Login

इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह - भाग ३६

दोन प्रोफेसर्सची एक संघर्षमय प्रेमकहाणी
मागच्या भागात आपण पाहिले की झालेल्या अत्याचारामुळे प्रिशा भावुक होऊन आतून पूर्णतः तुटते पण समीर तिच्याशी अचानक लग्न करतो आणि तिला पुढे लढण्यासाठी प्रेरित करतो.दुसरीकडे डॉ विशाल तुरुंगात गजाआड जातो आणि तिथे एक व्यक्ती त्याला भेटायला येतो.आता पाहूया पुढे..

तुरुंगातील अंधारात विशालच्या डोळ्यांत अजूनही एक प्रकारचं वेड चमकत होतं.त्याने समोर उभ्या त्या व्यक्तीकडे पाहिलं.. चेहरा सावलीत लपलेला, पण आवाज ओळखीचा.

विशालने तिरस्काराने म्हटलं, “मला सांगायचं होतं ना, की तूच तू या खेळाचा खरा मास्टर आहेस?”
त्या व्यक्तीने हळूहळू पुढे पाऊल टाकलं.

लाइटच्या झोताने त्याचा चेहरा उजळला.तो विराज होता!
त्याच्या डोळ्यांत एक विचित्र थंडपणा होता ,जणू भावना संपल्या होत्या.

तो म्हणाला,
“मी तुला फक्त एवढं सांगितलं होतं की प्रिशाला बदनाम करायचं, तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं पण हे ? शी ss बलात्कार?”

विशाल खदखदून हसला.

“विराज, तू तिच्या प्रेमात आंधळा झालास पण मी नाही. ती मुलगी माझ्या हाती आली होती आणि मला ‘नाही’ हा शब्द आवडत नाही.”

विराजचा चेहरा क्षणात बदलला.त्याने विशालचा कॉलर पकडला आणि थरथरत्या आवाजात म्हणाला,
“तू जे केलंस, त्याची किंमत तुला मोजावी लागेल. मी आता तुला वाचवणार नाही. पोलिसांसमोर मी स्वतः सगळं कबूल करीन की या कटामागे मीही होतो.”

विशालने तिरकसपणे हसत विचारलं,
“का रे? प्रेम जागं झालं का? की अपराधबोध?”

विराजने काहीच उत्तर दिलं नाही.

त्याने मागे वळून शांतपणे दरवाजा ठोठावला.गार्ड आला, आणि त्याने फक्त एवढं म्हटलं,
“हा माणूस आयुष्यभर इथे सडावा, त्याचं नावसुद्धा कोणी उच्चारू नये असा बंदोबस्त करा.”

दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये प्रिशा हळूहळू सावरत होती.
समीर रोज तिच्यासोबत असायचा, तिच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी नवनवीन प्रयत्न करायचा पण तिच्या डोळ्यांत अजूनही एक न संपणारी ज्वाला होती.

एका संध्याकाळी तिने समीरकडे पाहत ठाम आवाजात म्हटलं,
“समीर, मी आता गप्प बसणार नाही. माझ्यासोबत जे झालं, ते कित्येक मुलींसोबत होतंय पण कोणी बोलत नाही. मी बोलेन.”

समीरने तिच्या डोळ्यांत पाहिलं त्यात भीती नव्हती, फक्त शक्ती होती.

“मी तुझ्या सोबत आहे, प्रिशा पण हा रस्ता सोपा नाही.”

“माहित आहे मला,” ती म्हणाली,“पण जर मी गप्प राहिले, तर न्याय मरेल.”

त्या रात्री, प्रिशाने मीडिया रिपोर्टरला संपर्क केला.ती स्वतःचं नाव, चेहरा सगळं उघड करणार होती कारण तिला तिची लाज नाही, अपराध्याची लाज उघड करायची होती.

समोर कॅमेरा चालू झाला.ती शांतपणे बोलू लागली,
“मी डॉक्टर विशालचा गुन्हा जगासमोर आणतेय. मी बळी नाही, मी साक्षीदार आहे, एका स्त्रीच्या अस्मितेचा, तिच्या पुनर्जन्माचा.”

त्या मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल झाला.देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या, कोणी तिचं कौतुक केलं, कोणी प्रश्न विचारले पण एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली ती म्हणजे आता प्रिशा निर्भीड झालेली होती.

दरम्यान, पोलिस चौकशीत विराजने आपला कबुलीजबाब दिला.त्याने सांगितलं की, विशालसोबत मिळून त्याने प्रिशाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा कट रचला होता कारण तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता पण विशालच्या कृत्यानं तोही हादरला आणि आता पश्चात्तापाने ग्रासलेला होता.

न्यायालयात प्रकरण चालू झालं.प्रिशा साक्षीपेटीत उभी होती, निडर, ठाम.

तिने न्यायाधीशांना पाहत म्हटलं,
“माझं शरीर,आत्मा तुटला असेल, पण माझं मन नाही. मी इथे स्वतःसाठी नाही, तर प्रत्येक त्या स्त्रीसाठी उभी आहे जी अजूनही शांत बसली आहे.”

त्या शब्दांनी सगळं कोर्टरूम शांत झालं.विशालचा चेहरा पांढरा पडला.शेवटी न्याय मिळाला.डॉ. विशालला जन्मठेपेची शिक्षा झाली.विराजला सहकारी म्हणून शिक्षा झाली, पण त्याला सुधारण्याची संधी देण्यात आली.

बाहेर न्यायालयाच्या पायर्‍यांवर प्रिशा आणि समीर उभे होते.पहाटेचा सूर्य त्यांच्या चेहऱ्यावर चमकत होता अगदी तसाच जसा त्या हॉस्पिटलच्या खोलीत एकदा उगवला होता.

प्रिशाने हळू आवाजात म्हटलं,
“या वेळी मी केवळ वाचले नाही समीर,मी पुन्हा जन्मले आहे.”

समीरने तिचा हात धरला आणि म्हणाला,
“हा तुझा नव्हे, आपल्या सगळ्यांचा विजय आहे.”

त्या क्षणी त्यांच्या मागे असंख्य स्त्रिया उभ्या होत्या,
कधी न पाहिलेल्या, पण त्या सर्वांच्या डोळ्यांत एकच भाव होता तो म्हणजे धैर्याचा..

वाचकहो आज प्रिशा जिंकली कारण तिला समीरची भक्कम साथ होती. स्त्री कधीही अबला नसते. तिची शक्ती तिच्यातच दडलेली आहे याची जाणीव फक्त तिला करून देणं गरजेचं असतं आणि तेच समीरने केलं. आता पुढे काय होणार या प्रेमकथेमध्ये? समीरची आई प्रिशाला सून म्हणून स्वीकारेल?

आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.तोपर्यंत स्टे ट्युन्ड..