शहिदांच्या स्वप्नातील भारत आणि सद्यस्थिती
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले. त्यात अनेक थोर नेते जसे की लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी आणि बरेच होते. ह्यात अनेक लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. अनेक क्रांतिकारकांनी आपल्या मातृभूमीसाठी बलिदान दिले होते. कित्येक तरुण हे शहीद झाले. त्यामुळे भारताला सहजासहजी इंग्रजांकडून स्वातंत्र्य प्राप्त झाले नाही हे आजही लोकांना ठाऊक आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले. त्यात अनेक थोर नेते जसे की लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी आणि बरेच होते. ह्यात अनेक लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. अनेक क्रांतिकारकांनी आपल्या मातृभूमीसाठी बलिदान दिले होते. कित्येक तरुण हे शहीद झाले. त्यामुळे भारताला सहजासहजी इंग्रजांकडून स्वातंत्र्य प्राप्त झाले नाही हे आजही लोकांना ठाऊक आहे.
ऑगस्ट महिन्यात नऊ तारखेला ‘क्रांतिदिन’ साजरा करण्यात येतो. त्यावेळी शहिदांना त्यांच्या केलेल्या कार्याबद्दल अभिवादन करण्यात येते.मार्च महिन्यात २३ मार्च हा ‘शहीद दिन’ म्हणून ओळखला जातो. कारण ह्याच दिवशी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू ह्यांना फाशी देण्यात आली होती.
तत्कालीन परिस्थितीत पारतंत्र्यात राहणे आणि अन्याय सहन करणे हे क्रांतिकारकांना मंजूर नव्हते. त्यामुळे त्यांनी आपल्या देशासाठी आपल्या प्राणांची पर्वा कधीच केली नाही. असे नव्हते की त्यांना माहीत नव्हते की ह्याचा परिणाम पुढे काय होईल, पण काही न करता हातावर हात ठेवून बसणे त्यांना शक्य नव्हते. भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना इंग्रजांविरुद्ध बंड करुन ब्रिटीश पोलिस अधिकारी जॉन. पी. सॅण्डर्सची हत्या केल्याप्रकरणी २३ मार्च १९३१ रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली होती.
इंग्रजांनी अजून कोणी त्यांच्या विरोधात जावू नये म्हणून वचक बसवण्यासाठी त्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली.यानंतर सर्व देशच ह्या घटनेने पेटून उठला होता आणि त्यांच्या बलिदानानंतर देशमुक्तीची चळवळ अजूनच तीव्र झालेली होती. देशभक्तीचे उदाहरण साऱ्या देशवासीयांना देवून स्वातंत्र्यलढ्यात शहीद झालेले शिरीषकुमार सारखे बालक, तरूण क्रांतिकारक आणि स्त्रिया ह्यांनी नवी प्रकाशाची ज्योत प्रत्येकाच्या मनात ह्यामुळे तेवत ठेवली होती.
असे म्हणतात जेव्हा भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव हे तिघे तुरूंगात होते तेव्हा त्यांचे वय जास्त नव्हते आणि त्यातही ते व्यायाम करत होते आणि निश्चिंत होते. त्यांच्या डोळ्यांत मृत्यू विषयी भय नव्हते. त्यावेळी स्वातंत्र्य हे एकच ध्येय त्यांच्यासमोर होते. हिंसेचा वापर केल्याने त्यांना मवाळमतवादी होते त्यांनी मदत केली नाही.
आपल्याला जरी स्वातंत्र्य अनुभवता आले नाही तरी येणाऱ्या पिढीने ते अनुभवावे हा निःस्वार्थी हेतू शहिदांचा होता. एक चांगला आणि प्रगत देश जो स्वतंत्र असावा हीच आकांक्षा त्यांची होती. कारण जेव्हा देश आपला असेल तेव्हाच आपण तिथे मुक्तपणे श्वास घेवू शकतो आणि आपल्या मातीवर कोणाची जबरदस्ती मालकी नसावी हाच त्यांनी विचार केला होता.
