इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह - भाग २

दोन प्रोफेसर्सची एक परफेक्ट लव्हस्टोरी
बेस्ट टीचर अवॉर्ड मिळाल्याने प्रिशाला खूप आनंद झाला होता.कार्यक्रम संपल्यावर ती घरी आली.

तिचे बाबा(विनयराव) टी. व्ही. बघत बसलेले होते.
तिच्या हातातील ट्रॉफी पाहताच ते म्हणाले,

" अगं वसुधा,आलीस का बाहेर? आपल्या प्रिशाला बेस्ट टीचर अवॉर्ड मिळाला आहे."

वसुधाताई हातातील काम सोडून एका वाटीत साखर घेऊन बाहेर आल्या आणि आनंदाने म्हणाल्या,

" थांब पोरी.मी तुझे तोंड गोड करते."

प्रिशाने साखर खाल्ली.कधी नव्हे ते आज प्रिशाला साखरेची चव खूप छान लागली.

" खरंच प्रिशा,तुझी मेहनत,जिद्द,चिकाटी आणि विद्यार्थ्यांवरील शिस्तीची जरब पाहता हा अवॉर्ड तुलाच मिळणार असा ठाम विश्वास मला होताच."विनयराव

" थँक्यू बाबा." प्रिशा

" तू सर्वांच्या मनात आपली एक वेगळीच छाप पाडली आणि त्याचेच हे एक यशस्वी फलित आहे बाळा." वसुधाताई

" पण आई बाबा तुम्हाला एक सांगू का? " प्रिशा

" काय गं बाळा?"वसुधाताई

"माझ्या डिपार्टमेंटच्या एच.ओ.डीचा या अवॉर्डसाठी मला सतत तगादा असायचा,एक वेगळेच प्रेशर होते.त्यात माझी पुरती घुसमट होत होती, दमछाक होत होती.परंतु प्रत्येक कामात परफेक्ट असणाऱ्या व्यक्तीकडून त्या व्यक्तीचा वरिष्ठ अशी अपेक्षा ठेवणारच ही काळ्या दगडावरील रेष असली तरीही आपण ही अपेक्षा सार्थ ठरवण्यास इतरांच्या तुलनेत फार समर्थ आहोत असा माझा अट्टाहास तर होताच पण ठाम विश्वास देखील होता.त्यामुळेच हे शक्य झाले." प्रिशा

" बाळा, मेहनतीशिवाय यशाची चव चाखता येत नाही हे जरी खरे असले तरीही आयुष्य जगताना दरवेळी परफेक्ट होऊनच जगले तर आनंद आणि समाधान यातील फरक बऱ्याचदा अवघड होऊन जातो अन् मग सहज सुंदर जगणे माणूस विसरून जातो." विनयराव

" म्हणजे? बाबा तुम्हाला काय म्हणायचे आहे?परफेक्ट असणे चुकीचे आहे? परफेक्ट माणूस आपल्या आयुष्यात आनंद आणि समाधान शोधू शकत नाही?" प्रिशा

" बेटा,मला असे नव्हते म्हणायचे.माझे म्हणणे होते की..." विनयराव

" तुमच्या दोघांची शाब्दिक जुगलबंदी संपली असेल तर जेवायला बसाल का? नाही म्हणजे इथे जर तुम्ही परफेक्शन,आनंद, समाधान वगैरे शोधत असाल तर बासुंदी पुरी बनवण्याचे माझे परफेक्शन आणि ती खाऊन तुम्हा दोघांना मिळणारा आनंद आणि समाधान नक्कीच हिरमुसला जाईल.बाकी तुम्हा दोघांची मर्जी!"वसुधाताई

विनयराव आणि प्रिशा हसू लागले.
" प्रिशा, मला वाटतं आपण गृहमंत्र्यांचे म्हणणे ऐकून जेवणावर ताव मारला तर परफेक्शन, आनंद आणि समाधान आपल्याला मोठ्या दिमाखात चाखता येईल."विनयराव

" येस बाबा." प्रिशा

इतक्यात डायनिंग टेबलवर व्हिडिओ गेम खेळत असलेल्या हर्षने(प्रिशाचा लहान भाऊ) प्रिशाच्या हातातील ट्रॉफी पाहताच विचारले,
" ताई,कसली सॉलिड ट्रॉफी मिळाली आहे गं तुला? मानलं यार तुला!"

