तोतया वारसदार (पर्व २ रे) भाग १३

“आमच्या ऑफिसने काय केलं असतं यांचा अंदाज तुम्ही का बांधत बसला. तुमचं काम होतं माहिती देण्याचं, ?

 तोतया वारसदार

पात्र रचना

सारंग         - वकील,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

डॉ प्रशांत       - डॉक्टर,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

किरीट         - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

निशांत        - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. शोधकर्ता

नयना         - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर  

महादेवराव      - घराण्याचा मूळ पुरुष.

सखारामपंत     - महादेवराव – सखारामपंत. वेळणेश्वरला स्थायिक

विश्वनाथ       - महादेवराव – विश्वनाथ. गोकर्ण महाबळवेश्वरला स्थायिक.

कौशिक        - महादेवराव – कौशिक – समुद्रात बुडून मेला.

दिनकर       - महादेवराव - - दिनकर साताऱ्याला गेला तिथून पुणे आणि तिथून

               कानपूरला गेला

चंद्रकांत गोखले                - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर

उज्ज्वला                    - चंद्रकांत गोखल्यांची बायको.

विश्वास                     - चंद्रकांत गोखल्यांचा मुलगा अमेरिका.

स्वानंदी                     - विश्वास ची बायको.

सुनील                      - चंद्रकांत गोखल्यांचा धाकटा मुलगा अमेरिका.

नर्मदा आणि गोदावरी – महादेवरावांच्या मुली, लग्न होऊन चिपळूण आणि नंतर

पुण्यास स्थलांतर पण पुण्याच्या प्लेग मधे दोन्ही कुटुंबाची संपूर्ण वाताहत झाली.

रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला

स्थायिक

रेवती          सखाराम पंतांची मुलगी हरिहर साने यांच्याशी लग्नं करून सांगलीला

स्थलांतर.

अक्षय साने     - महादेवराव – सखाराम – रेवती -अक्षय

सहावी  पिढी. सुरतला स्थायिक.

अंबिका        सखाराम पंतांची मुलगी  अकाली मृत्यू.

कावेरी         रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न

श्रीरंग         कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या  वेळेस सैन्यात गेला.

सीता, सरिता जान्हवी    – श्रीरंग च्या मुली.

शंकरन               - श्रीरंगचा दुसऱ्या बायको पासून झालेला मुलगा.

विनायक       भास्कर चा मुलगा वसंत त्याचा मुलगा विनायक

व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.

जय           व्यंकटेशचा मुलगा.

रोहन          - सौमित्रचा मुलगा

लक्ष्मण आणि वर्षा      - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी.

  गोकर्णला स्थायिक.

वसुधाबाई             - लक्ष्मणची आई.

विश्राम आणि अनिल           - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -गंगाधर –

सहावी पिढी.

  साताऱ्याला  स्थायिक.

दिनेश आणि प्रांजल            - विश्रामची मुलं. सातारा

विनय                       - अनिलचा मुलगा सातारा.

विश्वंभर                     - महादेव – विश्वनाथ- ओंकार- विश्वंभर.

माधव                      - विश्वंभर – राजाराम – माधव. तंजावरला

 स्थायिक

वसुंधरा                      - माधवची बायको.

चिन्मय आणि विवेक           - माधव ची मुलं.

हेमांगी                      - चिन्मयची बायको. 

कावेरी                      - महादेव – विश्वनाथ- कावेरी. विश्वास परांजपे शी लग्न.

वसंतराव परांजपे                     कावेरी परांजप्यांचे आताचे वंशज

प्रभावती                            वसंतरावांच्या पत्नी

त्र्यंबक                             वसंतरावांचे काका.

गोविंद                             वसंतरावांचा धाकटा भाऊ.

श्रीकांत आणि विक्रम            -वसंतरावांची मुलं. अमेरिकेत असतात. 

सुधाकर गोखले         निशांतला कानपूरला भेटलेले पहिले गोखले.

विशाखा               सुधाकररावांची बायको.

बबन                 - सारंग सरांचा चपराशी

सुभाष गोखले          -बबनचा मित्र. कटातला भागीदार. तोतया वारसदार

अविनाशराव           - निशांतचे वडील.

जयश्री                - निशांतची आई.

भाग  १३          

भाग १२  वरुन पुढे वाचा .......   

  

“मी कारण विचारलं, तुम्ही भेटला नाहीत, ते आम्हाला माहीत आहे. कारण सांगा. नेमकं सांगा.” आता ऑफिसरच्या आवाजाचा टोन जरा बदलला होता.

“मला पुन्हा त्यांच्या घरी आलेलं पाहून जर सुलतानी संतापला असता, आणि त्यांनी खरंच पोलिसांना बोलावून माझ्या विरुद्ध तक्रार केली असती, तर माझा प्रॉब्लेम झाला असता. सर, मी साधा शोधकर्ता आहे. दुसऱ्या देशा मधे जाऊन कारनामे करणारा जेम्स बॉन्ड नाही.” – निशांत.

“तुम्हाला जर एवढी खात्री होती, की सुलतानी हाच अविनाश गोखले आहे, तर तुम्ही त्याच वेळेस आर्मी ऑफिसला का कळवलं नाही?” – ऑफिसर.

“माझी खात्री माझ्या अंदाजावर होती. कसलेही पुरावे हातात नसतांना मी आर्मी ऑफिसला काय जाऊन सांगणार होतो? माझे असे अंदाज आहेत म्हणून? त्याचा काय उपयोग झाला असता?” – निशांत.

“आमच्या ऑफिसने काय केलं असतं यांचा अंदाज तुम्ही का बांधत बसला. तुमचं काम होतं माहिती देण्याचं, ते तुम्ही केलं नाही. सरकार पासून महत्वाची माहिती, मुद्दाम असा शब्द मी वापरत नाही, पण दडवून ठेवली. हे खरं.” – ऑफिसर.

“नाही सर, कृपया गैरसमज करून घेऊ नका. समजा, मी माहिती दिली असती, आणि मग तुमच्या ऑफिस ने त्या माहितीची शहानिशा करायला सुरवात केली असती. आज अविनाश तुमच्या समोर बसला आहे. तुम्ही हजार प्रश्न विचारून खात्री करून घेऊ शकता, पण त्यावेळेस तो दुसऱ्या देशात होता, तुमच्या अधिकारावर पण मर्यादा होत्या. आणि खरंच त्यांची स्मृति त्यावेळे पर्यन्त तरी आली नव्हती. जर चौकशी मधे सुलतानी हा सुलतानीच आहे, असं सिद्ध झालं असतं तर, खोटी माहिती दिली, म्हणून तुम्हीच मला अडकवलं असतं.” – निशांत.

“हूं, ठीक आहे. मिस्टर निशांत, तुम्ही जाऊ शकता.” – ऑफिसर.

निशांत हॉटेल वर आला तेंव्हा सारंग, अविनाश आणि सलमा त्यांची वाटच पहात  होते. दुसऱ्या दिवशी  अविनाश आणि सलमाची पेशी होती, त्याचीच चर्चा चालली होती.

सारंग सरांना आणि निशांतला थोडा फार फरक वगळता, सारखेच प्रश्न विचारले होते, त्यामुळे दुसऱ्या दिवशी अविनाश आणि सलमाला  पण त्याचीच पुनरावृत्ति होईल असा विचार करून त्याच प्रश्नांची  पुन्हा उजळणी करण्यात आली.

दुसऱ्या दिवशी पण सारंग सर थांबणार होते, पण निशांत म्हणाला की तो सोबत करणार आहे, त्यामुळे सारंग सर नागपूरला गेले तरी चालण्या सारखं आहे. मग सारंग सर नागपूरला जायच्या तयारीला लागले. निशांत, अविनाश आणि सलमा आर्मी हेड क्वार्टरला पोचले.

“आज प्रथम अविनाशची चौकशी आणि काही टेस्ट होणार आहेत, तेंव्हा सलमा मॅडम तुम्हाला उद्या यावं लागणार आहे. आज तुम्ही जाऊ शकता.” – ऑफिसर.

“पण सर, त्यांना इथे एकटं सोडायचं? आम्ही थांबलो तर चालणार नाही का?” -सलमा

“मॅडम तुम्ही घाबरता कशाला? सुलतानी हेच अविनाश गोखले आहेत हे जवळ जवळ सिद्ध झालं आहे, फक्त काही गोष्टी क्लियर व्हायच्या आहेत, एवढंच. तुम्ही निश्चिंत पणे हॉटेल वर जा. काळजी करू नका.” – ऑफिसर.

तो अधिकाऱ्याने असा निर्वाळा दिल्याने निशांत आणि सलमा दोघेही आश्वस्त झाले आणि तेथून निघाले.

“मिस्टर अविनाश, तुमच्या जवळ गन  आणि मॅगझीनस् आहेत हे माहीत असतांना सुद्धा तुम्ही त्यांची काळजी घेतली नाही, याबद्दल तुम्हाला निष्काळजी पणा केल्या बद्दल जबाबदार धरल्या जाऊ शकतं. यावर तुमचं काय म्हणण आहे?” – ऑफिसर.

“मी जबाबदार आहे हे मला मान्य आहे, पण परिस्थिती माझ्या हाताबाहेर गेली होती आणि कुठलंही नियंत्रण माझ्या हातात नव्हतं. अश्या परिस्थितीत जीव वाचवणं हे महत्वाचं होतं. त्या रात्रीच्या गडद अंधारात वस्तु कुठे पडल्या ते कळणं शक्यच नव्हतं आणि मी कोसळल्या नंतर मला काहीच आठवत नव्हतं.” – अविनाश.

“तुमची स्मृति परत आली आहे हे किती  जणांना माहीत आहे? कोण कोण तुमच्या संपर्कात होतं?”- ऑफिसर.

“माझा व्यवसाय असल्याने, संपर्कात बरेच लोकं होते. शेजारी, होते, मित्र मंडळी होती. पण माहिती कोणालाच नव्हती. आम्ही खूप खबरदारी घेतली होती.”- अविनाश.

“खबरदारी घेण्याचं काय कारण होतं? काही प्रॉब्लेम झाला होता का?”  - ऑफिसर.

“तुम्ही जेंव्हा परक्या ठिकाणी असता, आणि एकटे असता, तेंव्हा दडपणाखाली वावरत असता, आणि आपोआपच एक्स्ट्रा सावधगिरी बाळगता, तसंच झालं.” – अविनाश.

“तुम्ही तिथे ३० वर्ष रहात होता, मग परकं ठिकाण कसं म्हणता?” – ऑफिसर.

“जेंव्हा लक्षात आलं की मी भारतीय आर्मी ऑफिसर आहे, तेंव्हापासून असुरक्षितता जाणवायला लागली. तो इस्लामी देश, मी हिंदू आर्मी ऑफिसर, लोकांना कळल्यावर त्यांची काय प्रतिक्रिया असेल, या विचाराने आम्ही दोघंही घाबरलो होतो. सलमा जास्तच घाबरली होती.” – अविनाश.

“म्हणून तुम्ही भारतात येण्याचा निर्णय घेतला?” – ऑफिसर.

“नाही, आमचं त्याबद्दल काही बोलणंच झालं नव्हतं. काही दिवस गेल्यावर सलमा म्हणाली की तिला अजमेरला चादर चढवायची आहे, मन्नत पुरी करायची आहे.  शेजाऱ्यांना पण तिने हेच सांगितलं होतं. मग आम्ही भारतात आल्यावर अजमेरला गेलो आणि नंतर मुंबईच्या हाजी आली ला जायचं होतं, पण सलमा एकदम बदलली आणि म्हणाली की आता नागपूरला जायचं. तेंव्हा कुठे मला समजलं की तिच्या मनात काय चाललं आहे ते.” – अविनाश.

एक आर्मी ऑफिसर आत आला, म्हणाला.

“सर्व तयारी झाली आहे. आपण यांना घेऊन जाऊ शकतो.”

“चला गोखले आपल्याला एम्स मधे जायचं आहे, तिथे तुमच्या बऱ्याच टेस्ट होणार आहेत.” – ऑफिसर.

टेस्ट म्हंटल्यांवर, आता कुठल्या दिव्यातुन  जावं लागणार आहे हा विचार मनात येऊन, अविनाश दचकला पण दुसऱ्याच क्षणी त्याला जाणवलं की त्या  ऑफिसरने  त्याला गोखले म्हणून हाक मारली होती, सुलतानी म्हणून नाही. हे लक्षात आल्यावर तो रीलॅक्स झाला. मग ती वरात एम्सला पोचली.

मग सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या, X ray, MRI, होल बॉडी सीटी स्कॅन सकट ज्या ज्या टेस्ट करायच्या होत्या, त्या सर्व करून झाल्या.

“मिस्टर गोखले सर्व टेस्ट करून झाल्या आहेत, आता एक्स्पर्ट ओपिनियन आल्यावर पुन्हा एक मीटिंग करावी लागेल.” – ऑफिसर.

“म्हणजे सर, मी किती दिवस दिल्लीत रहायचं?” – अविनाश.

“ते आत्ता नाही सांगता येणार. तुम्हाला पत्र येईल.” – ऑफिसर.

‘उद्या सलमाला यायचं आहे का?” – अविनाश.

“हो आज तूमच्या ज्या टेस्ट झाल्या, तश्याच त्यांच्या पण सगळ्या टेस्ट उद्या होणार आहेत.” – ऑफिसर.

“सर एक विचारू? या टेस्ट कशा करिता?” – अविनाश.

“कराव्या लागतात. तो प्रोटोकॉल आहे. तुमच्या सारख्या केस मधे काय काय करायचं यांचे नियम मॅन्यूअल मधे लिहिले  आहेत. त्या प्रमाणेच चाललं आहे.” – ऑफिसर.

दुसऱ्या दिवशी सलमाच्या पण सर्व टेस्ट झाल्या. सर्व जण मग नागपूरला परत आले.

“आमच्या दोघांच्याही सर्व टेस्ट झाल्यात, आता त्याचा अभ्यास करून तज्ञ मंडळी सांगतील, त्या प्रमाणे पुढची चौकशी होईल.” – अविनाश.

अविनाश आल्याचं कळल्यावर सारंग सर पण आले होते. विश्राम होताच. तो म्हणाला,

“आपल्याला सर्वांना जवळ जवळ सारखेच प्रश्न आणि ते ही पुन्हा पुन्हा विचारून झाल्यावर सुद्धा अजून चौकशी काय बाकी राहिली आहे?” – विश्राम.

“माझ्या मते त्यांनी ज्या टेस्ट केल्या, त्या बहुधा, अविनाश आणि सलमाची शारीरिक तपासणी करण्यासाठी असाव्यात. अविनाश, ३० वर्ष दुसऱ्या देशात होता. तो म्हणतो आहे की स्मृति आत्ता परत आली, पण तसं नसेल, आणि तो किंवा सलमा दुसऱ्या देशाच्या हेरगिरी विभागाच्या संपर्कात असतील, आणि त्यांनी यांच्या शरीरात काही चिप वगैरे ठेवली असेल, तर ते कळून येईल. ही दोघं कोणची औषधं घेत होती यांचा अंदाज येईल, त्यावरून हे लोकं कशाच्या अमलाखाली आहेत का हे कळून येईल. आणि हे फक्त अविनाशच्या बाबतीतच नव्हे तर सलमाला पण लागू पडतं. अविनाश इनोसंट असू शकतो, आणि सलमा एजंट असू शकते, ती पूर्ण पणे ट्रेंड एजंट असू शकते. ह्याच सगळ्या गोष्टी ते अगदी बारकाईने तपासणार असावेत. आणि यांचा निष्कर्ष निघाल्यावर, त्या आधाराने पुढची चौकशी होईल. आणि माझा अंदाज असा आहे, की पुढच्या चौकशीत मानसोपचार तज्ञ पण असतील.” – सारंग.

“बापरे, इतके सारे पैलू आहेत? पण सारंग, अविनाश काय किंवा सलमा काय दोघंही अगदी साधं आणि चारचौघा सारखं जीवन जगत होते, मग असा संशय का घेतल्या जातो आहे?” - विश्राम म्हणाला.

“ते साधे आहेत यावर आपला विश्वास आहे, पण सरकारचं काय? रोज २५ लोकं येऊन म्हणत असतील, की आम्ही साधे आहोत, तर त्याच्यावर डोळे झाकून कसा विश्वास ठेवणार? सरकार आपलं काम करत आहे, त्यांना ते करू द्या. जर तुम्ही इनोसंट आहात, तर तुम्हाला घाबरण्याचं काय कारण आहे? आम्हाला नागरिकत्व द्या, असा  अर्ज तुम्ही केला आहे, सरकार तुमच्या मागे लागलं नव्हतं की भारतात या म्हणून. तेंव्हा थोडी कळ सोसा, सर्व मनासारखं होईल.” – सारंग.

सारंग सरांचं बोलणं ऐकल्यावर अविनाश आणि सलमा दोघांच्याही चेहऱ्यावर चिंतेचं  सावट आलं.

“बापरे, म्हणजे आता आम्ही एजंट आहोत, असं गृहीत धरून आमची चौकशी होणार का? सिनेमात दाखवतात, तसं आम्हाला खुर्चीला बांधून मारपीट करतील का?”– सलमा.

“नाही, नाही असं काही होणार नाही. नेहमी प्रमाणेच तुमची चौकशी होईल. तेच प्रश्न पुन्हा विचारल्या जातील इतकंच. तुम्ही कुठलाही अपराध केला नाहीये, तेंव्हा घाबरण्याचं काही कारण नाहीये. चिंता करू नका.” सारंग सर म्हणाले, तरी सुद्धा दोघांच्याही चेहऱ्यांवर चिंता स्पष्ट दिसत होती.

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com