तोतया वारसदार
पात्र रचना
बबन सारंग वकिलांचा चपराशी.
सुभाष गोखले बबनचा बार मधला मित्र.
भाग ४०
भाग ३९ वरून पुढे वाचा....
“चकरा मारल्या शिवाय बोर्डाचं काम होत नाही, मग काय करायचं?” – सुभाष.
“ठीक आहे, मला डिटेल्स द्या, मला जसं जमेल, तशी मी चौकशी करून येत जाईन. मग तर झालं?” – बबनने आश्वासन दिलं. सुभाषने समाधानाने मान डोलावली,
बबन आणि सुभाषची भेट होऊन जवळ जवळ आठ दहा दिवस झाले होते, एक दिवस दुपारी, मोकळा वेळ होता, आणि सारंग सर कोर्टात गेले असतांना बबन बोर्डाच्या ऑफिस मधे पोचला. चौकशी च्या डेस्क पाशी जाऊन रांगेत उभा राहिला. थोड्याच वेळात त्याचा नंबर लागला.
“हूं बोला काय काम आहे?” – चौकशी अधिकारी.
“मॅट्रिकच्या सर्टिफिकेट मधे दुरुस्ती साठी अर्ज केला होता, त्यांची काय स्थिती आहे हे जाणून घ्यायचं होतं.” – बबन.
“इथून सरळ पुढे जा, ५ नंबर ची खोली, आणि सर्टिफिकेट असं लिहिलेल्या टेबल वर जाऊन चौकशी करा.” – अधिकारी.
बबन सर्टिफिकेट असं लिहिलेल्या टेबल पाशी गेला. खुर्चीवर कोणीच नव्हतं. बबनने शेजारच्या माणसाला विचारलं तर तो म्हणाला की “साहेबांकडे गेले आहेत, येतील थोड्याच वेळात, बसा थोडा वेळ.”
तासभर झाला तरी तो माणूस काही आला नाही. बबननी पुन्हा शेजारच्या माणसाला खुर्ची कडे बोट दाखवून, विचारलं. “अजून किती वेळ लागेल यांना यायला?”
“आता साहेबां कडे गेले आहेत, कसं सांगणार, किती वेळ लागेल ते? पण तुम्ही बसा येतीलच थोड्या वेळात.” शेजारचा माणूस म्हणाला आणि कामाला लागला.
बबनला आता जास्त वेळ थांबता येणं शक्य नव्हतं म्हणून तो तिथून निघाला. सुभाष जेंव्हा म्हणाला होता, की हेलपाटे घालावे लागतात, तेंव्हा त्याचा विश्वास बसला नव्हता, पण आता पटलं.
दोन तीन वेळा जाऊन सुद्धा संबंधित माणूस भेटला नाही, तेंव्हा शेजारच्या माणसाला त्याने जरा तक्रारीच्या सुरातच म्हंटलं, “हे साहेब, कधी भेटतील? मी चार वेळा येऊन गेलो, आमचं काम होईल तेंव्हा होईल, पण त्याला किती वेळ लागेल, हे सुद्धा कळायला मार्ग नाही, हे साहेब पण नेहमीच कसे त्यांच्या साहेबांकडे असतात?”
“हे बघा त्याबद्दल मी काही सांगू शकणार नाही. पण तुम्हाला जर तक्रार करायची असेल, तर तक्रार विभागात जाऊन रीतसर तक्रार करू शकता.” – शेजारच्या टेबल वरचा माणूस.
बबन जाम चिडला, पण काही उपयोग नव्हता. हात चोळत बसण्या शिवाय काही पर्याय नव्हता. पुन्हा एक चक्कर मारावीच लागणार होती. पण अश्या किती चकरा मारायच्या? या विचाराने बबन अजूनच वैतागला. एक वेळ त्याला वाटलं, की खरंच जाऊन तक्रार करावी, पण मग त्याने तो विचार बाजूला सारला, जर तो माणूस चिडला, आणि दुरुस्ती करायला नकार दिला तर सगळंच मुसळ केरात जायचं, त्या पेक्षा जमलं तर उद्या पुन्हा येऊ. बबन माघारी फिरला. दोन तीन दिवसांनी बबननी सुट्टी घेतली, आणि सकाळी सकाळीच बोर्डात पोचला. आज सुदैवाने तो माणूस जागेवर हजर होता.
“साहेब, काम होतं.” बबननी अदबीने सांगीतलं.
“बोला काय दुरुस्ती करायची आहे आणि कशात करायची आहे?” – कारकून.
मॅट्रिकच्या सर्टिफिकेट मधे दुरूस्ती करायची आहे, तसा अर्ज पण दिला आहे.” – बबन
“केंव्हा दिला आहे अर्ज?” – कारकून.
बबनने तारीख सांगितली.
“नाव सांगा.” – कारकून.
“सुभाष गोखले.” – बबन.
कारकुनाने अर्ज काढला. वाचला. त्याला आश्चर्य वाटल्याचं दिसत होतं. तो म्हणाला, “वडीलांच्या नावात दुरुस्ती करायची आहे? का?” – कारकून.
नाव चुकीच पडलं आहे म्हणून.” – बबन.
“काय चूक आहे?” – कारकून.
सर्टिफिकेट मधे आश्विन लिहिलं आहे, ते अविनाश पाहिजे.” – बबन.
“असं कसं झालं? तुमच्या तेंव्हाच कसं लक्षात आलं नाही? बरीच वर्ष होऊन गेलीत. तुम्ही त्या वेळेस नीट बघितलं नव्हतं का?” – कारकून.
“नाही न, आमच्या पण लक्षात आलं नाही. काही दिवसांपूर्वी जुनी कागद पत्र नीट लावून ठेवत होतो, तेंव्हा अचानकच लक्षात आलं.” – बबन.
“ठीक आहे, बघतो मी, पण हे जरा अवघड आहे. तुम्ही असं करा, पुढच्या मंगळवारी या. याच वेळेस. ठीक आहे?” – कारकून.
“ठीक आहे.” असं म्हणून बबन बाहेर पडला. त्याला समाधान वाटलं की काहीतरी काम झालं आहे. आता गाडी पुढे सरकेल. त्याने PCO वरुन सुभाषला फोन करून अपडेट दिलं.
आठवड्या नंतर मंगळवारी सांगितल्या प्रमाणे बबन हाफ डे सुट्टी घेऊन, बोर्डात गेला.
“साहेब, आमच्या कामाचं काय झालं? पुढे सरकलं का?” – बबन.
तुमची केस मी पाहिली. तुमच्या शाळेने त्यावेळेस जी माहिती आम्हाला दिली होती, त्या प्रमाणे आश्विन हेच नाव बरोबर आहे.
“पण साहेब, हेच तर चुकीचं पडलं आहे म्हणून बदलायचं आहे.”- बबन.
“साहेब, हे नाव चुकीचं आहे, हे कशावरून?” – कारकून
मग बबनने गोपालगंज बांग्लादेशच्या शाळेचे बनवलेले खोटे सर्टिफिकेट दाखवले, म्हणाला, “हे बघा साहेब, ज्या प्राथमिक शाळेत दाखला घेतला होता, त्या शाळेचे सर्टिफिकेट.”
“हे तर बांग्लादेश मधल्या शाळेचे सर्टिफिकेट आहे. आणि टे ही प्राथमिक शाळेचे. हे ग्राह्य धरता येणार नाही. ज्या शाळेकडून मॅट्रिकच्या परीक्षेला बसला होता, त्या शाळेनी जी माहिती पाठवली होती, तीच ग्राह्य धरली जाईल.” – कारकून.
“पण साहेब, हेच सर्वात पहिलं डॉक्युमेंट आहे.” – बबन.
“हे सर्टिफिकेट तुमचंच आहे, हे तरी कशावरून. आणि दुसऱ्या देशातल्या, या सर्टिफिकेटची पडताळणी तरी कशी करणार? दुसरी गोष्ट, तुम्हीच सुभाष गोखले आहात, याला काय पुरावा आहे तुमच्या जवळ?” – कारकून
आता मात्र बबन हादरला. तो बघतच राहिला. आपल्यावर काही शेकायला नको म्हणून त्याने तो कोण हे सांगायचं ठरवलं. तो म्हणाला,
“साहेब, खरं सांगायचं तर हे माझ्या मित्राचं काम आहे. त्याला सुट्टी मिळत नाहीये, खूप काम आहे, म्हणून चौकशी करायला मी आलो आहे.” – बबन.
“असं जर आहे, तर तुमच्या मित्रालाच येऊ द्या. कारण दुसर्याच्या सांगण्यावरून, तिसर्याचं सर्टिफिकेट कसं बदलता येईल?” – कारकून.
“त्याला वेळ नाही, म्हणून मी आलो, तुम्हाला तर सांगीतलं मी.” – बबन.
“हे बघा, तुम्हाला सांगीतलं मी की त्यालाच येऊ द्या. त्यांच्या सर्टिफिकेट वरची नोंद बदलून तुम्हाला काही कार्यभाग तर साधायचा नाही ना?” – कारकून.
“काय साहेब, मित्रांच्या अडचणीत मी त्याला मदत करतो आहे. अजून काय?” – बबन.
“तुम्ही कोण? तुमचं नाव काय? कुठे असता?” – कारकून.
“तुम्ही हे का विचारता आहात? मी काय केलं आहे?” – बबन.
“मिस्टर, तुम्ही आधी तुमचं नाव सुभाष गोखले असं सांगीतलं आणि आता म्हणता आहात तुम्ही सुभाष गोखले नाहीत, मग आम्हाला कळायला नको का, की तुम्ही कोण? आणि हे सगळं करण्यामागे तुमचं हेतु काय? आधी तुमचं खरं नाव सांगा.” कारकुन आता जरा जरबेच्या स्वरात बोलला.
बबन आता सॉलिड घाबरला. सारंग सरांना जर कळलं, की आपण कुणा गोखले नामक माणसाचं सर्टिफिकेट वरचं नाव बदलण्याचा उद्योग करतो आहोत, तर आपली काही खैर नाही. मग सही सलामत सुटका करून घेण्याच्या इराद्याने तो म्हणाला, “साहेब, तुम्ही म्हणता, तसंच करतो. सुभाष गोखल्यांना घेऊनच येतो इथे. तुमचा पण संशय फिटेल आणि मग काम पण होऊन जाईल. बरोबर ना?”
“बरोबर, हेच मी सांगत होतो. आणा त्यांना तुम्ही इथे, मगच बघू तुमच्या कामाचं काय करायचं ते. आणि हो, खऱ्या सुभाष गोखल्यांना घेऊन या. गेम खेळू नका भारी पडेल तुम्हालाच.” – कारकून.
“हो साहेब.” असं म्हणून बबन तिथून सटकला. बाहेर पडल्यावर त्याने एक दीर्घ श्वास घेतला. मग एका PCO वर जाऊन सुभाषला फोन केला, आणि संध्याकाळी भेटायला बोलावलं.
संध्याकाळी सुभाष कॉफी हाऊस समोर बबनची वाट पाहत होता. अर्धा तास होऊन गेला, तरी बाबांचं काही चिन्ह दिसत नव्हतं. तो कंटाळला, पण इलाज नव्हता, काही महत्वाचं असेल, म्हणूनच बोलावलं असेल, असा विचार करून तो वाट बघत होता. शेवटी एकदाचा बबन आला.
“काय बबनशेठ, किती उशीर, मी आत्ता परत जाणार होतो.” – सुभाष.
“अरे ऐन निघायच्या वेळेस कोणी पक्षकार आला, मग त्यांची फाइल काढणं, चहा आणून देणं, यात वेळ गेला. काय करणार, नोकरी आहे.” – बबन.
“बरं काय विशेष? कशाला बोलावलं?” – सुभाष.
मग बबननी सकाळी बोर्डात काय घडलं हे सविस्तर सांगीतलं. मग म्हणाला, “आता, यापुढे तुम्हालाच करावं लागणार आहे, जे काही करायचं ते.” – बबन
सुभाष जरा विचारात पडला, मग म्हणाला, “करावं तर लागणारच आहे. बघतो काय करता येतं ते.”
“पण सुभाष, हे सर्टिफिकेट तू चंदूला हाताशी धरून करून घेऊ शकतो, सारंग सर बोर्डात काही करू शकतील, असं मला वाटत नाही.” – बबन.
“तो शेवटचा उपाय आहे. इथे नाहीच जमलं, तर तेच करावं लागेल. पण बबनराव, तुम्ही म्हणाला होता, की ही सर्व कागद पत्र कोर्टाला सबमिट होणार आहेत, आणि कोर्टाच्या निर्णयानुसार सर्व संपत्तीचं वाटप होणार आहे, अश्या परिस्थितीत जर कोर्टाने सांगीतलं, की बोर्डाकडून प्रमाणित करून आणा, तर आपण सरळ जेल मधे. ही एक फार मोठी रिस्क आहे, ती घ्यायची का, याचा विचार करावा लागेल.” – सुभाष.
“नको, नको, तुम्ही कसंही करून बोर्डात जमवाच. आपल्याला इतका मोठा धोका पत्करायचा नाहीये.” – बबन.
“ठीक आहे करतो मी. काही तरी जुगाड.” – सुभाष.
मीटिंग संपली.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा