इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह - भाग २४

एकाच महाविद्यालयातील दोन प्रोफेसर्सची प्रेम कहाणी
भाग २४


‘त्या दिवशी विद्यानिकेतन बागेत प्रिशाला भेटलेला तो व्यक्ती कोण होता?त्याच्या देहबोलीवरून तर तो गुंड वाटत होता.शिवाय त्याची भाषा देखील गलिच्छ होती.प्रिशाला याबाबत विचारायला हवं..’
मनोमन हा विचार करत समीर त्या दिवशी कॉलेजमध्ये प्रिशाला शोधत खूप फिरला कारण तिचा मोबाईल नंबर काही केल्या लागत नव्हता, पण नंतर त्याला कळले की ती सुट्टीवर आहे.

दुसऱ्या दिवशी तो पुन्हा प्रिशाला शोधत तिच्या डिपार्टमेंटमध्ये आला.ती आपल्या टेबलवर काहीतरी करत बसलेली होती.

“ प्रिशा..”समीर

तिने चमकून मागे पाहिले.
“ तू? तू इथे काय करतोय?” प्रिशा

“ असं काय करतेस? मी तुला भेटायला आलो आहे.काल कुठे गायब झाली होतीस?” समीर

“ सुट्टी घेतली होती..”प्रिशा

“ कशासाठी?” समीर

“ महत्वाचे काम होते..” प्रिशा

“ काय काम होते?” समीर

समीर प्रिशाच्या टेबलासमोर खुर्ची घेऊन बसला.
तो त्याचा हात तिच्या हातांवर ठेवणार तोच प्रिशाने आपला हात मागे घेतला.

तेवढ्यात समीरने विचारलेल्या प्रश्नाकडे नजर अंदाज करत प्रिशा म्हणाली,
“ ऐक ना समीर,मला ना आज खूप काम आहे.त्यामुळे आपण उद्या भेटून बोलूया का?”

“ मला त्या दिवशी बागेत जे घडले त्याबाबत तुझ्याशी महत्वाचे बोलायचे आहे..”समीर

“बोलू याबद्दल आपण नंतर..”प्रिशा

“ अगं पण..” समीर

तिने आपले डोके समोर असलेल्या पुस्तकांमध्ये घातले,
“ प्लिज समीर..” प्रिशा

तिला खरोखर कामाचा किंवा अभ्यासाचा लोड आहे,असे वाटून समीर आपल्या डिपार्टमेंटमध्ये परतला.हिला कसा काय अचानक इतका लोड आला की ही पुस्तकांच्या गराड्यात डोके घालून बसलीय?या विचाराने तो जरावेळ तिथेच घुटमळत थांबला.

त्याची ती तगमग, नुकतंच लेक्चर घेऊन आलेल्या वैभवी मॅडमने ओळखली.

“ काय हो समीर सर?”वैभवी

“ आ..काही नाही..”समीर

“प्रिशा आत असेल ना.. भेटायचे आहे का तिला?”वैभवी

“ आ..हो,नाही म्हणजे झालं भेटून..”समीर

‘ कमाल आहे,आज हा हो,नाही असे का म्हणतोय?नक्कीच दोघांचे भांडण किंवा काहीतरी बिनसलं असणार..’ असा मनोमन विचार करत
वैभवी मॅडम म्हणाल्या,

“ बरं बरं. हॅव अ गुड डे..”वैभवी

“ थँक्यू मॅडम.. अँड सेम टू यू..”समीर

चेहऱ्यावर हलकेसे स्मितहास्य करत वैभवी मॅडम स्टाफ रूममध्ये जाऊन टेबलवर बसल्या.

समीर देखील आपल्या डिपार्टमेंटमध्ये गेला. ‘आपण बागेतील घटनेबद्दल विचारताच प्रिशाने जाणीवपूर्वक विषय का बदलला?’,ही खुमखुमी त्याला काही केल्या शांत बसू देत नव्हती.’खरंच अशी का वागते ही? ठीक आहे हुशार,जबाबदार प्रोफेसर आहे पण दुसऱ्या व्यक्तीच्या देखील भावना जपायला हव्यात की नको?’,या विचाराने तो पुरता उदास झाला.खरं तर त्याचे प्रिशावर खूप प्रेम होते,त्यामुळे तिला कसल्याही प्रकारे दुखावणे त्याला मान्य नव्हते; किंबहुना यात स्वतःला मात्र कितीही दुःख झाले,मानसिक त्रास झाला तरीही तो सहन करणे त्याला जास्त योग्य वाटत होते.

इकडे वैभवी मॅडम,आपल्या टेबलवर बसून पुस्तकांमध्ये गढून गेलेल्या प्रिशाकडे बघत होत्या.

‘समीर भेटल्यापासून इतकं मन लावून लेक्चर सोडून कुठलंही काम प्रिशा करत नव्हती.मग हिने स्वतःहून राणा सरांकडे रिसर्चचे काम मागितले की काय?’ असा विचार वैभवी मॅडम करू लागल्या.

त्या तिच्या टेबलाजवळ गेल्या.
“कुठलं काम दिलंय राणा सरांनी..?” वैभवी

“ राणा सरांनी कुठलंही काम दिलं नाहीए ; मी मुलांसाठी माझ्या सब्जेक्टच्या नोट्स शोधून ठेवते आहे.त्यामुळे तुम्हीही मला डिस्टर्ब केले नाही तर बरे होईल.” प्रिशा

“ हो ग बाई,कर तुझं काम! आफ्टर ऑल यू आर अ परफेक्ट टीचर; पण एक लक्षात ठेव नुसतं कामात परफेक्ट असून चालत नाही, मोठ्यांशी,स्मोरच्याशी नीट बोलणेही जमले पाहिजे.समजलं?”वैभवी

प्रिशा काहीच न बोलता दुसरीकडे तोंड फिरवून बसली.

“ आजकालच्या पिढीला मोठ्यांचा आदर करणे अजिबात जमत नाही.अजिबात संस्कार नाहीत त्यांच्यावर.जेवढे शिकले तेव्हढे हुकले.."
सीनिअर असूनही वैभवीला प्रिशाने भाव न दिल्याने वैभवी मॅडम तावातावाने बोलल्या.

“कुठले संस्कार नाहीत हो माझ्यावर?आणि एक मिनिट तुम्ही काय संस्कारांची भाषा करता? तुम्हाला काय वाटलं, मला काहीच माहीत नाही? समीर आणि माझ्यामध्ये का येता हो तुम्ही? ती वनिता मॅडम तुम्हीच पाठवली होती ना समीरकडे?” प्रिशा

आता मात्र वैभवी मॅडम चांगल्याच वरमल्या.आपले पितळ उघडे पडल्याने त्यांना काहीच सुचेना.त्यांची बोलतीच बंद झाली.

“ आता यावर सफाई नाही का तुमच्याकडे?”प्रिशा

“ मी? छे! मी असे काहीही केलेले नाही..ते तर सारे समीरच्या डिपार्टमेंटमधील महेश सरांनी..” आपल्या तोंडून सत्य निघून गेल्याने वैभवी मॅडम चांगल्याच घाबरल्या आणि त्यांनी आपल्या तोंडावर आपला उजव्या हाताची थरथरणारी बोटे ठेवली.

प्रिशाशी भिडवलेली नजर चोरत,हलकेच आपल्या टेबलवर दुसरीकडे तोंड करून वैभवी मॅडम बसल्या..

“वाह! हेच तर हवं होतं मला.शेवटी सत्य तुमच्या तोंडून बाहेर पडलंच.एखाद्यावर किती हो तो जळफळाट करायचा?माझ्या जागी तुमच्या मुलीशी असे डावपेच कोणी खेळले असते तर?”
प्रिशाला आज कुठलेच भान राहिले नव्हते.खरं तर साऱ्या बाबींची तजवीज करूनच ती वैभवी मॅडमवर असणारा आपला राग व्यक्त करत होती.

आता काय होणार पुढे?प्रिशा समीरशी बागेतील घटनेबद्दल बोलेल? कसा रिएक्ट होईल तो वैभवी मॅडमने केलेल्या या सर्व गोष्टींना? पाहूया पुढील भागात.. सो स्टे ट्यूनड..

क्रमशः

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे





🎭 Series Post

View all