तोतया वारसदार (पर्व २ रे) भाग १४

“याची कर्नल राहेजा यांनी पुष्टी केली आहे. त्या वेळेच्या डायरी मधे त्यांनी नमूद करून ठेवलं आहे ??

 तोतया वारसदार

पात्र रचना

सारंग         - वकील,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

डॉ प्रशांत       - डॉक्टर,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

किरीट         - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

निशांत        - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. शोधकर्ता

नयना         - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर  

महादेवराव      - घराण्याचा मूळ पुरुष.

सखारामपंत     - महादेवराव – सखारामपंत. वेळणेश्वरला स्थायिक

विश्वनाथ       - महादेवराव – विश्वनाथ. गोकर्ण महाबळवेश्वरला स्थायिक.

कौशिक        - महादेवराव – कौशिक – समुद्रात बुडून मेला.

दिनकर       - महादेवराव - - दिनकर साताऱ्याला गेला तिथून पुणे आणि तिथून

               कानपूरला गेला

चंद्रकांत गोखले                - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर

उज्ज्वला                    - चंद्रकांत गोखल्यांची बायको.

विश्वास                     - चंद्रकांत गोखल्यांचा मुलगा अमेरिका.

स्वानंदी                     - विश्वास ची बायको.

सुनील                      - चंद्रकांत गोखल्यांचा धाकटा मुलगा अमेरिका.

नर्मदा आणि गोदावरी – महादेवरावांच्या मुली, लग्न होऊन चिपळूण आणि नंतर

पुण्यास स्थलांतर पण पुण्याच्या प्लेग मधे दोन्ही कुटुंबाची संपूर्ण वाताहत झाली.

रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला

स्थायिक

रेवती          सखाराम पंतांची मुलगी हरिहर साने यांच्याशी लग्नं करून सांगलीला

स्थलांतर.

अक्षय साने     - महादेवराव – सखाराम – रेवती -अक्षय

सहावी  पिढी. सुरतला स्थायिक.

अंबिका        सखाराम पंतांची मुलगी  अकाली मृत्यू.

कावेरी         रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न

श्रीरंग         कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या  वेळेस सैन्यात गेला.

सीता, सरिता जान्हवी    – श्रीरंग च्या मुली.

शंकरन               - श्रीरंगचा दुसऱ्या बायको पासून झालेला मुलगा.

विनायक       भास्कर चा मुलगा वसंत त्याचा मुलगा विनायक

व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.

जय           व्यंकटेशचा मुलगा.

रोहन          - सौमित्रचा मुलगा

लक्ष्मण आणि वर्षा      - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी.

  गोकर्णला स्थायिक.

वसुधाबाई             - लक्ष्मणची आई.

विश्राम आणि अनिल           - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -गंगाधर –

सहावी पिढी.

  साताऱ्याला  स्थायिक.

दिनेश आणि प्रांजल            - विश्रामची मुलं. सातारा

विनय                       - अनिलचा मुलगा सातारा.

विश्वंभर                     - महादेव – विश्वनाथ- ओंकार- विश्वंभर.

माधव                      - विश्वंभर – राजाराम – माधव. तंजावरला

 स्थायिक

वसुंधरा                      - माधवची बायको.

चिन्मय आणि विवेक           - माधव ची मुलं.

हेमांगी                      - चिन्मयची बायको. 

कावेरी                      - महादेव – विश्वनाथ- कावेरी. विश्वास परांजपे शी लग्न.

वसंतराव परांजपे                     कावेरी परांजप्यांचे आताचे वंशज

प्रभावती                            वसंतरावांच्या पत्नी

त्र्यंबक                             वसंतरावांचे काका.

गोविंद                             वसंतरावांचा धाकटा भाऊ.

श्रीकांत आणि विक्रम            -वसंतरावांची मुलं. अमेरिकेत असतात. 

सुधाकर गोखले         निशांतला कानपूरला भेटलेले पहिले गोखले.

विशाखा               सुधाकररावांची बायको.

बबन                 - सारंग सरांचा चपराशी

सुभाष गोखले          -बबनचा मित्र. कटातला भागीदार. तोतया वारसदार

अविनाशराव           - निशांतचे वडील.

जयश्री                - निशांतची आई.

भाग  १४          

भाग १३   वरुन पुढे वाचा .......

“बापरे, म्हणजे आता आम्ही एजंट आहोत, असं गृहीत धरून आमची चौकशी होणार का? सिनेमात दाखवतात, तसं आम्हाला खुर्चीला बांधून मारपीट करतील का?”– सलमा.

“नाही, नाही असं काही होणार नाही. नेहमी प्रमाणेच तुमची चौकशी होईल. तेच प्रश्न पुन्हा विचारल्या जातील इतकंच. तुम्ही कुठलाही अपराध केला नाहीये, तेंव्हा घाबरण्याचं काही कारण नाहीये. चिंता करू नका.” सारंग सर म्हणाले, तरी सुद्धा दोघांच्याही चेहऱ्यांवर चिंता स्पष्ट दिसत होती.

हे लोकं नागपूरला  आल्यावर आठवडा भराने आर्मी ऑफिसने सात तज्ञ लोकांची  एक कमिटी तयार केली. कमिटीची दिल्लीला आर्मी ऑफिस मधे मीटिंग भरली होती. मिटिंगला एक मानसोपचार तज्ञ, एक पॅथॉलॉंजिस्ट, एक रेडियोलॉंजिस्ट, एक मेडीसीन एक्स्पर्ट, एक सर्जन, एक आर्मी ऑफिसर आणि एक आयबी मधला अधिकारी, असे सगळे हजर होते. विषय होता अविनाश आणि सलमा.

“आपल्या समोर आता सर्वच रीपोर्ट आहेत. त्याचा अभ्यास केल्यावर काय निष्कर्ष निघाले आहेत?” – आर्मी ऑफिसर.

दोघांचेही MRI आणि सीटी स्कॅन अगदी क्लियर आहेत. कुठेही फॉरीन बॉडी असल्याचं दिसत नाहीये. बऱ्याच उंचीवरुन अविनाश पडला होता, खरं तर मल्टीपल फ्रॅक्चर नक्कीच असतील, पण कुठेही ऑपरेशनच्या खुणा नाहीयेत.” – रेडियोलॉंजिस्ट

सर्जनने पण त्यांच्या मताला दुजोरा दिला.

“दोघांचे ही पॅथॉलॉंजी रीपोर्ट नॉर्मल आहेत. कुठल्याही प्रकारचं डोपिंग झाल्याचं आढळलं  नाही.” – पॅथॉलॉंजिस्ट

“ब्रेन वॉश करण्यासाठी जी औषधं देतात, तसं पॅथॉलॉंजी रीपोर्ट पाहिल्यावर काहीच आढळलं नाही. ही माणसं क्लीन आहेत.” – मेडीसीन एक्स्पर्ट.

यावर थोडा वेळ चर्चा होऊन निष्कर्ष असा निघाला की अविनाश आणि सलमा क्लिनिकली क्लीन आहेत. आता मानसोपचार तज्ञांचा आणि आयबी चा रीपोर्ट आला की पुढच्या कार्यवाही साठी सरकार कडे पाठवून देता येईल.  

मग पुढच्या आठवड्यात चौकशीला या असे पत्र अविनाश आणि सलमाला पाठवल्या गेलं.

“निशांत, तू आमच्या बरोबर दिल्लीला येतोस का? तू बरोबर असला की मला धीर येतो.” – सलमा.

“अग त्याला कशाला त्रास देते आहेस? मी आहेच ना.” – अविनाश.

“तू जेंव्हा चौकशी साठी आत जातोस, तेंव्हा माझा जीव टांगणीला लागतो, तेंव्हा जर निशांत बरोबर असेल, तर अस्वस्थता जरा कमी होते. निशांत तू चलच.” – सलमा.

शेवटी, तिघंही दिल्लीला निघाले.

दिल्लीला आर्मी ऑफिस मधे सलमा आणि निशांत बाहेर बसले होते. अविनाश आत होता. समोर यावेळेस आर्मी ऑफिसर बरोबर आयबी चा अधिकारी आणि मानसोपचार तज्ञ बसले होते.  

“तुमच्या ट्रूप चा कमांडर कोण होता?” – अधिकारी.

“कर्नल राहेजा.” – अविनाश.

“जेंव्हा असा ड्रॉप असतो, त्यावेळी हवामानाची संपूर्ण माहिती घेतलेली असते, आणि त्यानुसारच केंव्हा ड्रॉप करायचं हे ठरतं. तुम्हाला जेंव्हा ड्रॉप केलं तेंव्हा हवामान उत्तम होतं असा रीपोर्ट होता, सर्व जण सुरक्षित उतरले, पण तुम्हीच एकटे कसे काय भरकटले?” – अधिकारी.

“आधी सर्वांना ड्रॉप केलं, शेवटी मी आणि माझ्या मागे कर्नल सर होते, तो पर्यन्त हवा चांगली होती. मी उडी मारल्या नंतर सुद्धा हवा चांगली होती,  मी वळून पाहिलं तेंव्हा मला कर्नल साहेब पण हवेत दिसले होते, पण नंतर काय झालं ते कळलंच नाही, अचानक सोसाट्याचा वारा आला, आणि मी वाऱ्या बरोबर भरकटत गेलो.” – अविनाश.

“पण तुमच्या मागून कर्नल साहेबानी सुद्धा जंप केलं होतं आणि ते मात्र ठरलेल्या जागी उतरले. यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे?” – अधिकारी.

“माझ्या जवळ पॅरॅशूटचा कंट्रोल होता, पण हवेचा नव्हता. माझा काहीच इलाज चालत नव्हता, आणि शेवटी तर पॅरॅशूटच फाटलं.” – अविनाश.

“याची कर्नल राहेजा यांनी पुष्टी केली आहे. त्या वेळेच्या डायरी मधे त्यांनी नमूद करून ठेवलं आहे की अचानक वारा सुटला आणि अविनाशचं पॅरॅशूट पाहता, पाहता लांबवर गेलं आणि दिसेनासं झालं म्हणून.” – आर्मी ऑफिसर.

“दुर्गादास, नारायण स्वामी आणि प्रकाश तुमचे सहकारी होते?” – अधिकारी

“हो.” – अविनाश.

“मग निशांतने  जेंव्हा त्यांची नावं सांगितली, आणि फोटो दाखवले, तेंव्हा तुम्ही ओळख का नाकारली?” – अधिकारी.

“त्या वेळेस मला काहीच आठवत नव्हतं. त्यामुळे मी ओळख नाकारली, पण त्यानंतरच  हळू हळू माझी स्मृति परत यायला लागली. आणि आता सगळं आठवतंय. ” – अविनाश.

अधिकाऱ्याने मानसोपचार तज्ञांकडे पाहून प्रश्नार्थक मुद्रा केली. त्यावर त्याने फक्त त्या दोघांनाच ऐकू जाईल, एवढ्या हलक्या आवाजात म्हंटलं,

“तसं खरं बोलतो आहे. पण काही तरी खटकतंय, खोटं बोलत नाहीये, पण पाठ केल्या सारखं वाटतंय. पण फारसं गंभीर वाटत नाही, पुढचा प्रश्न विचारा.”– मानसोपचार तज्ञ

“तुम्हाला बंगाली येतं?” – अधिकारी.

“आता इतके वर्ष तिथे राहिल्यावर येणारच न. पण फक्त बोलता येतं आणि थोडं थोडं वाचता येतं.” – अविनाश.

“हकीम चाचांना इंग्लीश किंवा हिन्दी येत होतं?” – अधिकारी.

“इंग्लीश नाही. हिन्दी येत होतं.” – अविनाश.

