तोतया वारसदार (पर्व २ रे) भाग ४

“तुमच्या पासपोर्ट साठीचं पोलिस व्हेरीफिकेशन झालं आहे. आता तुमचा अर्ज मोठ्या साहेबांकडे अप्रू

 तोतया वारसदार (पर्व २ रे)

पात्र रचना

सारंग         - वकील,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

डॉ प्रशांत       - डॉक्टर,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

किरीट         - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

निशांत        - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. शोधकर्ता

नयना         - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर  

महादेवराव      - घराण्याचा मूळ पुरुष.

सखारामपंत     - महादेवराव – सखारामपंत. वेळणेश्वरला स्थायिक

विश्वनाथ       - महादेवराव – विश्वनाथ. गोकर्ण महाबळवेश्वरला स्थायिक.

कौशिक        - महादेवराव – कौशिक – समुद्रात बुडून मेला.

दिनकर       - महादेवराव - - दिनकर साताऱ्याला गेला तिथून पुणे आणि तिथून

               कानपूरला गेला

चंद्रकांत गोखले                - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर

उज्ज्वला                    - चंद्रकांत गोखल्यांची बायको.

विश्वास                     - चंद्रकांत गोखल्यांचा मुलगा अमेरिका.

स्वानंदी                     - विश्वास ची बायको.

सुनील                      - चंद्रकांत गोखल्यांचा धाकटा मुलगा अमेरिका.

नर्मदा आणि गोदावरी – महादेवरावांच्या मुली, लग्न होऊन चिपळूण आणि नंतर

पुण्यास स्थलांतर पण पुण्याच्या प्लेग मधे दोन्ही कुटुंबाची संपूर्ण वाताहत झाली.

रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला

स्थायिक

रेवती          सखाराम पंतांची मुलगी हरिहर साने यांच्याशी लग्नं करून सांगलीला

स्थलांतर.

अक्षय साने     - महादेवराव – सखाराम – रेवती -अक्षय

सहावी  पिढी. सुरतला स्थायिक.

अंबिका        सखाराम पंतांची मुलगी  अकाली मृत्यू.

कावेरी         रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न

श्रीरंग         कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या  वेळेस सैन्यात गेला.

सीता, सरिता जान्हवी    – श्रीरंग च्या मुली.

शंकरन               - श्रीरंगचा दुसऱ्या बायको पासून झालेला मुलगा.

विनायक       भास्कर चा मुलगा वसंत त्याचा मुलगा विनायक

व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.

जय           व्यंकटेशचा मुलगा.

रोहन          - सौमित्रचा मुलगा

लक्ष्मण आणि वर्षा      - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी.

  गोकर्णला स्थायिक.

वसुधाबाई             - लक्ष्मणची आई.

विश्राम आणि अनिल           - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -गंगाधर –

सहावी पिढी.

  साताऱ्याला  स्थायिक.

दिनेश आणि प्रांजल            - विश्रामची मुलं. सातारा

विनय                       - अनिलचा मुलगा सातारा.

विश्वंभर                     - महादेव – विश्वनाथ- ओंकार- विश्वंभर.

माधव                      - विश्वंभर – राजाराम – माधव. तंजावरला

 स्थायिक

वसुंधरा                      - माधवची बायको.

चिन्मय आणि विवेक           - माधव ची मुलं.

हेमांगी                      - चिन्मयची बायको. 

कावेरी                      - महादेव – विश्वनाथ- कावेरी. विश्वास परांजपे शी लग्न.

वसंतराव परांजपे                     कावेरी परांजप्यांचे आताचे वंशज

प्रभावती                            वसंतरावांच्या पत्नी

त्र्यंबक                             वसंतरावांचे काका.

गोविंद                             वसंतरावांचा धाकटा भाऊ.

श्रीकांत आणि विक्रम            -वसंतरावांची मुलं. अमेरिकेत असतात. 

सुधाकर गोखले         निशांतला कानपूरला भेटलेले पहिले गोखले.

विशाखा               सुधाकररावांची बायको.

बबन                 - सारंग सरांचा चपराशी

सुभाष गोखले          -बबनचा मित्र. कटातला भागीदार. तोतया वारसदार

अविनाशराव           - निशांतचे वडील.

जयश्री                - निशांतची आई.

भाग ४    

भाग ३ वरुन पुढे वाचा .......   

  

तिकडे बांग्लादेशात, एकतरपूरला काही वेगळंच चालू होतं.

“तुम्ही आपसात कोणची भाषा बोलत होता? बंगालीत बोलत नव्हता तुम्ही.” – शेजारी राहणारी शाजिया, सलमाला  विचारात होती. सलमाला एक ४४० वोल्टचा शॉक बसला. त्या दिवशी कधी नव्हे ते सुलतानी आणि सलमा मधे वादावादी झाली होती आणि दोघांचेही आवाज चढले होते. सलमाने काही तरी थातुर मातुर उत्तर देऊन विषय संपवला. पण एका विचित्र धास्तीने  तिच्या मनांत घर केलं. तिने रात्री या विषयावर सुलतानीशी बोलायचं ठरवलं.

रात्री जेवणा साठी सुलतानीला बोलवायला सलमा गेली तेंव्हाही सुलतानीचा राग शांत झाला नव्हता. त्याने नकारार्थी मान हलवली आणि तोंड फिरवून बसला. सलमाने आता बंगालीत बोलायला सुरवात केली.

“हलक्या आवाजात आणि ते ही बंगालीतच बोल. मॅटर सिरियस आहे. आपल्याला इथून कदाचित जावं लागेल.” – सलमा.

आता सुलतानीने तिच्याकडे मान वर करून पाहीलं. ती घाबरली होती, आणि तिच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत होतं. सुलतानी कळवळला. उगाच आपण भांडलो, याचा त्याला विषाद वाटला. तो बंगालीतच बोलला,

“सलमा, सॉरी. मला माफ कर. मी तुझ्यावर ओरडून बोललो त्या साठी मला माफ कर. मला त्या बद्दल खूप वाईट वाटतं आहे.” – सुलतानी.

“मी त्याबद्दल बोलतच नाहीये. खरं कारण वेगळंच आहे. आपण मराठीत भांडलो हे ते कारण आहे.” – सलमा.

“मला कळलं नाही, नीट सांग.” – सुलतानी.

मग सलमाने शाजिया काय म्हणाली ते सांगीतलं. ते ऐकल्यावर मात्र सुलतानीच्या डोक्यात प्रकाश पडला. आता तो सुद्धा गंभीर झाला.

“आता मी शाजियाला आम्ही हिंदीत बोलत होतो असं सांगीतलं आणि गप्प बसवलं. पण जर ती तिच्या नवऱ्याशी बोलली आणि त्याने विचारलं की हिंदीत का बोलत होते हे लोकं, तर आपल्या जवळ त्याचं काय उत्तर आहे? इथे आजूबाजूला सगळे बंगालीतच भांडतात. म्हणून आता यापुढे मराठी बंद.” – सलमा.

“तुझं बरोबर आहे. मराठी बंद. पण तू असं का म्हणालीस की इथून जावं लागेल, काय कारण? – सुलतानी.

“समजा शाजियाचा नवरा अजून कोणाकडे बोलला, तर ही गोष्ट पसरायला वेळ  लागणार नाही. मग तो मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल.” – सलमा.

सुलतानी विचारात पडला. हे धोकादायक होतं. चौकशी सुरू झाली तर त्यांची परिणीती कशात होईल हे सांगणं कठीण होतं. तो काहीच बोलत नाही असं पाहून सलमाच म्हणाली,

“काय झालं? तू काहीच बोलत नाहीये.”

“गंभीर आहे प्रकरण. काय बोलावं तेच सुचत नाहीये.” – सुलतानी.

“मी विचार केला आहे. सांगू का?” – सलमा.

“हूं, सांग.” सुलतानी.

“आपला मुलगा, रहमान, सारखा आजारी आजारी असायचा, त्यावेळी मी त्याच्या आरोग्यासाठी मन्नत मागितली होती. अजमेर शरीफ दरग्या वर चादर चढविन  म्हणून. पण जमलंच नाही. रहमान तर गेला, पण आपल्यावर आणखी संकटं येऊ नयेत म्हणून मन्नत पुरी करणं आवश्यक आहे. तुला काय वाटतं?” – सलमा.

“आलं माझ्या लक्षात. पण त्याने काय होणार? परत आल्यावर सुद्धा चिंतेची ही तलवार मानेवर राहणार आहेच.”- सुलतानी.

“तेंव्हाचं तेंव्हा बघू. कदाचित मन्नत पुरी झाल्यावर त्रास होणार नाही.” – सलमा.

“अग आपल्या जवळ पासपोर्ट पण नाहीये, आधी तो मिळवावा लागेल. मग व्हिजा, या सगळ्या साठी काय करावं लागतं ते ही माहीत नाहीये.” – सुलतानी.

“आपण डाक्याला जाऊ, तिथे चौकशी करू, जे काय पैसे खर्च करावे लागतील ते करू. पण इथे कोणाशीच काहीही बोलू नकोस. आता माझी वेळ वाया घालवायची अजिबात इच्छा नाहीये. लवकरात लवकर मन्नत पुरी करायची आहे.”– सलमा

दुसऱ्याच दिवशी दोघंही डक्याला गेले. थोडी चौकशी केल्यावर त्यांना एक एजंट भेटला. त्यांनी पासपोर्ट काढून देण्याची हमी दिली.

“साधारण किती वेळ लागेल?” – सुलतानीने विचारले.

“चार ते पांच महीने.” – एजंट

“बापरे इतका वेळ लागतो? तुम्ही एजंट आहात लवकर नाही का होऊ शकणार?”-सलमा

“कशा साठी हवाय तुम्हाला पासपोर्ट? कुठे जाणार आहात?” – एजंट.

“दोन ठिकाणी. एक हज यात्रा करायची आहे, आणि दुसरं म्हणजे अजमेर शरीफ वर चादर चढवायची आहे. मन्नत आहे.” – सलमा.

“ठीक आहे मी प्रयत्न करतो पण चांसेस कमी आहेत कितीही झालं तरी ३ महीने तरी लागतीलच. आणि या काळात तुम्ही घर सोडून कुठे जाऊ नका, पोलिस व्हेरीफिकेशन होईल.” – एजंट

“एजंट साहेब, आम्ही ज्या एरिया मधे राहतो, तिथे घरी पोलिस आले, तर खूपच बदनामी होईल. हे काम परस्पर होणार नाही का?” – सलमा  

“होईल, पण मला एकतरपूरला यावं लागेल, आणि खर्च पण लागेल. तुमची तयारी असेल तर सांगा.” -एजंट.

“किती खर्च येईल?- सुलतानी.

“दोघांचे पासपोर्ट आहेत तर १० हजार खर्च येईल. एखाद्या वेळेस थोडा जास्त पण येऊ शकतो.” एजंट.

“आम्हाला कसं कळेल की पासपोर्ट तयार झाला आहे म्हणून?” – सुलतानी.

“तुमचा पत्ता असणारच आहे फॉर्म वर. मी कळवेन तुम्हाला.” एजंट.

“आमचा फोन पण आहे. नंबर घ्या लिहून.” – सुलतानी. मग सुलतानीने त्याचा पण फोन नंबर लिहून घेतला. म्हणाला

“मी केंव्हा फोन करू तुम्हाला?”

साधारण महिन्याने फोन करा कुठवर प्रगती झाली आहे ते सांगेन.” – एजंट.

एवढं बोलणं झाल्यावर, सुलतानीने मग त्याला ५००० रुपये दिले. उरलेले ५ पासपोर्ट हातात आल्यावर देऊ म्हणाला. मग दोघेही डाक्याचा लालबाग किल्ला आणि अहसान मंजिल म्यूजियम बघायला गेले. तिथे काही फोटो काढले, मग प्रसिद्ध तारा मस्जिदला भेट दिली आणि मग एकतरपूरला वापस आले. आता त्यांच्या डोक्यांवरचं ओझं थोडं हलकं झालं होतं. तरीही सलमाची चलबिचल होतच होती.

“उद्या जर कोणी विचारलं की कुठे गेले होते, तर काय सांगायचं?” – सलमा.

“अरे सलमा त्यासाठीच तर आपण लालबाग आणि म्यूजियम आणि तारा मस्जिद दोन्ही तिन्ही ठिकाणी फोटो काढले. सांग डाक्याला गेलो होतो. काय काय पाहिलं ते ही अगदी रंगवून सांग. पासपोर्ट बद्दल एक चकार शब्द पण बोलू नकोस.” – सुलतानी.

ज्याची शंका होती तसंच झालं. दुसऱ्या दिवशी शाजियानी विचारलंच.

“काल कुठे होता तुम्ही? रात्री खूप उशिरा पर्यन्त आले नव्हते.” – शाजिया.

“अग काही नाही, खूप वर्ष झाली कुठे गेलोच नव्हतो. मग ठरवलं की डाकयाला जाऊ. तिथे बऱच काही पाहण्या सारखं आहे.” असं म्हणून मग सलमाने जे जे पाहीलं होतं त्याच रसभरीत वर्णन केलं, फोटो पण दाखवले. शाजियाचं समाधान झालं आणि ती गेली. पण चार वाजता आणखी ४ बायकांना घेऊन आली. आजू बाजूची वस्ती सगळी लोवर मिडल क्लासची असल्याने सर्वांनाच ती डाक्याला फिरून आली याचं कौतुक होतं. पण सरते शेवटी एका बाईने विचारलंच,

“अग सलमा ही शाजिया म्हणत होती की तुम्ही हिंदीत भांडत होता म्हणून, तू हिन्दी कुठे शिकली?”

“अग असं काही नाहीये, शाजियाला भास झाला. मला कुठलं हिन्दी येतं? सिनेमा पाहून पाहून जेवढं येतं तेवढंच. भांडता भांडता एखादं वाक्य बोलले असेन हिंदीत. याच्या पलीकडे काही नाही.” – सलमा.

बायका तर गेल्या, पण सलमाच्या मनात पुन्हा भीतीने डोकं वर काढलं. ही वार्ता पसरली आणि चौकशी सुरू झाली तर काय होणार? सुलतानीचं खरं स्वरूप कळलं तर काही धडगत नाही, या विचाराने तिची झोप उडाली. तिने सुलतानीला दुपारचा प्रसंग सांगितला. तो पण धास्तावला, पण पासपोर्ट येई पर्यन्त शांत पणे बसण्या शिवाय काही उपाय नव्हता. पासपोर्ट लवकर मिळू दे अशी प्रार्थना करण्या शिवाय त्यांच्या हातात काहीच नव्हतं. पण तो विषय तेवढ्यावरच थांबला. त्याचं आणखी प्रसारण झालं नाही. एक महिना उलटला. सुलतानीने एजंटला फोन केला आणि विचारलं,

“पासपोर्टचं काम कुठवर आलं साहेब?” – सुलतानी.

“सरकारी काम आहे. आणि त्यांच्या गतीने ते चालू आहे. समाधानाची गोष्ट ही आहे की तुमच्या कागदपत्रांवर काही प्रश्न आले नाहीयेत, आणि तुमचा अर्ज हा आता मोठ्या साहेबांकडे अप्रूव्हल साठी गेला आहे. लवकरच काम होईल अशी आशा करायला हरकत नाही.” – एजंट.

आणखी एक महिना गेला आणि सुलतानीने एजंटला फोन केला.

“थोडा वेळ लागणार आहे. कारण साहेब १५ दिवस सुट्टीवर गेले होते. त्यांच्या जागी त्यांचा असिस्टंट काम बघत होता, त्यांच्यावर कामाचं खूप लोड होतं म्हणून थोडा जास्त वेळ लागू शकतो. पण चिंता करू नका, उद्या पासून मोठे साहेब कामावर जॉइन होता आहेत, तरी अजून एक ते दीड महिना लागेल मग पोलिस व्हेरीफिकेशन, ते झाल्यावर मग मोठे साहेब अर्जावर फायनल म्हणून सही करतील. पोलिस व्हेरीफिकेशनला तुमचा अर्ज गेला की मी फोन करतो तुम्हाला.” – एजंट.  

एजंटचा फोन दोन महिन्यांनी आला.

“तुमच्या पासपोर्ट साठीचं पोलिस व्हेरीफिकेशन झालं आहे. आता तुमचा अर्ज मोठ्या साहेबांकडे अप्रूव्हल साठी आला आहे. अप्रूव्हल झालं, की तुम्हाला फोन करतो.”-एजंट.

“चला, एक मोठा टप्पा पार पडला आहे. पासपोर्ट आला की मग व्हीजा साठी तयारी. पण अजमेरला जायचं आहे ना, मग सगळंच व्यवस्थित होईल बघ. काळजी करू नको. तुझी मन्नत पुरी होणार.” – सुलतानीने सलमाला दिलासा दिला. त्याच्या बोलण्यावर सलमा खुशीत येऊन हसली.

तेवढ्याने सुद्धा सुलतानीला बरं वाटलं. बरेच दिवस तिचा चेहरा मलूल होता. आज थोडा उजळला होता. आता थोड्याच दिवसांची प्रतीक्षा होती. तिचा चेहरा फुलला.

पण महिना उलटून गेला तरी एजंटचा फोन आला नाही. काय झालं असेल?

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com