तोतया वारसदार (पर्व २ रे) भाग १५

“साधारण पद्धत अशी असते, की १० फालतू, निरुपद्रवी प्रश्न विचारायचे आणि त्यातच मधे एखादा गुगली टा??

 तोतया वारसदार

पात्र रचना

सारंग         - वकील,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

डॉ प्रशांत       - डॉक्टर,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

किरीट         - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

निशांत        - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. शोधकर्ता

नयना         - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर  

महादेवराव      - घराण्याचा मूळ पुरुष.

सखारामपंत     - महादेवराव – सखारामपंत. वेळणेश्वरला स्थायिक

विश्वनाथ       - महादेवराव – विश्वनाथ. गोकर्ण महाबळवेश्वरला स्थायिक.

कौशिक        - महादेवराव – कौशिक – समुद्रात बुडून मेला.

दिनकर       - महादेवराव - - दिनकर साताऱ्याला गेला तिथून पुणे आणि तिथून

               कानपूरला गेला

चंद्रकांत गोखले                - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर

उज्ज्वला                    - चंद्रकांत गोखल्यांची बायको.

विश्वास                     - चंद्रकांत गोखल्यांचा मुलगा अमेरिका.

स्वानंदी                     - विश्वास ची बायको.

सुनील                      - चंद्रकांत गोखल्यांचा धाकटा मुलगा अमेरिका.

नर्मदा आणि गोदावरी – महादेवरावांच्या मुली, लग्न होऊन चिपळूण आणि नंतर

पुण्यास स्थलांतर पण पुण्याच्या प्लेग मधे दोन्ही कुटुंबाची संपूर्ण वाताहत झाली.

रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला

स्थायिक

रेवती          सखाराम पंतांची मुलगी हरिहर साने यांच्याशी लग्नं करून सांगलीला

स्थलांतर.

अक्षय साने     - महादेवराव – सखाराम – रेवती -अक्षय

सहावी  पिढी. सुरतला स्थायिक.

अंबिका        सखाराम पंतांची मुलगी  अकाली मृत्यू.

कावेरी         रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न

श्रीरंग         कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या  वेळेस सैन्यात गेला.

सीता, सरिता जान्हवी    – श्रीरंग च्या मुली.

शंकरन               - श्रीरंगचा दुसऱ्या बायको पासून झालेला मुलगा.

विनायक       भास्कर चा मुलगा वसंत त्याचा मुलगा विनायक

व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.

जय           व्यंकटेशचा मुलगा.

रोहन          - सौमित्रचा मुलगा

लक्ष्मण आणि वर्षा      - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी.

  गोकर्णला स्थायिक.

वसुधाबाई             - लक्ष्मणची आई.

विश्राम आणि अनिल           - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -गंगाधर –

सहावी पिढी.

  साताऱ्याला  स्थायिक.

दिनेश आणि प्रांजल            - विश्रामची मुलं. सातारा

विनय                       - अनिलचा मुलगा सातारा.

विश्वंभर                     - महादेव – विश्वनाथ- ओंकार- विश्वंभर.

माधव                      - विश्वंभर – राजाराम – माधव. तंजावरला

 स्थायिक

वसुंधरा                      - माधवची बायको.

चिन्मय आणि विवेक           - माधव ची मुलं.

हेमांगी                      - चिन्मयची बायको. 

कावेरी                      - महादेव – विश्वनाथ- कावेरी. विश्वास परांजपे शी लग्न.

वसंतराव परांजपे                     कावेरी परांजप्यांचे आताचे वंशज

प्रभावती                            वसंतरावांच्या पत्नी

त्र्यंबक                             वसंतरावांचे काका.

गोविंद                             वसंतरावांचा धाकटा भाऊ.

श्रीकांत आणि विक्रम            -वसंतरावांची मुलं. अमेरिकेत असतात. 

सुधाकर गोखले         निशांतला कानपूरला भेटलेले पहिले गोखले.

विशाखा               सुधाकररावांची बायको.

बबन                 - सारंग सरांचा चपराशी

सुभाष गोखले          -बबनचा मित्र. कटातला भागीदार. तोतया वारसदार

अविनाशराव           - निशांतचे वडील.

जयश्री                - निशांतची आई.

भाग  १५   

भाग १४  वरुन पुढे वाचा .......

“मी प्रश्न विचारला आहे. आणि सलमा मॅडम बोला.”– यावेळेस आवाजात अजून रुक्ष पणा आणत अधिकारी बोलला.

“अविनाश व्यावसायिक आहे. त्याच्या संपर्कात अनेक माणसं येतात. त्यांच्याशी बोलता, बोलता जर अनावधानाने त्यांच्या बोलण्यात याविषयी जर काही आलं असतं तर प्रॉब्लेम झाला असता. म्हणून  मी माझ्या मनात काय आहे ते सांगितलं नाही.” – सलमा.