आता देशाला स्वातंत्र्य होऊन अनेक वर्षे झाली पण आताची तरूण पिढी ही व्यसनाधीन झालेली दिसते. काही करण्याची जिद्द खूप कमी प्रमाणात त्यांच्यात दिसून येते. इथे स्वतःचे पाहणारे दिसतात. क्रांतिकारकांनी तर देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले प्राण हसत हसत अर्पण केलेले होते तेही कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता.
आपल्या देशातील वस्तूंचा अभिमान होता त्यामुळे परकीय वस्तूंवर त्यांनी बहिष्कार टाकला होता पण आता देशवासीयांना परदेशी वस्तूच भुरळ जास्त घालतात.
आपली मातृभाषा आणि राष्ट्रभाषा ह्यासाठी अभिमान असायला हवा पण आता अन्य भाषेत बोलून आपण काहीतरी वेगळे आणि खास आहोत असेच बऱ्याच लोकांना वाटते.
क्रांतिकारक किंवा देशभक्त फक्त ह्यासाठी शहीद झाले नव्हते की आपल्या देशाचे हीत न जाणता फक्त स्वतःचा स्वार्थ साधून जगायचे. त्यांना प्रत्येक गोष्टींसाठी लढा द्यावा लागला आहे मग ते शिक्षण असो की स्वतःच्या शेतातील पिके पण आता तर आपल्याला सहज सर्व उपलब्ध होत आहे. त्यामुळे त्यांचे कष्ट न विसरता त्यांची देशाप्रतीची एकनिष्ठा आणि प्रेम हे गुण सर्वांनी घेण्यासारखे आहेत.
सैनिक जसे आपले कुटुंब मागे ठेवून आपल्या देशाचे शत्रूंपासून संरक्षण करतात तसेच सीमेवरच फक्त न जाता आता ज्या समस्या देशात चालू आहेत जसे की बेरोजगारी, वाढते गुन्हे, शेतीविषयक किंवा अन्य समस्या ह्या सर्वांचे हीत समजून एक सुजाण नागरिक ह्या नात्याने ह्या समस्या सोडवण्यास मदत करायला हवी. बदलते हवामान हे वाढत्या प्रदूषणामुळे होत आहे तर एकत्र येऊन त्यावर तोडगा काढायला हवा.
जर असा विचार केला की हेच त्यावेळी शक्य झाले असते का तर उत्तर कदाचित देता आले नसते पण जर इच्छाशक्ती असेल तर एकजुटीने सर्व काही करता येते हा आपला इतिहास नेहमीच सांगतो.
आपल्याकडे विविध साधने अस्तित्वात आहेत त्याचा वापर करून सुधारणा होऊ शकतात. आपला देश सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत आहेच पण क्रांतिकारकांचे थोर विचार म्हणजे परिस्थिती आल्यावर त्याग आणि खडतर वेळ आल्यावर त्याचा स्वीकार करून त्यावर मार्ग काढणे हे त्यांच्यातले गुण घेण्यासारखे आहेत.
एका दिवसांत हे सर्व होणार नाही, पण वरून आपले शहीद झालेले वीर ह्यांनी आपल्याकडे पाहिल्यावर त्यांनी जे देशाचे स्वप्न पाहिले होते आणि त्यासाठी बलिदान दिले ते सार्थक झाल्याचे समाधान नक्कीच त्यांना मिळण्याचा प्रयत्न सर्व भारतीयांनी करायला हवा. कारण आज आपला भारत देश स्वतंत्र आहे आज याचे खरे कारण म्हणजे हे क्रांतीवीर शहीद झालेले देशभक्तच!
जो पर्यंत आकाशात सूर्य दिसेल तो पर्यंत शहिदांचे मातृभूमीसाठी दिलेले योगदान त्यांच्या नावासकट प्रत्येक भारतीयांच्या मनात आणि हृदयात नक्कीच राहणार हे सत्य आहे.
©विद्या कुंभार
सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे राखीव आहेत.
फोटो सौजन्य साभार गुगल
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा