तोतया वारसदार (पर्व २ रे ) भाग २

नयनानी काही सांगितल्यावर विनय विरोध करेल ही शक्यता सध्या तरी नव्हती. तसंही नयनाच्या कुशाग्र ब?

 तोतया वारसदार पर्व २ रे

पात्र रचना

सारंग         - वकील,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

डॉ प्रशांत       - डॉक्टर,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

किरीट         - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

निशांत        - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. शोधकर्ता

नयना         - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर  

महादेवराव      - घराण्याचा मूळ पुरुष.

सखारामपंत     - महादेवराव – सखारामपंत. वेळणेश्वरला स्थायिक

विश्वनाथ       - महादेवराव – विश्वनाथ. गोकर्ण महाबळवेश्वरला स्थायिक.

कौशिक        - महादेवराव – कौशिक – समुद्रात बुडून मेला.

दिनकर       - महादेवराव - - दिनकर साताऱ्याला गेला तिथून पुणे आणि तिथून

               कानपूरला गेला

चंद्रकांत गोखले                - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर

उज्ज्वला                    - चंद्रकांत गोखल्यांची बायको.

विश्वास                     - चंद्रकांत गोखल्यांचा मुलगा अमेरिका.

स्वानंदी                     - विश्वास ची बायको.

सुनील                      - चंद्रकांत गोखल्यांचा धाकटा मुलगा अमेरिका.

नर्मदा आणि गोदावरी – महादेवरावांच्या मुली, लग्न होऊन चिपळूण आणि नंतर

पुण्यास स्थलांतर पण पुण्याच्या प्लेग मधे दोन्ही कुटुंबाची संपूर्ण वाताहत झाली.

रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला

स्थायिक

रेवती          सखाराम पंतांची मुलगी हरिहर साने यांच्याशी लग्नं करून सांगलीला

स्थलांतर.

अक्षय साने     - महादेवराव – सखाराम – रेवती -अक्षय

सहावी  पिढी. सुरतला स्थायिक.

अंबिका        सखाराम पंतांची मुलगी  अकाली मृत्यू.

कावेरी         रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न

श्रीरंग         कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या  वेळेस सैन्यात गेला.

सीता, सरिता जान्हवी    – श्रीरंग च्या मुली.

शंकरन               - श्रीरंगचा दुसऱ्या बायको पासून झालेला मुलगा.

विनायक       भास्कर चा मुलगा वसंत त्याचा मुलगा विनायक

व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.

जय           व्यंकटेशचा मुलगा.

रोहन          - सौमित्रचा मुलगा

लक्ष्मण आणि वर्षा      - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी.

  गोकर्णला स्थायिक.

वसुधाबाई             - लक्ष्मणची आई.

विश्राम आणि अनिल           - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -गंगाधर –

सहावी पिढी.

  साताऱ्याला  स्थायिक.

दिनेश आणि प्रांजल            - विश्रामची मुलं. सातारा

विनय                       - अनिलचा मुलगा सातारा.

विश्वंभर                     - महादेव – विश्वनाथ- ओंकार- विश्वंभर.

माधव                      - विश्वंभर – राजाराम – माधव. तंजावरला

 स्थायिक

वसुंधरा                      - माधवची बायको.

चिन्मय आणि विवेक           - माधव ची मुलं.

हेमांगी                      - चिन्मयची बायको. 

कावेरी                      - महादेव – विश्वनाथ- कावेरी. विश्वास परांजपे शी लग्न.

वसंतराव परांजपे                     कावेरी परांजप्यांचे आताचे वंशज

प्रभावती                            वसंतरावांच्या पत्नी

त्र्यंबक                             वसंतरावांचे काका.

गोविंद                             वसंतरावांचा धाकटा भाऊ.

श्रीकांत आणि विक्रम            -वसंतरावांची मुलं. अमेरिकेत असतात. 

सुधाकर गोखले         निशांतला कानपूरला भेटलेले पहिले गोखले.

विशाखा               सुधाकररावांची बायको.

बबन                 - सारंग सरांचा चपराशी

सुभाष गोखले          -बबनचा मित्र. कटातला भागीदार. तोतया वारसदार

अविनाशराव           - निशांतचे वडील.

