Login

इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह - भाग ३८

दोन प्रोफेसर्सची एक संघर्षमय प्रेमकहाणी
मागील भागात आपण पाहिले की प्रिशा सुलभाईंचा विश्वास जिंकते आणि पुनर्जन्म नावाच्या संस्थेची स्थापना करते. आता पाहुया पुढे..

पुनर्जन्म या संस्थेची सुरुवात मोठ्या धामधुमीत झाली.
प्रिशा दिवस-रात्र कामात गुंतलेली असायची.प्रत्येक पीडित मुलगी तिच्यासाठी स्वतःचं प्रतिबिंब होती.समीर तिला साथ देत होता, पण त्याला कधी कधी जाणवायचं की प्रिशा आता फक्त त्याची पत्नी राहिली नाही, तर ती एका मिशनमध्ये बदलली आहे.

एका संध्याकाळी समीर कॉलेजमधून काम करून घरी परतला आणि पाहतो तर प्रिशा टीव्हीवर होती.त्यात ती एका चर्चेमध्ये, समाजातील अन्यायावर बोलताना दाखवले गेले.ती प्रखर, निडर आणि संवेदनशील शब्दांत बोलत होती.समीरला तिचा अभिमान वाटला, पण त्याच वेळी त्याच्या मनाला एक टोचणीही लागली.

त्या दिवशी ती जरा उशीरा घरी आली.ती सध्या कॉलेज,संस्था आणि घर अशा तिन्ही जबाबदाऱ्या पार पाडत होती.प्रिशाने घाईतच स्वयंपाक केला.दोघेही डायनिंग टेबलवर जेवायला बसले.तो शांतपणे म्हणाला,
“आपण दोघं पूर्वी किती वेळ एकत्र घालवायचो.आता तर तू माझ्याशी बोलायलाही वेळ काढत नाहीस.असे का?”

प्रिशा हसली आणि म्हणाली,
“समीर, तूच तर म्हणाला होतास ना की मी सगळ्यांसाठी उभं राहायला हवी म्हणून..”

“हो, पण त्या ‘सगळ्यां’मध्ये मी मात्र हरवतोय प्रिशा,” समीरचा आवाज मंद पण दुखावलेला होता.

प्रिशाला समीरचे बोलणे ऐकून वाईट वाटले.तरीही ती शांत बसली.पुढच्या काही दिवसांत त्यांच्यामध्ये काहीही संवाद झाला नाही.प्रिशा तिच्या कामात गुंतली तर समीर त्याच्या कामात.दोघं एकाच घरात राहूनही दोन वेगळ्या जगात जगत होते.दोघांनाही त्यांच्या नात्यात एक पोरकेपणा जाणवत होता.

एक दिवस प्रिशाला संस्थेत एक फाइल आली.ती एक नवीन केस होती. एका मुलीवर अत्याचार झाला होता आणि आरोपीचं नाव पाहून तिच्या हातातून फाइल खाली पडली.
त्या फाइलवर लिहिलं होतं, “विराज साठे – अपील केस”

हो, तोच विराज! ज्याने कबुलीजबाब दिला होता, पण आता शिक्षा कमी करण्यासाठी अपील दाखल केली होती.
त्याचं पत्र संस्थेला आलं होतं. त्यात म्हटलं होतं,
“मी स्वतःला सुधारलं आहे. मला एकदा प्रिशाशी बोलायचं आहे. माझं सत्य सांगायचं आहे.”

प्रिशा हादरली.तिने ही गोष्ट समीरपासून लपवली.ती स्वतः त्याला भेटायला गेली तेही केवळ एकदाच, उत्तर मिळवण्यासाठी.. कारण प्रश्न पीडित मुलीचाही होताच.

तुरुंगात विराज तिला पाहून थोडा थांबला.त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप झळकत होता, तरीही प्रिशाच्या मनात त्याच्याविषयी संशय दाटून आला.

“मी आता वेगळा झालो आहे, प्रिशा,” विराज म्हणाला.

