Login

इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह - भाग ३१

दोन प्रोफेसर्सची एक संघर्षमय प्रेमकहाणी
मागील भागात आपण पाहिले की समीरची आई म्हणजे सुलभाताई प्रिशा आणि समीरच्या नात्याबद्दल नाखुश असतात. म्हणून त्या प्रिशाला समीरच्या रूममधून जायला सांगतात. प्रिशा मात्र समीरच्या विचारांत हरवते.आता पाहुया पुढे..

रात्र गडद होत चालली होती. प्रिशा बाबांच्या पलंगाजवळ बसून त्यांचा हात हलकेच दाबत होती. तिच्या मनात सतत समीरचे शब्द घुमत होते. तेवढ्यात हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये अचानक गोंधळ उडाला. कोणाचे तरी बूट पाऊलवाटेवर ठणकत होते. त्यात सिस्टर घाबरलेल्या आवाजात ओरडून म्हणायला लागल्या,
“तुम्हाला आत जाण्याची परवानगी नाही, हे हॉस्पिटल आहे!”

प्रिशा दचकली. तिने खिडकीतून बाहेर पाहिलं. काळ्या लेदर जॅकेटमध्ये, उंच आणि मास्कधारी चेहऱ्याचा माणूस दोन गुंडांसोबत उभा होता.त्याच्या डोळ्यांत एक विचित्र संताप चमकत होता.

त्याच क्षणी रिसेप्शन काऊन्टरवर रिपोर्टची वाट पाहत बसलेल्या समीरच्या आईच्या (सुलभाताई) चेहऱ्यावरचा रंगच उडाला. त्या धावत धावत उठल्या आणि थरथरत प्रिशा ज्या डिपार्टमेंटमध्ये होती तिथे पोहोचल्या कारण रिसेप्शन पासून ते जवळ होते.

एव्हाना बाहेर काहीतरी गडबड आहे हे प्रिशाला समजले होतेच त्यामुळे ती बाहेर डोकावली.तिने सुलभाताईंना पाहिले.ती सुलभाताईंना म्हणाली,
" काकू इकडे या.."

प्रिशाचा आवाज ऐकून सुलभाताईंना जरा हायसे वाटले. त्या तिच्याकडे गेल्या.सुलभाताई खूप घाबरलेल्या पाहून तिने त्यांना आधार दिला आणि जवळ बसवलं.तिने आपल्या रूमचे दार लावून घेतले.

सुलभाताई म्हणाल्या,
“तो इथे कसा आला? त्याला कसं कळलं?”

प्रिशा थोडी बुचकळ्यात पडली.
“काकू, कोण इथे आला आहे? कोण आहे तो? तुम्ही ओळखता त्याला?"

सुलभाताई गार पडल्या. त्यांच्या नजरेत अजूनही प्रचंड भीती होती.त्यामुळे त्या थरथरत होत्या.

तेवढ्यात तो माणूस प्रिशाची रूम ठोठावू लागला.
इतका वेळ शांत झोपलेले तिचे बाबा अचानक उठून बसले. आता मात्र प्रिशा प्रचंड घाबरली.

तिच्या रूमचे दार ठोठावून तो वैतागला. शेवटी तो मोठ्या आवाजात म्हणाला,
" ए दार उघड लवकर.. दार उघडलं नाही तर तुमच्या दोघींच्या लाडक्या समीरचं काही खरं नाही. प्रिशा, तुला समीरपासून लांब राहावंच लागेल. नाहीतर परिणाम भयंकर होतील!”

संपूर्ण कॉरिडॉरमध्ये शांतता पसरली.नर्सेस भीतीने मागे सरकल्या. प्रिशाच्या रूमचा दरवाजा अजूनही बंद होता.तरीही ती थरथरत, ठाम आवाजात म्हणाली,
“ओह मिस्टर तुम्ही कोण आहात ते आधी सांगा.हॉस्पिटल मध्ये अशी अरेरावी आम्ही सहन करणार नाही.इथे आजारी पेशंट आहेत.तुमच्या अशा गुंडगिरी करण्यामुळे त्यांच्यावर काय परिणाम होईल? दुसरं म्हणजे मी काय करावं काय नाही ते तुम्ही का ठरवताय?”

तो राकट हसला आणि म्हणाला,
“ए दुसऱ्यांशी मला काही घेणं देणं नाही.मला तर तू हवी आहेस.आपले जुने हिशोब अजून चुकते करायचे आहेत. दुसरं म्हणजे माझं नाव जाणून घेण्याची गरज नाही,फक्त इतकं समजून घे की समीर माझ्या हातून सुटणार नाही. आणि जर तू त्याच्या जवळ राहिली तर तुला तुझं आणि त्याचं आयुष्य विसरावं लागेल. ठोकून टाकीन मी तुम्हा दोघांना..”

प्रिशाचे हृदय जोराने धडधडू लागले. तिचे पाय जणू जमिनीला खिळले. तिला आवाज ओळखीचा वाटला पण त्याचे बोलणे ऐकून तिची शंका खरी ठरली.

ती स्वगत करत म्हणाली,
' म्हणजे हा विराज आहे?तोच विराज ज्याने माझ्यावर एकतर्फी प्रेम करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता? जो विद्यानिकेतन बागेत समीर आणि माझ्या पुढ्यात येऊन काही बाही बोलला होता? तो इथे कसा आला?'

तेवढ्यात सुलभाताई प्रिशाचा हात घट्ट पकडून म्हणाल्या,
“प्रिशा, आत्ता काहीही बोलू नकोस,फक्त त्याला इथून निघून जाऊ दे.”

सुलभाताईंच्या मनात मात्र अनेक प्रश्न फेर धरू लागले.
' हा म्हणजे प्रिशाचा आधीचा बॉयफ्रेंड असावा का? याला या दोघांविषयी माहित आहे? म्हणूनच समीरच्या आयुष्याशी खेळायला हा निघाला आहे? म्हणजे मला त्याने घरी येऊन धमकी यामुळे दिली तर..'

दरम्यान, रिसेप्शन मधील एका मॉनिटरवर अचानक अलार्म वाजू लागला.डॉक्टर तिथेच उभे होते.ते म्हणाले,
" स्पेशल रूम न.१४ ,समीर नावाच्या पेशंटच्या रूममधील अलार्म आहे. गो टू द रूम इमीडीएटली.."

समीरच्या आईच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.
“देवा, माझ्या मुलाला काही होऊ नये!”

प्रिशाने ठाम नजरेने दार उघडले आणि त्या गुंडाकडे पाहिले.ती म्हणाली,
“जरी संपूर्ण जग माझ्या प्रेमाविरुद्ध उभं राहिलं तरी मी समीरला सोडणार नाही कारण आमचं प्रेम अमर आहे.”

गुंडाचा चेहरा एकदम पडला.तो पुटपुटला,
“तुझ्यात बेकार कॉन्फिडन्स आहे..अरे हा परफेक्ट आहेस ना तू.. म्हणूनच तू मला कधी कधी धोकादायक वाटतेस आणि जाम आवडतेस."

प्रिशा पेटून उठली होती.तिच्या आणि समीरच्या प्रेमाची आग कोणालाही भस्मसात करू शकते हे तिने दाखवून दिले.

तो विराज नावाचा गुंड हसत हसत वळला आणि अंधारात निघून गेला.

वाचकहो, आता प्रिशा काय करेल? समीर ठीक असेल का?तो गुंड प्रिशाच्या आणि समीरच्या प्रेमाला ग्रहण लावेल का? प्रिशाचा भूतकाळ सुलभाताई कशा प्रकारे घेतील? याचा त्यांच्या आणि प्रिशाच्या नात्यावर काय परिणाम होईल? प्रिशाचे बाबा यावर कसे व्यक्त होतील? पाहुया पुढील भागात..


क्रमशः