जयश्री                - निशांतची आई.

भाग  २  

भाग १  वरुन पुढे वाचा .......   

  

“अरे, एवढे लोकं येणार आहेत तर त्यांची नीट व्यवस्था व्हायला पाहिजे. आपलं घर काही इतकं मोठं नाहीये, त्यांची गैरसोय व्हायला नको. मोठी माणसं आहेत बाबा ती. आणि, सगळे कसे काय येत आहेत? काही खास? काही असेल, तर सांग बाबा, म्हणजे तशी तयारी करायला बरं.” – आई.

“तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यासाठीच आम्ही आधी आलो आहोत. त्यांना सर्वांना अंबादेवीच्या दर्शनाला यायचं आहे. अजून एक गोष्ट, त्यांना आपलं शेत आणि संत्र्याची बाग बघायची आहे. आणि तुमच्याशी पण काही बोलायचं आहे.” – निशांत.

“माझ्याशी काय काम आहे बुवा त्यांचं?” – बाबा.

“साताऱ्याचे गोखले म्हणजे विश्राम गोखले आणि अनिल गोखले. त्यांना आपली नयना आवडली आहे. अनिल गोखल्यांचा मुलगा विनय साठी ते नयनाला मागणी घालणार आहेत. त्यासाठी येत आहेत.” निशांत.

“काय करतात हे अनिल गोखले?” – बाबा.

मग निशांतने सर्वच गोखल्यांची कुंडली विस्ताराने  सांगितली. सर्व ऐकल्यावर अविनाश रावांनी समाधानाने मान डोलावली.

“निशांत, ही गोखले मंडळी कशी आहेत? विनयचा स्वभाव कसा आहे?” – बाबा.

“बाबा सर्वच गोखले म्हणजे १०० नंबरी सोनं आहे. ते उद्या आल्यावर तुम्हाला कळेलच. तुम्ही आजिबात काळजी करू नका.” – निशांत.

“नयना, तुला पसंत आहे का? तुझं काय मत आहे?” – आई.

नयना सारखी बोल्ड मुलगी सुद्धा हा प्रश्न ऐकल्यावर लाजली, तिला काही स्पष्ट उत्तर देता आलं नाही, तिने नुसतीच मान डोलावली आणि किचन मधे पळून गेली. पांच मिनिटांनी ती सर्वांसाठी सरबत घेऊन आली तेंव्हा तिचा चेहराच सांगत होता की तिचा होकार आहे म्हणून.

दुसऱ्या दिवशी सर्व गोखले मंडळींना घेऊन बस आली. दिवसभराचं कॉंट्रॅक्ट दिलं होतं त्यामुळे कसलाच प्रश्न नव्हता. चहा नाश्ता झाल्यावर निशांतने आई बाबांशी सगळ्यांची ओळख करून दिली. मग व्यंकटेश बोलायला उठला.

“अविनाशराव निशांतने तुम्हाला कल्पना दिली असेलच. मी मोठा म्हणून बोलतो आहे. माझा चुलत भाऊ अनिल गोखले यांची तुमच्या नयनाला सून करून घ्यायची इच्छा आहे. आम्हा सर्व गोखले मंडळींचा याला पूर्ण पाठिंबा आहे. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही होकार द्यावा.” – व्यंकटेश.

अविनाशरावांनी जयश्रीबाईंकडे पाहीलं, त्यांनी मान डोलावली. तसं या विषयावर कालच सर्व चर्चा झाली होती. त्यामुळे निशांतच्या बाबांनी संमती दिली. मग थोडावेळ याच विषयावर चर्चा झाली. मग पुन्हा व्यंकटेश उभा राहिला. अविनाशराव त्यांच्या कडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते, की आता अजून काय सांगणार आहे म्हणून.

“अविनाशराव, माझी पुतणी, वसुधा वहिनींची मुलगी आणि लक्ष्मणची बहीण वर्षा, हिच्यासाठी मी तुमच्या निशांतचा हात मागतो आहे. त्याला पण तुम्ही संमती द्यावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे.”

हे नवीनच होतं. यांची काहीच कल्पना निशांत आणि नयनाने दिली नव्हती. अविनाशराव जरा गोंधळून गेले. म्हणाले,

“आत्ताच सर्वांशी ओळख झाल्यामुळे एकदम लक्षात येत नाहीये, कोणाची मुलगी आणि कोणाची बहीण? व्यंकटेश राव, पुन्हा एकदा ओळख करून द्याल का?”

“हो, हो.” व्यंकटेश म्हणाला. त्याने वसुधा बाई, लक्ष्मण आणि वर्षाला समोर बसायला सांगीतलं. त्यांनी खुर्च्या समोर ओढून घेतल्या. “ ह्या वसुधा वहिनी, माझा चुलत भाऊ वासुदेव यांची पत्नी. वासुदेवाचं मागच्या वर्षी निधन झालं. हा लक्ष्मण वसुधा वहिनीचा मुलगा. तुम्हाला गोकर्ण महाबळेश्वर या जागृत देवस्थाना बद्दल माहीत असेलच. लक्ष्मण गोकर्णच्या मंदिरात पौरोहित्य करतो. हे त्यांच्याकडे पिढीजाद चालत आलेलं आसन आहे. वर्षा ही वसुधा वहिनींची मुलगी. कारवारच्या कॉलेज मधून B.Com. झाली आहे. वर्षा आणि निशांतची ओळख आत्ताचीच म्हणजे गोखल्यांच्या वारसदारांचा शोध घेता घेता निशांत गोकर्णला पोचला तेंव्हा गोखल्यांच्या बरोबरच त्याला वर्षांचाही शोध लागला. या दोघांनी कधी सांगीतलं नाही, पण सर्वांच्या केंव्हाच लक्षात आलं होतं की हे दोघं एकमेकांत गुंतले आहेत म्हणून. निशांतची कुशाग्र बुद्धी आम्ही सर्वांनी अनुभवलीच आहे. आम्ही सर्वांनी एकत्र येणं हे त्याच्याच कामगिरीचं फळ आहे. आमची वर्षा गुणी पोर आहे. धार्मिक संस्कारात वाढल्यामुळे तिच्यावर उत्तम संस्कार झाले आहेत, हे वेगळे सांगायला नकोच. आता तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा आणि खात्री करून घ्या.” व्यंकटेशने एक दीर्घ भाषण दिलं.

वर्षांच्या चेहऱ्यावर दक्षिणेची झाक असली तरी, गोरी, घारी नाकी डोळी नीटस वर्षा जयश्रीबाईंना आवडली. निशांतचीच पसंती असल्याने, उगाच दोन चार प्रश्न रितीला धरून त्यांनी विचारले आणि संमती देऊन टाकली. अविनाशरावांचा प्रश्नच नव्हता. एकदा जयश्रीबाईंनी पसंती दिल्यावर त्यांनी पण लगेच होकार भरला. दोन्ही लग्न गोखले कुटुंबातच होणार होते आणि अख्ख गोखले कुटुंब उपस्थित होतं. ठरवा ठरविचा आणि देण्या घेण्याचा काही प्रश्नच नव्हता. दोन दिवसांनी साखरपुडा करायचं ठरलं. मग व्यंकटेशने रोहन आणि शलाकाच्या लग्नाची पण बातमी दिली. जेवणं झाल्यावर सर्वांना अविनाशराव शेत दाखवायला घेऊन गेले. रात्री जेवणं झाल्यावर सर्व गोखले मंडळी नागपूरला परतली. ठरल्या प्रमाणे, दोन दिवसांनी नागपूरला सर्वांच्या उपस्थितीत तिघांचाही साखरपुडा पार पडला. विनय आणि नयनाचं लग्न साताऱ्याला, निशांत आणि वर्षांचं गोकर्णला आणि रोहन आणि शलाकाचं सुरतला करण्याचं पण ठरलं. तिन्ही लग्नाच्या तारखा जवळ जवळ च्या काढायच्या हे ही ठरलं. ज्यामुळे सर्व गोखले मंडळी सर्वच लग्नाला हजर राहू शकतील.

“सर्व तिन्ही लग्नाचा खर्च आपण सामायिक इस्टेटी च्या मिळकती मधून करू” असा प्रस्ताव सारंग सरांनी मांडला. आणि तो प्रस्ताव पण एकमुखाने मंजूर झाला.

अविनाशराव जयश्रीबाई, निशांत आणि वर्षा, सगळे निशांतच्या फ्लॅट वर राहिले होते.

एक दिवस बोलता बोलता अविनाशराव व्यंकटेशला म्हणाले, जर तुम्ही सर्व लोकं लग्नाला येणारच आहात, तर तिन्ही लग्न नागपूरलाच करूया. म्हणजे सर्वांचीच उस्तवारी वाचेल. आणि लग्न झाल्यावर आपापल्या गावी रीसेप्शन द्यायचं म्हणजे झालं. यावर पूर्ण दिवस चर्चा झाली आणि अविनाशरावांचा हा प्रस्ताव पण पास झाला. सर्वांनी लक्ष्मणाला तारखा काढायला सांगितल्या.

नंतरचे चार दिवस नुसती धमाल चालली होती. एक दिवस नयना विनयला म्हणाली,

“विनय, इतकी मोठी इस्टेट आहे, सारंग सरांनी इतकी वर्ष सांभाळली, यापुढेही त्यांना त्रास देणं मला सयुक्तिक वाटत नाही. त्यांचंही आता वय झालं आहे. आणि एकट्या वर्षाला ही जबाबदारी कदाचित झेपणार नाही, असं मला वाटतं.”

“तुझ्या मनात काय आहे? मला समजेल असं सांग.” – विनय.

“तू जर नागपूरला आलास, आणि ही जबाबदारी घेतलीस, तर  वर्षावरचा ताण कमी होईल. शेती हा विषय तुला नवीन आहे, पण हळू हळू जमेल, तसंही सारंग सरांनी चांगली टीम तयार केली आहे. आणि मी आणि निशांत आहेच तुझ्या मदतीला. आम्ही शेतकरीच आहोत.” – नयना.  

“अग पण आम्ही ज्या प्रोजेक्ट वर काम करत होतो, त्याचं काय?” – विनय.

“ते इथे पण सुरू करता येईल. इथल्या MIDC मधे जागा घेऊन तुला फॅक्टरी टाकता येईल.” – नयना थोडं थांबून पुढे म्हणाली, “हेड ऑफिस सातारा किंवा पुणे ठेवा. तसंही फॅक्टरी आणि ऑफिस वेगवेगळ्या ठिकाणी असतं. त्या निमित्तानी त्यांचंही नागपूरला येणं जाणं होईल.”

नयनानी काही सांगितल्यावर विनय विरोध करेल ही शक्यता सध्या तरी नव्हती. तसंही नयनाच्या कुशाग्र बुद्धीने विनय दिपुन गेला होता. त्याला खूप कौतुक होतं.

“हूं, मी दिनेश आणि बाबांशी आणि काकांशी बोलतो आणि मगच ठरवू.” – विनय.

या विषयावर बरीच चर्चा झाली, शेवटी विनयला होकार मिळाला. मग सारंग, प्रशांत आणि किरीटशी सरांशी चर्चा झाली. त्यांना आनंदच झाला.

“चला, शेती बघण्याचं ओझं उतरलं. विनय, अभिनंदन. अर्थात आम्ही आहोतच. आणि तुला फॅक्टरी टाकण्यासाठी सुद्धा आमचा उपयोग होईल. छान विनय, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.” – किरीट.

सगळी कायदेशीर कार्यवाही पूर्ण झाली. विनय आणि वर्षा या दोघांना ट्रस्टी म्हणून जोडून घेतलं. सुभाषला २ लाख दिले, पण गोविंदा म्हणाला की त्याला जशी जरूर पडेल, तसे तो मागून घेईल. ते ही मान्य झालं.

शेवटी एकदाचं गॅदरिंगचं  सूप वाजलं. सगळ्यांनीच परस्परांचा अश्रुपूर्ण डोळ्यांनी निरोप घेतला. पुढच्या वर्षी लग्नात भेटायचं प्रॉमिस करून सगळे आपापल्या वाटेला लागले.

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com