Login

धरसोड वृत्ती

मुलांच्या धरसोड वृत्तीचा पालकांना भोगायला लागणारा मनस्ताप यावर ही छोटीशी गोष्ट आहे
"हि असली धरसोड वृत्ती आता मी खपवून घेणार नाही पंकज. " मीनाताई कडाडल्या. घरात वातावरण आज चांगलेच पेटले होते. पंकज पाय आपटत लॅपटॉप घेऊन बाहेर निघून गेला.
पंकज, शैलेशराव आणि मीनाताई यांचे मध्यमवर्गीय त्रिकोणी कुटुंब. शैलेशराव निवृत्त बँक अधिकारी होते तर मीनाताई माध्यमिक शाळेत प्राध्यापिका होत्या. पंकज लहानपणापासूनच चंचल स्वभावाचा होता. स्वतःला काय हव आहे हे जाणून घ्यायच्या भानगडीत तो जास्त पडायचा नाही. सतत त्याला दुसर्‍यांच अनुकरण करण्याची सवय होती.
शाळेत असताना त्याची चित्रकला बघुन मीनाताईंनी त्याला चित्रकलेचा क्लास लावला पण मधेच त्याचा मित्र स्केटिंग च्या क्लास ला जातोय म्हणून त्याने चित्रकलेचा क्लास सोडुन स्केटिंग चा लावला आणि एकदोनदा पडल्यानंतर सोडुन दिला.
दहावीनंतर सुद्धा चांगले मार्क मिळाल्याने सायन्स ला अ‍ॅडमिशन मिळाली असताना सुद्धा मित्राचे ऐकून आर्ट्स ला अ‍ॅडमिशन घेतली आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करू लागला. त्याचा त्याला एका वर्षातच कंटाळा आला. त्याने आईवडिलांच्या मागे भुणभुण करत परत सायन्स ला अ‍ॅडमिशन घेतली ज्याच्यासाठी शैलेश आणि मीना ताईंना खूप आटापिटा करावा लागला.
बारावीनंतर त्याने हट्टाने कमी मार्क असताना मॅनेजमेंट कोट्यातून इंजिनिअरींग ला अ‍ॅडमिशन घेतली .पहिल्या वर्षी इलेक्ट्रॉनिक्स ब्रँच असताना दुसर्‍या वर्षी मित्राचे ऐकून कॉम्प्युटर सायन्स ही ब्रँच घेतली. तिथेही मीनाताई समजावणीच्या सुरात बोलल्या की,' बाळा तुझा इंट्रेस्ट कशात आहे बघ'. पण 'तुला आजकालच स्पर्धेच युग कळत नाही ग. मला माझ चांगल वाईट कळते' असे सांगून पंकज ने मीना ताईंना गप्प केले.
कॉलेज कॅम्पस मधून सिलेक्शन न झाल्याने त्याने मित्राचे ऐकून वेगवेगळे क्लास लावले आणि ढीग खटाटोप करून एका स्टार्ट अप कंपनी मध्ये जॉब मिळवला. पण तिथे पण काम जास्त आणि पॅकेज कमी म्हणुन दुसरा जॉब मिळायच्या आतच तो सोडुन टाकला.
त्यावेळी सुद्धा मीनाताई आणि शैलेश राव यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीही त्याने उलट उत्तर दिले, " तुमच्या वेळचा काळ वेगळा होता. तुम्ही आयुष्यभर एकाच ठिकाणी नोकरी केली. तुमची पिढी लाचार आणि घाबरट होती. आमची पिढी स्वाभिमानी आहे. आणि एकाला चार नोकर्‍या पडल्या आहेत. जी कंपनी एम्प्लॉईज ना गाढवा सारखे राबवते आम्ही तिथे थांबत नाही. आमच्याकडे आभाळाएवढ्या संधी आहेत, आणि मी काय करायच ते मी माझ बघुन घेईन. "
त्याच्या अशा वागण्याने दोघेही सतत टेंशन मध्ये असायचे. मध्यंतरी त्याने आपली सगळी सेव्हिंग स्टॉक मार्केट मध्ये गुंतवली एका मित्राच्या सांगण्यावरून आणि त्यात त्याला भारी नुकसान झाले. आणि ही गोष्ट शैलेश ना त्याच्याच मित्राकडून कळाली.
त्यावरून आज घरात वातावरण तापले होते. पंकज चिडून बाहेर निघुन गेला आणि घरात हे दोघे पती पत्नी डोक्याला हात लावून बसलेले. रात्री उशिरा कधीतरी पंकज घरी येऊन झोपला.
दोन महिने या घटनेला होऊन गेले, आता मीनाताई ना वाटले इतके नुकसान झाले आहे तर पंकज जबाबदारीने पावले उचलेल. त्यांना वाटले हा कुठेतरी जॉब शोधत असावा. त्या महिन्यात शैलेश यांचे रिटायरमेंट चे काही फंड्स त्यांच्या खात्यात जमा झाले.
