तोतया वारसदार (पर्व २ रे) भाग १२

“मला पुन्हा त्यांच्या घरी आलेलं पाहून जर सुलतानी संतापला असता, आणि त्यांनी पोलिसांना बोलावून ?

 तोतया वारसदार (पर्व २ रे)

पात्र रचना

सारंग         - वकील,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

डॉ प्रशांत       - डॉक्टर,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

किरीट         - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

निशांत        - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. शोधकर्ता

नयना         - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर  

महादेवराव      - घराण्याचा मूळ पुरुष.

सखारामपंत     - महादेवराव – सखारामपंत. वेळणेश्वरला स्थायिक

विश्वनाथ       - महादेवराव – विश्वनाथ. गोकर्ण महाबळवेश्वरला स्थायिक.

कौशिक        - महादेवराव – कौशिक – समुद्रात बुडून मेला.

दिनकर       - महादेवराव - - दिनकर साताऱ्याला गेला तिथून पुणे आणि तिथून

               कानपूरला गेला

चंद्रकांत गोखले                - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर

उज्ज्वला                    - चंद्रकांत गोखल्यांची बायको.

विश्वास                     - चंद्रकांत गोखल्यांचा मुलगा अमेरिका.

स्वानंदी                     - विश्वास ची बायको.

सुनील                      - चंद्रकांत गोखल्यांचा धाकटा मुलगा अमेरिका.

नर्मदा आणि गोदावरी – महादेवरावांच्या मुली, लग्न होऊन चिपळूण आणि नंतर

पुण्यास स्थलांतर पण पुण्याच्या प्लेग मधे दोन्ही कुटुंबाची संपूर्ण वाताहत झाली.

रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला

स्थायिक

रेवती          सखाराम पंतांची मुलगी हरिहर साने यांच्याशी लग्नं करून सांगलीला

स्थलांतर.

अक्षय साने     - महादेवराव – सखाराम – रेवती -अक्षय

सहावी  पिढी. सुरतला स्थायिक.

अंबिका        सखाराम पंतांची मुलगी  अकाली मृत्यू.

कावेरी         रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न

श्रीरंग          कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या  वेळेस सैन्यात गेला.

सीता, सरिता जान्हवी    – श्रीरंग च्या मुली.

शंकरन               - श्रीरंगचा दुसऱ्या बायको पासून झालेला मुलगा.

विनायक       भास्कर चा मुलगा वसंत त्याचा मुलगा विनायक

व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.

जय           व्यंकटेशचा मुलगा.

रोहन          - सौमित्रचा मुलगा

लक्ष्मण आणि वर्षा      - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी.

  गोकर्णला स्थायिक.

वसुधाबाई             - लक्ष्मणची आई.

विश्राम आणि अनिल           - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -गंगाधर –

सहावी पिढी.

  साताऱ्याला  स्थायिक.

दिनेश आणि प्रांजल            - विश्रामची मुलं. सातारा

विनय                       - अनिलचा मुलगा सातारा.

विश्वंभर                     - महादेव – विश्वनाथ- ओंकार- विश्वंभर.

माधव                      - विश्वंभर – राजाराम – माधव. तंजावरला

 स्थायिक

वसुंधरा                      - माधवची बायको.

चिन्मय आणि विवेक           - माधव ची मुलं.

हेमांगी                      - चिन्मयची बायको. 

कावेरी                      - महादेव – विश्वनाथ- कावेरी. विश्वास परांजपे शी लग्न.

वसंतराव परांजपे                     कावेरी परांजप्यांचे आताचे वंशज

प्रभावती                            वसंतरावांच्या पत्नी

त्र्यंबक                             वसंतरावांचे काका.

गोविंद                             वसंतरावांचा धाकटा भाऊ.

श्रीकांत आणि विक्रम            -वसंतरावांची मुलं. अमेरिकेत असतात. 

सुधाकर गोखले         निशांतला कानपूरला भेटलेले पहिले गोखले.

विशाखा               सुधाकररावांची बायको.

बबन                 - सारंग सरांचा चपराशी

सुभाष गोखले          -बबनचा मित्र. कटातला भागीदार. तोतया वारसदार

अविनाशराव           - निशांतचे वडील.

जयश्री                - निशांतची आई.

भाग  १२          

भाग ११ वरुन पुढे वाचा .......   

  

मग अविनाशने त्याला काय काय विचारलं त्याचा गोषवारा दिला.

“बस इतकंच?” हे तर तासा भरात आटपायला हवं होतं.” – विश्राम.

“तेच तेच प्रश्न फिरून फिरून विचारात होते. वैताग होता, पण सारंग सरांबरोबर बरीच उजळणी केल्या मुळे माझ्या उत्तरात काही विसंगती त्यांना शोधता आली नाही, हे ही खरं.” – अविनाश.

दुसऱ्या दिवशी दोघेही नागपूरला आले. निशांतला फोन करून सलमा बद्दल विचारपूस केली तेंव्हा तो म्हणाला की “तुम्हीच या इथे. दोन दिवस पाहुणचार घ्या. थोडे ताजे तवाने व्हा. मग आहेच चौकशीची पुढची फेरी.”

१५ दिवस उलटून गेले. सारंग सरांनी दोघांचाही व्हीजा वाढवून मिळण्या साठी  अर्ज केला होता. त्यांना व्हीजा वाढवून मिळाला. दिवस चालले होते आणि काहीच घडत नव्हतं. सर्वच अस्वस्थ झाले होते. जो काही निर्णय लागायचा तो लागला पाहिजे असंच सर्वांना वाटत होतं. शेवटी एक दिवस ती अनिश्चितता संपली. अविनाश आणि सलमा दोघांनाही दिल्लीला बोलावलं होतं. दुपारी निशांतचा फोन आला की त्याला दिल्लीला बोलावलं आहे म्हणून. निशांतला आदल्या दिवशी बोलावलं होतं. ठरलेल्या दिवशी तिघंही दिल्लीला पोचले.

निशांतला तीन वाजताची वेळ दिली होती, तो अडीचला ऑफिस मधे पोचला.

त्याच दिवशी सकाळी ११ वाजता सारंग वकील चौकशीला  सामोरे जात होते.

“या बसा. अॅडव्होकेट सारंग बसा.” – ऑफिसर.

आमच्याकडे जो रीपोर्ट आला आहे, त्यात असं म्हंटलं आहे की तुम्ही विनायक गोखल्यांच्या मालमत्तेचे ट्रस्टी होता, आणि त्यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या वारसदारांचा शोध घेण्याची मोहीम तुम्ही राबवली.” – ऑफिसर.

“बरोबर आहे सर.” – सारंग.

“या मोहिमे बद्दल जरा सविस्तर सांगा. कुठलीही गोष्ट वगळू नका.” – ऑफिसर.

हे असे प्रश्न सर्वांनाच विचारल्या जातील यांची सारंग सरांना कल्पना होतीच. म्हणून  त्यांनी विश्राम, निशांत, अविनाश आणि सलमा बरोबर एक मसुदा ठरवला होता. त्यानुसारच, पण प्रत्येकाने थोडा वाक्यांचा सिक्वेन्स बदलून आणि थोडा फेरफार करून बोलायचं असं ठरलं होतं. जेणे करून प्रत्येक जण पाठ केलेलं भाषण देतो आहे असं वाटायला नको. प्रत्येकाने आपापली शैली वापरायची, पण तपशिलात काडीचाही फरक नको. आता जेंव्हा सारंग सरांना पूर्ण तपशील विचारला तेंव्हा सारंग सरांनी त्यांच्या भाषेत सर्व तपशील सविस्तर सांगीतला.

“पोलिसांचा रीपोर्ट पण असाच आला आहे, पण मला हे सांगा की  विनायकरावांची दोघं मुलं इंग्लंडला आहेत, हे माहीत असतांना सुद्धा त्यांना संपर्क करायचा सोडून अविनाशच्या शोधाच्या मागे का लागला  तुम्ही?” – ऑफिसर.

“त्यांचा इंग्लंड मधला पत्ता माहीत नव्हता, म्हणून मी माझ्या दोन – तीन मित्रांना पत्र पाठवून त्यांचा पत्ता लागतो का हे बघायला सांगितलं होतं. पण आंतर राष्ट्रीय पत्र मिळायला वेळ लागतो. त्यांना कामातून फुरसत मिळाल्यावर ते पत्ता शोधणार, पत्ता मिळाल्यावर ते आम्हाला कळवणार,  त्यात बराच वेळ जाणार होता, निशांत मोकळा होता, म्हणून अविनाश बद्दल काही कळतं का हे शोधायला त्याला सांगितलं.” – सारंग.

“त्यावेळेस तुम्ही म्हणता, की अविनाशने ओळखच नाकारली, मग आता वर्षभरानंतर ते इथे आल्यावर तुम्ही कसा विश्वास ठेवला?” – ऑफिसर. “या मधल्या काळात त्याच्याशी काही संपर्क झाला होता का?”

“नाही, पण त्यावेळेस सुद्धा सुलतानी हाच अविनाश आहे यावर निशांत ठाम होता. त्याने ज्या कुशलतेने बाकी गोखल्यांना शोधलं त्यामुळे आम्ही तेंव्हा सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. पण अविनाशची स्मृति वापस येईल, आणि तो भारतात येईल, असं कल्पनेत सुद्धा वाटलं नव्हतं. ते आमच्या साठी  सुद्धा सर्प्राइजच होतं.” – सारंग.

“म्हणजे आमच्या कडून त्याला क्लीन चिट  मिळाली, तर तोच संपत्तीचा हक्कदार असणार आहे.” – ऑफिसर.

“नाही, सर्व गोखल्यांच्या मीटिंग मधे असं ठरलं आहे की संपत्तीचा ट्रस्ट करायचा. अविनाशला सहावा ट्रस्टी बनवायचं आणि ट्रस्टीचं जे मानधन असेल ते त्याला मिळेल. आणि हे अविनाशला  मान्य आहे.” – सारंग.

“ठीक आहे अॅडव्होकेट सारंग, आत्ता पुरतं एवढचं. तुम्ही येऊ शकता.” – ऑफिसर.

सारंग वकील बाहेर पडले, त्यांची नजर निशांत आणि अविनाशला शोधत होती, पण बाहेर जाण्याचा मार्ग वेगळा असल्याने त्यांची भेट झाली नाही. ते तिथून सरळ  अविनाश ज्या हॉटेल वर उतरणार होता, त्या हॉटेलवर गेले आणि स्वत:साठी रूम बूक केली. अविनाश ज्या रूम मधे राहिला होता, तिथे गेले.

आता आर्मी ऑफिस मधे निशांत बसला होता.

“मिस्टर निशांत, सुरवात करायची? तुम्ही तयार आहात?” – ऑफिसर.

“यस सर.” – निशांत.

“प्रथम भारतातले वारसदार शोधायचे सोडून, एकदम बांग्लादेशला जाण्याचं काय कारण होतं? तुम्हाला पक्की खबर होती का? असं असेल तर तुम्ही आर्मी ऑफिसला का कळवलं नाही? याबद्दल तुमच्यावर कारवाई होऊ शकते.” – ऑफिसर.  

“सर तुम्ही समजता तसं काहीच नाहीये, आम्हाला कसलाही सुगावा लागला नव्हता. सारंग सरांनी त्यांच्या इंग्लंड मधल्या मित्रांना पत्र पाठवून, दोघा इंग्लंड मधल्या मुलांची माहिती काढायला सांगितलं होतं. पण माहिती मिळायला वेळ लागणार होता, म्हणून ट्रस्टी लोकांनी असं ठरवलं, की एकतरपूरला जायचं, आठ दिवस राहायचं आणि शोध घेण्याचं थोडं नाटक करायचं आणि वापस यायचं.” – निशांत.

“नाटक करायचं? असं करण्या मागे काय उद्देश होता?”- ऑफिसर.

“आर्मीच्या रेकॉर्डस प्रमाणे गेली ३० वर्ष अविनाशचा पत्ता लागला नव्हता, त्यामुळे जो आर्मीला सापडला नाही, तो आम्हाला सापडण्याची मुळीच शक्यता नव्हती. जेवढे वारसदार सापडतील, त्याचा कंप्लीट अकाऊंट कोर्टा समोर ठेवायचा होता, त्यावेळेस कोर्टाने जर असा शेरा मारला असता, की तुम्ही अविनाशला शोधायचा प्रयत्नच केला नाही, तर सगळेच अडचणीत आले असते, म्हणून हे सगळं केलं.” – निशांत.

“जेंव्हा तुम्ही सुलतानीला प्रथम भेटला, तेंव्हा असं काय तुम्हाला आढळलं की आल्यावर तुम्ही खात्रीपूर्वक सांगीतलं की सुलतानी हाच अविनाश आहे?” – ऑफिसर.

“सर माझ्या जवळ अविनाशचा जुना फोटो होता. आणि खरा अविनाश अचानक समोर आला. सर हा असा योगायोग होता की मी सुद्धा क्षणभरा करता आश्चर्य चकित झालो होतो. पण सर मी डिटेक्टिव आहे आणि अश्या परिस्थितीला सामोरं जाण्याची आम्हाला सवय असते. त्यामुळे थोड्या वेळा करिता जरी मी गांगरून गेलो होतो, तरी मी स्वत;ला लवकरच सावरलं. बारकाईने  निरीक्षण केल्यावर बरेच बारीक सारिक तपशील माझ्या नजरेस आले. तुमच्या जवळ जुना फोटो असेल, आणि तुम्ही सुलतानीला भेटला पण आहात. फोटोत  जी चेहरेपट्टी आहे, तसाच त्यांचा चेहरा होता. वयाचा फरक सोडला तर दोन्ही एकदम सारखे होते. त्यांच्या फोटो मधे दोन्ही कानांचा आकार आणि ठेवण वेगळी आहे, तसाच फरक मला ते प्रत्यक्ष भेटल्यावर दिसला. त्यांचे दात, उजवी कडून तिसरा खालचा दात तुटला आहे. जो फोटोत पण स्पष्ट दिसतो आहे. त्यांच्या कपाळावर टांके घातल्याच्या खुणा आहेत. यांचा उल्लेख आर्मी रेकॉर्डस मधे पण आहे. आणि फोटोत पण स्पष्ट दिसत आहे. त्यांच्या केसांचं वळण हे तर अगदी ठळक पणे दिसून येतं. अर्थात हे सगळं निरीक्षण तुम्ही पण केलंच असेल. पण सुलतानीने ओळखच नाकारली. मी त्यांना माझ्या जवळ असलेला फोटो पण दाखवला, पण त्यांना काहीच आठवत नव्हतं. त्यांनी चिडून जवळ जवळ मला हाकलूनच दिलं. शेवटी मी परत फिरलो.” – निशांत.

“नागपूरला गेल्यावर तुम्ही सर्वांना हे सांगितलं?” – ऑफिसर.

“सर्वांना म्हणजे फक्त ट्रस्टींना, कारण तो पर्यन्त बाकी गोखले अजून पिक्चर मधे यायचे होते. पण नंतर हळू हळू सर्वांनाच कळलं.” – निशांत.

“तुम्ही सुलतानीला त्याचा पूर्व इतिहास विचारला नाही? त्यांच्या पॅरॅशूट बद्दल आणि बॅग बद्दल, युनिफॉर्म बद्दल विचारावसं वाटलं नाही का?” – ऑफिसर.

“विचारलं. पण उत्तर मिळालं नाही.” – निशांत.

“म्हणजे? काय म्हणाले सुलतानी?” – ऑफिसर.

“आमच्या देशात लोकं गाडीने किंवा बस ने फिरतात. पॅरॅशूटने नाही. असं उत्तर मिळालं. मी त्यावेळेस सलमा मॅडम कडे बघितलं की त्या तरी काही बोलतील, पण सुलतानी एवढे चिडले होते, की त्यांनी मला धक्केच मारायचं शिल्लक ठेवलं होतं. मला तिथून काढता पाय घेण्या शिवाय काही पर्यायच नव्हता. आणि सुलतानीची त्यावेळेची मनस्थिती पाहता मी अजून काही पाठपुरावा करू शकलो असतो अशी शक्यता नव्हती. म्हणून मी भारतात परत आलो.” – निशांत.

“त्यांच्या सहकाऱ्यांना तुम्ही भेटला होता, त्यांची नावं सांगितली का?” – ऑफिसर.

“हो बोलता बोलता दुर्गादास आणि स्वामी यांचा उल्लेख केला होता. मी त्यांना सांगितलं की हे दोन मित्र त्यांची खूप आठवण करतात म्हणून.” – निशांत.

“काय प्रतिक्रिया होती सुलतानीची?” – ऑफिसर.

“निर्विकार चेहरा होता, कसलाच बोध झालेला दिसला नाही. मी थोड्या वेळाने वेगळ्या पद्धतीने हाच प्रश्न विचारलं, तर त्यावर त्यांचं उत्तर होतं की “मी  बांग्लादेशी मुस्लिम आहे. माझा जन्मच इथला आहे आणि मी कधीही भारतात गेलो नाही. माझ्या मनावर हे माझे मित्र आहेत हे ठसवण्यात तुमचा काय हेतु आहे? आता तुम्ही ताबडतोब निघा नाहीतर मला पोलिसांना बोलवावं लागेल” अशी धमकीच दिली त्यांनी.” – निशांत.

“सुलतानीच्या बायकोला, सलमाला तर सगळंच माहीत होतं, तुम्ही त्यांना प्रश्न विचारले नाहीत का?” – ऑफिसर.

“सर मी इनव्हेस्टीगेटिंग ऑफिसर म्हणून गेलो नव्हतो, त्यामुळे सुलतानी एवढा चिडलेला असतांना सलमा मॅडमला काही प्रश्न विचारणं शक्यच नव्हतं. पुन्हा मी तिथे परदेशी पाहुणा होतो, सुलतानीने खरंच पोलिसांना बोलावलं असतं, तर प्रकरणाला वेगळीच दिशा मिळाली असती. म्हणून मी तो मोह आवरला. पण मी सलमा मॅडम कडे लक्षपूर्वक बघत होतो, आणि त्यांच्या नजरेत मला सत्य जाणवलं. त्यांना बोलायचं होतं पण बोलू शकत नव्हत्या. मग काय करणार?” – निशांत.

“तुम्ही दुसऱ्या वेळेस जेंव्हा सर्टिफिकेट चेक करण्या साठी  पुन्हा बांग्लादेशला गेलात, तेंव्हा सुलतानीला भेटण्याचा प्रयत्न केला नाही. काय कारण होतं?- ऑफिसर

“भेटण्याचा विचार केला होता, पण नंतर कॅन्सल केला.” – निशांत.

“मी कारण विचारलं, तुम्ही भेटला नाहीत, ते आम्हाला माहीत आहे. कारण सांगा. नेमकं सांगा.” आता ऑफिसरच्या आवाजाचा टोन जरा बदलला होता.

“मला पुन्हा त्यांच्या घरी आलेलं पाहून जर सुलतानी संतापला असता, आणि त्यांनी पोलिसांना बोलावून माझ्या विरुद्ध तक्रार केली असती, तर माझा प्रॉब्लेम झाला असता. साहेब, मी साधा शोधकर्ता आहे. दुसऱ्या देशा मधे जाऊन कारनामे करणारा जेम्स बॉन्ड नाही.” – निशांत.

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com