Login

इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह - भाग २९

दोन प्रोफेसर्सची एक संघर्षमय प्रेमकहाणी
मागच्या भागात आपण पाहिले की प्रिशाच्या वडिलांना मुंबईलाच ऍडमिट रहावे लागते त्यासाठी प्रिशा मुंबईलाच थांबते.मोबाईल फुटल्यामुळे तिचा समीरशी संपर्क होऊ शकत नव्हता म्हणून ती रोज कासावीस होत होती.आता पाहुया पुढे..

आपल्या वडिलांची काळजी घेण्यासाठी प्रिशा हॉस्पिटलमध्ये एकटीच थांबलेली होती. रोज सकाळी डॉक्टरांचे राऊंड, नर्सेसची चकरा आणि बाबांची औषधांची काळजी या सगळ्यात तिचा दिवस जात होता पण जसजसा अंधार दाटू लागायचा, तसं तिच्या मनात समीरचं नाव अधिक गडद होत असे.

मोबाईल नसल्यामुळे तिचा समीरशी कुठलाही संपर्क झालेला नव्हता.त्याच्याशी नाही निदान त्याच्या आईशी तरी पुन्हा कधी फोन होऊ शकेल? त्याची अवस्था कशी असेल?मी पुन्हा मुंबई सोडून आपल्या शहरात जावं का? असे अनेक प्रश्न तिला रात्री झोपू देत नसत.खरं तर सगळं सोडून ती घरी जाऊ शकत नव्हती, कारण बाबांची देखभाल आवश्यक होती. तिच्याजवळ बाबांचा मोबाईल होता, पण तो सुद्धा खूप जुना आणि संपर्कासाठी फारसा उपयुक्त नव्हता कारण त्यात सोशल मीडिया वापरण्याची सोय नव्हती.त्यात तिला समीरचा मोबाईल नंबर पाठसुद्धा नव्हता.

एक दिवस रात्री तिचे बाबा झोपलेले होते. सहज म्हणून तिने खिडकीतून बाहेर एक कटाक्ष टाकला.एकीकडे बाबांची काळजी आणि दुसरीकडे समीरला भेटण्यासाठीची उत्कंठा, तिचा जीव घेऊ लागली होती. तिने एक सुस्कारा टाकला.

'कुठे आहेस रे तू, समीर? कधी तरी एकदा फक्त भेटशील का?' तिने स्वतःशीच स्वगत करत समीरला प्रश्न केला.

तेवढ्यात अचानक तिच्या बाबांनी आवाज दिला.

"प्रिशा..."

ती पटकन त्यांच्याजवळ गेली.

"बाबा,मी इथेच आहे...काय झालं?"

"मला पाण्याचा ग्लास देतेस का?"

" हो, हो हे घ्या."

तिने त्यांच्या हातात ग्लास दिला.त्यांनी पाणी पिले.ते निश्चिंतपणे म्हणाले,
"तू आहेस ना इथे, मग सगळं ठीक होईल."

बाबांचे हे शब्द तिच्या मनात खोलवर घर करून गेले.खरंच, म्हातारपण आणि आजार यांच्या कांगोऱ्यात उतारवय सापडलं की माणूस हतबल होत किती परावलंबी होतो हे तिने आज अनुभवले. बाबांच्या काळजीत ती त्यांचा हात किती तरी वेळ हातात धरून बसली होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलमध्ये एक नवा पेशंट आला. सिस्टर्स एकमेकींशी चर्चा करत असताना प्रिशाने हे नाव ऐकलं.ते नाव ऐकताच प्रिशा दचकली.

नाव होतं ,"समीर राणे".

ती धावत रिसेप्शनकडे गेली.

"एक्सक्यूज मी, तुम्ही म्हणालात ना समीर राणे? कुठल्या वॉर्डमध्ये आहेत ते?"

"त्यांना इथे नाही तर दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये ऍडमिट केले आहे पण सध्या फक्त काही रिपोर्ट्सच्या तपासणीसाठी त्यांना इथे शिफ्ट केले आहे."