दोन दिवसानी पंकज बाबांसमोर बसला आणि म्हणाला, "बाबा, मी आणि माझा एक मित्र मिळून स्टार्ट अप कंपनी सुरू करायचा प्लॅन करत आहोत. त्यासाठी आम्हाला 20 लाख रुपयांची गरज आहे. यातले 10 लाख माझा मित्र देणार आहे तर बाकीचे 10 लाख तुम्ही मला द्या. एकदा बिझनेस रूळावर आला की मी तुम्हाला परत देतो. " अचानक 10 लाखांची मागणी पंकज करतोय हे बघुन शैलेश चक्रावले. पण सावरून म्हणाले, "अरे पण मी कुठून तुला 10 लाख रुपये देऊ?" त्यावर पंकज झटकन उत्तरला, "अहो तुमचे नुकतेच रिटायरमेंट चे पैसे आलेत ना, तर त्यातून होऊन जाईल. "
बाबांना काय बोलायचे सुचतच नव्हते. मीनाताई आतुन सगळे ऐकत होत्या. रिटायरमेंट च्या पैश्याची गोष्ट छेडल्यामुळे त्यांचा संताप झाला. तडक बाहेर येऊन त्यांनी खुर्ची ओढली आणि बाप लेकाच्या समोर बसल्या.
त्यांनी पंकज ला शांतपणे विचारले, " पंकज, हा जो तुझा मित्र आहे त्याला बिझनेस चा किती वर्षांचा अनुभव आहे? आणि बिझनेस कोणता करायचा विचार आहे?" अचानक आई आल्याने पंकज गोंधळलेला पण धीटपणे म्हणाला, "अग आई, मी बोललो ना स्टार्ट अप बिझनेस आहे तर त्याला तरी कसा अनुभव असणार. तोही माझ्यासारखाच नवीन आहे .आणि बिझनेस फूड सप्लाय चेन मध्ये आहे. " मीनाताई पुन्हा शांततेत म्हणाल्या, "बर मला सांग तुम्ही इतक्या पैशाची गुंतवणूक कशी करणार आहात, त्याचा काही आराखडा असेल तर दे आणि मार्केटिंग कशी करणार तेही सांग. "
आता पंकज पुरता गोंधळलेला. " अग अजून आम्ही आराखडा नाही काढला कच्चा हिशोब ठेवलाय आणि आम्ही आमचं आम्ही बघून घेऊ ना कस करायच ते. तुम्हाला त्यातल काही समजणार नाही. बाबा, तुम्ही पैसे द्याल की नाही सांगा ." पंकज ने घाईने विषय बदलला.
आता मात्र मीना ताईंचा धीर सुटला. "मुळीच देणार नाहीत बाबा पैसे, तुला आई बाप म्हणजे एटीएम वाटतात का ? की आम्ही तुला खोडरबर वाटतोय तुझ्या मागच्या चुका पुसून टाकायला. आमची पिढी घाबरट आणि लाचार वाटते ना तुम्हाला. त्याच लाचारी ने आम्ही आयुष्यभर कष्ट करुन आमच्या म्हातारपणाची सोय करुन ठेवली आहे. लहानपणापासून तुझ्या धरसोड वृत्तीने हैराण झालो आहोत आम्ही. एक गोष्ट स्वतः ची ठरवुन पुर्ण केली नाहीस तु, आज याच ऐक उद्या त्याच ऐक. आईबाप म्हणून आजपर्यंत आम्हीही सहन केल. पण म्हणुन आयुष्यभर आम्ही तुला पोसणार नाही. तुच म्हणाला होतास ना तुमच्या पिढीकडे भरपूर संधी आहेत तर मग मिळव संधी लाग नोकरीला पैसे जमव आणि सुरु कर तुला हवा तो बिझनेस. आजपासून तुला घरातून काहीही आर्थिक मदत मिळणार नाही. तुला जॉब लागेपर्यंत तु घरात राहु शकतोस तेही फक्त 3 महिने. त्यानंतर तु तुझी तुझी सोय बघायची. आणि अजून एक 'तुम्हाला काय कळतय' ची पिपाणी परत वाजवायची नाही,मी एक प्राध्यापिका आहे आणि तुझे वडील बॅंकेत अधिकारी होते समजल. "
कधी नव्हे ते आईच ईतक टोकाचे बोलणे ऐकून पंकज बिथरला. तिच्या बोलण्याला बाबांची मूकसंमती होतीच. त्याला वाटलं काही दिवसानी हे लोक विसरतील पण एक महिन्याने मीना ताईंनी पुन्हा विचारले,"शोधला का जॉब? लक्षात आहे ना फक्त 2 महिने शिल्लक आहेत. " आता मात्र त्याला कळून चुकले स्थिर नोकरी शोधल्याशिवाय गत्यंतर नाही. घाबरून का होईना त्याने नोकरी शोधायला सुरवात केली.

तात्पर्य:- काही मुले आईवडिलांच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊन आयुष्याकडे जबाबदारीने न बघता उधळपट्टी करत राहतात. आणि काही पालक सुद्धा आज ना उद्या याला अक्कल येईल म्हणून सहन करत राहतात. मुलांना वेळीच आवर घालणे आणि त्यांना येनकेन प्रकारे जबाबदारीची जाणीव करून देणे हे पालकांचे कर्तव्य आहे.

0