तोतया वारसदार (पर्व २ रे ) भाग ३

“तुमच्या कामाचं स्वरूप मी जेंव्हा ऐकलं, वंशावळी पाहीली, तेंव्हा व्यंकटेश आणि सौमित्र यांचाच फ?

 तोतया वारसदार

पात्र रचना

सारंग         - वकील,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

डॉ प्रशांत       - डॉक्टर,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

किरीट         - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

निशांत        - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. शोधकर्ता

नयना         - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर  

महादेवराव      - घराण्याचा मूळ पुरुष.

सखारामपंत     - महादेवराव – सखारामपंत. वेळणेश्वरला स्थायिक

विश्वनाथ       - महादेवराव – विश्वनाथ. गोकर्ण महाबळवेश्वरला स्थायिक.

कौशिक        - महादेवराव – कौशिक – समुद्रात बुडून मेला.

दिनकर       - महादेवराव - - दिनकर साताऱ्याला गेला तिथून पुणे आणि तिथून

               कानपूरला गेला

चंद्रकांत गोखले                - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर

उज्ज्वला                    - चंद्रकांत गोखल्यांची बायको.

विश्वास                     - चंद्रकांत गोखल्यांचा मुलगा अमेरिका.

स्वानंदी                     - विश्वास ची बायको.

सुनील                      - चंद्रकांत गोखल्यांचा धाकटा मुलगा अमेरिका.

नर्मदा आणि गोदावरी – महादेवरावांच्या मुली, लग्न होऊन चिपळूण आणि नंतर

पुण्यास स्थलांतर पण पुण्याच्या प्लेग मधे दोन्ही कुटुंबाची संपूर्ण वाताहत झाली.

रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला

स्थायिक

रेवती          सखाराम पंतांची मुलगी हरिहर साने यांच्याशी लग्नं करून सांगलीला

स्थलांतर.

अक्षय साने     - महादेवराव – सखाराम – रेवती -अक्षय

सहावी  पिढी. सुरतला स्थायिक.

अंबिका        सखाराम पंतांची मुलगी  अकाली मृत्यू.

कावेरी         रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न

श्रीरंग         कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या  वेळेस सैन्यात गेला.

सीता, सरिता जान्हवी    – श्रीरंग च्या मुली.

शंकरन               - श्रीरंगचा दुसऱ्या बायको पासून झालेला मुलगा.

विनायक       भास्कर चा मुलगा वसंत त्याचा मुलगा विनायक

व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.

जय           व्यंकटेशचा मुलगा.

रोहन          - सौमित्रचा मुलगा

लक्ष्मण आणि वर्षा      - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी.

  गोकर्णला स्थायिक.

वसुधाबाई             - लक्ष्मणची आई.

विश्राम आणि अनिल           - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -गंगाधर –

सहावी पिढी.

  साताऱ्याला  स्थायिक.

दिनेश आणि प्रांजल            - विश्रामची मुलं. सातारा

विनय                       - अनिलचा मुलगा सातारा.

विश्वंभर                     - महादेव – विश्वनाथ- ओंकार- विश्वंभर.

माधव                      - विश्वंभर – राजाराम – माधव. तंजावरला

 स्थायिक

वसुंधरा                      - माधवची बायको.

चिन्मय आणि विवेक           - माधव ची मुलं.

हेमांगी                      - चिन्मयची बायको. 

कावेरी                      - महादेव – विश्वनाथ- कावेरी. विश्वास परांजपे शी लग्न.

वसंतराव परांजपे                     कावेरी परांजप्यांचे आताचे वंशज

प्रभावती                            वसंतरावांच्या पत्नी

त्र्यंबक                             वसंतरावांचे काका.

गोविंद                             वसंतरावांचा धाकटा भाऊ.

श्रीकांत आणि विक्रम            -वसंतरावांची मुलं. अमेरिकेत असतात. 

सुधाकर गोखले         निशांतला कानपूरला भेटलेले पहिले गोखले.

विशाखा               सुधाकररावांची बायको.

बबन                 - सारंग सरांचा चपराशी

सुभाष गोखले          -बबनचा मित्र. कटातला भागीदार. तोतया वारसदार

अविनाशराव           - निशांतचे वडील.

जयश्री                - निशांतची आई.

भाग  ३  

भाग २ वरुन पुढे वाचा .......   

  

सगळी कायदेशीर कारवाही पूर्ण झाली. विनय आणि वर्षा या दोघांना ट्रस्टी म्हणून जोडून घेतलं. सुभाषला २ लाख दिले, पण गोविंदा म्हणाला की त्याला जशी जरूर पडेल, तसे तो मागून घेईल. ते ही मान्य झालं.

शेवटी एकदाचं गॅदरिंगचं  सूप वाजलं. सगळ्यांनीच परस्परांचा अश्रुपूर्ण डोळ्यांनी निरोप घेतला. पुढच्या वर्षी लग्नात भेटायचं प्रॉमिस करून सगळे आपापल्या वाटेला लागले.

लग्नाच्या तारखा काढण्याची जबाबदारी सर्वांनी लक्ष्मणवर सोपवली होती. त्या प्रमाणे लक्ष्मणने पुढच्या वर्षीच्या डिसेंबर आणि जानेवारी मधल्या तीन तीन तारखा काढून सर्वांना कळवल्या. सर्वांची मतं घेतल्या नंतर जानेवारी महिन्यातले मुहूर्त निश्चित झाले.

सारंग सरांनी निशांतच्या कंपनीवर जे काम सोपवलं होतं, ते पूर्ण झालं होतं. म्हणून बिल बनवून राव साहेब, सारंग सरांना भेटायला गेले. जेंव्हा सारंग सरांनी काम दिलं तेंव्हा अंदाजे, एक वर्ष लागेल, असं धरून एस्टिमेट केलेलं होतं प्रत्यक्षात ९ महिन्यातच सर्व शोध कार्य पूर्ण झालं होतं. आणि हे सर्व निशांतच्या अतिशय कुशलतेने आणि चिकाटीने केलेल्या कामाचं फळ होतं. सारंग सरांनी बिल लगेचच पास केलं आणि किरीटला चेक द्यायला सांगितलं. मग सारंग सरांनी सर्व जमल्यावर काय घडामोडी झाल्या, त्या राव साहेबांना सांगितल्या. निशांतचं लग्न ठरल्याचं ऐकून राव साहेबांना आनंद झालाच, पण निशांत नोकरी सोडणार म्हणून वाईट पण वाटलं. साहजिकच होतं ते. निशांत सारखा खंदा फलंदाज गेल्यावर त्यांच्या टीम ची खूप हानी होणार होती, त्यांचा उजवा हातच जायबंदी झाला होता. पण तरीही त्यांनी मोठ्या मनाने निशांतला मोकळं करायचं मान्य केलं. निशांत सारखा माणूस पुन्हा मिळणं खूपच कठीण होतं. १० वर्षांचा सहवास, राव साहेबांना आपल्या भावना आवरणं कठीण झालं. त्यांचा गळा दाटून आला. म्हणाले,

“तुमच्या कामाचं स्वरूप मी जेंव्हा ऐकलं, वंशावळी पाहीली, तेंव्हा व्यंकटेश आणि सौमित्र यांचाच फक्त पत्ता लागेल असा अंदाज होता, कारण ते इंग्लंड मधे आहेत ही पक्की माहिती आपल्याजवळ होती. पण त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही सापडतील यांची शून्य टक्के खात्री होती. त्यामुळे फेल्यूअर म्हणून आमचं नाव सगळी कडे पासरलं असतं म्हणून हे काम अंगावर घ्यायला मी फारसा उत्सुक नव्हतो. पण निशांत म्हणाला, की

“आपण अत्यंत कसोशीने प्रयत्न करू. नेहमीच आपण मारामाऱ्या, कारस्थानं यांच्या शोधात अडकलेलो असतो. ही केस वेगळी आहे. जास्त आव्हानात्मक आहे. मी शब्द देतो की मी अथक प्रयत्न करीन, आणि प्रयत्नांना यश मिळतंच असा आपला अनुभव आहे. घेऊया आपण हे काम.”

आणि त्याने ते रेकॉर्ड टाइम मधे यशस्वी करून दाखवलं. सारंग सर, निशांत म्हणजे हिरा आहे, आमच्या कंपनीचं चैतन्य आहे.” पण त्यालाही त्याचं खाजगी आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. मी त्याचा निर्णय मान्य करतो.

निशांत आता मोकळा झाला होता. तो सारंग सर आणि राव सरांना भेटला. सर्वांच्याच साठी या भेटी फार अवघड होत्या. सर्वांची निशांतशी भावनात्मक गुंतवणूक झाली होती.

नयनाला नागपूरलाच बरीच कामं होती, त्यामुळे ती नागपूरलाच राहिली, पण निशांत मात्र अमरावतीला गेला. आता तो शेतीमधे पूर्ण लक्ष घालणार होता.

नयना आता निशांतच्या फ्लॅट वर राहायला गेली होती. तिचं आणि विनयचं रोज रात्री फोनवर बोलणं होत होतं. एक दिवस नयनाने विनयला विचारलं की,

“लग्नानंतर तू नागपूरला सेटल होणार हे पक्क आहे ना?”

“हो, आपलं तसंच ठरलं आहे न? मग असं का विचारते आहेस?” – विनय.

“नाही, माझ्या मनात एक आयडिया आली आहे. सांगू का?” – नयना

“जेंव्हा तू परवानगी मागतेस ना? तेंव्हा मला घाबरायला होतं, की काय वाढून ठेवलंय समोर म्हणून” – विनय.

“मी गंभीरपणे विचारते आहे आणि तू चेष्टा करतो आहेस, जाऊ दे, नाहीच बोलत मी. आपण दुसरंच काही तरी बोलू.” – नयना.

“बरं बरं सॉरी, बोल तुझ्या मनात काय आहे ते. मी ऐकतो आहे.” – विनय.

“मला असं वाटतं की लग्नाला जवळ जवळ वर्ष भरायचा अवधी आहे, तर तू या वेळेचा सदुपयोग कारावास.” – नयना.

“म्हणजे मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे?” – विनय.

“दोन गोष्टी आहेत, एक फॅक्टरी आणि दुसरी संत्र्‍याची बाग. कशाची फॅक्टरी टाकायची हे ठरलं का?” – नयना.

“नाही, म्हणजे अजून विचारच चालू आहे. एकदा ठरलं की त्या बाबत सर्वे करावा लागेल. काय प्रॉडक्शन घ्यायच, त्याला बाजारात किती मागणी आहे ते बघायचं आणि मार्केटिंग कसं होणार हे सगळं बघावं लागणार आहे.” – विनय.

“हो पण त्यासाठी दोन किंवा तीन फील्ड निश्चित करावे लागतील, ते तरी  केले आहेत का?” – नयना.

“म्हणजे? मला समजलं नाही.” – विनय.

“म्हणजे, लाइट इंजीनीरिंग, हेवि इंजीनीरिंग, केमिकल किंवा पेंट  किंवा फार्मा किंवा प्लॅस्टिक असं. काही तरी दिशा पकडावी लागणार आहे, त्या दृष्टीने काही हालचाल केली आहे का?” – नयना.

“अरे बापरे, अशी काहीच चर्चा नाहीये, नुसतीच बोलणी चालू आहेत. कसं करायचं काय करायचं यांची.” – विनय.

“तेच विचारते आहे मी, कसं आणि काय करायचं ते ठरतंय का?” – नयना.

