तोतया वारसदार
पात्र परिचय-
सारंग - वकील, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य
डॉ प्रशांत - डॉक्टर, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य
किरीट - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य
निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी.
रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला
स्थायिक
रेवती सखाराम पंतांची मुलगी हरिहर साने यांच्याशी लग्नं करून सांगलीला
स्थलांतर.
अंबिका सखाराम पंतांची मुलगी अकाली मृत्यू.
कावेरी रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न
श्रीरंग कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या वेळेस सैन्यात गेला.
सीता, सरिता जान्हवी – श्रीरंग च्या मुली.
विनायक भास्कर चा मुलगा वसंत त्याचा मुलगा विनायक
व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.
भाग ५
भाग ४ वरून पुढे वाचा....
याच काळात घडलेली एक घटना, पंतांच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी देऊन गेली. एक दिवस पंतांना चिपळूणहून दोघं जण भेटायला आले, ते महाऋद्राचं आमंत्रण द्यायला आले होते. त्यासाठी ४-५ दिवस चिपळूणलाच राहावं लागणार होतं. सगळी व्यवस्था आयोजकच करणार होते. पंतांनी सुशीलाशी विचार विनिमय करून होकार दिला. महाऋद्र आटोपून पंत सहाव्या दिवशी संध्याकाळी वेळणेश्वरला पोचले. घरी पोचताच त्यांना दिसलं की ओसरीवर तुकाराम बसला आहे. पंतांना पाहिल्यावर तो उठून समोर आला.
पंतांनी विचारलं “काय रे तुकाराम काय झालं.?”
“कारभारनीला लई उलट्या, जुलाब होत्यात, चार दिस झाले, आराम काही पडत नाही.” तुकाराम बोलता बोलता रडायला लागला.
“अरे, एकदम काय असं झालं ? चल मी येतो आत्ताच.” असं म्हणून पंत त्याच्या बरोबर निघाले. तुकारामाच्या बायकोला बघितल्यावरच त्यांच्या लक्षात आलं की काही खरं नाही. जुलाब आणि उलटयांच्या मुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण अतिशय घटलं होतं, आणि ती प्रचंड ग्लानितच होती. हालचाल करण्याची शक्ती पण गमावून बसली होती. पंतांनी आपल्या जवळच्या पिशवीतून कर्पूररस भस्म काढलं आणि तो नागरमोथ्या च्या काढयामद्धे मिसळून तिला पाजला. तिला कसलीच शुद्ध नव्हती.
“तुकारामा, चार दिवस झाले म्हणतोस, मग औषध काय दिलस ?”
“मी आलो हुतो, पर तुमी नव्हते तवा काहीच केलं नाही.” – तुकाराम
पंतांनी कपाळाला हात लावला. म्हणाले “मी आता औषध दिलं आहे, काही सुधार पडतो का ते बघ, मी चार घटका झाल्यावर पुन्हा येऊन औषध देऊन जाईन. बाकी तो परमेश्वर समर्थ आहे. त्याची प्रार्थना कर.” रात्री जाऊन पंतांनी पुन्हा एकदा औषधांची मात्रा दिली, आणि सकाळी पुन्हा येईन असं सांगून गेले. पण तुकाराम पहाटे पहाटेच पुन्हा धावत धावत घरी आला, पंत त्यांच्या बरोबर गेले, तुकारामाच्या बायकोला तपासल्यावर ते म्हणाले “नाडी लागत नाहीये. श्वासही थांबला आहे, संपलं आहे सगळं.” पंत तिथेच बसले, त्यांना दुख: अनावर झालं होतं. “तुकारामा, मी चिपळूणास जायलाच नको होतं, मी तुझा अपराधी आहे. मी इथेच असतो तर तुझी बायको वाचली असती.”
आणि त्यानंतर पंतांनी एक निर्णय घेतला. त्यांनी भिक्षुकी बंद केली आणि पूर्णपणे वैद्यकीला वाहून घेतलं.
अल्पावधीतच त्यांची एक निष्णात वैद्य अशी कीर्ती चहूकडे पसरली. पंचक्रोशीत त्यांना चांगला मान होता. रेवतीचं रत्नागिरीच्या सान्यांच्या मुलाशी, हरिहरशी लग्न होऊन ती रेवती साने झाली. पण दोनच वर्षात रेवतीच्या नवऱ्यानी सांगलीला एका पेढीवर नोकरी पत्करली आणि ते दोघं सांगलीला गेले. अंबिका मात्र अकालीच असाध्य रोगाने गेली. पंत स्वत: वैद्य असूनही काहीच करू शकले नाहीत.
भास्करच्या जन्माच्या वेळी, सुशीलाबाईंना बाळंतपण फार अवघड गेलं आणि त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळतच गेली. अंबिका गेल्यानंतर सुशीलाबाईंनी वर्ष भरातच देह ठेवला. पंत हे लागोपाठ झालेले आघात सहन करू शकले नाहीत. दोनच वर्षात त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
एवढं सगळं झाल्यावर रंगनाथाला आता वेळणेश्वर मधे राहायची मुळीच इच्छा उरली नव्हती. तो पूर्ण विचार करून, भास्करला घेऊन पुण्याला आला. पण पुण्याला काही त्याचं बस्तान बसलं नाही. या दरम्यान त्याची नागपूरच्या एका पुरोहिताशी ओळख झाली. तो रंगनाथची खूप तारीफ करायचा. त्यांनी “आपल्याबरोबर नागपूरला चला, तिथे माझ्या बऱ्याच ओळखी आहेत आणि तुझा तिथे चांगला जम बसेल.” असा विश्वास दिला. रंगनाथ नागपूरला आला. तिथे लवकरच त्याचं बस्तान बसलं. पौरोहित्य छान चाललं होतं. चार पैसे गाठीला पण लागले होते. त्यांचं नागपूरच्याच मंदाकिनी नावाच्या मुलीशी लग्न झालं. हे साल होतं १८८०. त्याच वर्षी भास्कर मुंबईला वकिली शिकून नागपूरला आला होता आणि त्यांनी नागपूरला वकिली सुरू केली होती. १८८५ मधे भास्करचं कुळकर्ण्यांची मुलगी रमा हिच्याशी विवाह झाला. १८९०. साली रंगनाथला मुलगी झाली. १० वर्षांनी घरात पाळणा हलला होता. नाव कावेरी ठेवली. खूप लाडा कोडात कावेरी वाढली. तिचं १९०५ साली देशमुखांच्या विश्वासशी लग्न लावून दिलं. पुढच्याच वर्षी रंगनाथाचा मृत्यू झाला. भास्करला वसंत, श्रीधर, राघव आणि कृष्णा अशी चार मुलं झाली. वकिली पास झाल्यावर १९०७ साली वसंतचं लग्न झालं. त्याला विनायक नावाचा मुलगा झाला. श्रीधरने लग्न केलं नाही. राघवने संन्यास घेतला आणि कृष्णा हा अपंग जन्मला. तो फारसा जगलाच नाही अकालीच गेला. कावेरीला श्रीरंग आणि श्रीपाद नावाची मुलं झाली. श्रीपाद देशाची सेवा करण्या साठी क्रांतिकारक बनला, त्याचा पुढे काहीच पत्ता लागला नाही. श्रीरंगला तीन मुली झाल्या. मधल्या काळात भास्करने पण राम म्हंटला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस सैन्यात भरती चालू होती, श्रीरंग सैन्यात सामील झाला आणि त्यांची पाठवणी भारताबाहेर आफ्रिकेत केल्या गेली. त्याच्यानंतर त्याचा काहीच ठाव ठिकाणा कळला नाही. वसंतने, मग कावेरी, तिची सून वैदेही आणि तिन्ही मुलींना आपल्या घरी आणलं. त्यांची लग्न करून दिली. त्यांचे संसार सुरळीत सुरू झाले. त्या वेळेस गावाच्या बाहेर स्वस्तात प्लॉट मिळत होता तो त्यांनी घेऊन ठेवला. पुढे त्याचा मुलगा विनायक शिकून वकील झाला आणि वडिलांच्या कामात त्याला मदत करू लागला. त्यानीच ४० एकर शेती घेतली आणि तिथे संत्र्याची बाग केली. विनायकनीच, वसंताने घेतलेल्या प्लॉटवर टोलेजंग बंगला बांधला. विनायकला तीन मुलं झाली. व्यंकटेश आणि सौमित्र इंग्लंडला गेले आणि तिकडेच स्थायिक झालेत. तिसरा अविनाश आर्मी मधे गेला. त्याचा १९७१ च्या युद्धात बेपत्ता म्हणून संदेश आला. त्याचा नंतर, बराच पाठपुरावा करूनही काहीच पत्ता लागला नाही. १९७१ साली विनायकरावांची पत्नी, सरस्वती मृत्यू पावली. त्यानंतर विनायकराव एकटेच होते.
****
इथे घराण्याचा इतिहास संपला. निशांतने वंशावळी उघडून पाहीली. उद्या पुन्हा एकदा वाचू आणि वंशावळीचा बारकाईने अभ्यास करू असा विचार करून तो झोपायला गेला.
दुसऱ्या दिवशी निशांतने उठल्यावर, पुन्हा एकदा विनायकरावांनी लिहिलेला इतिहास आणि वंशावळी डोळ्या खालून घातली. त्यांनी मनाशी काही विचार केला, आणि राव साहेबांना फोन लावला, आणि भेटायला गेला. राव साहेबांना सगळ्या परिस्थितीची कल्पना दिली. त्यांनी ओके केल्यावर, निशांतने तेथूनच सारंग वकिलांना फोन लावून भेटीची वेळ मागून घेतली.
संध्याकाळी ७ वाजता सारंग आणि किरीट बरोबर निशांतची चर्चा झाली. निशांतनी सुरवात केली. “आपल्याला दोन पिढ्या मागे जाऊन तपास करावा लागणार आहे. आणि त्यासाठी वेगवेगळ्या शहरात जावं लागणार आहे. गोष्ट दोन पिढ्या पूर्वीची असल्याने, शोध कार्याला बराच वेळ लागू शकतो.”
“म्हणजे नेमकं काय करणार आहात तुम्ही ?” किरीटने विचारले.
“असं बघा, दिनकरचा १८५७ नंतर काहीच उल्लेख नाही.” निशांतने वंशावळीचा कागद समोर ठेवला. “त्यामुळे, कानपूरला जाऊन त्याचा काही ठावठिकाणा लागतो का हे बघावं लागेल. नर्मदा आणि गोदावरी, दोघींचेही पुण्याला स्थलांतर झाले होते, त्यानंतर वंशावळीत काहीच उल्लेख नाही. त्याचा पण तपास करावा लागेल. श्रीरंग, आणि त्याच्या तीन मुलींच्या पुढच्या आयुषयाविषयी काहीच उल्लेख नाही, त्या सर्वांचा पण पण शोध घ्यावा लागेल. श्रीरंगचा धाकटा भाऊ, श्रीपाद, त्याच्याबद्दल सुद्धा काही लिहून ठेवलं नाही त्यामुळे त्याचाही किंवा त्याच्या कुटुंबाचा शोध घ्यावा लागेल. रंगनाथ आणि भास्करची बहीण रेवती, ती सांगलीला गेली, पण पुढे तिच्याबद्दल काहीच उल्लेख नाही, तेंव्हा तिचा पण शोध घ्यावा लागेल. विनायकरावांची दोन मुलं, इंग्लंडला स्थायिक झाली आहेत, त्यांच्याबद्दल चौकशी करावी लागेल. तिसरा मुलगा, अविनाश, १९७१ च्या युद्धात बेपत्ता झाला आहे, ते पण बघावं लागेल.” एका दमात निशांतने एवढं सगळं सांगितलं, आणि सारंग आणि किरीटची काय प्रतिक्रिया आहे, हे बघण्यासाठी तो थांबला.
“इतकं सगळं बघावं लागणार आहे? अरे बापरे, इतका तपास करायचा म्हणजे वेळ पण भरपूर लागेल. किती वेळ लागेल साधारण पणे?” किरीटच बोलला.
“आत्ताच याबद्दल काही सांगणं अवघड आहे. काम सुरू केल्यानंतर, थोडा परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. जरा महिना, दोन महीने होऊ द्या, मग पुन्हा बसून आढावा घेऊ.” निशांतने आपली बाजू स्पष्ट केली.
सारंग वकील निशांतचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होतेच, पण वंशावळीचा पण अभ्यास करत होते. ते म्हणाले, “निशांत, मी तुझं बोलणं ऐकत होतो, तू म्हणालास की दिनकर पासून शोध कार्याला सुरवात करावी लागेल म्हणून, म्हणजे १८५७ पर्यन्त मागे जाऊन तपास करायचा आहे. बरोबर आहे?”
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा