तोतया वारसदार (पर्व २ रे) भाग ६

सुभाषने लक्ष्मणचं बोलणं ऐकलं आणि त्याच्या हाता पायातलं त्राणच गेलं. लक्ष्मणने ओळखलं म्हणजे ‘?

 तोतया वारसदार

पात्र रचना

सारंग         - वकील,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

डॉ प्रशांत       - डॉक्टर,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

किरीट         - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

निशांत        - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. शोधकर्ता

नयना         - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर  

महादेवराव      - घराण्याचा मूळ पुरुष.

सखारामपंत     - महादेवराव – सखारामपंत. वेळणेश्वरला स्थायिक

विश्वनाथ       - महादेवराव – विश्वनाथ. गोकर्ण महाबळवेश्वरला स्थायिक.

कौशिक        - महादेवराव – कौशिक – समुद्रात बुडून मेला.

दिनकर       - महादेवराव - - दिनकर साताऱ्याला गेला तिथून पुणे आणि तिथून

               कानपूरला गेला

चंद्रकांत गोखले                - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर

उज्ज्वला                    - चंद्रकांत गोखल्यांची बायको.

विश्वास                     - चंद्रकांत गोखल्यांचा मुलगा अमेरिका.

स्वानंदी                     - विश्वास ची बायको.

सुनील                      - चंद्रकांत गोखल्यांचा धाकटा मुलगा अमेरिका.

नर्मदा आणि गोदावरी – महादेवरावांच्या मुली, लग्न होऊन चिपळूण आणि नंतर

पुण्यास स्थलांतर पण पुण्याच्या प्लेग मधे दोन्ही कुटुंबाची संपूर्ण वाताहत झाली.

रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला

स्थायिक

रेवती          सखाराम पंतांची मुलगी हरिहर साने यांच्याशी लग्नं करून सांगलीला

स्थलांतर.

अक्षय साने     - महादेवराव – सखाराम – रेवती -अक्षय

सहावी  पिढी. सुरतला स्थायिक.

अंबिका        सखाराम पंतांची मुलगी  अकाली मृत्यू.

कावेरी         रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न

श्रीरंग         कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या  वेळेस सैन्यात गेला.

सीता, सरिता जान्हवी    – श्रीरंग च्या मुली.

शंकरन               - श्रीरंगचा दुसऱ्या बायको पासून झालेला मुलगा.

विनायक       भास्कर चा मुलगा वसंत त्याचा मुलगा विनायक

व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.

जय           व्यंकटेशचा मुलगा.

रोहन          - सौमित्रचा मुलगा

लक्ष्मण आणि वर्षा      - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी.

  गोकर्णला स्थायिक.

वसुधाबाई             - लक्ष्मणची आई.

विश्राम आणि अनिल           - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -गंगाधर –

सहावी पिढी.

  साताऱ्याला  स्थायिक.

दिनेश आणि प्रांजल            - विश्रामची मुलं. सातारा

विनय                       - अनिलचा मुलगा सातारा.

विश्वंभर                     - महादेव – विश्वनाथ- ओंकार- विश्वंभर.

माधव                      - विश्वंभर – राजाराम – माधव. तंजावरला

 स्थायिक

वसुंधरा                      - माधवची बायको.

चिन्मय आणि विवेक           - माधव ची मुलं.

हेमांगी                      - चिन्मयची बायको. 

कावेरी                      - महादेव – विश्वनाथ- कावेरी. विश्वास परांजपे शी लग्न.

वसंतराव परांजपे                     कावेरी परांजप्यांचे आताचे वंशज

प्रभावती                            वसंतरावांच्या पत्नी

त्र्यंबक                             वसंतरावांचे काका.

गोविंद                             वसंतरावांचा धाकटा भाऊ.

श्रीकांत आणि विक्रम            -वसंतरावांची मुलं. अमेरिकेत असतात. 

सुधाकर गोखले         निशांतला कानपूरला भेटलेले पहिले गोखले.

विशाखा               सुधाकररावांची बायको.

बबन                 - सारंग सरांचा चपराशी

सुभाष गोखले          -बबनचा मित्र. कटातला भागीदार. तोतया वारसदार

अविनाशराव           - निशांतचे वडील.

जयश्री                - निशांतची आई.

भाग  ६   

भाग ५ वरुन पुढे वाचा .......   

  

“मुंबईला गेलो, तर आग्रा कॅन्सल करावं लागेल. ताजमहाल बघता येणार नाही. बघ तूच ठरव.” – सुलतानी.

“असं असेल तर, आपण मुंबई पण कॅन्सल करू आणि नागपूरला जाऊ. मला तुमचं घर बघायचं आहे, आणि निशांतला पण भेटायचं आहे.” – सलमा.

सुलतानी हतबुद्ध होऊन सलमाकडे बघतच राहिला. आता त्यांच्या डोक्यात थोडा थोडा प्रकाश पडायला लागला. सलमा पूर्ण विचार करूनच भारतात आली आहे असं त्याला जाणवलं.

“तुझ्या डोक्यात काय चाललंय हे आता मला हळू हळू क्लियर होतंय. तू शाजियाला इतकी घाबरलीस का? काय आहे तुझ्या मनात? तुझा वापस बांग्लादेशात जाण्याचा विचार दिसत नाहीये.” – सुलतानी.

“बरोबर ओळखलं आहेस. मला सांग त्या भोचक शाजियाला काही अक्कल नाहीये, ती अशीच बडबडत राहिली असती आणि एक दिवस चौकशी सुरू झाली असती, तर तुझं काय झालं असतं? आणि मग मी कशी जगले असते? म्हणून मी हा निर्णय घेतला. इथे तुझी माणसं आहेत. आणि मुख्य म्हणजे निशांत आहे. तो सर्व अडचणीतून मार्ग काढेल असा विश्वास आहे.”– सलमा

“सलमा, निशांत एक डिटेक्टिव आहे, त्याचं काम आहे शोध घेणं, सारंग वकिलांनी त्याला गोखल्यांना शोधण्याच्या कामासाठी हायर केलं होत. त्याच कामा निमित्त तो तिथे आला आणि आपली ओळख झाली. त्याचं काम संपलं असेल, तर तो आपल्याला भेटणार पण नाही. हे तुझ्या लक्षात येत नाही का?” सुलतानी.

“आणखी एक गोष्ट, आपला व्हीजा फक्त तीन महिन्यांचा आहे. आपल्या जवळ तेवढे पैसे पण नाहीत. इथे राहायचं म्हणजे व्हीजा वाढवावा लागेल आणि त्या करिता पटेल असं कारण द्यावं लागेल. एवढं करून सुद्धा नेहमी साठी राहायचं म्हणजे नागरिकत्व घ्यावं लागेल, आणि ते इतक्या सहजा सहजी मिळत नसतं.” – सुलतानी.

“ते काही असू दे, आपण चान्स घ्यायला काय हरकत आहे? तुझी माणसं आहेत तिथे, सारंग वकील आहेत. काही तरी नक्कीच करतील. निशांत काय म्हणाला होता? आठव जरा. तो म्हणाला होता की, ” आमचे सारंग वकील सर्व नीट करतील चिंता करू नका.” मग जाऊन पाहायला काय हरकत आहे?” सलमा म्हणाली, आणि सुलतानीला ते मान्य कारावंच लागलं. मग ते नागपूरचं रिजर्वेशन मिळतं का बघायला स्टेशनवर गेले. पुढचा एक महिना रिजर्वेशन  फूल होतं. एक महिना दिल्लीत राहणं शक्य नव्हतं मग त्यांनी फ्लाइटचं तिकीट काढलं आणि दुसऱ्या दिवशी नागपूरच्या विमानात बसले.

“आपण असं करू, सरळ वाड्यावरच जाऊ. आपलंच घर आहे. बघूया काही सोय होते का ते. नाही तर हॉटेल आहेच.” सलमा असं म्हणाली आणि सुलतानी म्हणजे अविनाश तिच्याकडे बघतच राहिला. भारतात जायचं ठरल्या पासून सलमा नख शिखांत बदलली होती.

“घर सोडून ३० -३५ वर्ष झाली आहेत, आता तिथे काय असेल, कोण असेल, वाडा तरी धड असेल का? काहीच कल्पना नसतांना सरळ वाड्यावरच जायचं? कोणी असलाच, तरी आपल्याला ओळखणार पण नाही. आपण प्रवासात आहोत आणि आपल्याजवळ या तीन बॅगा आहेत, हे तू विसरते आहेस का?” अविनाश म्हणाला.

“मी काहीच विसरले नाहीये. पण आपण आधी आपल्या घरी जायचं. फायनल. आपण आपल्या घरी जातो आहोत ही कल्पनाच माझ्या मनाला इतकी सुखावून जाते आहे की विचारू नकोस.”– सलमा.

“ओके. चला, पण आधी जरा नाश्ता करून मग जायचं का?” – अविनाश.

त्यांची रिक्शा घरं समोर उभी राहिली. अविनाश आणि सलमा खाली उतरले. घरा समोर मांडव पडला होता, आणि आत मधे सगळी धांदल उडाली होती.

“नक्कीच कोणाचं तरी लग्न दिसतंय. हा वाडा विकला गेला की काय ते कळत नाहीये. आता काय करायचं? – अविनाश.

तेवढ्यात कोणी तरी बाहेर आलं.

गोखल्यांच्या घरा समोर अंगणात मोठा मांडव उभारला होता. चार चार लग्न म्हंटल्यांवर मोठा मांडव जरुरीच होता. पाहुण्यांची लगबग चालू होती. झाडून सर्व गोखले, साने आणि परांजपे आणि केळकर मंडळी सहकुटुंब सपरिवार आले होते. मोठा जल्लोष चालू होता. उद्या पहिलं लग्न दिनेश आणि गार्गीचं लागणार होतं. आज तिन्ही जोडप्याचं एकत्र श्रीमंत पूजन होतं. त्याचीच सर्व तयारी चालली होती. सारंग सरांच्या मते वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी केली होती, म्हणून त्याला सुद्धा सह कुटुंब आमंत्रण होतं. त्याने स्वत:हूनच बरीचशी कामं अंगावर घेतली होती. त्याच्या साठीच तो घाई घाईने बाहेर चालला होता. तो बाहेर आला आणि त्याच वेळेस बाहेर फाटकासमोर एक रिक्शा येऊन उभा राहिला आणि एक जोडपं सामानांसहित उतरलं. सुभाष विचार करत होता की ‘सगळे पाहुणे तर आले आहेत, कोणीच राहिलं नाहीये, मग हे सामाना सहित अजून कोण आले आहेत? बरं, बाहेर गावा वरुन  आले आहेत हे स्पष्टच दिसत होतं. तो तिथेच उभा राहिला.

“हा गोखल्यांचाच वाडा आहे न?” अविनाशने विचारले.

“हो गोखल्यांचाच वाडा आहे. पण आपण कोण?” – सुभाष.

“हा एवढा मोठा मांडव दिसतो आहे कोणाचं लग्न आहे का?” – अविनाश.

“हो विश्राम गोखल्यांच्या मुलाचं लग्न आहे. पण आपण कोण? आणि एवढे प्रश्न का विचारता आहात. तुम्ही लग्नाला आला आहात का?” – सुभाष.

“हे जे कोणी विश्राम गोखले आहेत, यांना बोलावता का बाहेर?” – अविनाश म्हणाला, सुभाषच्या देहबोली वरून अविनाशने ओळखलं की तो कार्यकर्ता आहे म्हणून.

“ते आत्ता गडबडीत आहेत. तुम्ही मला सांगा, काय काम आहे तुमचं?” – सुभाष.

“हा तर विनायकराव गोखल्यांचा वाडा आहे. या विश्राम गोखल्यांनी वाडा विकत घेतला आहे का? – अविनाश.

“नाही, हा वाडा विनायकराव गोखल्यांचाच आहे. पण आता ते नाहीयेत. पण तुम्ही ही  सगळी चौकशी का करता आहात? कोण आहात तुम्ही?” – सुभाष.

“हे बघा तुम्ही त्यांना बोलवा. मी त्यांच्याशीच बोलेन.” – अविनाश ठामपणे म्हणाला. त्याला हा काय प्रकार आहे तेच कळत नव्हतं. तो विश्राम गोखल्यांना ओळखत नव्हता. आधीच प्रवासातून आला होता, आणि वरतून हा गोंधळ, त्याची चीड चीड होत होती.

