला.ह्यांची काकू आली होती. तिच्या बोलण्यात नेहमीच एक कटुता, कडवटपणा दडलेला असायचा. अंगणात पाऊल टाकताच तिने माझ्याकडे नजर टाकली आणि थेट म्हणाली,
“मुलगा असेल तर घराला आधार. मुलगी म्हणजे फक्त आणि फक्त खर्च, लग्न, हुंडा, हे सगळं ओझं कोण उचलणार?”