“नाही नुसतीच बोलणी चालू आहेत, काही ठोस असं काही निष्पन्न नाही निघालं अजून. पण निघेल लवकरच.” – विनय.

“विनय मी एक सुचवू का?” – नयना.

“बाबा, दिनेश आणि काकांचा सल्ला घेऊ?” – विनय.

“बरोबरच आहे. तसंच कर. नाही तर एखादा कन्सलटंट का हायर करत नाहीस? त्यांच्या जवळ सगळाच डाटा असतो. ते योग्य पर्याय सुचवतील.” – नयना.

“हा एक पर्याय आहे आणि कोणाला हायर करायचं याचाच खल चालला होता. आणि काही लोकांशी मीटिंग पण झाल्या. पण कोणा बद्दल इतकी खात्री वाटली नाही. बरं पैसे मात्र भरमसाठ मागताहेत. म्हणून काम रेंगाळतं आहे.” – विनय.

“निशांतला सांग सर्व्हे करायला. कशात बिझनेस केला तर फायदेशीर ठरेल याचा सर्व्हे केला, तर तुम्हाला निर्णय घ्यायला कठीण जाणार नाही बघ.”- नयना.

“अरे, माझ्या लक्षातच आलं नाही, पण निशांत शोधकर्ता आहे, हे काम तो करू शकेल? त्याला शोधकार्य जमतं पण बिझनेस कशात करणं फायदेशीर आहे, हे कसं समजेल त्याला? मुळात व्याप्ती इतकी आहे, की त्याचा अभ्यास करता करता किती वर्ष लागतील, हेच कळणार नाही.” – विनय.

“तू म्हणतो आहेस ते बरोबर आहे, पण निशांत हा वेगळाच माणूस आहे. तू त्यालाच का विचारत नाहीस?” – नयना.

“निशांतला विचारायच्या अगोदर बाबा, काका आणि दिनेशशी बोलतो. त्यांनी ओके केलं तर निशांतला विचारतो. तू मात्र निशांतला काही बोलू नकोस. उगाच गैरसमज व्हायला नकोत.” – विनय.

“नाही, या बाबतीत तू निश्चिंत रहा.” – नयना.

दुसऱ्या दिवशी विनय ने नयनाला फोन केला.

“मी बोललो सर्वांशी. निशांतशी एकदा बोलून पाहावं असंच सर्वांचं मत पडलं. आता मी निशांतशी बोलतो.” – विनय

“नको, ही फोनवर बोलण्याची गोष्ट नाहीये. तू निशांतला साताऱ्याला बोलावून घे. महत्वाचं बोलायचं आहे असं सांग. मग सगळे मिळून हा टॉपिक चर्चेला घ्या. समोरा समोर सर्वांचेच दृष्टिकोन कळतील.” – नयना.

अर्ध्या तासाने विश्रामचा निशांतला फोन गेला.

“एका महत्वाच्या बाबीवर चर्चा करायची आहे. तू साताऱ्याला येऊ शकतोस का? म्हणजे आम्हाला निर्णय घ्यायला सोपं पडेल.”- विश्राम

“ठीक आहे येतो मी. पण विषय कळला तर जरा तयारी करता येईल.” – निशांत.

“नाही, तयारीची काही आवश्यकता नाहीये. तू आल्यावरच सविस्तर बोलू.” – विश्राम.

दोन दिवसांनी निशांत नागपूरला गेला. त्याला वाटलं की नयनाला पण घेऊन गेलो, तर विनयशी तिची भेट होईल. मग दोघेही साताऱ्याला जाण्यासाठी महाराष्ट्र एक्सप्रेस मधे बसले.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी विश्राम, दिनेश, अनिल आणि विनय निशांत बरोबर चर्चेला बसले. अर्थातच नयना पण होती. मग दिनेशने विषय सांगितला.

“निशांत, तुला माहितीच आहे, की  नागपूरला फॅक्टरी काढायची असं ठरलं होतं. पण प्रश्न हा आहे की आमचं ठरत नाहीये की इंजीनीरिंग फॅक्टरी टाकायची की केमिकल. तुला बोलावण्याचं कारण असं आहे की आम्हाला वाटतं की तू सर्व दृष्टीने अभ्यास करून आम्हाला एक तुलनात्मक तक्ता करून द्यावास जेणेकरून आम्हाला निर्णय घेता येईल.” – विश्राम.

निशांत हे ऐकून अवाक झाला. तो संभ्रमात पडला. म्हणाला,

“काका, अहो माझ्यावर एवढा विश्वास टाकलात, त्याबद्दल मला आनंदच आहे. पण मी नम्रपणे नमूद करू इच्छितो की हे माझ्या कुवती बाहेरचं काम आहे. अहो कुठलीही फॅक्टरी टाकायची म्हणजे त्याचा कच्चा माल, त्यांची उपलब्धी, त्यांच्यावर करावी लागणारी प्रक्रिया, त्यांची गुणवत्ता, आणि त्याचं मार्केटिंग हे सगळं विचारात घ्यावं लागणार आहे, आणि सरते शेवटी त्याचं अर्थकारण. ते फायदेशीर असायला हवं. याच्या  साठी त्या त्या विषयातला तज्ञ माणूसच लागेल. माझ्या सारखा माणूस उपयोगाचा नाही. तुमच्या फॅक्टरीचं एखादं सीक्रेट कोणी चोरलं आणि त्यावर भरपूर कमाई केली, तर ती चोरी मी उघडकीला आणू शकेन, पण तुम्ही म्हणता ते माझ्या क्षमते बाहेरचं काम आहे.” – निशांत.

निशांत इतक्या स्पष्ट पणे बोलल्यावर सर्व गप्प बसले. त्यांना निशांत कडून खूप अपेक्षा होत्या. पण तो जे बोलला ते ही सर्वांना पटलं होतं.

“निशांत अरे, हे सगळं करून झालं आहे, पण कुठल्याच कन्सलटंट कडून आम्हाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मग आता काय करायचं? तूच सांग.” – दिनेश.

“दिनेश, तू तुझ्या सासऱ्यांना म्हणजे केळकरांना विचारून बघ. ते खूप हुशार आहेत. कदाचित ते तुम्हाला काही सुचवू शकतील.” – निशांत.

“बाबा, हे आपल्याला सुचलंच नाही. म्हणतात ना काखेत कळसा आणि गावाला वळसा. तसंच झालं. बाबा तुम्हीच बोला.” – दिनेश.

“बघ निशांत शेवटी तूच मार्ग दाखवला. आता आमचं प्रोजेक्ट नक्की मार्गी लागेल. म्हणजे तशी खात्रीच आहे.” – विश्राम.

दुसऱ्या दिवशी निशांत गोकर्णला गेला. तिथे दोन दिवस पाहुणचार आणि वर्षाशी मनसोक्त गप्पा झाल्यावर सातारा, आणि मग नयनांसह नागपूर गाठलं.

तिकडे बांग्लादेशात, एकतरपूरला काही वेगळंच चालू होतं.

“तुम्ही आपसात कोणची भाषा बोलत होता? बंगालीत बोलत नव्हता तुम्ही.” – शेजारी राहणारी शाजिया  सलमाला  विचारात होती. सलमाला एक ४४० वोल्टचा शॉक बसला. त्या दिवशी कधी नव्हे ते सुलतानी आणि सलमा मधे वादावादी झाली होती आणि दोघांचेही आवाज चढले होते. सलमाने काही तरी थातुर मातुर उत्तर देऊन विषय संपवला. पण एका विचित्र धास्तीने  तिच्या मनांत घर केलं. तिने रात्री या विषयावर सुलतानीशी बोलायचं ठरवलं.

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com