“बंगाली लोकांना इतकं चांगलं हिन्दी बोलता येत नाही, मग “हकीम चाचांना कसं काय येत होतं?” – अधिकारी

“ते नावाजलेले हकीम होते. बऱ्याच लोकांशी त्यांचा संबंध यायचा, म्हणून.” – अविनाश.

“हकीम चाचांच्या घरी असतांना शुद्धीवर आल्यावर तुम्ही आपसात कोणच्या भाषेत संपर्क करत होता?” – अधिकारी.

“हिन्दी मधे.” – अविनाश.

“का तुम्हाला तर बंगाली येते. आत्ताच तसं म्हणालात तुम्ही.” – अधिकारी.

“त्यावेळेस मला बंगाली भाषेचा गंध पण नव्हता. ती नंतर इतक्या वर्षात हळू हळू यायला लागली.” – अविनाश.

“साधारण किती वर्ष लागली तुम्हाला बंगाली शिकायला?” – अधिकारी.

“तसं काही सांगता येणार नाही. पण बऱ्यापैकी संभाषण करण्या साठी दोन वर्ष तरी लागली असावीत.” – अविनाश.

आर्मी ऑफिसरने पांच सहा फोटो समोर ठेवले  आणि विचारलं,

“हे कोणाचे फोटो आहेत?”

“हा दुर्गादास, हा परेरा, हा प्रकाश आणि हा नारायण स्वामी बाकी दोघं आमच्याच यूनिट मधे होते, पण त्यांची नावं आठवत नाहीयेत.” – अविनाश.

“तुम्हाला काय टास्क दिलं होतं?” – ऑफिसर.

“पॅरॅशूट गोळा करून कोणाला दिसणार नाही अश्या ठिकाणी लपवून ठेवायचं, मग सर्वांनी एका ठरलेल्या जागी जमायचं. त्या परिसरात पाकिस्तानी फौजेचा खूप वावर होता, म्हणून दूसरा दिवस लपून बसायचं आणि रात्री मुक्ती बाहिनीला जाऊन मिळायचं. नंतर काय करायचं यांच्या सूचना कर्नल सरांना होत्या.” – अविनाश.

तुम्हाला एकतरपूरच्या जंगलात उतरायचं होतं पण तुम्ही भलतीकडेच कोसळला, ती जागा कोणची?” – अधिकारी.

“कुल्लापारच्या जवळच्या जंगलात पडलो असणार कारण हकीम चाचा कुल्लापार ला रहात होते.” – अविनाश.

“कुल्लापार आणि एकतरपूर मधलं अंतर ४० किलोमीटर आहे, तुमचं पॅरॅशूट इतके किलोमीटर दूर भरकटत गेलं आणि नंतर फाटलं?” – अधिकारी.

“ज्या वेळेस पॅरॅशूट भरकटत गेलं, तेंव्हा रात्रीच्या गडद अंधारात, आणि अनोळखी परिसरात, दिशा आणि गती दोन्ही कळणं अशक्य होतं.” – अविनाश.

“तुमचे हकीम चाचा कुल्लापार मधले नामांकित हकीम होते, मग एकतरपूरला स्थलांतर करण्याचं काय कारण होतं?” –अधिकारी.

“स्थलांतर आम्ही केलं.  चाचा ७८ सालीच गेले. आम्ही एकतरपूर ला ८२ साली आलो. तिथे माझा व्यवसाय अजून वाढला.” – अविनाश. 

“ओके, मिस्टर अविनाश, आता तुम्ही बाहेर बसा आणि सलमा मॅडमला  १० मिनिटांनी आत पाठवून द्या.” – आर्मी ऑफिसर.

अविनाश गेल्यावर आर्मी ऑफिसर ने बाकी दोघांना विचारले,” काय ओपिनियन आहे?”

“क्लियर. नो प्रॉब्लेम.” – आयबी अधिकाऱ्याचं उत्तर.

