Login

तोतया वारसदार भाग ३८

“नाही हो काका, नोकरी मी आवड म्हणून करतो आहे. तशी आमच्या कडे संत्र्‍याची बागायती शेती आहे. वर्षां

तोतया वारसदार

पात्र रचना

अक्षय साने            महादेवराव – सखारामपंत – रेवती --- अक्षय

वैशाली साने           अक्षय ची बायको.

शलाका साने           अक्षय ची मुलगी.

विश्राम आणि अनिल           - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी.

  साताऱ्याला  स्थायिक.

सुधा                        - विश्रामची बायको.

दिनेश आणि प्रांजल            -विश्रामची मुलं.

मालती                      - अनिलची बायको.

विनय                       - अनिलचा मुलगा

                   

भाग  ३८                   

भाग ३७  वरून पुढे  वाचा....

“म्हणजे आता प्रथम वाराणसी मग नाशिक आणि मग कानपूर असा प्रवास होणार आहे तर. या तुमच्या शोधकार्यात तुम्हाला यश मिळो  अशी शुभेच्छा.” – अक्षय

“बरं पण एक राहिलं. अक्षय, मी तुला बोललो होतो, आम्ही एक गेट टुगेदर करणार आहोत, नागपूरला. त्यासाठी त्या वाड्याचं दुरुस्ती काम हाता घेणार आहोत, तुम्ही पण यायचं आहे.” – विश्राम.

“नक्की. तू निश्चिंत रहा.” – अक्षय.

दुसऱ्या दिवशी ब्रेक फास्ट करतांना चर्चा चालली होती. विषय अर्थातच वारसदारांचा होता.

“मला कौतुक याचं वाटतं, की काहीच धागा दोरा नसतांना निशांतने हे काम अंगावर घेतलंच कसं? आपण अयशस्वी झालो, तर आपल्या कारकि‍र्दीवर डाग लागेल, अशी भीती वाटली नाही का निशांत तुला?” – अक्षय.

“नाही, हे नेहमी असंच असतं. शून्यातूनच  स्वर्ग गाठायचा असतो. शोधकर्ता हेच काम करतो. सामान्य लोकांना पहिला प्रश्न हाच पडतो की सुरवात कुठून करायची, आणि माहिती कुठून मिळेल. पण आम्ही म्हणतो की पहिलं पाऊल टाका, दुसऱ्या पावलाची जागा आपोआप मिळेल. आता, सध्याचं वारसदार शोधायचं  हे काम खरंच कठीण होतं पण आव्हान स्वीकारण्याची एकदा सवय झाली की त्याचं व्यसन जडतं. असंच माझ्याही बाबतीत झालं आहे.” – निशांत.

“हो काका, सहज म्हणून यांच्या बरोबर मी गोकर्णला जायचं ठरवलं आणि आता मला पण इंट्रेस्ट यायला लागला आहे. मजेशीर काम आहे.” – रोहन.

“रोहन, अरे, हे निरुपद्रवी काम आहे म्हणून तुला मजा येतेय, पण जर एखाद्या गुन्ह्याचा किंवा कारस्थानाचा शोध घ्यायचा असेल, तेंव्हा अंगावर बेतण्याची पण शक्यता असते हे लक्षात ठेव.” – विश्राम.

“हे मात्र १०० टक्के खरं काका. मला काही वेळेस असे अनुभव आलेले आहेत, तेंव्हा केवळ आणि केवळ प्रसंगावधानच तुमच्या मदतीला असतं. सिनेमात दाखवतात तसं काही आमच्या जवळ पिस्तूल वगैरे नसतं, पण हल्लेखोरांजवळ मात्र असू शकतं, आणि मग अशा कठीण प्रसंगाला धैर्याने तोंड द्यावं लागतं.” – निशांत.

“असा एखादा प्रसंग तुझ्यावर पण आला होता का?” – विश्राम.

“हो एका फॅक्टरीत सतत चोऱ्या होत होत्या, लाखों रुपयांचं नुकसान होत होतं. सगळे प्रयत्न करून झाल्यावर मग आमच्याकडे ती केस आली होती.” – निशांत.

“काय झालं होतं, नीट सविस्तर सांग म्हणजे आम्हाला पण कळेल.” – अक्षय.

एक फॅक्टरी आहे, तिथे हॉटेल आणि दुकांनाना आइस क्रीम ठेवण्यासाठी  लागणारे डीप फ्रीजर बनवतात. इंडस्ट्री साठी लागणार मोठे दीप फ्रीजर सुद्धा बनवतात. याच्यासाठी या फॅक्टरीला मोठ्या प्रमाणात कॉपरच्या ट्यूब लागतात. आता ह्या ट्यूब उच्च दर्जाच्या तांब्याच्या असतात, त्यामुळे खूप महाग असतात. या ट्यूब ची चोरी होत होती. दर महिन्याचं जेंव्हा फिजिकल स्टॉक टेकिंग व्हायचं तेंव्हा स्टॉक रजिस्टर मधला आकडा आणि प्रत्यक्षात असलेला स्टॉक, यांचा ताळमेळ बसत नव्हता. प्रॉडक्शन रजिस्टर मधून किती ट्यूब वापरल्या गेल्या यांचा आकडा काढला. तो स्टोर मधल्या रजिस्टरशी जुळत होता. पण प्रत्यक्षात ट्यूब ची संख्या कमी होती. मग सगळ्या ट्यूब एक नवीन पिंजरा बनवून, त्यात ठेवल्या आणि त्याला कुलूप घातलं. एवढं करूनही पुढच्या महिन्यात ट्यूब कमी भरल्या. कोणालाच काही कळत नव्हतं. नुकसानीचा आकडा आता वाढून लाखांमधे  गेला होता.” निशांत थोडा थांबला. तो जे काही सांगतो आहे ते लोकांना कितपत कळलं आहे, ते बघत होता.

“किती लांबीची असते हो ती ट्यूब?” – शलाका.

“ट्यूब साधारण १२ फुटांची असते.” – निशांत

“मग एवढी मोठी ट्यूब घेऊन जातांना कोणीच कसं बघितलं नाही? कारखान्याला सिक्युरिटी नव्हती का? आणि कामगार तर असतातच न, त्यांच्यापैकी सुद्धा कोणीच बघितलं नाही?” – अक्षय.

“नाही न, अक्षरश: हवेत विरून गेल्या सारख्या गायब होत होत्या.” – निशांत.

“मग?” – विश्राम. पण आता सर्वांचीच उत्सुकता वाढली होती.

“मग काही नाही, स्टोअर मधे एक वॉचमन बसवून झाला, काहीच फरक पडला नाही. मग सगळे प्रकार करून झाल्यावर ते आमच्याकडे आले. मी फॅक्टरी साइट  वर जाऊन बघितलं, कशाचा काहीच पत्ता लागण्याची शक्यता दिसत नव्हती. पण आमच्या राव साहेबांनी हे आव्हान स्वीकारलं. मला म्हणाले, तुला या फील्ड चा अनुभव येईल. तू कर ही केस. मग काय मी त्यांच्या फॅक्टरीत गेलो. काय करायचं, कसं करायचं यांची काहीच कल्पना राव साहेबांनी दिली  नव्हती. म्हणाले “तुझ्या बुद्धीचा आणि निरीक्षण शक्तीचा उपयोग करून ही केस सोडव.” – निशांत.

“मग? तू गेलास त्या फॅक्टरीत?” – रोहन.

“हो, गेलो ना, पहिले दोन दिवस फॅक्टरीत फिरलो, खूप बारकाईने निरीक्षण केलं कुठे काही फट आढळली नाही मग स्टोअर मधे १५ दिवस मुक्काम ठोकला. स्टोअर मधे २-३ सायकली दिसल्या. त्या प्रॉडक्शन आणि इतर डिपार्टमेंटला लागणारं सामान पोचवण्याच्या कामात येत होत्या. एक दिवस मी सहज उभा होतो, सायकली जवळच होत्या. पाहत असतांना माझ्या लक्षात आलं की, सायकलीच्या  हॅंडल च्या खाली  ७-८ इंचाचा उभा पाइप असतो आणि त्या पाइपला एक आडवा आणि एक तिरपा असे दोन पाइप जोडून  सायकलची त्रिकोणाकृती फ्रेम तयार होते, त्या ठिकाणी दोन मोठे बोल्ट  कसलेले दिसले. असं कुठल्याच सायकलला नसतं. वरतून हॅंडलला अडकवलेली  बास्केट असल्याने, ते बोल्ट सहजा सहजी दिसत नव्हते. मी बराच विचार करत होतो, आणि माझ्या लक्षात एक गोष्ट आली. ती कोणाची सायकल आहे त्यांची चौकशी केली. सहज विचारतो आहे असं दाखवून मी त्या माणसाचं वजन स्टोअर मधल्या काट्या वर चेक केलं. ते साठ किलो भरलं. आता माझं काम झालं होतं.” – निशांत.

