Login

जगायचंय मला भाग ३

जगायचंय मला
"चॅम्पियन्स ट्रॉफी 2025"

जगायचंय मला

भाग ३.

त्या सकाळी घरभर गडबड चालली होती. गडबडीचं कारण मी होते. पहाटेच्यावेळेला अचानक कळा सुरू झाल्या आणि माझ्या तोंडून जोरात हुंकार फुटला.

माझ्या आवाजाने घरभर सगळे धावले. काकू, शेजारणी अंगणात जमा झाल्या. कुणी पाणी आणायला सांगत होतं, पण त्यांच्या तोंडचे शब्द माझ्या मनाला घाव घालत होते “बघूया आता काय होतं... मुलगा असेल तर सोनं, नाहीतर…”

त्या क्षणी मला इतका राग आला होता कि विचारू सोया नाही पण कळांच्या वेदना इतक्या तीव्र होत्या की उत्तर देणंही शक्य नव्हतं. घामानं अंग भिजलं होतं, श्वास खालीवर होत होता.

मी डोळे मिटले आणि पोटावर हात ठेवला. मनाशीच माझ्या बाळाशी बोलले “बाळा, आपण दोघं मिळून ही वेळ पार करू. तू धीर धर, मीही धीर धरते. आपण लवकरच हॉस्पिटलला पोहोचू.”

काही क्षणांनी कळा थोड्या शमताच मी कसेबसे उठले. अंगणात आली तर शेजारचा दादा लगेच रिक्षा घेऊन धावत आला.

“ताई, पटकन बसा. मी आहे ना, मी सोडतो हॉस्पिटलला.”

त्याच्या चेहऱ्यावरची काळजी खरी होती. त्या क्षणी तो माझ्यासाठी देवासारखा वाटला. थरथरत मी हात जोडून आभार मानले आणि रिक्षेत बसले.

रस्त्यात वेदनांनी जीव कासावीस होत होता. प्रत्येक धक्क्यानं पोटाला झटका बसत होता. पण मी डोळे घट्ट मिटून मनात फक्त माझ्या बाळाचा चेहरा पाहत होते “काही झालं तरी मला माझं बाळ हवंय.”

काही वेळात हॉस्पिटल गाठलं. डॉक्टर आधीपासून ओळखीचे होते, त्यामुळे वेळ न दवडता त्यांनी मला थेट ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. दार बंद होताना बाहेर उभ्या नजरा मी पाहिल्या कुणाच्या डोळ्यांत भीती होती, कुणाच्या चेहऱ्यावर नापसंती.

काही तासांनी अखेर तो क्षण आला. बाळाच्या रडण्याचा गोड आवाज कानावर पडला आणि मी सुटकेचा नि:श्वास टाकला. नर्सने माझ्या कुशीत माझं बाळ ठेवलं. माझी लाडकी मुलगी.

मी तिला घट्ट कवटाळलं. तिच्या गालांवरच्या मऊ त्वचेचा स्पर्श माझ्या आयुष्याचा सर्वात सुंदर क्षण होता. डोळ्यांतून ओघळणारे अश्रू आता वेदनेचे नव्हते, ते शुद्ध आनंदाचे होते.

पण बाहेर मात्र वातावरण थंडावलं. कुणी हसले नाही, कुणी अभिनंदन केलं नाही. उलट काकूने तोंड वाकडं करून म्हंटल “अरे देवा, पुन्हा एक ओझं जन्माला आलं.”

त्या शब्दांनी माझं हृदय थरारलं. पण लगेच माझ्या डोळ्यांत विश्वास आला. मी बाळाच्या कपाळावर किस घेत हळू आवाजात म्हटलं “माझी परी... तुला जग काहीही म्हणो, पण तू माझं जग आहेस. तू माझी ताकद आहेस. हे कधीच विसरू नकोस.”

हे मात्र गप्प होते. त्यांच्या डोळ्यांत नाराजी स्पष्ट दिसत होती. मला वेदना झाल्या, पण त्या क्षणी त्यांचं मौन माझ्यासाठी गौण ठरलं. कारण माझ्या कुशीत माझं जग होतं.

दोन दिवसांनी घरी परतल्यावर उपहास सुरुच होते. शेजारच्या बायकांचे टोमणे, नातेवाईकांचे कडवे बोल...
“काय उपयोग मुलीचा? उद्या लग्न झालं की दुसऱ्याचं घर भरवायचं.”

अशा बोलांनी मी आतून रडत होते, पण माझ्या परीचा चेहरा पाहिला की माझं मन पुन्हा खंबीर व्हायचे. प्रत्येक वेळी मी स्वतःला एकच वचन दिलं“माझ्या मुलीला कोणी ओझं म्हणणार नाही. “माझ्या मुलीला कोणी कमी लेखणार नाही , ती शिकेल, उभी राहील, स्वतःचं नाव कमावेल.तेव्हा समाजाला कळेल मुलगी म्हणजे भार नाही, तीच घराचं खरं बळ आहे.”

तीच मुलगी आज जन्माच्या पहिल्या क्षणापासूनच माझ्या प्रेमाच्या कवचात सुरक्षित झाली.