Login

इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह - भाग ३०

दोन प्रोफेसर्सची एक संघर्षमय प्रेमकहाणी

मागील भागात आपण पाहिले की नियतीने अखेरीस प्रिशा आणि समीरची भेट घडवून आणली.आता पाहुया पुढे..

दरवाज्यात उभ्या असलेल्या समीरच्या आईकडे पाहत प्रिशा थोडी गोंधळली.समीरच्या हातातील हात तिने पटकन काढून घेतला. तिच्या मनात भीती, संकोच आणि कुतूहल सगळं एकदम उसळून आलं.

समीर मात्र तिचा हात पुन्हा हातात घेत म्हणाला,
“आई, ही प्रिशा.माझी खरी मैत्रीण.माझ्या आयुष्यातली सगळ्यात जवळची व्यक्ती.”

समीरची आई एक क्षण नि:शब्द झाली. तिच्या डोळ्यांत आश्चर्य तर होतंच पण त्याहून जास्त एक प्रकारची भीती दाटून आली. तिनं हलक्या आवाजात विचारलं,
“समीरचा एक्सिडेंट झाला तेव्हा तूच फोन केला होतास का?"

प्रिशाने हसत ,थोडसं लाजत मान डोलावली.प्रिशाला शब्दच सुचत नव्हते. तिच्या मनात विचारांचा भडीमार सुरू होता.
' आईला मी आवडेन का? त्यांनी मला नाकारलं तर? समीर पुन्हा माझ्यापासून दूर जाईल का?'

समीरची आई पुढे आली आणि समीरला म्हणाली,
“बाळा, सध्या तुला आरामाची गरज आहे.तू नंतर आलीस तरी चालेल..”

प्रिशाच्या डोळ्यांत पाणी दाटलं.ती घाबरतच बोलली,
“ठीक आहे काकू, खरं सांगायचं तर,मी समीरपासून काही काळ दुरावले होते. माझ्या परिस्थितीमुळे, बाबांच्या आजारामुळे मी त्याच्याशी संपर्कात राहू शकले नाही."

समीर आईकडे पाहत म्हणाला,
“आई, हीच ती व्यक्ती जी माझ्या आयुष्यातली इम्परफेक्ट परफेक्टनेस आहे. हिच्यासोबत मला अपूर्ण असूनही पूर्ण असल्यासारखं वाटतं.”

आईने एक दीर्घ श्वास घेतला.
“समीर, आयुष्याचं खरं सौंदर्य म्हणजे योग्य प्रेम असतं.त्याला अजून पुष्कळ वेळ आहे.तू जावू शकतेस आता."

प्रिशाला आईच्या वागण्याचे वाईट वाटले नव्हते कारण ती त्यांच्यात अनोळखी असूनही समीरच्या इतक्या जवळ हातात हात घालून बसली होती.तिला स्वतःचेच असे वागणे म्हणजे मोठे पाप केल्यासारखे वाटत होते.ती मनोमन विचारांत गुरफटली,
' आईंसमोर आता माझी इमेज धुळीस मिळाली म्हणूनच त्या मला असं म्हणाल्या.मी भान ठेवून राहायला हवं होतं.'

मनात येणारे विचार थांबवत ती म्हणाली,
" येते काकू.."

" ठीक आहे.."

तिच्याकडे अगदी तिऱ्हाइत असल्याप्रमाणे समीरच्या आईने पाहिले. प्रिशा तिथून निघून गेली.

आई समीरला म्हणाली,
" तुझ्या बोलण्यातला रोख मला कळला समीर.
ही मुलगी तुझ्यासाठी इतकी महत्वाची आहे? आईला एकदा विचारावं असं वाटलं ही नाही तुला?"

दोघंही एकदम तणावात गेले.

समीर म्हणाला," आई आजचं तुझं वागणं मला पटलेलं नाही.तिच्यासोबत तुझं बोलणं म्हणजे एकदम इन्सल्टिंग वाटलं मला.."

" तुझ्यासाठी मी कुठल्याही मुलीला सून मानून घ्यावं असं जर तुला वाटत असेल तर सॉरी..माझा या गोष्टीला तीव्र विरोध आहे.."

समीर म्हणाला,
" पण का? काय कमी आहे तिच्यात ? माझ्यापेक्षा जास्त परफेक्ट आहे ती."

" समीर आपण या विषयावर नंतर बोलूया.."

" नाही.मला आत्ताच बोलायचं आहे.काय प्रॉब्लेम आहे तुझा?"

" हे बघ समीर ही मुलगी अगदी परफेक्ट असली तरीही तू तिच्यासोबत तुझे आयुष्य घालवू शकत नाही.ते शक्य नाही.."

" पण का? तेच तर तुला विचारतोय ना मी.."

तेवढ्यात सिस्टर आत आल्या आणि म्हणाल्या,
" तुम्ही पेशंट आहात त्यामुळे तुमचं असं रागात बोलणं धोकादायक आहे.त्यामुळे शांत व्हा.तुम्हाला एक ब्लड टेस्ट सांगितली आहे ती करून घेऊ.( समीरच्या आईकडे पाहत)तुम्ही यांच्या आई ना?"

" हो."

"काळजी घ्या यांची.आता थोडा वेळ बाहेर थांबा."

आई बाहेर गेली.समीरच्या मनाची अवस्था तिला समजत होती.ती मनोमन विचार करू लागली,
' प्रिशा मला माफ कर. तुला माझ्या अशा स्वभावाचा सामना करावा लागला.तू परफेक्ट आहेस माझ्या समीरसाठी.पण तो गुंड मुलगा तुझ्यासोबत समीरचं लग्न होऊ देणार नाही.तसे झाले तर त्याने आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.त्यात समीरच्या दोन बहिणी,म्हणजे माझ्या पोटच्या मुली त्या अगदी लहान असतानाच गमावल्या आहेत.आता मी माझ्या समीरला गमावू शकत नाही.प्लीज समजून घे मला.हे सारं समीरला सांगितलं तर तो त्या गुंड मुलाच्या पिच्छा पुरवेल आणि आणखी काही भलतं सलतं घडेल..समीर आणि प्रिशा योग्य वेळ आली की मी तुम्हा दोघांनाही हे सत्य सांगेल.तोपर्यंत मला माफ करा..'

आईच्या डोळ्यातून पाणी आलं.

इकडे प्रिशा आपल्याच विचारांच्या तंद्रीत असताना सिस्टरचा फोन आला. ते थोडे अस्वस्थ असल्याचं कळलं. प्रिशा घाईघाईनं निघाली.

समीरच्या जीवाची अवस्था देखील केविलवाणी होती.एकीकडे प्रिशा भेटल्याचा आनंद तर दुसरीकडे आईने तिला नाकारण्याचे दुःख.समीर मनोमन म्हणाला,
' प्रिशा,तू फक्त माझी आहेस. तुझी आयुष्यभर वाट पहायला मी तयार आहे फक्त यावेळी कुठेही हरवू नकोस,माझ्यापासून दूर जाऊ नकोस..'

इकडे बाबांना शांत झोपवून प्रिशा बसलेली होती.समीरचे हे शब्द जणू तिच्या कानावर पडले आणि ती कळवळून म्हणाली,
"नाही, यावेळी मी तुझ्यापासून दूर जाणार नाही.”

दोघांच्या मनाची कवाडं पुन्हा एकदा एकमेकांना शोधू लागली. त्या नजरेत हजारो गोष्टी होत्या—प्रेम, विश्वास,ध्यास, मिलनाची आस..

वाचकहो, प्रिशाच्या बाबांच्या प्रकृतीत सुधारणा होते का?आईच्या मनात नक्की कोणाविषयी भीती आहे? कोण आहे तो धमकावणारा गुंड? प्रिशा आणि समीरचे प्रेम अजून कशकशाची परीक्षा देईल? पाहुया पुढील भागात..


क्रमशः
©® सौ. प्रियंका शिंदे बोरुडे
0

🎭 Series Post

View all