तोतया वारसदार (पर्व २ रे) भाग १०

मग सलमाने सगळ्यांची नावं आणि पत्ते लिहून दिले. आणि विचारलं, “लिहून दिली आहेत नावं आणि पत्ते, पण

 तोतया वारसदार

पात्र रचना

सारंग         - वकील,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

डॉ प्रशांत       - डॉक्टर,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

किरीट         - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

निशांत        - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. शोधकर्ता

नयना         - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर  

महादेवराव      - घराण्याचा मूळ पुरुष.

सखारामपंत     - महादेवराव – सखारामपंत. वेळणेश्वरला स्थायिक

विश्वनाथ       - महादेवराव – विश्वनाथ. गोकर्ण महाबळवेश्वरला स्थायिक.

कौशिक        - महादेवराव – कौशिक – समुद्रात बुडून मेला.

दिनकर       - महादेवराव - - दिनकर साताऱ्याला गेला तिथून पुणे आणि तिथून

               कानपूरला गेला

चंद्रकांत गोखले                - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर

उज्ज्वला                    - चंद्रकांत गोखल्यांची बायको.

विश्वास                     - चंद्रकांत गोखल्यांचा मुलगा अमेरिका.

स्वानंदी                     - विश्वास ची बायको.

सुनील                      - चंद्रकांत गोखल्यांचा धाकटा मुलगा अमेरिका.

नर्मदा आणि गोदावरी – महादेवरावांच्या मुली, लग्न होऊन चिपळूण आणि नंतर

पुण्यास स्थलांतर पण पुण्याच्या प्लेग मधे दोन्ही कुटुंबाची संपूर्ण वाताहत झाली.

रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला

स्थायिक

रेवती          सखाराम पंतांची मुलगी हरिहर साने यांच्याशी लग्नं करून सांगलीला

स्थलांतर.

अक्षय साने     - महादेवराव – सखाराम – रेवती -अक्षय

सहावी  पिढी. सुरतला स्थायिक.

अंबिका        सखाराम पंतांची मुलगी  अकाली मृत्यू.

कावेरी         रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न

श्रीरंग         कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या  वेळेस सैन्यात गेला.

सीता, सरिता जान्हवी    – श्रीरंग च्या मुली.

शंकरन               - श्रीरंगचा दुसऱ्या बायको पासून झालेला मुलगा.

विनायक       भास्कर चा मुलगा वसंत त्याचा मुलगा विनायक

व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.

जय           व्यंकटेशचा मुलगा.

रोहन          - सौमित्रचा मुलगा

लक्ष्मण आणि वर्षा      - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी.

  गोकर्णला स्थायिक.

वसुधाबाई             - लक्ष्मणची आई.

विश्राम आणि अनिल           - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -गंगाधर –

सहावी पिढी.

  साताऱ्याला  स्थायिक.

दिनेश आणि प्रांजल            - विश्रामची मुलं. सातारा

विनय                       - अनिलचा मुलगा सातारा.

विश्वंभर                     - महादेव – विश्वनाथ- ओंकार- विश्वंभर.

माधव                      - विश्वंभर – राजाराम – माधव. तंजावरला

 स्थायिक

वसुंधरा                      - माधवची बायको.

चिन्मय आणि विवेक           - माधव ची मुलं.

हेमांगी                      - चिन्मयची बायको. 

कावेरी - महादेव – विश्वनाथ- कावेरी. विश्वास परांजपे शी लग्न.

वसंतराव परांजपे                     कावेरी परांजप्यांचे आताचे वंशज

प्रभावती                            वसंतरावांच्या पत्नी

त्र्यंबक                             वसंतरावांचे काका.

गोविंद                             वसंतरावांचा धाकटा भाऊ.

श्रीकांत आणि विक्रम            -वसंतरावांची मुलं. अमेरिकेत असतात. 

सुधाकर गोखले         निशांतला कानपूरला भेटलेले पहिले गोखले.

विशाखा               सुधाकररावांची बायको.

बबन                 - सारंग सरांचा चपराशी

सुभाष गोखले          -बबनचा मित्र. कटातला भागीदार. तोतया वारसदार

अविनाशराव           - निशांतचे वडील.

जयश्री                - निशांतची आई.

भाग  १०      

भाग ९  वरुन पुढे वाचा .......   

  

“सर्वच मित्र मुक्ती बाहिनीला सपोर्ट करणारे होते. सर्वांनी मिळूनच ठरवलं की यांची ओळख उघड होऊ द्यायची नाही म्हणून. कारण त्या वेळी, त्या भागात पाकिस्तानी फौजेचा बराच वावर होता. म्हणून, हा माणूस हकीम चांचांचा दूरचा रिश्तेदार आहे आणि  वाघाच्या हल्ल्यात जखमी झाला आहे असं सगळी कडे पसरवलं. अब्बाजान हकीम असल्याने आमच्या घरात त्याची शुश्रूषा चालू असली तरी कोणाला काही संशय आला नाही.” – सलमा.

“ओके, आपण इथे जरा ब्रेक घेऊया. सलमा चहा पिऊन जरा तू फ्रेश हो. मग आपण पुढे चौकशी सुरू करू.” – धनशेखर.

चहा पिणं झाल्यावर, धनशेखर साहेबांनी विचारलं की,

“ओके, दुसरं सेशन सुरू करायचं?” यावर सलमाने मान हलवून संमती दिली.

“सलमा मॅडम तुम्ही म्हणालात की अविनाशची स्मृति परत आल्यावर भारतात येण्याचा निर्णय तुम्ही घेतला. असं का? भारतातले लाखों लोकं परदेशात स्थायिक झाले आहेत.  तुम्हालाच का भारतात यावसं वाटलं? काय कारण आहे.” – धनशेखर.

“साहेब, अपनी अपनी सोच हैं. कोणाला घरचं जेवण आवडतं तर कोणाला हॉटेलचं. प्रत्येकाची भावना वेगळी असते. याला कुठलंच गणित लावता येणार नाही.” – सलमा.

“धरणीवर आपटल्यामुळे अविनाशची स्मृति गेली, पण काहीही न करता, आपोआप कशी वापस आली? असं काही होत नसतं.” – धनशेखर.

“साहेब, विनायकरावांनी वारसदार शोधायला सांगितल्यामुळे, डिटेक्टिव निशांत शोध घेता, घेता एकतरपूरला पोचला. निरनिराळ्या लोकांच्या तो भेटी घेऊन अविनाश बद्दल काही माहिती मिळते का ते बघत होता. अशातच त्याची आणि सुलतानीची भेट झाली. निशांत डिटेक्टिव आहे, त्याला जाणवलं की हाच अविनाश आहे म्हणून. पण सुलतानीने स्पष्ट पणे ओळख नाकारली. निशांत तर वापस गेला, पण सुलतानीच्या मनात किडा सोडून गेला. माणसाचा मेंदू नेमक्या कुठल्या प्रणालीवर कार्य करतो हे काही मला माहीत नाही, पण त्यानंतरच अविनाशला हळू हळू आठवायला लागलं.” – सलमा.

“तुमच्या सारख्या अतिशय सुंदर मुलीने, ज्याची मेमरी गेली आहे आणि ज्यांच्या आंगावर जखमेच्या अगणित खुणा आहेत, अशा तुमच्या पेक्षा १५ वर्षाने मोठे असलेल्या अविनाशशी लग्न करावं हे जरा विचित्रच आहे. काय कारण आहे?” – धनशेखर.

“काही विशेष नाही, सहवासाने प्रेम फुलतं. आम्ही कितीतरी वर्ष एकमेकांच्या सहवासात होतो, अविनाशचा स्वभाव खूप चांगला आहे. खूप कष्टाळू आहे आणि परिस्थितीला हार जाणारा नाहीये, याच गुणांमुळे मला त्याच्याशी लग्न करावस वाटलं.” – सलमा.

“भारतात येण्याची कल्पना कोणाची? तुमची की अविनाशची? तुमच्यावर जबरदस्ती झाली का?” – धनशेखर.

“अविनाशला तर आम्ही नागपूरला येईपर्यंत काहीच कल्पना नव्हती. सगळं माझ्याच इच्छे नुसार चाललं होतं.” – सलमा.

“तुम्ही निघाले तेंव्हा शेजाऱ्यांना काय सांगून निघालात?” – धनशेखर.

“त्यांना आम्ही अजमेर शरीफ वर चादर चढवायला चाललो आहोत एवढंच माहीत आहे. मला मन्नत पूरी करायची आहे, हेच सांगितलं.” – सलमा.

“आता शेवटचा प्रश्न. तुमचे शेजारी, पाजारी आणि ओळखीचे यांची नावं आणि पत्ते  लिहून द्या.” – धनशेखर.

मग सलमाने  सगळ्यांची नावं आणि पत्ते लिहून दिले. आणि विचारलं,

“लिहून दिली आहेत नावं आणि पत्ते, पण हे कशासाठी?” – सलमा.

“ते आवश्यक असतं. त्याचा उपयोग होईल किंवा नाही हे नाही सांगता येणार. ते मंत्रालयातले अधिकारी ठरवतील.” – धनशेखर म्हणाले.

“ठीक आहे.” – सलमा.

“आणि हो, जर आवश्यक वाटलं तर दिल्लीला तुम्हाला बोलावतील आणि तिथे पण बरीच विचारपूस केली जाईल. तेंव्हा तयारीत रहा. आत्ता मला जे सांगितलं आहे, त्यापेक्षा वेगळं काही सांगितलं तर चौकशीच्या अजून काही फेऱ्या होऊ शकतील. तेंव्हा चांगली तयारी करा. त्या वेळेस तिथे सांभाळून घ्यायला धनशेखर असणार नाही. इतकंच काय, अविनाश सुद्धा असणार नाही.” – धनशेखर.

“साहेब, ही सगळी चौकशी झाल्यावर आम्हाला इथे राहायला मिळेल न?” – सलमा.

“हे बघ सलमा, तुम्ही इथे नागरिकत्व मागता आहात यासाठी काही सबळ  कारण असायला हवं, म्हणजे एखादी नोकरी, किंवा, भारताचा नागरिक असलेल्या माणसाशी लग्न वगैरे, तुमच्या बाबतीत असं काहीच नाहीये. अविनाशची सर्वकष चौकशी झाल्या शिवाय, त्याच्या बद्दल निर्णय होणार नाही. आणि जो पर्यन्त, त्याला क्लीन चिट मिळत नाही, तोपर्यंत तुमच्याही बाबतीत काहीच होणार नाही. वेळ लागणारच आहे. पण धीर सोडू नका, सर्व ठीक होईल.” – धनशेखर.

“धनशेखर साहेब, तुमचा काही तरी अंदाज तर असेलच न?” – विश्राम.

“साहेब, पोलिस व्हेरीफिकेशन ही अगदी प्राथमिक फेरीची चौकशी आहे. याच्यापुढे, वरच्या लेव्हल चे लोकं सूत्र हातात घेतात. ही मंडळी वेगळ्याच दिशेने काम करतात. त्यामुळे मी काही फारसं सांगू शकणार नाही. अविनाशची केस जरा कॉम्प्लिकेटेड आहे. कदाचित, IB किंवा CBI ची सुद्धा चौकशी होऊ शकते.” एवढं बोलून धनशेखर निघाले.

ते गेल्यावर थोड्या वेळाने, सलमाने विचारलं की,

“हे सीबीआय आणि आयबी काय आहे?”

“भावंड आहेत.” – विश्राम.

“भावंड? कोणची भावंड? आणि त्यांचं इथे काय काम?” – सलमा.

“अग तसं नाही. सीबीआय आणि आयबी दोन्ही भारत सरकारचे वरच्या दर्जाचे पोलिस आहेत. सीबीआय गुन्हेगारी विषयक तपास करते आणि आयबी अंतर्गत सुरक्षे संदर्भात चौकशी करते. देशाच्या सुरक्षेला कुठून धोका आहे का याचा तपास करते.” - विश्राम.

“आता आमच्या पासून काय धोका असणार आहे देशाला?” – सलमा.

“तुमच्याकडून धोका आहे किंवा नाही हा प्रश्नच नाहीये, त्यांना तुमच्या पासून काही धोका नाही हे पटलं पाहिजे. ती खात्री पटे पर्यन्त ते चौकशी करत राहतील.”- विश्राम.

“बापरे, मग आता? अविनाश तू काहीच कसं बोलत नाहीयेस” – सलमा.

“तू एवढं टेंशन घेऊ नकोस. आधी आर्मीची इन्व्हेस्टिगेशन टीम माझी चौकशी करणार. त्यात जर मला क्लीन चिट मिळाली, तर तुला काहीच त्रास होणार नाही. आपल्या हातात आता फक्त चौकशीला सामोरं जाण्या शिवाय दूसरा पर्याय नाहीये.” -अविनाश.

दुसऱ्या दिवशी आर्मी ऑफिस मधून फोन आला की लगेच या म्हणून. अविनाश ऑफिस मध्ये गेल्यावर त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले. आणि चार फोटो काढले.

एका आठवड्याने अविनाशला आर्मी ऑफिस मधे पुन्हा बोलावलं पण यावेळेस त्याला एक पत्र दिल. त्याला चार दिवसांनी दिल्लीला आर्मी हेड क्वार्टर मधे चौकशीला हजर राहायचं होतं.

“तुम्ही एकटे जाऊ नका, मी पण येते बरोबर.” – सलमा.

“तू येऊन काय करणार? मी एकटाच जातो. एका दिवसाचा तर प्रश्न आहे.” – अविनाश.

“तरी पण मी येणार. तुला काही केलं तर? आता मला भीती वाटायला लागली आहे. त्या दिवशी धनशेखर कसं बोलत होते ते ऐकलं न?” – सलमा.

“सलमा तू नको, मी जातो यांच्या बरोबर. काळजी करू नकोस.” – विश्राम.

“एवढ्या मोठ्या वाड्यात मी एकटी राहू? माझा तर जिवच जाईल” – सलमा.

“मी निशांतला फोन लावतो, त्याला आणि वर्षाला इथे बोलावून घेतो, मग तुला घाबरण्याचं काहीच कारण नाही.” – विश्राम.

मग विश्रामनी निशांतला फोन  लावला आणि काय परिस्थिती आहे ते सांगितलं आणि नागपूरला येतोस का असं विचारलं. पण तो म्हणाला,

“काका त्या पेक्षा सलमाकांकूच  इथे आल्या तर जास्त बरं होईल, असं मला वाटतं. इथे आई बाबा पण आहेत. आणि चार सहा दिवस वाड्यावर आपण सगळे एकेरच होतो, तेंव्हा चांगली ओळख झालीच आहे.” – निशांत.

“निशांत अरे, वाडा कोणाचाच नव्हता, सगळेच पाहुणे होते, पण आता तुमच्या घरी सलमाने आलेलं तुझ्या आईला चालेल का ते माहीत नाही. म्हणून तुम्हीच आलात तर बरं होईल.” – विश्राम.

“कदाचित तसं असू शकेल, पण मी आईलाच विचारतो. आणि फोन करतो.” – निशांत.

थोड्या वेळाने, निशांतचा फोन आला, म्हणाला,

“आईला काही हरकत नाहीये, मी असं करतो, मी केंव्हा येऊ सलमाकाकुला घ्यायला? तसं सांगा.” – निशांत.

मग दोन दिवसांनी निशांत आला आणि सलमाला अमरावतीला घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी विश्राम आणि अविनाश दिल्लीला गेले.

“बसा. मिस्टर सुलतानी उर्फ अविनाश गोखले, बसा. तुम्हाला कशा करता बोलावलं आहे याची कल्पना आहे?” आर्मी ऑफिसरने विचारले.

टेबलाच्या पलीकडच्या बाजूला  तिघं बसले होते. अविनाश एकटाच होता. विश्राम बाहेर बसला होता.

“यस सर.” – अविनाश.

मधल्या चार दिवसांत सारंग सरांनी अविनाशचा टयूशन क्लास घेतला होता, त्यामुळे अविनाश आता पूर्ण आत्मविश्वासाने  चौकशीला सामोरा जात होता. टयूशन च्या दरम्यान त्याने एकदा सारंग सरांना म्हंटलं की,

“सर तुम्ही येता का माझ्या बरोबर दिल्लीला? जरा मला बळ येईल.” – अविनाश.

“नाही, तू वकिलाला बरोबर घेऊन आला आहेस, हे कळलं तर तुझी केस कमजोर पडण्याची शक्यता आहे. त्यांच्या मनात संशय येऊ शकतो. सामान्य माणसं वकिलाला बरोबर घेऊन फिरत नसतात. तू कुठल्याही कुठल्याही प्रकारे अवांतर बोलू नकोस. जे सत्य आहे, जे खरं आहे आणि आपण उजळणी केली आहे त्या प्रमाणेच बोल.” – सारंग.

“आपण आता चौकशीला सुरवात करतो आहोत. तुमचं प्रत्येक वाक्य लिहून घेतल्या जाणार आहे. हे तुम्हाला मान्य आहे?” – ऑफिसर.

“यस सर. मान्य आहे.” – अविनाश.

“बांग्लादेश मधे तुम्ही काय करता?” – ऑफिसर.

“माझं कपड्याचं  छोटसं दुकान आहे.” – अविनाश.

“तुम्ही तर आता भारतात आला आहात. मग दुकान बंद आहे का?”- ऑफिसर.

“नाही, माझा एक चांगला मित्र आहे तो सध्या सांभाळतो आहे.” – अविनाश.

“तुम्ही जेंव्हा विमानातून उडी मारली तो दिवस कोणचा होता?” – ऑफिसर.

“रविवारची रात्र म्हणजे सोमवारची पहाट होती.” – अविनाश.

“तुमची तर स्मृति गेली होती, मग हे तुम्हाला कसं कळलं?” – ऑफिसर.

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com