“अविनाश शांत हो. या वाद विवादात पडण्यापेक्षा तू सारंग वकिलांना फोन कर. सर्वच गोष्टी स्पष्ट होतील.” – सलमा.  

अविनाशचं आणि सारंग वकिलांचं नाव ऐकल्यावर मात्र सुभाष घाबरला. या माणसा बरोबर वाद घालण्यात काही अर्थ नाहीये, हे त्याला कळलं आणि तो घाई घाईने विश्रामला बोलवायला आत गेला. जातांना अविनाशला इथेच थांबा असं सांगून गेला.

“अविनाश तू ओळखत नाही का या विश्राम गोखल्यांना?” – सलमा.

“नाही. मला तेच बघायचं आहे की आमच्या वाड्यात विश्राम गोखल्यांच्या मुलांचं लग्न कसं काय? ज्यांचं नावही मी कधी ऐकलं नाही.” – अविनाश.

सुभाष आत मधे जाऊन विश्रामला शोधत होता, मांडवात खुर्च्या टाकून बरेच गप्पा मारत होते.

“काय रे कोणाला शोधतो आहेस?” व्यंकटेशने विचारलं.

“विश्राम काकांना शोधतो आहे, बाहेर कोणी अनोळखी पाहुणे आले आहेत, खूप प्रश्न विचारत आहेत. मी सांगीतलं त्यांना की विश्राम गोखल्यांच्या मुलांचं लग्न आहे म्हणून, तर म्हणाले की “विश्रामला बाहेर बोलवा. मी त्यांच्याशीच बोलेन.” म्हणून विश्राम काकांना शोधतो आहे.” – सुभाष.

“असं? चल मी बघतो कोण आहे ते.” – व्यंकटेश.

त्या घोळक्यात लक्ष्मण पण होता, तो म्हणाला,

“काका थांबा, मीच बघतो तुम्ही बसा आरामात.” – लक्ष्मण

लक्ष्मण बाहेर आला त्याला अविनाश, आणि एक अतिशय देखणी स्त्री सलमा,  सामाना सकट उभे असलेले दिसले.

“नमस्कार. मी लक्ष्मण गोखले, आपण कोणाला भेटायला आला आहात?” – लक्ष्मण

“मी कोणाला भेटायला आलो? हे काय गौड बंगाल आहे? लक्ष्मणराव, तुमच्या घरात तुम्ही कोणाला भेटायला जाता?” – अविनाश.

“हे विनायकरावांचे घर आहे, व्यंकटेश चे घर आहे, सौमित्राचे घर आहे. तुम्ही म्हणता हे तुमचं घर आहे, कसं? ...” – लक्ष्मण बोलता बोलता थांबला. त्याने अविनाशचा फोटो पाहिला होता. अविनाशच्या चेहरे पट्टीत काही फरक झाला नव्हता. जसं निशांतने लगेच ओळखलं तसंच लक्ष्मणच्या पण ध्यानात आलं की हे अविनाशकाका  म्हणून.

तो एकदम उत्तेजित स्वरात बोलला,

“तुम्ही अविनाश काका आहात आणि तुम्ही सलमा काकू, होय ना?”

“तुम्ही आम्हाला ओळखता?” अविनाश म्हणाला. आता आश्चर्य करायची पाळी अविनाश आणि सलमाची होती.

सुभाषने लक्ष्मणचं  बोलणं ऐकलं आणि त्याच्या हाता पायातलं त्राणच गेलं. लक्ष्मणने ओळखलं म्हणजे ‘मी जेंव्हा क्लेम सादर करत होतो तेंव्हा या लोकांना अविनाश बद्दल सगळी माहिती होती.’ तो सॉलिड घाबरला.

“सुभाष, रिक्शाचं भांडण देऊन टाक आणि हे सामान घेऊन आत ये.” लक्ष्मणने सुभाषला सांगीतलं, आणि तो अविनाश आणि सलमाला म्हणाला,

“चला चला आत चला. तुम्ही अगदी प्रॉपर वेळेवर आला आहात. गोखल्यांची चार लग्नं आहेत. या. या.” लक्ष्मण म्हणाला.

मांडवात शिरल्या, शिरल्या, त्याने आरोळी ठोकली. “सर्प्राइज.”

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com