“म्हणजे नेमकं काय झालं, आमच्या काहीच लक्षात येत नाहीये.” – अक्षय.

“हाच तर फरक आहे, शोधकर्ता आणि सामान्य माणसं यांच्या मधे.” – निशांत.

“निशांत, उगाच भाव खाऊ नकोस, आमची उत्सुकता ताणू नको, लवकर सांग छडा कसा लागला ते.” – विश्राम.

“मग मी MD साहेबांकडे गेलो. त्यांना माझे निष्कर्ष सांगितले, ते त्यांना पटले. मला म्हणाले की त्या माणसाला स्टोअर मधून काढतो. पण मी त्यांना सांगीतलं की त्याला चोरी करतांना पकडलं, तर त्याला कोणाची मदत होते आहे हे पण कळून येईल. गेट च्या आधी एक मोठा ट्रक चं वजन करण्याचा कांटा होता, त्यांच्या अवती भवति सगळा रस्ता खणून काढला. आता प्रत्येकाला आत येतांना आणि बाहेर जातांना त्या काट्यावरूनच जावं लागणार होतं. दोन तीन दिवस काहीच घडलं नाही पण चौथ्या दिवशी, हा स्टोअर चा माणूस होता, तो जेंव्हा काट्यावर आला, तेंव्हा वजनाच्या काट्याने ७४ किलो दाखवले. म्हणजे ६० किलो त्याचं वजन, १० किलो सायकलचं आणि वरचे ४ किलो, कॉपर ट्यूबचं, असा सरळ  हिशोब होता. लगेच MD साहेबांना बोलावलं आणि दाखवलं. मग ते दोन्ही बोल्ट उघडले, तेंव्हा प्रत्येक भोकात पाइपचे तीन फुटांचे दोन दोन तुकडे घातलेले दिसले. झालं, माझं काम संपलं होतं. रात्री हॉटेलवर गेल्यावर रीपोर्ट लिहून दुसऱ्या दिवशी सादर केला, की मी वापस जायला मोकळा. पण त्याच रात्री हॉटेल वर जातांना माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला. माझा त्या रात्री जिवच गेला असतं, पण नशिबाने, दोन पोलिस ड्यूटि संपवून घरी चालले होते. त्यांनी हा प्रकार पाहिल्यावर बाईक थांबवली. त्यांना पाहिल्यावर हल्लेखोर पळून गेले, पण पोलिसांनी त्यांना ओळखलं होतं. मी महिना भर हॉस्पिटल मधे होतो. त्या गुंडांना पोलिसांनी पकडलं, त्यांच्या मागे कारखान्याचा यूनियन लीडर होता, हे पण उघडकीस आलं. शेवटी एकदाचं प्रकरण संपलं, पण मला दोन महीने हॉस्पिटल मधे राहावं लागलं. तीन ऑपरेशनला सामोरं जावं लागलं. पण आता ठीक आहे.”  - निशांत.

“बापरे, एवढं सगळं झालं? आणि तरीही तू याच व्यवसायात आहेस? इतकी खरंच जरूर आहे का? दुसरी नोकरी शोध, मिळेल तुला.” – विश्राम.

“नाही हो काका, नोकरी मी आवड म्हणून करतो आहे. तशी आमच्या कडे संत्र्‍याची बागायती शेती आहे. वर्षांचं लाखों रुपयांचं उत्पन्न आहे, नोकरी नाही केली तरी चालण्या सारखं आहे. पण माझी साहसी वृत्ती मला स्वस्थ बसू देत नाही.” – निशांत.

‘ऐकावं ते नवलच आहे. तू वेगळाच आहेस, यात वाद नाही. पण रोहन तुझं काय? तुला सुद्धा आवडला आहे का हा व्यवसाय?” – विश्राम.

“काका अहो, मी काही तो व्यवसाय म्हणून स्वीकारणार नाहीये. सध्या निशांत बरोबर आहे एवढंच. सगळं आटोपल्यावर लंडनला जायचंच आहे. एवढा मोठा व्यवसाय आहे, तो सोडून कसं चालेल?” – रोहन.

“बरं मग नागपूरला जायला केंव्हा निघणार तुम्ही लोकं?” – विश्राम

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

0

🎭 Series Post

View all