“पासपोर्ट कशाला काढायचा असं त्याने विचारलं नाही का?” – अधिकारी.

“विचारलं. मग मी सांगितलं की अजमेरला चादर चढवायची आहे ही मन्नत पुरी करायची आहे म्हणून.” – सलमा.

“त्यांचा विश्वास बसला? पूर्वी कधी याबद्दल कधी बोलणं झालं होतं?” – अधिकारी.

“नाही, याविषयी आमचं बोलणं कधी झालं नव्हतं.” – सलमा.

“का? त्यांना सांगायची कधी जरूर वाटली नाही?” – अधिकारी.

“साहेब, मन्नत कोणाला सांगायची नसते म्हणून सांगितलं नाही.” – सलमा.

“पण अविनाश तर म्हणाला की तुम्ही शेजारी राहणाऱ्या शाजियाला सांगीतलं होतं म्हणून. ते कसं काय?” – अधिकारी.

“आधी कोणालाच सांगितलं नव्हतं. इथे यायचं जेंव्हा पक्क झालं तेंव्हा कोणाला उगाच शंका नको यायला म्हणून शाजियाला सांगितलं. तिला सांगितलं म्हणजे सर्वांना कळणारच होतं.” सलमा.  

“मग तुम्ही अजमेरला जाऊन आलात का? मन्नत पुरी करून आलात?” – अधिकारी.

“हो, आधी आम्ही अजमेरलाच गेलो आणि मग नागपूर.” – सलमा.

“आता तुमची मन्नत पुरी झाली आहे, आता सांगायला हरकत नसावी. कशा करिता मागितली होती मन्नत?” – अधिकारी.

थोडा वेळ सलमा संभ्रमात पडली. सांगावं की नाही यांचा विचार करत होती.

“साहेब मन्नत अशी सांगत नसतात. ती सांगितली तर, असर नाहीसा होतो.”- सलमा.

“जे घडायचं आहे ते घडून गेलं आहे, त्यामुळे आता आम्हाला सांगा.” – अधिकारी.

सलमा काहीच बोलली नाही. सगळे पण शांत होते. कोणी काहीच बोललं नाही. सलमा गोंधळली, ती शांतता तिला असह्य झाली. म्हणाली,

“साहेब, सांगायलाच पाहिजे का? त्याने काय फरक पडणार आहे?” – सलमा म्हणाली.

“ते आपण नंतर बघू. तुम्ही बोला.” – अधिकारी.

थोडा वेळ सलमा संभ्रमात पडली. सांगावं की नाही यांचा विचार करत होती. मन्नत बद्दल काही प्रश्न विचारल्या जाईल, याची काही कल्पनाच नव्हती. त्यामुळे उजळणी झालीच नव्हती. सारंग सर म्हणाले होते, की कुठलाही अवांतर बोलू नका. आता काय करायचं.

“तुम्ही उत्तर नाकारू शकता, पण त्यामुळे तुमच्या निगेटिव पॉईंट्स मधे वाढ होईल. बघा, विचार करा नागरिकत्व, तुम्हाला हवं आहे.” – अधिकारी.

ही गोळी मात्र लागू पडली. सलमाने सांगायचं ठरवलं. जे होईल ते पाहिल्या जाईल. असा विचार तिने केला.

“साहेब, माझा मुलगा रहमान फार आजारी होता, कुठल्याही औषधांमुळे त्याला उतार पडत नव्हता. तेंव्हा साधारणपणे जे केल्या जातं तेच मी केलं. अजमेर शरीफ ला जाऊन चादर चढविन अशी मन्नत मागितली.” – सलमा  

“मग आता मुलगा बरा झाला असेल ना? तुमच्या बरोबर तो पण भारतात आला आहे का?” – अधिकारी.

“नाही. तो चार वर्षांचा असतांना तो आम्हाला सोडून गेला.” – सलमा.

“कोणच्या साली?” – अधिकारी.

“१९८९ साली.” – सलमा.

“मग इतकी वर्ष मधे गेल्यावर, आता २००१ साली अचानक मन्नत पुरी करण्याचं काय कारण?” अधिकारी.

“निशांत येऊन गेल्यावर अविनाशची स्मृति परत यायला लागली होती, आणि आम्हाला असुरक्षित वाटायला लागलं. असं वाटलं की मन्नत पुरी केल्यावर डोक्यांवरचं टेंशन  निघून जाईल म्हणून.” – सलमा.

“पण अविनाश तर म्हणाला की असुरक्षित वाटायला लागलं म्हणून तुम्हीच भारतात येण्याचा निर्णय घेतला म्हणून. मग मन्नतच पुरी करायची होती, तर ती झाल्यावर तुम्ही वापस जायला पाहिजे.” – अधिकारी.

आता सलमा गोंधळली. हे सगळं कुठल्या दिशेने चाललं आहे हेच तिला कळेना. ती भांबावली. म्हणाली,

“साहेब भारतात यायला काही तर कारण पाहिजे, म्हणून मन्नत सांगितलं.” – सलमा.

“सलमा मॅडम तुम्ही नेमकी काय मन्नत मागितली होती? हज यात्रा करीन म्हणून की अजमेरला येईन म्हणून?” – अधिकारी.

“दोन्ही ठिकाणी मागीतली होती. अजमेर झालं. आता बघायचं हज केंव्हा होईल ते. हजला खूप खर्च येतो त्यामुळे थोडा काळ जावा लागेल.” – सलमा म्हणाली. आता ती बरीच सावरली होती. अधिकारी हसला आणि सायकॉलॉंजिस्ट ला म्हणाला,

“तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा.”

“सलमा मॅडम तुम्ही हुशार आहात यात शंका नाही. तुम्ही वैद्यकी पण शिकलात असं कळलं, तुमचं शिक्षण किती झालंय?”- सायकॉलॉंजिस्ट

“कुल्लापारला सातवी पर्यन्त शाळा होती. तेवढं शिकली. अब्बाजान कडून वैद्यकी शिकली.” – सलमा.

“तुम्हाला हिन्दी येते ती कशी? कुठे शिकला?” – सायकॉलॉंजिस्ट

“शाळेत थोडी शिकले, बाकी अब्बाचे बरेच मरीज होते, त्यामुळे मला बऱ्यापैकी  हिन्दी येते.” – सलमा.

आता सायकॉलॉंजिस्ट ज्याचं नाव गोडबोले होतं, तो मराठीत बोलला.

“आमच्या नागपूर ऑफिस कडून आणि पोलिसांकडून जे रीपोर्ट आले आहेत, त्यात तुम्ही मराठी पण उत्तम बोलता असं लिहिलं आहे. कुठे शिकलात?”– गोडबोले.

“तुम्हाला पण मराठी येतं? तुम्ही मराठी आहात?” – सलमा.

“हो, माझं नाव गोडबोले. मी मराठीच आहे. तुम्ही मराठीत बोलू शकता.” – गोडबोले.

बांग्लादेशात मराठीचे क्लासेस आहेत का?” -गोडबोले.

“नाही. मी अविनाशकडूनच शिकले.” सलमाचं उत्तर.

“पण तुम्हीच म्हणालात की निशांत येऊन गेल्यावरच अविनाशची स्मृति परत आली म्हणून. मराठी भाषा पण तेंव्हाच त्याला आठवायला लागली होती का?” – गोडबोले.

“हो.” – सलमा.

“निशांत येऊन गेल्यावर, म्हणजे साधारण वर्षभरापूर्वी तुमची मराठीशी ओळख व्हायला सुरवात झाली.”- गोडबोले.

“हो” – सलमा.

“काय कारण आहे की ही भाषा तुम्हाला शिकाविशी वाटली?” – गोडबोले.

“ही अविनाशची मातृभाषा आहे, आणि त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत बोललं तर त्याला आनंद होईल असं वाटलं म्हणून मी मराठी शिकले. आणि त्याने पण अतिशय उत्साहाने मला शिकवलं.” – सलमा.  

“ओके, सलमा मॅडम मला असं वाटतं की लंच ची वेळ झाली आहे, तुम्ही लोकं पण जेवण करून घ्या. जेवणानंतर आपण पुन्हा सुरवात करू.” – गोडबोले.

सलमा बाहेर गेली. ती गेल्यावर एक १० मिनिटं तिघांनी आपसात चर्चा केली आणि मग ते पण लंच घ्यायला निघाले.

“सलमा काय काय झालं? सविस्तर सांग.” – अविनाश.

जेवतांना सलमाने सर्व सांगितल. शेवटी म्हणाली,

“एक जण मराठी होता. गोडबोले नाव होतं त्यांच. मला खूप हायसं वाटलं. खूप प्रेमळ वाटला तो. नक्की आपल्याला मदत करेल.” – सलमा.

अविनाशला पण बरं वाटलं. तो म्हणाला,

“हे एकदम छान झालं सलमा, आता आपलं काम लवकर होईल.” मग त्याचं लक्ष निशांत कडे गेलं, निशांतचा चेहरा जरा गंभीर होता.

“तुला काय झालं? तू का असा एकदम गंभीर झालास?” त्याने निशांतला विचारलं. पण निशांतचं लक्षच नव्हतं. तो विचार करत होता. अविनाशने त्याला स्पर्श केला, आणि विचारलं,

“कसला विचार करतो आहेस?” – अविनाश.

“काका, तुमचे सहकारी, दुर्गादास, स्वामी, आणि प्रकाश आणि तुम्ही, कामगिरीवर जातांना, हरियानवी, तेलगू आणि मराठी होते की फक्त सैनिक होते, फौजी?”- निशांत

“फौजी. तेथे आम्ही कुठल्या भागातून आलो, किंवा आमची भाषा काय हा प्रश्नच उद्भवत नाही.” – अविनाश.

“मग तसंच आहे हे. हे लोकं फक्त आयबी अधिकारी आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. उगाच हुरळून जाऊ नका.” – निशांत.

अविनाश आणि सलमा विचारात पडले. निशांतच्या बोलण्यात तथ्य आहे हे त्यांना जाणवलं.

“मग आता काय करायचं? तूच सांग.” – अविनाश.

“साधारण पद्धत अशी असते, की १० फालतू, निरुपद्रवी प्रश्न विचारायचे आणि त्यातच मधे एखादा गुगली टाकायचा, या वेळेस समोरचा माणूस अनावधानाने खरं किंवा त्यांना हवं असलेलं उत्तर देतो, आणि त्यानंतर मग खरी फरफट सुरू होते. तेंव्हा सलमा मॅडम, प्रत्येक प्रश्न तपासून बघा आणि पूर्ण विचार करूनच उत्तर द्या. त्यासाठी थोडा वेळ घ्या. ताबडतोब उत्तर देण्याची जबरदस्ती ते करू शकत नाहीत. उत्तर न देण्याचा पण अधिकार तुम्हाला आहे. पण असं केल्याने केस खराब होऊ शकते.” – निशांत.

सलमाला आठवलं की तो अधिकारी पण असंच म्हणाला होता, की तुम्ही नकार देऊ शकता म्हणून. पण तसं करायचं नव्हतं. म्हणजे एकच मार्ग, विचार करूनच उत्तर देणे.  

“ही माणसं भाषेवर का घसरली आहेत हे समजत नाहीये. काकांना सुद्धा भाषेवर बरेच प्रश्न विचारले, होय न काका?” – निशांत.

“हो, पण तेंव्हा काही वाटलं नव्हतं. जनरल प्रश्न होते ते.” – अविनाश.

“पण सलमा काकुला पण विचारताहेत, यांचा काय अर्थ लावायचा, कळत नाही.”–निशांत.

“जे काही असेल ते, पण सामोरं तर जावंच लागणार आहे. सलमा जरा जपून आणि निशांत म्हणाला तसं विचार करूनच बोल.”-अविनाश.

लंच संपला, आणि आता सलमा अधिकाऱ्याचं समोर बसली होती.

“स्मृति परत यायच्या अगोदर तुमची दिनचर्या काय होती?” हा एकदम वेगळाच प्रश्न त्यांनी विचारलं होता. हा सोपा प्रश्न होता. सलमा रीलॅक्स झाली.

“आमचं कपड्याचं दुकान होतं. अविनाश सकाळीच दुकानात जायचा. जेवायला घरी यायचा मग नंतर एकदम दुकान बंद करून रात्री साधारण १० वाजता यायचा.”– सलमा.

अविनाश म्हणाले होते की ते सुरवातीला सायकल वर आजू बाजूच्या गावात फिरायचे, हे खरं आहे का?” – अधिकारी.

“हो, कुठल्याही धंद्यात सुरवातीला कष्ट घ्यावेच लागतात.” – सलमा.

“त्यांना तर बंगाली येत नव्हतं, म्हणजे असं त्यांनीच सांगितलं, तेंव्हा ग्राहकांशी कसा  संवाद साधायचे?” – अधिकारी.

“हिन्दी मधून.” – सलमा.

पण बंगाली लोकांना हिन्दी इतकं चांगलं येत नाही, मग?” – अधिकारी.

“साहेब, आधी तर आमचा देश हिंदुस्थानचाच भाग होता, मग सगळीकडे पाकिस्तानी लोकं होते, त्यामुळे कामा पुरतं  हिन्दी सर्वांनाच येत होतं.” – सलमा.

“धंदा चांगला चालण्यासाठी बंगाली येणं आवश्यक होतं. मग ते केंव्हा बंगाली शिकले? आणि कोणी शिकवलं?” अधिकारी.

“मीच” – सलमा.

किती वेळ लागतो हो बंगाली शिकायला? म्हणजे अविनाश केंव्हा शिकला?” – अधिकारी.

“दोन एक वर्ष लागली असतील. म्हणजे कामापूरतं यायला लागलं होतं.” – सलमा.

“ठीक आहे. आता आठ वाजले आहेत, बरीच रात्र झाली आहे. तुम्ही जाऊ शकता. उद्या पुन्हा तुम्हाला यावं लागेल. तुमच्या बरोबर अविनाश आणि निशांत आले आहेत, त्यांना पण उद्या बरोबर घेऊन या. त्यांच्याशी पण उद्या संवाद साधायचा आहे.” – अधिकारी.

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com