तोतया वारसदार
पात्र रचना
सारंग - वकील, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य
डॉ प्रशांत - डॉक्टर, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य
किरीट - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य
निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. शोधकर्ता
नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर
महादेवराव - घराण्याचा मूळ पुरुष.
सखारामपंत - महादेवराव – सखारामपंत. वेळणेश्वरला स्थायिक
विश्वनाथ - महादेवराव – विश्वनाथ. गोकर्ण महाबळवेश्वरला स्थायिक.
कौशिक - महादेवराव – कौशिक – समुद्रात बुडून मेला.
दिनकर - महादेवराव - - दिनकर साताऱ्याला गेला तिथून पुणे आणि तिथून
कानपूरला गेला
चंद्रकांत गोखले - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर
उज्ज्वला - चंद्रकांत गोखल्यांची बायको.
विश्वास - चंद्रकांत गोखल्यांचा मुलगा अमेरिका.
स्वानंदी - विश्वास ची बायको.
सुनील - चंद्रकांत गोखल्यांचा धाकटा मुलगा अमेरिका.
नर्मदा आणि गोदावरी – महादेवरावांच्या मुली, लग्न होऊन चिपळूण आणि नंतर
पुण्यास स्थलांतर पण पुण्याच्या प्लेग मधे दोन्ही कुटुंबाची संपूर्ण वाताहत झाली.
रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला
स्थायिक
रेवती सखाराम पंतांची मुलगी हरिहर साने यांच्याशी लग्नं करून सांगलीला
स्थलांतर.
अक्षय साने - महादेवराव – सखाराम – रेवती -अक्षय
सहावी पिढी. सुरतला स्थायिक.
अंबिका सखाराम पंतांची मुलगी अकाली मृत्यू.
कावेरी रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न
श्रीरंग कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या वेळेस सैन्यात गेला.
सीता, सरिता जान्हवी – श्रीरंग च्या मुली.
शंकरन - श्रीरंगचा दुसऱ्या बायको पासून झालेला मुलगा.
विनायक भास्कर चा मुलगा वसंत त्याचा मुलगा विनायक
व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.
जय व्यंकटेशचा मुलगा.
रोहन - सौमित्रचा मुलगा
लक्ष्मण आणि वर्षा - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी.
गोकर्णला स्थायिक.
वसुधाबाई - लक्ष्मणची आई.
विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -गंगाधर –
सहावी पिढी.
साताऱ्याला स्थायिक.
दिनेश आणि प्रांजल - विश्रामची मुलं. सातारा
विनय - अनिलचा मुलगा सातारा.
विश्वंभर - महादेव – विश्वनाथ- ओंकार- विश्वंभर.
माधव - विश्वंभर – राजाराम – माधव. तंजावरला
स्थायिक
वसुंधरा - माधवची बायको.
चिन्मय आणि विवेक - माधव ची मुलं.
हेमांगी - चिन्मयची बायको.
कावेरी - महादेव – विश्वनाथ- कावेरी. विश्वास परांजपे शी लग्न.
वसंतराव परांजपे कावेरी परांजप्यांचे आताचे वंशज
प्रभावती वसंतरावांच्या पत्नी
त्र्यंबक वसंतरावांचे काका.
गोविंद वसंतरावांचा धाकटा भाऊ.
श्रीकांत आणि विक्रम -वसंतरावांची मुलं. अमेरिकेत असतात.
सुधाकर गोखले निशांतला कानपूरला भेटलेले पहिले गोखले.
विशाखा सुधाकररावांची बायको.
बबन - सारंग सरांचा चपराशी
सुभाष गोखले -बबनचा मित्र. कटातला भागीदार. तोतया वारसदार
अविनाशराव - निशांतचे वडील.
जयश्री - निशांतची आई.
भाग ९
भाग ८ वरुन पुढे वाचा .......
मग धनशेखरांनी विनायकरावांच्या मृत्यू पासून सुरवात करून आता पर्यन्त सर्व सांगितलं. कमांडर साहेब, ऐकून थक्कच झाले.
“मला आठवतंय की निशांत एकदा आमच्या ऑफिस मध्ये येऊन अविनाशची चौकशी करून गेला होता, त्याला आम्ही दिल्ली हेडक्वार्टरला पाठवलं होतं. पण काही असलं तरी तुमचा रीपोर्ट आम्हाला आला की आम्ही तो दिल्लीला पाठवून देऊ. मग दिल्ली ऑफिस जी अॅक्शन घ्यायची असेल, ती घेतील.” – कमांडर.
“साहेब, ऑफ द रेकॉर्डस मी तुम्हाला सांगितलं आहेच, पण रीपोर्ट द्यायचा असेल, तर तुमचं तसं पत्र लागेल. हे लोकं व्हॅलीड पासपोर्ट आणि व्हिजा वर इथे आलेले आहेत. दुसऱ्या देशातले सन्माननीय नागरिक आहेत. सयुक्तिक कारणाशिवाय त्यांची चौकशी करता येणार नाही. तेंव्हा कारणा सहित तुम्ही चौकशीची डिमांड करा.” – धनशेखर.
“ठीक आहे. आज जे काही यांनी सांगितलं ते मी सविस्तर हेड कार्टरला पाठवून देतो. मग ते म्हणतील तसं करू. फक्त, मिस्टर सुलतानी उर्फ अविनाश, तुम्ही नागपूर सोडून जाऊ नका. इंस्पेक्टर एवढं तुम्ही करा.” – कमांडर.
“ओके.” – धनशेखर.
मग अविनाश आणि धनशेखर बाहेर पडले.
“अविनाश, नागपूर सोडून कुठेही जाऊ नका, आणि जायचंच असेल, तर आम्हाला आधी कळवून जा. सध्या तरी तुमच्या जाण्या येण्या वर निर्बंध नाहीयेत. पण तुम्ही इथेच राहिलात तर बरं होईल.” – धनशेखर.
“नाही आम्ही कुठेही जाणार नाहीये. तुम्ही निश्चिंत रहा.” – अविनाश.
अविनाश घरी आल्यावर सगळे त्याच्या भोवती जमा झाले. मग आर्मी ऑफिस मध्ये काय घडलं ते अविनाशने सविस्तर सांगितलं. मग म्हणाला,
“सगळं मला वाटत होतं की योग्य दिशेने चाललंय, पण शेवटी तो कमांडर जे काही म्हणाला, त्याने सगळे संदर्भच बदलून गेले.” – अविनाश. त्याचा चेहरा पडला होता.
“असं काय म्हणाला तो साहेब?” – सलमा
“तुमची स्टोरी खूप फिल्मी वाटते आहे. यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. असो, आम्ही पोलिसांना बोलावलं आहे. ते येतच असतील.”- अविनाश.
“मग पोलिस आले होते? काय झालं?” – विश्राम.
“सुदैवाने इंस्पेक्टर धनशेखर आले होते. त्यांनी मग सर्व कथा, अगदी बाबांच्या मृत्यू पासून सांगितली. निशांत मला शोधत एकतरपूरला कसा आला होता, ते ही सांगितलं. मग ते साहेब म्हणाले, की ते माझी फाइल सर्व नोटिंग करून दिल्लीला पाठवतील. त्या नंतर सर्व दिल्लीच्या आदेशानुसार होईल.” – अविनाश.
“मग आता?” – विश्राम.
“आता दिल्लीची टीम इनव्हेस्टीगेशन करतील.” – अविनाश.
“अरे, मग ठीकच आहे न अविनाश, आपल्याला यांची कल्पना सारंग सरांनी दिलीच होती. त्याप्रमाणेच जर होत असेल, तर काळजीचं काय कारण आहे? – व्यंकटेश.
“काळजीचं कारण हे आहे, की टीमचं वेळापत्रक काय आहे ते आपल्याला माहीत नाही. आमचा व्हिजा तीन महिन्यात संपून जाईल. मग काय होणार?” – अविनाश.
“हे बघ अविनाश, ज्या गोष्टींवर आपला कंट्रोल नाही, त्या बद्दल विचार करून मेंदू कशाला शिणवतोस? आम्ही आहोत तुझ्या बरोबर.” – व्यंकटेश.
“अरे तुमचा मुक्काम संपला आहे परवा तुम्ही दक्षिण भारत फिरायला जाणार आणि मग लंडनला. विश्राम आणि लक्ष्मण साताऱ्याला. बाकी सगळे आधीच आपापल्या गावी गेले आहेत. उरतात कोण? आम्ही दोघं. आणि आम्ही ३० वर्षांनंतर भारतात येतो आहोत. टेंशन येणार नाही का? आणि सध्या तरी आम्ही परदेशी नागरिक आहोत. NRI नाही तुमच्या सारखे.” – अविनाश आता जरा भावुक झाला होता.
“हूं, साहजिक आहे. तुझं म्हणण बरोबर आहे. टेंशन येऊ शकतं. असं करू, माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे. आम्ही दक्षिण भारत फिरून येतो, तो पर्यन्त विश्राम राहील येथे, मग आम्ही परत आल्या नंतर, मी राहीन, मी विश्रामला मोकळं करेन, तो साताऱ्याला जायला मोकळा. मग तर काही प्रॉब्लेम नाही?” – व्यंकटेश.
“नाही, नको, तुम्हा लोकांचा व्यवसाय आहे, तुम्ही आपले प्लॅन बदलू नका. मी करेन मॅनेज. जरूर पडली तर सारंग सर आहेतच.” – अविनाश.
“ठीकच आहे. तसंही आम्ही साताऱ्यावरून एकाच दिवसात नागपूरला येऊ शकतो. फक्त अविनाशने फोन केला की आम्ही हजर. अविनाश तू काळजी करू नकोस. आम्ही तुला वाऱ्यावर सोडणार नाही. नाही तर असं करतो, व्यंकटेश लंडनला राहतो, त्याने थांबण्याची काहीच आवश्यकता नाहीये. सध्या मी इथे राहूनच जातो. दिनेश, विनय आणि अनिल आहेत तिथे सांभाळायला. काय अनिल?” – विश्राम.
“हो दादा, हेच बरोबर आहे. काही दिवस तू रहा, नंतर मी येईन मग तू साताऱ्याला जा. आपण असंच करू.” – अनिलने दुजोरा दिला.
या योजने बद्दल सारंग सरांशी बोलणं झालं. त्यांनाही पटलं. त्यांनीही अविनाशला दिलासा दिला की, ते नागपुरातच आहेत, आणि त्याच्यासाठी पूर्ण वेळ अव्हेलेबल आहेत.
१५ दिवस निघून गेले, मधल्या काळात, सारंग सरांनी सलमाच्या नागरिकत्वाचा अर्ज विदेश मंत्रालयाकडे केला. आता त्याची पण कार्यवाही सुरू होण्याची शक्यता होती.
एक दिवस धनशेखर वाड्यावर आले. म्हणाले,
“मी सलमाची चौकशी करायला आलो आहे. कृपया तिला बोलवा.” – धनशेखर.
“काय साहेब, सलमाची चौकशी कशाला?” – विश्राम.
“त्यांनी सिटिजनशिप साठी अर्ज केला आहे, म्हणून त्यांचं पोलिस व्हेरीफिकेशन करायची ऑर्डर आली आहे.” – धनशेखर.
“म्हणजे गंभीर असं काही नाहीये.” – विश्राम.
“विषय गंभीरच आहे. सलमा मॅडम काय उत्तरं देतात, आणि त्यावरून मंत्रालय काय निष्कर्ष काढतात, त्यावर नागरिकत्व मिळणार की नाही, हे अवलंबून आहे.” – धनशेखर.
सलमा आली. पाठोपाठ अविनाश पण आला.
“ये सलमा, हे इंस्पेक्टर धनशेखर. यांना तू ओळखतेसच. पण आत्ता ते तुझं पोलिस व्हेरीफिकेशन करायला आले आहेत. तू सिटिजनशिप साठी अर्ज केला होतास, त्याच संदर्भात आहे. टेंशन घेऊ नकोस. सगळी खरी खरी उत्तरं दे. झालं. मग काही प्रॉब्लेम नाही.” – विश्राम.
“आता जे सवाल जबाब होतील ते नीट लिहून घ्या. या स्टेटमेंट वर सलमा मॅडम सही करणार आहेत.” – धनशेखर आपल्या असिस्टंटला सांगत होते.
“हां तर सलमा मॅडम सुरू करूया? टेंशन घेण्या सारखं काही नाहीये.” – धनशेखर.
“मला मॅडम म्हणू नका. नुसतं सलमा म्हणा.” – सलमा.
“तुम्हाला भारताचं नागरिकत्व घ्यावंसं का वाटलं?” – धनशेखर.
“माझ्या नवऱ्याची म्हणजे अविनाश गोखले यांची स्मृति परत आली, आणि त्यांना
आपल्या मातृभूमीची आठवण झाली. त्यांची खूप घुसमट होत होती. पण माझा विचार करून ते काही बोलत नव्हते. मग मीच पुढाकार घेतला आणि आम्ही भारतात आलो. आणि म्हणून मी नागरिक्तवा साठी अर्ज केला.” – सलमा.
“तुमचे पती बांग्लादेशात कशाला आले होते?” – धनशेखर.
“ते भारतीय सैन्यात होते, १९७१ साली मुक्ती बाहिनीला मदत करण्यासाठी त्यांच्या ट्रूपला बांग्लादेशात पॅरा ड्रॉप केलं होतं.” – सलमा.
“लढाई तर १५ दिवसांतच संपली, मग लढाई संपल्यावर ते भारतात परत यायला हवे होते. असं काय घडलं की त्यांनी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला?” – धनशेखर.
“त्यांनी काहीच निर्णय घेतला नाही. पण या ड्रॉप मधे त्यांचं पॅरॅशूट भरकटलं आणि फाटलं. ते वेगात एका झाडावर कोसळले. खूप जखमी अवस्थेत ते झाडावर लोंबकळत होते. माझ्या वडिलांनी त्यांना पाहीलं, आणि घरी आणलं.” – सलमा.
“तुमच्या वडिलांना कसं कळलं की अविनाशचं पॅरॅशूट भरकटलं ते?” – धनशेखर.
“नाही, त्यांना काहीच माहीत नव्हतं. सकाळी ते काही जडी बुटी आणण्या साठी रानात गेले होते. माझे वडील त्या परिसरात एक प्रसिद्ध हकीम होते. त्यांना अविनाश झाडावर लोंबकळत असलेल्या अवस्थेत दिसले. मग त्यांनी अजून एक दोन मित्रांना बोलावलं, आधी त्यांनी अविनाशला कष्टाने झाडावरून खाली उतरवलं आणि. मग सर्वांनी मिळून त्यांना उचलून घरी आणलं.” – सलमा.
“कोणचे डॉक्टर होते? ज्यांनी ट्रीटमेंट दिली?” – धनशेखर.
“साहेब, एवढं का विचारता आहात? तुम्हाला तर सगळंच माहीत आहे.” सलमा.
“सलमा मॅडम मी ड्यूटि वर आहे. हे पोलिस व्हेरीफिकेशन चालू आहे. विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही नीट उत्तरं दिलीत तर तुमच्या साठी ते चांगलं होईल. तुम्ही प्रश्न विचारायचे नाहीत.” -धनशेखर जरा कमावलेल्या स्वरात बोलले. त्यांचा आविर्भाव पाहून सलमा जरा घाबरली. पण विश्रामने तिला नजरेनेच घाबरू नकोस असं खुणावलं.
“सलमा मॅडम माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तुम्ही.” – धनशेखर.
“माझे वडील नावाजलेले हकीम होते, कुल्लापार एक छोटसं गाव होतं. त्या काळी तिथे गावात कोणीही डॉक्टर नव्हता. त्यामुळे माझ्या वाडिलांनीच अविनाशवर उपचार करून बरं केलं. मी त्यांना या कामात मदत करत होते.” – सलमा.
“तुम्हाला वैद्यकी येते?” – धनशेखर.
“हो, माझ्या अब्बाजान एवढी नसली तरी बरीच येते. लोकांचा विश्वास आहे माझ्यावर. आजू बाजूच्या लोकांना मीच औषधं देते.” – सलमा.
“अविनाशला जेंव्हा झाडावरून उतरवलं, त्यावेळेस त्यांच्या शरीरावर युनिफॉर्म असेलच. तो आणि फाटलेलं पॅरॅशूट पाहून लोकांना कळलंच असेल, की हा भारतीय सैनिक आहे म्हणून. मग त्यांनी ते कसं अॅक्सेप्ट केलं?” – धनशेखर.
“सर्वच मित्र मुक्ती बाहिनीला सपोर्ट करणारे होते. सर्वांनी मिळूनच ठरवलं की यांची ओळख उघड होऊ द्यायची नाही म्हणून. कारण त्या वेळी, त्या भागात पाकिस्तानी फौजेचा बराच वावर होता. म्हणून हा माणूस हकीम चांचांचा दूरचा रिश्तेदार आहे आणि वाघाच्या हल्ल्यात जखमी झाला आहे असं सगळी कडे पसरवलं. अब्बाजान हकीम असल्याने आमच्या घरात त्याची शुश्रूषा चालू असली तरी कोणाला काही संशय आला नाही.” – सलमा.
“ओके, आपण इथे जरा ब्रेक घेऊया. सलमा चहा पिऊन जरा तू फ्रेश हो. मग आपण पुढे चौकशी सुरू करू.” – धनशेखर.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729