Login

इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह - भाग ३३

दोन प्रोफेसर्सची एक संघर्षमय प्रेमकहाणी
मागील भागात आपण पाहिले की प्रिशा तिचे आणि विराजचे नाते सुलभाताईंना सांगते.त्याच वेळी हॉस्पिटल बाहेर विराज, प्रिशा आणि समीर विरुद्ध प्लॅन बी आखायला सुरू करतो.आता पाहुया पुढे..

सकाळी हॉस्पिटलच्या बाहेर गाड्यांची वर्दळ सुरू झाली होती. रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये पांढऱ्या भिंतींसारखीच अनोळखी तरीही विचित्र शांतता पसरली होती.

समीर हळूहळू बरा होत होता, पण त्याच्या आजूबाजूला काहीतरी बदललेलं होतं,वातावरणात भावनांचा दबाव होता.चोहिकडे असणारी शांतता आणि उदासीनता त्याचा जीव घेऊ पाहत होती.त्यामुळे अंगावरील अपघाताच्या जखमा, मळकट असा पेशंट बेड त्याला आणखी निरस करू लागली.कधी एकदा प्रिशाकडे जाऊन,पुन्हा एकदा मनमोकळे करून आपले आयुष्य तिच्या नावे करून टाकेन असे समीरला झाले.

सुलभाताई आपल्या मुलाकडे पाहत,त्याचे मन वाचत होत्या.सारं काही समजत असूनही त्या गप्प होत्या. तेवढ्यात तिथे प्रिशा आली.तिने समीरकडे प्रेमळ कटाक्ष टाकला.तो देखील छान हसला.तिने सुलभाताईंकडे पाहिले.त्यांच्या नजरेत तिच्याविषयी काळजी होती, पण त्याचसोबत एक अदृश्य अंतर देखील होते.

प्रिशा तिथून निघाली आणि आपल्या वडिलांकडे गेली.
त्याच वेळी, हॉस्पिटलमध्ये प्रिशाची आई वसुधाताई आल्या.त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा होत्या.

“प्रिशा!” मुलीला पाहताच त्यांनी तिला मिठी मारली ,“बाळा, तुला काही झालं नाही ना?”

“नाही आई, सगळं ठीक आहे,” प्रिशा म्हणाली.

समोरून सुलभाताई आल्या आणि प्रिशाला जाणवलं,आता यांच्यात काहीतरी गहन बोलणं होणार आहे.

सुलभाताई थोडं पुढे येत म्हणाल्या,
“वसुधाताई, मी सुलभा समीरची आई."

" नमस्कार पण तुम्ही इथे कशा? शिवाय माझी ओळख तुम्हाला कशी ठाऊक?"

" नियतीचा खेळ म्हणा हा हवं तर..आपल्या दोघींच्या मुलांबद्दल मला जरा बोलायचं आहे.”

प्रिशाच्या मनात धडधड सुरु झाली.तिकडे समीरची अवस्था देखील काही वेगळी नव्हती.

कॉरिडॉरच्या कोपऱ्यातल्या छोट्या गार्डनमध्ये दोघी बसल्या. दोघींच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते.

“हे पाहा वसुधाताई,” सुलभाताई शांतपणे म्हणाल्या,
“माझ्या मुलाचा जीव आज वाचला, पण त्याच्या भोवतीचा धोका अजून संपलेला नाही. तुमच्या मुलीच्या भूतकाळामुळे तो सतत संकटात येतोय. मला माझ्या मुलाचं आयुष्य वाचवायचं आहे.”

वसुधाताईंच्या डोळ्यांत अश्रू आले.
“तुम्ही बरोबर बोलता, सुलभाताई पण माझी मुलगीही काही वाईट नाही. ती फक्त प्रेम करते समीरवर प्रामाणिकपणे पण प्रत्येक वेळी तिचं नशीब तिला परत ओढून संकटात आणतं.”

सुलभाताईंचा आवाज किंचित कठोर झाला,
“प्रामाणिक असो वा नसो, पण त्यामुळे माझ्या मुलाच्या जीवावर बेततंय हे खरं आहे. म्हणून कृपया तुमच्या मुलीला माझ्या मुलाच्या आयुष्यातून दूर ठेवा.”

त्या शब्दांनी वसुधाताईंच्या मनात जणू खोल बाण घुसला
पण एक आई म्हणून त्यांनी स्वतःला सावरलं.

“ठीक आहे,” त्या हळूच म्हणाल्या, “जर हेच योग्य असेल, तर मी माझ्या प्रिशाला घेऊन जाते.असंही तिच्या बाबांची तब्येत आता बरी होत आहे. पण लक्षात ठेवा कधी कधी दूर गेलेले लोकही नियती पुन्हा समोर आणते.”

सुलभाताई काही क्षण शांत राहिल्या.
त्यांच्या नजरेत थोडा पश्चात्ताप होता, पण त्यांनी काहीच प्रत्युत्तर दिले नाही.

दोन - तीन दिवसांत प्रिशाच्या बाबांना सुट्टी मिळाली. वसुधाताई प्रिशाला तसेच बाबांना घेऊन तिथून निघाल्या.समीरच्या रुममध्ये एकदा डोकावून बघण्याची प्रिशाची खूप इच्छा होती पण ती काहीच बोलली नाही.

समीर देखील त्या दिवशी औषधांच्या गुंगीतून शुद्धीवर आला तेव्हा फक्त तिच्या नावाची कुजबुज त्याच्या ओठांवर होती,
“प्रिशा…”
सुलभाताईंनी त्याचा हात धरला.

“ती गेली समीर. तिच्यासाठी नाही, आपल्या सुरक्षिततेसाठी.”

समीरच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.

त्याने काहीच विचारलं नाही पण त्या नजरेत हजार प्रश्न, हजार दुखं होती.

काही महिने लोटले.मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांवर गर्दीच्या समुद्रात सगळं पुन्हा नेहमीसारखं दिसत होतं.
पण दोन मनं अजूनही शांत नव्हती, एक समीरचं, एक प्रिशाचं.

प्रिशा आता तिच्या बाबांच्या तब्येतीकडे लक्ष देत होती.बाबांसह मुंबईलाच तिच्या मावशीकडे ती राहत होती आणि वेळ मिळेल तसा नोकरीसाठी अर्ज करत होती.

त्या दिवसातच तिला एका प्रतिष्ठित ' साउथ मुंबई कॉलेज' मधून फोन आला,
“मॅडम, तुमची प्रोफाईल आम्हाला खूप आवडली. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटमध्ये लेक्चरर म्हणून इंटरव्ह्यूसाठी यावे लागेल.त्याबद्दल ची माहिती मेलवर पाठवली आहे."

प्रिशाच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं.
" ओके सर.. थँक्यू."
तिने फोन ठेवला.

' कदाचित आता माझं आयुष्य पुन्हा मार्गी लागेल..' ती मनात म्हणाली.

दुसरीकडे, समीरलाही त्याच कॉलेजकडून मेल आला,
“केमिकल इंजिनीअरिंग, वॉक इन इंटरव्ह्यू.."

त्यानेही विचार न करता होकार दिला.

दोघांनाही कल्पना नव्हती की नियतीचा खेळ पुन्हा सुरू झाला आहे.

इंटरव्ह्यूचा दिवस उजाडला.
कॉलेजच्या भव्य इमारतीत सकाळचं ऊन सोनेरी रंग फेकत होतं.प्रिशा हातात फाईल घेऊन स्टाफ रूमकडे चालत होती.
दरवाज्याजवळ कोणीतरी तिच्या दिशेने आलं आणि दोघांची धडक झाली.फाईल खाली पडली. दोघं एकाच वेळी वाकले आणि नजरेला नजर भिडली. ते होते समीर आणि प्रिशा.

क्षणभर वेळ थांबला.सभोवतालचा आवाज बंद झाला. एकमेकांच्या डोळ्यांत साठलेली आठवण फक्त आता बोलत होती.

“तू,इथे?” समीर थरथरत्या आवाजात म्हणाला.

“हो.पण मला वाटलं, तू..” प्रिशाने वाक्य पूर्णही केलं नाही.

दोघांच्या चेहऱ्यावरील अनपेक्षित आश्चर्य आणि आतून उठलेला गहिवर जणू काही वाळवंटात पालवी दिसल्यासारखा भासत होता.

तरीही पुढे काहीही न बोलता ते दोघे आपापल्या मार्गी गेले. त्यांचे इंटरव्ह्यू पार पडले.थोड्या वेळातच लिपिकने आवाज दिला,

" मि. समीर आणि मिस प्रिशा तुम्हाला प्रिन्सिपलने बोलावलं आहे."

प्रिशा आणि समीर पुन्हा एकत्र काम करतील? असे झालेच तर कसे सामोरे जातील ते त्यांच्या भूतकाळाला? विराजचा “प्लॅन बी” आता सुरू होणार का? आणि दोघांच्या आईंमध्ये उभा असलेला हा दुरावा पुन्हा मिटेल का? पाहुया पुढील भागात..

क्रमश:

©® सौ. प्रियंका शिंदे बोरुडे

(वाचकहो, तुम्हाला प्रत्येक भाग कसा वाटला हे सांगायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी खूप मोठा प्रेरणा स्रोत आहे.)