“माघाशीच म्हंटलं की एका ठिकाणी तो पाठ करून उत्तर दिल्या सारखं वाटलं. बाकी सर्व ठीक आहे. सिरियस असं काही नाही. क्लियर.’ - मानसोपचार तज्ञ

“या सलमा मॅडम बसा. सवाल जवाब शूरु करे?” – आर्मी ऑफिसर.

सलमाने मान हलवून होकार दिला. समोर आयबी चा अधिकारी बसला हे पाहून, तिच्यावर खूप दडपण आलं होतं.

“तुमचे आणि अविनाशचे संबंध कसे आहेत?” – अधिकारी.

“म्हणजे? मला समजलं नाही.” – सलमा.

“तुमच्यावर  भारतात येण्याची जबरदस्ती केली आहे का?” – आधिकारी.

“नाही. भारतात येण्याची आयडिया माझीच होती. मलाच तिथे राहायचं नव्हतं.”- सलमा

“का? तो तर तुमचा देश आहे. तुमचं जन्मच तिथला, मग असं काय घडलं की तुम्हाला तुमचाच देश सोडावासा वाटला?” – अधिकारी

“अविनाशला जसं जसं आठवायला लागलं, तशी माझी भीती वाढत गेली, खूप असुरक्षित वाटायला लागलं.” – सलमा.

“आम्हाला आमच्या देशात कधीच भीती वाटली नाही. तुम्हाला का वाटली?” – अधिकारी.

“साहेब, तो इस्लामी देश आहे. अविनाश भारताचा आर्मी ऑफिसर आणि वरतून हिंदू. लोकांची काय प्रतिक्रिया असेल हे कळणं शक्य नव्हतं. त्याही पेक्षा एक मुस्लिम मुलगी हिंदू माणसाशी लग्न करते ही गोष्ट कदाचित लोकांच्या पचनी  पडली नसती. आम्ही खूप टेंशन मधे होतो. म्हणून शेवटी मी भारतात येण्याचा निर्णय घेतला.” – सलमा.

“तुमचे आणि अविनाशचे संबंध कसे आहेत?” – अधिकारी.

“आत्ताच तर सांगितलं” – सलमा.

“नाही तुम्ही म्हणालात की तुम्हाला समजलं नाही. आता समजलं असेल तर सांगा तुमचे संबंध कसे आहेत” – अधिकारी म्हणाला. त्याचा स्वर थोडा रुक्ष झाला होता. सलमा थोडी बावचळली पण सारंग सरांनी सांगितलं होतं, की प्रश्न विचारणारा आवाजात असे निरनिराळे चढ उतार मुद्दाम करतात म्हणून. त्याकडे लक्ष न देता, आपण आपल्या भूमिकेवर ठाम राहायचं आहे.

“खूपच चांगले आहेत. अविनाशचा स्वभाव खूप शांत आणि चांगला आहे.” – सलमा.

“जर संबंध चांगले आहेत, तर भारतात येण्या सारखा एवढा मोठा निर्णय तुम्ही अविनाश पासून लपवून का ठेवला? अविनाशची इच्छा नव्हती का?” – अधिकारी.

सलमा गप्प बसली. ती विचार करत होती की नेमकं काय उत्तर दिलं तर या लोकांचं समाधान होईल म्हणून.

“मी प्रश्न विचारला आहे. आणि सलमा मॅडम बोला.”– यावेळेस आवाजात अजून रुक्ष पणा आणत अधिकारी बोलला.

“अविनाश व्यावसायिक आहे. त्याच्या संपर्कात अनेक माणसं येतात. त्यांच्याशी बोलता, बोलता जर अनावधानाने त्यांच्या बोलण्यात याविषयी जर काही आलं असतं तर प्रॉब्लेम झाला असता. म्हणून  मी माझ्या मनात काय आहे ते सांगितलं नाही.” – सलमा.

“पासपोर्ट कशाला काढायचा असं त्याने विचारलं नाही का?” – अधिकारी.  

  

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com