Login

इच्छापूर्ती

लहानपणी जिवलग असलेल्या मैत्रिणींची भेट म्हातारपणी घडवून आणली जाते

चॅम्पियन ट्रॉफी २०२५

लघुकथा

इच्छापूर्ती

"सुलु कशी आहेस ग. बऱ्याच दिवसात तुझा फोन नाही आला?"

"सुमे मी बरी आहे गं पण तुला माहितीये ना इकडे कायं मेली रेंज का फेंज नसते त्यामुळे कोणाला फोन करता येत नाही."

"सुलु माझा पंचाहत्तारावा वाढदिवस आता जवळ आला आहे तेव्हा आपण एकत्र असावं असं मला खूप वाटतंय."

"अगं बाई नुसतं वाटून कायं उपयोग? इथे मी तर एकटीच असते. तुझ्याकडे तुझी मुलं, सुन आहे तू त्यातल्या एखाद्याला घेऊन ये ना इथे मला भेटायला."

"अगं तिथे तू एकटी. इथे माझ्याजवळ सगळे आहेत परंतु प्रत्येक जण आपापल्या व्यापात व्यस्त असतो. मी कोणाजवळ माझी इच्छा बोलून दाखवू सांग ना. खरंतर मी म्हटलं तर कोणीतरी येईल पण मला सुद्धा त्यांना सांगायला बरं वाटत नाही गं."

त्या दोघींचा संवाद काम करता करता नेहाने म्हणजेच सुमनच्या सुनेने ऐकला. तिला एकदम वरमल्यासारखं झालं. कायं खोटं बोलत होत्या आई. नाना गेल्यापासून आई खूप एकट्या पडल्या आहेत. त्यांच्या आपल्या कॉलनीमधील काही मैत्रिणी दुसरीकडे गेल्या आहेत तर कोणी देवाघरी गेल्या. आपली मुलं पण आता मोठी झाली त्यामुळे त्यांचा वेळ जाता जात नाही. मुलं लहान असताना मुलांचं करण्यात त्यांचा वेळ खूप मजेत निघून जायचा. देवाधर्माचं करतात पण ते तरी किती वेळ करणार. तिने मनोमन एक खुणगाठ बांधली. आता सत्तावीस तारखेला आईंच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाला सुलु मावशीला नक्कीच इथे घेऊन यायचं. त्यावेळी दोघींच्या चेहऱ्यावरील आनंद आपण आयुष्यभर विसरू शकणार नाही.

सत्तावीस तारखेला नेहा पहाटे चारलाच उठली. तिने सगळा आईच्या आवडीचा स्वयंपाक केला. त्यांच्यासाठी आणलेली साडी, मोत्याची कुडी सर्व एकत्र ठेवून तयारी करून ठेवली. नेहाने आज सगळ्यांना सुट्टी घेऊन घरीच रहायला सांगितलं होतं. तिने फक्त नितीनला म्हणजेच तिच्या नवऱ्याला सांगितलं की तिला काही कामानिमित्त लवकर बाहेर जायचं आहे. तिने आदल्या दिवशीच गाडी बुक केली होती. ती जी निघाली ती थेट पनवेलच्या थोडं पुढे जिथे सुलभा मावशी राहत होती तिथे गेली. दरवाज्याची कडी वाजवल्यावर मावशीने स्वतः दार उघडलं. ती आश्चर्यचकित झाली,

"अगं नेहा तू सकाळी सकाळी इकडे कशी. आज सुमनचा वाढदिवस आहे ना मग तू तिथे तिच्याजवळ असायला हवं. मी मेली कधीची फोन करतेयं पण इकडे रेंजच नाही त्यामुळे तिला शुभेच्छा पण देता आल्या नाहीत अजून."

"मावशी तुमची आंघोळ, पूजा सगळं आटोपलं आहे ना?"

"हो गं मी पहाटे लवकर उठूनच अंघोळ, पूजा सगळं आटपुन घेते."

"मग आता लवकर चला. थोडंसं तुमचं सामान घ्या आणि माझ्याबरोबर चला. मी तुम्हाला न्यायला आले आहे. इथे शेजारी कोणाला काही सांगायचं असेल तर सांगा आणि दरवाज्याला कुलूप लावून आपण निघूया लगेच."

"अगं पण तू मला कुठे घेऊन जातेस मला काही सांगशील तरी."

"तुम्ही फक्त माझ्याबरोबर चला तुम्हाला तिथे गेल्यावर नक्कीच आनंद होईल."

"बरं बाई तू म्हणशील तसं." दोघी लगोलग गाडीत बसल्या.

"मावशी अगदी आरामात बसा. सर्वात आधी हा उपमा खाऊन घ्या मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. बाहेर काहीतरी खाण्यासाठी थांबण्यापेक्षा म्हटलं घरूनच आणूया."

"अगं तशी मी इतक्या सकाळी काही खात नाही पण आता तू आणलाच आहेस तर खाते. बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं काही केव्हाही बरं."

सकाळी लवकर निघाल्यामुळे त्यांना काही ट्रॅफिक लागला नाही आणि साधारण साडेदहा अकराच्या सुमारास त्यांची गाडी नेहाच्या बिल्डिंग खाली उभी राहिली. गाडीतून उतरल्यावर सुलभा मावशीच्या लक्षात आलं आपण कुठे आलो आणि त्यांचे डोळे पाण्याने डबडबले. दोघी लीफ्टने वर गेल्यावर नेहाने दरवाजाची बेल वाजवली. सगळेजण आपापले आवरण्यात बिझी होते म्हणून आईनी दरवाजा उघडला. दारात तिच्या लाडक्या सुलुला बघून ती तिच्या गळ्यातच पडली.

"सुsssलू, माझी इच्छाशक्ती खूप प्रबळ आहे गं म्हणून आज तू माझ्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाला माझ्याजवळ आहेस. खुप आठवण येत होती तुझी." लहानपणापासूनच्या सगळ्या घटना दोघींच्याही डोळ्यापुढून सरकत होत्या.

"अगं तुझ्या प्रबळ इच्छा शक्तीची पूर्तता करणारी ही तुझी सुनबाई. खरंच मला तिचं खूप कौतुक वाटतंय ग. मी जरी एकटी असले तरी हे तुझं भरलेलं घर आणि तुझ्यावर मनापासून प्रेम करणारी माणसं बघून माझं मन प्रसन्न झालं."

"अगं आम्हाला न सांगता नेहा कधी गेली काही कळलंच नाही. आज माझ्या वाढदिवसाला ती नाही घरात म्हणून मला खूप वाईट वाटत होतं."

"बरं चला आता दोघी एकमेकींना कडकडून भेटला आहात ना! मावशी तुम्ही हात पाय धुऊन घ्या. खरंच आई आणि मावशी तुमची ही अतूट मैत्री बघून आम्हाला खूप आनंद होतो."

नेहाने एक छोटीशी रांगोळी काढली त्यावर खुर्ची ठेवली आणि आईना बसवून त्यांचं औक्षण केलं. त्यांना सुंदर सिल्कची साडी भेट दिली आणि कानातल्या कुड्यांची डबी त्यांच्या हातात दिली. आईना खूपच गहिवरून आलं. आपल्याला मुलगी नाही पण ही सून आपली लेकच झाली आहे. आपली किती काळजी घेते, किती जपते आपल्याला. जेव्हापासून नाना गेले आहेत तेव्हापासून तर ती आपलं मन जाणून सगळं करत असते. आपल्याशी गप्पा मारून आपल्याला बोलतं करते. नेहाने सुलभा मावशीना पण खुर्चीवर बसवलं त्यांना सुद्धा एक सुंदर साडी भेट दिली आणि एक खांद्याला अडकवायची पिशवी दिली. नितीन आणि त्याचा धाकटा भाऊ नयन हे दोघे सुद्धा नेहाच्या या वागण्याने आश्चर्यचकित झाले. खरंच आपल्याला जे सुचलं नाही ते नेहाने करून दाखवलं. एक स्त्रीच एका स्त्रीच्या भावना उत्कटपणे जाणू शकते हेच खरं. सगळा सोहळा झाल्यावर नेहा आई आणि मावशीला म्हणाली,

"आता तुम्ही दोघी मनसोक्त गप्पा मारा मी जरा आतमध्ये आवरते आणि जेवण वाढायला घेते."

जेवायला घेईपर्यंत दोघींच्या गप्पा अविरत सुरू होत्या. नितीन आणि नयन त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्या डोळ्यांत साठवत होते.


©️®️सीमा गंगाधरे
0