Login

दहावी नापास झाली तर यंदा कर्तव्य नक्कीच

माझ्या दहावीच्या निकालाची धमाल
मी जरा जास्तच मंद बुद्धीची (फक्त अभ्यासाच्या नाही हो, सर्वच बाबतीत ) म्हणून घरच्यांना, विशेषता आईला माझ्या नापास होण्याची च अपेक्षा. पण तरीही कुठेतरी तिला वाटायचं कि इतर मुलींसारखं आपल्या मुलीनेही चांगलं शिक्षण घ्यावं, नोकरी करावी, स्वतःच्या पायावर उभं राहावं.
जसजशी दहावी बोर्डची परीक्षा जवळ आली ती मला सकाळ संध्याकाळ बोलू लागली, "दहावी नापास झाली तर शिक्षण बंद आणि लग्न पक्क."

तिला माहित होतं जणू, कि तिच्या अशा बोलण्याचा माझ्यावर नक्कीच सकारात्मक परिणाम होणार. झालाही कारण मला सर्वात जास्त राग लग्न या शब्दाचा वाटायचा व सर्वात जास्त भीती मी आपल्या पायावर उभी व्हायच्या आधीच लग्न लावून कोणाच्यातरी गळ्यात मला बांधून देण्याची वाटत होती. त्यात लग्न झाल्यावर मुलींना कशाप्रकारे विविध यातनांमधून जावं लागतं याची उदाहरणे मी खूप जवळून बघत होती.

"आपल्याला काहीही करून दहावी पास व्हायचं आहे." अशी पक्की गाठ मी मनाशी बांधून घेतली. गणित आणि विज्ञान तरी बरं होतं माझं. पण इंग्लिश तर शत्रू होता शत्रू. सदानकदा माझ्या गळ्याचा घोट घेण्याच्या मार्गावर.

शाळा, ट्युशनमध्ये शिकवणारे सर मला कमी पडत होते म्हणून की काय ऋचाचेही (माझी प्रिय सखी आणि सहपाठी) मी खूप डोके खायची. मी दहावी पास व्हावे म्हणून तिने माझ्यावर खूप कष्ट घेतले. तिच्या आईने म्हणजे आमच्या गोड गोड काकूंनीही आमचं अभ्यासात मन लागावं म्हणून छान छान पदार्थ बनवून खाऊ घातले. अशाप्रकारे सर्वांनी माझ्यावर घेतलेल्या कष्टाचे फळ म्हणून मी दहावी शेचाळीस टक्क्यांनी पास झाली.

इंग्रजीत मला 36 गुण होते अन तरीही माझ्या बाबांनी पेढे वाटले. किती आनंद त्यांना झालेला. कदाचित मी आमच्या घरातली पहिली मुलगी दहावीच्या पुढे शिकणार होती म्हणून ते भारावून गेले होते.

आता हे सर्व आठवून खूप खूप हसू येतं. आता मी जेव्हा इंग्रजी भाषेतील मोठमोठी पुस्तकं वाचते, फाड फाड इंग्रजी बोलते तेव्हा वाटतं खरंच आपण मंदबुद्धी होतो की आळशी होतो?

0