तोतया वारसदार (पर्व २ रे) भाग ५

“आपल्या पासपोर्टचा अर्ज मोठ्या साहेबांच्या टेबल वर गेला आहे असं एजंटने सांगीतलं आहे, तेंव्हा ?

 तोतया वारसदार

पात्र रचना

सारंग         - वकील,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

डॉ प्रशांत       - डॉक्टर,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

किरीट         - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

निशांत        - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. शोधकर्ता

नयना         - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर  

महादेवराव      - घराण्याचा मूळ पुरुष.

सखारामपंत     - महादेवराव – सखारामपंत. वेळणेश्वरला स्थायिक

विश्वनाथ       - महादेवराव – विश्वनाथ. गोकर्ण महाबळवेश्वरला स्थायिक.

कौशिक        - महादेवराव – कौशिक – समुद्रात बुडून मेला.

दिनकर       - महादेवराव - - दिनकर साताऱ्याला गेला तिथून पुणे आणि तिथून

               कानपूरला गेला

चंद्रकांत गोखले                - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर

उज्ज्वला                    - चंद्रकांत गोखल्यांची बायको.

विश्वास                     - चंद्रकांत गोखल्यांचा मुलगा अमेरिका.

स्वानंदी                     - विश्वास ची बायको.

सुनील                      - चंद्रकांत गोखल्यांचा धाकटा मुलगा अमेरिका.

नर्मदा आणि गोदावरी – महादेवरावांच्या मुली, लग्न होऊन चिपळूण आणि नंतर

पुण्यास स्थलांतर पण पुण्याच्या प्लेग मधे दोन्ही कुटुंबाची संपूर्ण वाताहत झाली.

रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला

स्थायिक

रेवती          सखाराम पंतांची मुलगी हरिहर साने यांच्याशी लग्नं करून सांगलीला

स्थलांतर.

अक्षय साने     - महादेवराव – सखाराम – रेवती -अक्षय

सहावी  पिढी. सुरतला स्थायिक.

अंबिका        सखाराम पंतांची मुलगी  अकाली मृत्यू.

कावेरी         रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न

श्रीरंग         कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या  वेळेस सैन्यात गेला.

सीता, सरिता जान्हवी    – श्रीरंग च्या मुली.

शंकरन               - श्रीरंगचा दुसऱ्या बायको पासून झालेला मुलगा.

विनायक       भास्कर चा मुलगा वसंत त्याचा मुलगा विनायक

व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.

जय           व्यंकटेशचा मुलगा.

रोहन          - सौमित्रचा मुलगा

लक्ष्मण आणि वर्षा      - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी.

  गोकर्णला स्थायिक.

वसुधाबाई             - लक्ष्मणची आई.

विश्राम आणि अनिल           - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -गंगाधर –

सहावी पिढी.

  साताऱ्याला  स्थायिक.

दिनेश आणि प्रांजल            - विश्रामची मुलं. सातारा

विनय                       - अनिलचा मुलगा सातारा.

विश्वंभर                     - महादेव – विश्वनाथ- ओंकार- विश्वंभर.

माधव                      - विश्वंभर – राजाराम – माधव. तंजावरला

 स्थायिक

वसुंधरा                      - माधवची बायको.

चिन्मय आणि विवेक           - माधव ची मुलं.

हेमांगी                      - चिन्मयची बायको. 

कावेरी                      - महादेव – विश्वनाथ- कावेरी. विश्वास परांजपे शी लग्न.

वसंतराव परांजपे                     कावेरी परांजप्यांचे आताचे वंशज

प्रभावती                            वसंतरावांच्या पत्नी

त्र्यंबक                             वसंतरावांचे काका.

गोविंद                             वसंतरावांचा धाकटा भाऊ.

श्रीकांत आणि विक्रम            -वसंतरावांची मुलं. अमेरिकेत असतात. 

सुधाकर गोखले         निशांतला कानपूरला भेटलेले पहिले गोखले.

विशाखा               सुधाकररावांची बायको.

बबन                 - सारंग सरांचा चपराशी

सुभाष गोखले          -बबनचा मित्र. कटातला भागीदार. तोतया वारसदार

अविनाशराव           - निशांतचे वडील.

जयश्री                - निशांतची आई.

भाग  ५    

भाग ४ वरुन पुढे वाचा .......   

  

“चला, एक मोठा टप्पा पार पडला आहे. पासपोर्ट आला की मग व्हीजा साठी तयारी.  अजमेरला जायचं आहे ना, मग सगळंच व्यवस्थित होईल बघ. काळजी करू नको. तुझी मन्नत पुरी होणार.” – सुलतानी. त्याच्या बोलण्यावर सलमा खुशीत येऊन हसली.

तेवढ्याने सुद्धा सुलतानीला बरं वाटलं. बरेच दिवस तिचा चेहरा मलूल होता. आज थोडा उजळला होता. आता थोड्याच दिवसांची प्रतीक्षा होती. तिचा चेहरा फुलला.

पण महिना उलटून गेला तरी एजंटचा फोन आला नाही. काय झालं असेल? सलमाच्या मनात अनेक शंकांचं काहूर उठलं. ती सुलतानीला म्हणाली सुद्धा,

“आता हाता तोंडाशी घास आलेला असतांना काय होतं आहे, कशा मुळे विलंब होतो आहे काही कळत नाही. मला भीती वाटते आहे.” – सलमा.

“आपल्या पासपोर्टचा अर्ज मोठ्या साहेबांच्या टेबल वर गेला आहे असं एजंटने सांगीतलं आहे, तेंव्हा काळजी करू नकोस. सर्व ठीक होईल.” सुलतानी असं म्हणाला खरं पण त्याच्याही मनात धाकधूक होतीच. त्याने एजंटला फोन लावला. एजंटने सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाला,

“मलाही कळत नाहीये, का विलंब होतो आहे ते. आज मी पासपोर्ट ऑफिस मधे जाऊन चौकशी करतो आणि तुम्हाला फोन करतो.”

आता त्याच्या फोनची वाट पाहणे या व्यतिरिक्त सुलतानी आणि सलमा काहीच करू शकत नव्हते. रात्री एजंटचा फोन आला,

“मोठ्या साहेबांनी अर्जावर शेरा मारला आहे, की पोलिस चौकशी पुन्हा करा आणि सविस्तर रीपोर्ट द्या. त्यामुळे कदाचित उद्या किंवा परवा पोलिस तुमच्याकडे येऊ शकतील. घाबरू नका, साधी चौकशी असते, फार तर त्याला शे पाचशे द्या.” – एजंट.

“पण तुम्ही तर म्हणाला होता की आम्हाला पोलिसांशी बोलायची जरूर पडणार नाही म्हणून?” – सुलतानी.

“हो मी ती व्यवस्था केली होती, पण मोठ्या साहेबांनी पुन्हा करा असं सांगितल्यामुळे नाईलाज झाला आहे. मी उद्या त्या लोकांशी बोलतो. तुम्हाला त्रास होणार नाही. काळजी करू नका.” – एजंट.

“पण पासपोर्ट कशाला हवा आहे असं त्याने विचारले तर त्याला काय सांगू?” – सुलतानी.

“सांगा न तुम्हाला हज ला जायची इच्छा आहे म्हणून. हज यात्रा पासपोर्ट शिवाय होऊच शकत नाही. आणि हज करायची इच्छा असणं हा काही गुन्हा नाहीये.” एजंट.

दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी एक साध्या वेषातला पोलिस घरी आला. त्याने जनरल प्रश्न विचारले आणि मग म्हणाला की,

“तुमचं बँकेचं  पासबूक दाखवा.” – पोलिस.

“पासबूक? ते कशाला? आम्हाला पासपोर्ट हवा आहे, कर्ज नाही.” – सुलतानी.

“तुम्हाला हजला जाण्या साठी पासपोर्ट हवा आहे, मग तेवढं बँक बॅलन्स तुमच्या कडे आहे की नाही हे बघायला नको?” – पोलिस.

मग सुलतानीने पासबूक, फिक्स्ड डिपॉजिट रीसीप्ट दाखवल्या

“हूं, हे सगळं तर ठीक दिसतंय. आता मला सांगा तुम्हाला इतक्या वर्षांनंतर आत्ताच पासपोर्ट का काढावासा वाटला?” – पोलिस.

“तशी हज करायची इच्छा खूप वर्षांपासून होती, म्हणूनच पैसे साठवत होतो. आता तयारी झाली आहे, म्हणून पासपोर्ट काढतो आहे.” – सुलतानी.

“तुम्ही म्हणता की खूप वर्षांपासून हजला जायची इच्छा होती, मग पासपोर्ट इतक्या उशिरा का काढला?” – पोलिस.

“आधी पासून काढून काय करणार होतो? आधी पैसे साठवायला सुरवात केली आणि ते पुरेसे आहेत हे ठरल्यावर पासपोर्ट साठी अर्ज केला.” – सुलतानी.

“आम्ही आजू बाजूला चौकशी केली, पण या आधी तुम्ही हज विषयी कोणाजवळ बोलल्याचं कोणी सांगीतलं नाही. एकदम ठरलं का जायचं?” – पोलिस.

“नाही हजला जायची इच्छा खूप वर्षांपासून होत होती. कोणा जवळ काय बोलणार होतो? केंव्हा तरी बोललोही असू, पण साहेब, आजू बाजूला सगळे तसं म्हंटलं तर गरीबच आहेत. इतक्या दूर, परदेशात जाण्याचा विचारही कोणी करू शकत नाही. पण आमची जबरदस्त इच्छा होती आणि त्यामुळे आम्ही प्रयत्न करायचं ठरवलं. आणि बघा खुदाने हमारी ख्वाईश पूरी कर दी।“ – सुलतानी.

पोलिसांचं समाधान झालं. तो म्हणाला,

“हे मी आता डाक्याला पाठवून देतो. तुम्ही आता तिथे चौकशी करा.” – पोलिस.

चार दिवसांनी सुलतानीने एजंटला फोन करून पोलिस व्हेरीफीकेशन झालं आहे म्हणून सांगीतलं. तो म्हणाला की आता तो पाठपुरावा करेल. एक महिन्याने एजंटचा फोन आला,

“तुमचे पासपोर्ट तयार होऊन माझ्या जवळ आले आहेत. तुम्ही केंव्हाही येऊन ताब्यात घेऊ शकता.” – एजंट.

मग सुलतानी एकटाच डाक्याला जाऊन पासपोर्ट घेऊन आला. सलमा घरीच होती, त्यामुळे कोणाला कसलाच संशय आला नाही.

“मी आजच एजंटशी व्हीजा बद्दल बोलणार होतो, पण तू थांब म्हणालीस म्हणून विषय काढला नाही.” – सुलतानी.

“आपण एक महिना थांबू, मग व्हीजा काढू. तो पर्यन्त थोडी तयारी करू.” – सलमा.

मग सलमाने सुलतानीला म्हंटलं, की एक सूट शिवून घ्या. तिकडे थंडी असली तर त्रास होणार नाही.” – सलमा म्हणाली. सुलतानीने थोडे आढे वेढे घेतले पण तयार झाला. त्याने आता ठरवलं होतं की सलमाचा चेहऱ्यावर आनंद दिसत असेल, तर ती म्हणेल ते सर्व करायचं. सलमाने टेलरला पॅन्ट आणि कोटाला अस्तर शिवायला सांगितलं. सुलतानीला कळलं नाही म्हणून त्याने सलमाला विचारलं, पण सलमाने उत्तर दिलं नाही. सूट शिवून तयार झाला. सुलतानीने तो घरी आणला. पण अजूनही सलमा व्हिजा बद्दल बोलत नव्हती. सुलतानीला कळत नव्हतं की आता कशाला थांबायचं ते, पण तो काही बोलला नाही.

दुसऱ्या दिवशी सुलतानी दुकानावर गेल्यावर सलमाने त्याचा इतकी वर्ष जिवापाड जपून ठेवलेला, त्याचा मिलिटरी चा फाटलेल्या अवस्थेत असलेला युनिफॉर्म काढला. त्याला इस्त्री करून तो नीट ठेवला. मग पॅन्ट आणि कोटाचं अस्तर उसवलं. मग युनिफॉर्म पण उसवून बेमालुम पणे पॅन्ट आणि कोटाच्या आत मधून शिवला आणि वरतून अस्तर शिवून टाकलं. हे सगळं करण्यात आठ दिवस गेले. मग सलमाने सुलतानीला व्हीजा साठी अर्ज करायला सांगीतलं. एक दिवस सुलतानीला आणि सलमाला डाक्याला जावं लागलं. इंडियन एंबसी मधे जाऊन व्हीजाचं काम करून आले. यावेळेस सलमाने आधीच शाजियाला सांगीतलं की ते डाक्याला फिरून येणार आहेत म्हणून. तिला आश्चर्य वाटलं, पण तिने फारसं महत्व दिलं नाही.

एजंटने १५ दिवसांनी फोन केला, व्हीजा आणि तिकीट तयार आहे म्हणून.

सुलतानी आणि सलमाचा निघायचा दिवस उजाडला. सगळी तयारी झाली होती. सलमाने सुलतानीला नवीन शिवलेला सूट घालायला सांगितला.

“अग इतक्या गर्मीत  मी सूट घालावा अशी तुझी इच्छा आहे?” – सुलतानीने आश्चर्याने विचारलं.

“हो, आणि त्याचं कारण आहे. तुम्ही रुबाबदार दिसायला हवं” सलमा असं म्हणाली मग सुलतानीचा नाईलाज झाला.

दिल्लीला हॉटेलवर पोचल्यावर सलमा म्हणाली की

“आता तो सूट उतरवून मला द्या. मी नीट घडी करून ठेवते.” – सलमा.

“सलमा, मला तुझं वागणंच कळत नाहीये. इथे दिल्लीला चांगली थंडी आहे आणि तू मला सांगते की अंगावरून हा गरम सूट काढा म्हणून? काय कारण आहे?” – सुलतानी. “आहे, मी जे वागते आहे त्याला कारण आहे, पण मी ते योग्य वेळेस तुम्हाला सांगीन. नक्की. पण आत्ता तुम्ही मी जसं म्हणते तसं करा.” – सलमा.

“असं काय आहे की जे मला सांगण्याची योग्य वेळ आली नाही?” सुलतानी आता चिडला होता. डाक्याच्या गर्मी मधे हट्टाने सूट घालायला लावला, आणि आता दिल्लीच्या थंडीत सूट काढून ठेवायला सांगते आहेस, सलमा मला तुझं काही कळतच नाही.” सुलतानी वैतागाने म्हणाला.

मग सलमाने त्याच्या गळ्यात हात टाकले आणि अत्यंत मधाळ स्वरात बोलली,

“प्लीज.” असं केल्यावर कोण बायकोचं ऐकणार नाही? सुलतानीने मुकाट्याने सूट उतरवला. दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांनी अजमेरचं ट्रेनचं बूकिंग केलं. अजमेरला जायला एक दिवस, यायला एक दिवस आणि तिथे एक दिवस, असे तीन दिवस फारच धावपळीत गेले. एक दिवस दिल्लीला आराम केल्यावर, सुलतानी म्हणाला,

“आता काय? दिल्ली बघायची आहे? आजचा दिवस दिल्ली फिरायची का?” – सुलतानी.

“दिल्ली फिरायची आहेच, पण त्या अगोदर मुंबईचं रिजर्वेशन करू.” – सलमा.

“मुंबई? आपण मुंबईला जातो आहोत? तू मुंबई बद्दल काहीच बोलली नाहीस, सलमा तुझे काय प्लॅन आहेत, ते जरा सांगशील का?” – सुलतानी.

“मन्नत, मुंबईच्या हाजीअली ला चादर चढवायची आहे.” सलमा.

“हे काय नवीनच? तू आधी कधी बोललीच नाहीस.” – सुलतानी.

“मी तुझ्याशी अजमेर बद्दल पण काहीच बोलले नव्हते, तुला टेंशन देण्याची माझी इच्छा नव्हती. इतके पैसे पण नव्हते आपल्या जवळ.” – सलमा.

“हूं, हे खरं आहे, पण तू बोलायला हवं होतंस. उगाच लपवलं माझ्यापासून, मी काही तुझ्यावर चिडलो नसतो. काही तरी व्यवस्था केली असती.” – सुलतानी.

“ओके, पण आता जाऊच शकतो ना आपण.” – सलमा.

“सलमा आपल्या जवळ लिमिटेड पैसे आहेत. आपण दुसऱ्या देशात आहोत, हवे तेवढे पैसे नाही खर्च करू शकणार, हे ध्यानात ठेव.” – सुलतानी.

“माहीत आहे मला, म्हणून तर मी कुठलीही खरेदी करण्याच्या भानगडीत पडले नाही आवश्यक तेवढाच खर्च करते आहे.” – सलमा.

“मुंबईला गेलो, तर आग्रा कॅन्सल करावं लागेल. ताजमहाल बघता येणार नाही. बघ तूच ठरव.” – सुलतानी.

“असं असेल तर, आपण मुंबई पण कॅन्सल करू आणि नागपूरला जाऊ. मला तुमचं घर बघायचं आहे, आणि निशांतला पण भेटायचं आहे.” – सलमा.

सुलतानी हतबुद्ध होऊन सलमाकडे बघतच राहिला. आता त्यांच्या डोक्यात थोडा थोडा प्रकाश पडायला लागला. सलमा पूर्ण विचार करूनच भारतात आली आहे असं त्याला जाणवलं.

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com