Login

इंपरफेक्टली परफेक्ट बॉण्ड ऑफ लव्ह - भाग २६

दोन प्रोफेसर्सची प्रेमकहाणी
दुसऱ्या दिवशी मनाशी काहीतरी ठरवून प्रिशा कॉलेजला निघाली.तेवढ्यात वसुधाताई तिच्या समोर आल्या.

“ थांब प्रिशा..”
ती तिथेच थांबली.

वसुधाताईंनी प्रिशाची मीठ,चप्पल,केरसुणी अशा तीन पद्धतींत दृष्ट काढली.
“ आई,मला उशीर होतोय.. हे सगळं काय चाललयं तुझं?”

“ss श ss तुझ्यासमोर आज इतकी संकटे उभी आहेत अन् तू असं काय बोलतीयेस?”

“प्लीज आई.मला आता कोणाशीही हुज्जत घालायची नाहीये.मला जाऊ दे कॉलेजला..”

“ अगं थांब.हे एक चमचा दही साखर खा अन् मग जा..”

त्यांनी बळजबरी प्रिशाच्या तोंडात दही साखरेचा चमचा घातला.
“ हम्म..आता जा.आता तुला कुठलीही अडचण येणार नाही.आलीच तर तू त्यातून सहज मार्ग काढशील.”

“ नाही नाही.आपण एक काम करूया.तूच ये माझ्यासोबत कॉलेजला.म्हणजे मग मला एकही अडचण येणार नाही.”
प्रिशा आडवे बोलल्याप्रमाणे काहीशा उपहासाने म्हणाली.

“ बरं बाई.नाही तुला त्रास देत.जा आता बिनधास्त.”
वसुधाताई प्रिशाची काळजी वाटल्याने हळव्या होत म्हणाल्या.

प्रिशा मात्र आपल्या तंद्रितच निघाली.आज ती एकटीच निघाली.विनयराव काही कामानिमित्त लवकरच घराबाहेर पडले होते.

वाटेत असंख्य विचारांचे काहूर थैमान घालत असताना कॉलेज कधी आले हे तिला कळले देखील नाही.तिने ऑटोचे पैसे दिले आणि मेन ऑफिसजवळून डीपार्टमेंटकडे निघाली.अचानक तिला प्रिन्सिपल सरांच्या असिस्टंटने आवाज दिला.
“ मॅडम..प्रिंसिपल सरांनी तुम्हाला बोलावले आहे.”

ती आश्चर्यचकित झाली.सरांनी इतक्या अवेळी कसे काय बोलावले असा तिला प्रश्न पडला.विचार करत ती पुढे पाऊले टाकत जात होती अन तेवढ्यात प्रिंसिपल सरांच्या केबिनमधून तिला वैभवी आणि महेश सर बाहेर पडताना दिसले.

ती थबकली.काहीतरी गौडबंगाल आहे असे तिला मनोमन वाटले.तरीही जे समोर येईल त्यास सामोरे जाण्याची तिने तयारी केली.

“ मे आय कम इन सर?”
कॅबिनच्या डोअरवर नॉक करत, प्रिशा जराशी घाबरतच बोलली.

"येस कम इन .."
प्रिंसिपल पाटील सर काहीसे हताशपणे नाराजीच्या सुरात बोलले.

प्रिशा आत आली.वातावरण जरा धीरगंभीर आहे याची अनाहुत चाहुल तिला लागली.

" हे घ्या." पाटील सर

प्रिशा गोंधळात पडली होती तरीही तिने तिच्या हातातील लेटर वाचण्यास सुरुवात केली आणि तिला विश्वासच बसेना. ते लेटर म्हणजे तिचा राजीनामा होता.इथे येण्यापूर्वी महेश आणि वैभवी मॅडम तिला कशा काय दिसल्या याचे उत्तर तिला आता मिळाले.तिने क्षणाचाही विचार न करता तिथून बाहेर पडायचे ठरवले.

पाटील सरांना मात्र याबद्दल खुप आश्चर्य वाटले.कुठलीही सफाई न देता इतकी आदर्श असलेली ही शिक्षिका डायरेक्ट राजीनामा कसा काय स्वीकारत आहे? पण तरीही वैभवी मॅम आणि महेश सरांनी सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या मनात प्रिशाबद्दल आढी घालून होत्या म्हणून त्यांनीही प्रिशाला याबद्दल विचारणे टाळले आणि ते आपल्या दुसऱ्या कामात व्यस्त झाले.

इतका वेळ मनातल्या मनात असंख्य वादळं काहीही न बोलता सहन करत असलेली प्रिशा मात्र अश्रूंचा बांध अडवत थेट ऑटो मध्ये बसली.घरी पोहोचताच तिला आपले अश्रू अनावर झाले अन ती थेट वसुधाताईंच्या गळ्यात पडली.

" प्रिशा,काय झालं आहे बाळा? इतक्या लवकर कशी काय आलीस? तब्येत बरी आहे ना?" वसुधाताई

प्रिशा आईला बिलगली अन खुप रडू लागली.

वसुधाताई खुप घाबरल्या होत्या. तरीही आपल्या लाडक्या लेकीला कुरवाळत त्या म्हणाल्या,
" काय झालं आहे बाळा? सांग ना!"

फुंदून रडत असल्याने प्रिशाला धड बोलताही येत नव्हते.तरीही ती म्हणाली,
" आई,आज कॉलेज मध्ये पोचताच पाटील सरांनी मला रेसिग्नेशन लेटर हातात दिलं."

"काय?"

" हो."

" तू कारण विचारलं सरांना?"

" नाही आई.मला ना तिथे म्हणजे त्यांच्यासमोर काहीही सुचलं नाही.काहीही चुक नसतांना मी उलट गप्प बसले आणि थेट घरी आले."

" तू काहीही स्पष्टीकरण न देता निघून आलीस?"

"हो आई..सॉरी.चुकलं माझं.माझ्या तोंडातून ब्र शब्द सुद्धा निघत नव्हता गं!"

आपल्या लेकीचा आत्मविश्वास इतका डळमळीत झालेला पाहून वसुधाताई व्यथित झाल्या.

मनातल्या मनात काहीतरी विचार करून त्या म्हणाल्या,

" प्रिशा,जे होतं ते चांगल्यासाठीच होतं.उद्याच तू मुंबईला जा.तिथे मावशीकडे रहा."

" म्हणजे मी हे सर्व असंच सोडून देऊ?माझ्याविरुद्ध कारस्थाने रचलेल्या लोकांची जीत होऊ देऊ? आणि समीर?"
भावनांच्या आवेगात ती मनातलं बोलून गेली.एव्हाना वसुधाताईंना तिचं आणि समीरचं नातं कळून चुकलं होतं.तेवढयात त्यांना जोशी गुरुजींचं प्रिशाबद्दलचं भाकीत आठवलं आणि त्या भानावर आल्या.

" प्रिशा,जे झालं ते चांगलंच झालं.तू स्वतः ला सावर आणि उद्याची तयारी कर." वसुधाताई

" आई,हे कसं शक्य आहे? " प्रिशा

" हे बघ बाळा, तू ज्या परिस्थितीतून जात आहेस त्यातून बाहेर येण्यासाठी तुला एका ब्रेकची गरज आहे."वसुधाताई

" पण आई.."प्रिशा

आपल्या मुलीची अवस्था वसुधाताई बघू शकत नव्हत्या म्हणून गॅसवरची भाजी करपेल असा युक्तीवाद करून त्या तिथून निघून गेल्या.

खरंच इतक्या लवकर फुंकर घालता येते मनावर? मनातील बेधुंद प्रेम भावनांना इतक्या सहज आवर घालता येते किंवा त्यांना कायमचे परागंदा करता येते? जीवनात प्रेम पालवी नव्यानेच उमलू पाहत असताना तिच्यावर आघात करणे शक्य असते? ज्याला आपल्या प्रेमाची ग्वाही आपण देणार होतो तो दूर गेला तर? अशा नानाविध भावनांनी प्रिशा गलबलून गेली.

आता पुढे काय घडेल? समीर आणि प्रिशा इम्परफेक्ट असूनही परफेक्टपणे एकत्र येऊ शकतील की दोघांच्या पाऊल खुणा वेगवेगळ्या वाटेवर जातील? पाहूया पुढील भागात..

क्रमश:
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे

🎭 Series Post

View all