Login

इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह - भाग ४०

दोन प्रोफेसर्सची एक संघर्षमय प्रेमकहाणी
मागील भागात आपण पाहिले की प्रिशा,सुलभाताई आणि समीरच्या मनात एकमेकांविषयी कुठलेही मतभेद राहत नाहीत कारण विराजने सांगितलेल्या पुराव्याची योग्य पद्धतीने उकल होते.आता पाहुया पुढे..

काही आठवड्यांनंतर “पुनर्जन्म” या संस्थेचं काम देशभर गाजू लागलं होतं.प्रिशा अनेक महिलांना न्याय मिळवून देत होती.टीव्ही चॅनेल्सवर तिच्या मुलाखती, समाजमाध्यमांवर तिच्या धैर्याच्या पोस्ट्स झळकत होत्या.ती एक चेहरा नव्हे, तर एक चळवळ बनली होती पण तिच्या या तेजोमय प्रसिद्धीच्या प्रकाशामागे एक सावली तयार होत होती.कुठे ? तर राजकारणाच्या गलियार्‍यात.

एका रात्री न्यूज चॅनलवर अचानक ब्रेकिंग न्यूज लागली,
“पुनर्जन्म संस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप! सरकारी निधीचा गैरवापर,आरोपी प्रिशा समीर देशमुख?”

समीरने टीव्हीकडे पाहत अविश्वासाने डोळे चोळले.
“हे काय चाललंय पाहिलंस का प्रिशा?”

प्रिशा काही क्षण नि:शब्द राहिली.
“हे खोटं आहे, समीर.."

" प्रिशा मला माहित आहे की तू आणि तुझी म्हणजेच आपली संस्था असे काहीही करूच शकत नाही.तरीही अशा अफवा,अशी चुकीची न्यूज मीडियाकडे कोणी दिली? मला काहीच समजत नाहीये काय चाललंय ते..”

त्यानंतर मीडिया, ट्रोल्स, आणि विरोधकांचा वर्तमानपत्रातून भडिमार सुरू झाला.
“नायिका नव्हे, ढोंगी!.."
“पैशासाठी सहानुभूतीचा खेळ!” अशी मथळे त्यात झळकू लागली.

काही दिवस संस्थेबद्दलचा हा असा दिंडोरा पिटला गेला.
नंतर हे सगळं शांत झालं.

थोड्या दिवसांनी प्रिशाला पोलिसांकडून चौकशीसाठी नोटीस आली.सुलभाताईंच्या चेहऱ्यावर चिंता उमटली कारण त्या आता प्रिशा आणि समीरकडेच राहायला आल्या होत्या.

त्या काळजीच्या सुरात म्हणाल्या,“ देवा,पुन्हा सुरुवात झाली का या सगळ्याला?”

दुसऱ्या दिवशी प्रिशाने पत्रकार परिषद घ्यायचे ठरवले.
त्यात ती ठाम आवाजात,निर्भिडपणे म्हणाली,
“मी संस्थेसाठीचा असलेला कोणताही निधी गैर पद्धतीने वापरलेला नाही. हे आरोप माझ्या कामावर डाग लावण्यासाठी केले गेले आहेत.”

एका पत्रकाराने टोचून विचारलं,
“मग आमच्या हाती लागलेले हे दाखले कुठून आले? तुमच्या संस्थेच्या अकाऊंटमध्ये एका राजकीय ट्रस्टकडून पैसे जमा झालेत!”

प्रिशा चकित झाली.
“कोणता ट्रस्ट?”

पत्रकाराने उत्तर दिलं —
“ ' समानता विकास प्रतिष्ठान’ ज्याचे अध्यक्ष आहेत राज्यमंत्री अशोक राणे.”

त्या नावाचा उच्चार होताच प्रिशाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला.

तिला आठवलं की काही महिन्यांपूर्वी संस्थेला निधी देण्याच्या निमित्ताने मंत्री राणे स्वतः तिला भेटायला आले होते.त्यावेळी त्यांनी तिचं खूप कौतुक केलं होतं, तिच्यासोबत फोटो काढले होते आणि म्हणाले होते,
“तुमच्या धैर्याला आमचं राजकीय पाठबळ आहे एवढं लक्षात असू द्या.”

तेव्हाच प्रिशाला त्यांच्या डोळ्यांत एक स्वार्थी चमक दिसली होती, पण तिने दुर्लक्ष केलं होतं.आता तिला समजलं की
हा ' पाठिंबा' म्हणजे तिला फसवण्यासाठी रचलेला सापळा होता.

समीरला तिने याबद्दल सगळे सांगितले.
समीर म्हणाला,
“आपल्याला आता आधी हे सारं खोटं आहे म्हणून पुरावे गोळा करावे लागतील. राणेंनी मुद्दाम तुझ्या नावावर निधी ट्रान्सफर करून खोटं प्रकरण बनवलं आहे.”

प्रिशा ठाम आवाजात म्हणाली,
“या वेळेस मी न्यायालयात नाही, तर लोकांसमोर लढेन.”

ती थेट मंत्रालयात गेली.सुरक्षारक्षकांनी तिला थांबवलं, पण तिच्या नजरेतील धैर्याने तेही मागे सरले.

राणे आपल्या केबिनमध्ये आरामात बसलेले होते.

“अरे वा, प्रिशा मॅडम!” त्यांनी हसत पुढे म्हटलं,
“ अरेरे..टेन्शनमध्ये आहात? काय करणार? तुम्ही केलेला गुन्हाच मोठा आहे ना..आता तुम्ही इतक्या प्रसिद्ध झालात की आम्हालाही तुम्हाला तुमच्या आरोपाबद्दल स्पष्टीकरण द्या म्हणून म्हणावं लागतंय.. म्हणजे तुमच्यावरील आरोप सिद्ध करावा लागतोय..”

प्रिशा थेट म्हणाली,
“तुम्ही निधी माझ्या नावावर ट्रान्सफर केला, आणि आता भ्रष्टाचाराचं आरोपपत्र दाखल केलं. का? कारण मी महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवला म्हणून?”

राणे खुर्चीत मागे रेलले आणि उपहासाने हसत म्हणाले,
“राजकारण हे सत्यापेक्षा शक्तीवर चालतं, मॅडम. तुम्ही भावना दाखवताय, आम्ही खेळ खेळतोय.”

प्रिशाच्या चेहऱ्यावर शांत पण तीव्र राग होता.
“मी भावना दाखवत नाही तर मी युद्ध जाहीर करतेय तेही सत्याचं.”

त्या रात्री प्रिशाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यात ती म्हणाली,
“आज माझ्यावर आरोप झालेत, उद्या माझ्यासारख्या आणखी हजारोंवर होतील.काहींच्या मते,मी गप्प बसले असते तर ते बरोबर ठरले असते पण या वेळेस मी आवाज नाही, तर पुरावे सादर करेन आणि मला फसवणाऱ्यांचा राजकीय मुखवटा फाडून टाकेन.”

तो व्हिडिओ व्हायरल झाला.लोक पुन्हा तिच्या बाजूने उभे राहू लागले.समीर, सुलभाताई आणि काही विश्वासू लोकांनी मिळून तिच्यावरील आरोप नाहीसे करण्यासाठी पुरावे गोळा केले.

राणे यांच्या सचिवाने फसव्या व्यवहारांचा डेटा पेनड्राईव्हमध्ये जतन केला होता पण त्या व्यक्तीचा जीव धोक्यात होता कारण हा सचिव ईमानदार वृत्तीचा होता.यावरच एका रात्री त्याच सचिवाचं अपघाती मृत्यू झाल्याचं वृत्त आलं.

प्रिशा थरथरली.ती पुटपुटली,
' म्हणजे हा अपघात नव्हता. राणेंनी सर्व पुरावे मिटवले वाटतं.'

आता पुढे काय होणार? प्रिशाच्या संस्थेवरील हा आरोप खोटा आहे हे प्रिशा कसे सिद्ध करेल? समीर आणि प्रिशा एकत्र येऊन याला कसे सामोरे जातील? दोघेही एकमेकांविषयी असलेली आपल्या प्रेमाची ताकद पणाला लावून हा राजकीय लढा कसा लढतील? पाहूया पुढील भागात.. तोपर्यंत स्टे ट्युन्ड..

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे