Login

मी हरवलो तर शोधशील का... की पुन्हा न सापडलं नाही चालेल?

शोध इतरांच्या मनातील स्वतःचा
मी हरवलो तर शोधशील का… की पुन्हा न सापडणंही तुला चालेल?

कधी कधी एखादा साधा प्रश्न मनाच्या अवकाशात इतका खोलवर उतरतो की त्याचं उत्तर शब्दांत देता येत नाही. “मी हरवलो तर शोधशील का… की पुन्हा न सापडणंही तुला चालेल?” हा प्रश्न तसाच आहे शांत, पण हादरवणारा.

कारण हा प्रश्न फक्त शोधण्याचा नाही… हा प्रश्न आहे मूल्याचा, आपल्या अस्तित्वाची किंमत कोणाच्या मनात किती आहे याचा. नातं किती दृढ आहे हे सांगणारा नाही, तर नात्यात आपण कुठे उभे आहोत हे दाखवणारा.

काळ बदलतो, अंतर वाढतं, परिस्थिती बदलते… पण जो माणूस मनात असतो, तो कधीही पूर्णपणे हरवू शकत नाही. त्याचं हरवणं हे शारीरिक अंतर नसतं ते मनातून निसटायला लागतं. आणि ती जाणीव सर्वात वेदनादायी असते.

बहुतेक वेळा आपण नात्यांमध्ये एवढे गुंतून जातो, की समोरचा माणूस कधीतरी दूर चालला आहे हे लक्षातच येत नाही. आपण शोधत राहतो शब्दांमध्ये, नजरेत, छोट्याशा हाकेत… आणि समोरच्याच्या शांततेत मात्र उत्तर लपलेलं असतं.
कधी कधी शोधणं हे प्रेम असतं, आणि न शोधणं हे नातं बराच आधी संपल्याचं संकेत असतं.

कल्पना करा
एक दिवस आपण खरोखरच हरवलो. कोणी शोधेल?
किंवा, “तो परत आला नाही तरी चालेल” या उदासीन शांततेत आपण अदृश्य होऊ?

किती विचित्र आहे ना…
जेव्हा आपण प्रेम करत असतो, तेव्हा आपल्याला भीती लागते हरवण्याची नाही, तर हरवल्यावर सापडू न देण्याची!
कारण आपण कोणाला आठवत राहतो म्हणजे आपण अजूनही त्यांच्यासाठी ‘कोणी तरी’ आहोत असे वाटते.
पण शोधणं थांबलं की आपण स्वतःलाच एका क्षणी प्रश्न विचारतो
मी खरंच महत्त्वाचा होतो का, की सगळं फक्त कल्पना होती?

नात्यातील सर्वात मोठी शिल्लक ही प्रेमाची नसते…
ती ‘काळजी’ची असते.
काळजी असेल तर माणूस शोधतो
शंभर लोकांमध्ये, हाकांमध्ये, फोनमध्ये, आठवणीत, किंवा निदान मनात तरी.

जेव्हा कोणीतरी हरवतो तेव्हा
शोधणं म्हणजे प्रेम,
वाट पाहणं म्हणजे विश्वास,
आणि शांत बसणं म्हणजे नात्यातलं हळूहळू होतंय ते अंतर.

आज या प्रश्नाचं उत्तर कदाचित तुला देता येणार नाही…
पण मनात दडवलेली एकच आशा असते
आपल्यासाठी कोणीतरी कुठेतरी एक तरी पाऊल टाकेल… किमान शोधायचा प्रयत्न तरी करेल.

कारण जे नातं खरं असतं, ते मनातून हरवत नाही.
जो माणूस खरा असतो, तो कधीही ‘हरवू देत’ नाही.

आणि जर समोरची व्यक्ती शोधतच नाही…
तर उत्तर स्पष्ट होतं
आपण हरवलेलो नसतो,
तो आधीच दूर गेलेला असतो.

कधी कधी “कोणी शोधत नाही” हेही एक उत्तर असतं.
आणि ते उत्तर स्वीकारायला मन कठीण मार्गावरून चालतं…
पण त्याच मार्गावर आपण स्वतःला पुन्हा शोधतो.

शेवटी एकच सत्य
ज्यांना आपण हरवलो तर शोधावंसं वाटतं, तेच आपल्या आयुष्यात राहायला हवे.
उरलेल्यांना सोडून देणं ही स्वतःवरची सर्वात मोठी कृपा असते.

हा प्रश्न जितका भावनिक, तितकाच उत्तर देताना मनाला उभं करणारा कारण त्यातून समजतं आपण कोणाच्या आयुष्यात काय आहोत… आणि त्याहून महत्वाचं म्हणजे आपण स्वतःच्या आयुष्यात कोण आहोत.

©® सचिन कमल गणपतराव मुळे...
परभणी, ९७६७३२३३१५
0