प्रिशाचं मन पुन्हा उचंबळून आलं.

"कुठल्या रूममध्ये?" ती हरखून गेल्यासारखी विचारत होती.

"स्पेशल रूम न. १४."

प्रिशाच्या मनात आता काहीही शिल्लक नव्हतं.होता तो फक्त प्रेमाचा बहर..बाबांना समजावून ती तात्काळ त्या रूम मध्ये शिरणार तेवढ्यात एक सिस्टर आल्या.

" कोण पाहिजे तुम्हाला?"

"समीर राणे..तो इथे ऍडमिट आहे ना?"

सिस्टर म्हणाल्या,
"अहो मॅडम, पेशंट सध्या विश्रांती घेत आहे.तुम्ही कोण त्यांच्या?"

आपलं समीरशी नातं कोणतं आहे हा प्रश्न तिला ओळखीचा असूनही आज अनोळखी वाटला कारण दोन्ही बाजूंनी या नात्याचे बंध अजून घट्ट झालेले नव्हते.

" मी त्याची फ्रेंड."

" पास?"

प्रिशाने पास दाखवला. बाबा ऍडमिट असल्यामुळे तिच्याकडे आधीच पास होता.

" ठीक आहे.माफ करा पण सध्या आम्ही सुरक्षेच्या कारणासाठी पेशंटला भेटण्यासाठी आलेल्यांची खूप चौकशी करतोय.."

" ठीक आहे,काही हरकत नाही."

ती आत डोकावली.समीर खिडकीजवळ असलेल्या कॉटवर झोपलेला होता.डोक्यावर पट्टी, हातात काहीतरी कागद घेऊन तो छातीशी ठेवून तो झोपेच्या नौकेत पहूडलेला होता..

प्रिशाचं हृदय धडधडलं.इतक्या दिवसांत त्याला पाहिलेले नसल्याने ती भाऊक होऊन त्याच्याजवळ जाणार तोच समीरने अचानक डोळे उघडले.

दोघांची नजरानजर झाली.

"समीर..." ती म्हणाली.

तो आवाज ऐकताच समीरही शहारला.

दोघांच्याही डोळ्यांत शंका, प्रेम, आसुसलेपणा आणि थोडीशी नाराजी होती.समीर उठण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याला ते जमेना.

प्रिशा पुढे सरसावली.
"थांब! अजून काही दुखापत करून घेतलीस तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही."

समीर हसला आणि म्हणाला,

"म्हणजे अजून प्रेम आहे?"

प्रिशाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले..

"प्रेम? प्रेम तर होतेच, आहेच आणि कायम राहील.खरं सांगू? मीच हरवले होते.परफेक्ट होण्याच्या नादात मी तुला गमावायला निघाले नव्हते रे पण घडामोडी घडत गेल्या आणि आपली ताटातूट झाली.पण आता ,मी तुझ्या बरोबर आहे ,समोर उभी आहे. तुझ्यासारखीच इम्परफेक्ट, पण अगदी खरीखुरी!"

समीरने तिचा हात आपल्या हातात घेतला.

"मला वाटलं तू कधीच परत येणार नाहीस."

"ही काय आले ना आता..तीही कायमची."

तेवढ्यात समीरची आई दरवाज्याशी आली. त्या दोघांकडे पाहून आश्चर्यचकित झाल्या.

"माझा मुलगा शेवटी स्वतःसाठी मैत्री शोधायला शिकतोय. माझी कोणीही मैत्रीण बनू शकत नाही असे म्हणाला होतास ना? मग ही कोण?"

क्रमशः

प्रिशाची ओळख समीर काय म्हणून करून देईल आईला? त्यांच्या या प्रेमाला मिलनाचा धागा सापडेल की आणखी काही आडफाटे फूटतील? पाहुया पुढील भागात..

वाचकहो,भाग फारच उशिरा पोस्ट केल्यामुळे क्षमस्व..पण वेळ मिळेल तशी ही कथा पुढे नेण्याचा प्रांजळ प्रयत्न नक्की करीन..