“त्या रात्रीचा गुन्हा माझा नव्हता.मी थांबवू शकलो असतो स्वतःला, पण नाही थांबवलं. त्याची शिक्षा मी रोज स्वतःला देतो पण तुला माहित आहे का? तुझ्याशी संबंधित एक सत्य तुला सांगितलं गेलेलं नाही.”

प्रिशा चकित झाली,
“सत्य? कोणतं सत्य?”

“विशालने तुला फसवलं तेव्हा, तो एकटा नव्हता. खरं तर मीही त्याच्यासोबत होतो पण तुझ्यासोबत झालेल्या कुकर्माचा मलाही काही थांगपत्ता नव्हता.मला वाटतं ते सर्व तुझ्यावर घडवून आणण्यासाठी कुणीतरी बाहेरून त्याला सपोर्ट करत होतं म्हणजे तुझ्या जवळच्या वर्तुळातलं कोणीतरी.."

प्रिशा अवाक् झाली,
“काय बोलतोयस तू? तुझं तुला तरी कळतंय का?”

विराज शांतपणे म्हणाला,
“मला मान्य आहे.तू माझ्यावर विश्वास ठेवू शकणार नाही.म्हणून मी तुला आधीच फाईल दिली आहे.त्या फाइलमधल्या काही पानांत तुला पुरावा सापडेल.तुला त्यातून सर्व काही कळेल पण मी इथे काही सांगणार नाही. तूच शोध.”

प्रिशा गोंधळलेल्या अवस्थेत परतली.घरी आली तर समीर तिची वाट पाहत होता,
“कुठे होतीस तू? संस्थेत म्हणाले तू बाहेर गेलीस. कॉलेजमध्ये देखील तू आज हाफ डे घेतला होतास?”

ती गप्प उभी होती.

“तू पुन्हा त्या प्रकरणात शिरलीस का?” समीरने कठोर आवाजात विचारलं.

प्रिशाने सत्य लपवण्याचा प्रयत्न केला,
“मी फक्त केस तपासत होते..”

समीरने तिच्या बॅगेतून विराजचं पत्र काढलं कारण समीरला संस्थेमधून सगळी माहिती आधीच मिळाली होती.तिच्या चेहऱ्यावर धक्का बसल्यासारखा भाव आला.

“तू माझ्याशी हे सगळं लपवलंस?”

“समीर, मला फक्त सत्य शोधायचं होतं.."

“त्या माणसाशी भेटून ? ज्याने तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं? तुला कळतंय का मी काय बोलतोय? त्यावेळी तू एकटीनेच नाही तर मी सुद्धा प्रचंड त्रास सोसला.."
समीरचा आवाज थरथरत होता, पण तो रागाने नव्हे तर हळहळीने भरलेला होता.

“त्यावेळी मी तुला वाचवलं, तुझ्यासाठी लढलो आणि आज तू त्या गुन्हेगाराला भेटायला गेलीस? तेही माझ्याशिवाय?”

प्रिशा रडत म्हणाली,
“समीर, तो माझा भूतकाळ होता .मी त्याचं ओझं संपवण्यासाठी गेले होते.मी हे सारं तुझ्यापासून लपवलं कारण मला वाटलं तू मला थांबवशील..”

समीर तिच्यापासून दूर सरकला.
“कदाचित तू बरोबर केलंस प्रिशा, पण माझं मन आता तुझ्याशी कनेक्ट होणार नाही कारण मला वाटलं, आपण सगळं एकत्र करत आहोत, तेव्हाही आणि आताही..”

त्या रात्री दोघं एकाच घरात असूनही बोलले नाहीत.
बाहेर पावसाचा आवाज होता, आणि आत त्यांच्या नात्यात नव्याने उठलेलं एक अशांत, भयंकर वादळ..

वाचकहो,या संशयाच्या सावल्या प्रिशा आणि समीरला असेच झुरत ठेवतील का? प्रिशा विराजच्या सांगण्यावरून काय गुपित उघड करणार आहे? हे सत्य बाहेर येण्यापूर्वीच त्यांचं नातं एका निर्णायक वळणावर पोहोचेल का? जाणून घेऊया पुढील भागात.. तोपर्यंत स्टे ट्युन्ड..

क्रमशः

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
0

🎭 Series Post

View all