" थँक्यू ब्रो." प्रिशा

" बरं,चला आता जेवायला बसू या.मी ताट मांडते सर्वांसाठी." वसुधाताई

" राहू दे गं आई! आज आम्ही प्रत्येकजण आपापले ताट स्वतः करणार आहोत आणि तुझे ताट मी करणार आहे." प्रिशा

" अगं पण.."वसुधाताई

" ते काही नाही.तू बस बघू आधी निवांत."प्रिशा

" ए ताई,माझे पण ताट कर बरं का,प्लीज!" हर्ष

" नाही हं बाळा! नो लाडिगोडी प्लीज! तू कधी शिकणार मग हे काम? हे बघ आपल्याला काय हवे आहे ते आपल्यालाच माहित असते.बरोबर?" प्रिशा

" हो." हर्ष

" मग त्याप्रमाणे पदार्थ वाढून घे तुझ्या ताटात.हीच तर मुलांची स्वावलंबनाची पहिली पायरी आहे.म्हणून स्वतःला शिस्त लाव आणि स्वतःला ओळख.स्वतःच्या गरजा,गुण-अवगुण ओळखून पुढे टाकलेले पाऊल नक्कीच यशाकडे नेते.समजलं?" प्रिशा

" हो ताई." हर्ष

सर्वांनी आनंदाने जेवणावर ताव मारला.रात्रीचे ९ वाजले.शेजारीच राहत असलेली स्नेहा ( प्रिशाची मैत्रीण) घरी आली.

हॉलमध्ये प्रिशा वाचन करत असलेली पाहून,स्नेहा धावतच तिच्याकडे गेली आणि तिला आलिंगन देत म्हणाली,
" प्रिशा.. खूप खूप अभिनंदन डियर."

" कशाबद्दल?"प्रिशा

" ह... असं काय करतेस? बेस्ट टीचर अवॉर्ड मिळाला आहे तुला. मला माझ्या आईने सांगितलं."स्नेहा

" अच्छा! धन्यवाद."प्रिशा

" चल,आपण मस्त आईसक्रीम पार्टी करू या.आपण तिथेच खाऊ आणि घरच्यांना पार्सल आणू."स्नेहा

इतका वेळ प्रिशाच्या बाजूला बसून एकदम बिनधास्त बोलत असलेल्या स्नेहाचा हात धरत,आपल्यापासून जरा लांब करत प्रिशा म्हणाली,

" स्नेहा,मी ना पार्टी नक्की देईल पण रविवारी.तुला माहित आहे ना,ही माझी वाचनाची वेळ असते आणि एकवेळ जेवण झाले नाही तरी चालेल पण वाचन झालेच पाहिजे असा माझा नियम आहे. सो प्लीज गो बॅक टू युवर होम."प्रिशा


" अगं पण प्रिशा.."स्नेहा

" स्नेहा, रुल इज रुल.जा लवकर घरी,आई वाट पाहत असेल." प्रिशा

थोडेसे नाराज होऊन स्नेहा घरी गेली.

विनयराव ही सारी गंमत बाजूच्याच खोलीत ऐकत होते.ते स्वतःशीच स्वगत करत पुटपुटले,
' खरंच प्रिशा स्वतःनेच आखलेल्या बंधनांत किती जखडून घेते दरवेळी.बिचारी स्नेहा तशीच परत गेली.हे देवा,माझ्या प्रिशाला मनमोकळे,दिलखुलास जगणारा असा साथीदार मिळू दे.म्हणजे नकळतच तिला इंपरफेक्शनसुद्धा किती सुंदर,नितळ, आनंददायी असू शकते हे कळेल.'
कशी भेट होईल इम्परफेक्ट समीर आणि प्रिशाची?जाणून घेण्यासाठी वाचत रहा इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह..


भाग २ समाप्त.

क्रमशः

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे

🎭 Series Post

View all