कथा: इन्फिनिटी-भाग 3
विषय : सामाजिक कथा
राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा
टीम : अमरावती
प्रयोगाचा दिवस उजाडला. अमर अतिशय उत्साहात होता. प्रयोगशाळा सज्ज होती आणि राकेश सर सुद्धा आले होते.
"सर, प्रत्येक धर्मात त्यांच्या देवाने जीव निर्माण केला आहे हे सांगितले. बघा ना, कुणी म्हटले अॅडम पहिला सजीव, ब्रम्हदेवाने आपल्या अवयवातून मनुष्य निर्माण केला ही एक समजूत तर काही लोक मानतात की त्यांच्या देवाने चिखलातून मनुष्य निर्माण केला.
जितके धर्म तितक्या वेगवेगळ्या या कथा आहेत सर.
पण मी निर्जीवातून आज जीव निर्माण करणार, की जे करोडो वर्षे आधी पृथ्वीवर घडले असावे आणि जीवाची उत्पत्ती झाली.
चला तर मग सर, प्रयोगाला सुरुवात करूया."
अमर उत्साहाने सळसळत होता, एक वेगळीच चमक त्याच्या डोळ्यांत दिसत होती.
त्याने एक ट्रान्स्पेरेंट चेंबर बनवला होता ज्यात निर्जीव रसायने जसे की हायड्रोजन, अमोनिया इत्यादींचे मिश्रण होते. त्याने इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फिल्डच्या सहाय्याने त्या मिश्रणास प्रचंड वेगाने ढवळण्यास सुरू केले. काही तासानंतर त्याने त्याचं खास नॉलेज वापरलं आणि मिश्रणातील अणू विखुरतील अशी प्रक्रिया सुरु केली. विखुरणे ही थर्मोडायनामिक्स मधली महत्त्वाची संकल्पना ज्याला एंट्रोपी म्हणतात.
जितके जास्त अणू विखरत होते तितक्याच वेगाने एकमेकांवर येऊन आदळत होते.
त्या रासायनिक प्रक्रियेचा वेग प्रचंड वाढत चालला होता, मिश्रण घुसळल्या चालले होते.
ते बघून राकेश सरांना एकदम "समुद्र मंथन" घटना आठवली.
पण ते चूप राहिले कारण अमरच्या उत्साहावर त्यांना पाणी फिरवायचे नव्हते.
तितक्यात अमरच्या आवाजाने ते भानावर आले. अमर आनंदाने ओरडत होता, नाचत होता.
"येस सर, फायनली मी करून दाखवले. बघा, ही रासायनिक प्रक्रिया पूर्ण झाली आणि रिअॅक्शनचा प्राॅडक्ट बघा काय आहे....न्यूक्लेईक अॅसिड चा रेणू....सर, न्यूक्लेईक ऍसिड...डी एन ए चा बेस.. जीवाच्या उत्पत्तीचा संकेत."
"नक्कीच जीव असाच उत्पन्न झाला आणि निरनिराळ्या अवस्थांतून जात, ज्ञान मिळवत, अत्यंत अप्रगत अश्या आदिमानवाच्या अवस्थेत होता आणि नंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करत, संशोधन करत आजच्या प्रगत, आधुनिक अवस्थेत आहोत आपण."
"सर, मी जिंकलो, देवाच्या मदतीशिवाय निर्जीवातुन जीव तयार झाला. मी सिद्ध केले की देवाने मनुष्य नाही बनवला तर मनुष्याने देव संकल्पना बनवली आहे."
"सर, आपण कुठून आलो या भूतकाळासोबतच मी मानवजातीचे भविष्य बघू शकणारा एक अतिशय प्रगत असा प्रयोग करणार आहे, त्याचे उद्घाटन तुमच्या हस्ते आज करूया आणि भविष्य बघूया."
"नाही अमर, भविष्यात डोकावण्याचा प्रयत्न करू नकोस. तू निश्चितच एक ग्रेट वैज्ञानिक आहेस, प्रचंड बुद्धिमान आहेस पण हा मूर्खपणा करू नकोस. भूतकाळात डोकावलास तू हे एकवेळ मान्य, कारण न समजलेल्या गोष्टींची उकल करणे कारणे शोधणे हा मनुष्याचा स्वभाव आहे आणि तो हक्क त्याला आहे. पण काळाच्या पुढे जाण्याचा विचार करू नकोस, प्लीज. "
पण अमर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
क्वांटम मेकॅनिक्स वापरून त्याने अॅप बनवले होते.
मानवजातीचा आजपर्यंतचा प्रवास, क्षमता यांचे अॅनॅलिसिस करून अॅ पने भविष्य दाखवणे सुरू केले.
मनुष्य अतिशय प्रगत होत जाणार आहे. तंत्रज्ञान म्हणजेच मनुष्य असेल. दैनंदिन वापरतो त्या वस्तू आपल्या शरीराचाच एक भाग असतील इतके प्रगत होणार आहोत. पण हे काय? काय सांगतोय संगणक? इतके प्रगत होऊनही मनुष्य संपणार आहे? कुठलातरी विषाणू त्याला कारणीभूत असेल....
राकेश सरांना पुन्हा उत्क्रांतीवादाची आठवण झाली. निर्माण झालेली गोष्ट नष्ट होऊन पुन्हा नवनिर्माण होणार, आणि नवनिर्मिती ही काळानुसार प्रगत असणार. संपलो तरीही फिनिक्स पक्ष्यासारखे मनुष्य पुन्हा जन्म घेणार...
राकेश सरांनी खूप विरोध केला, अमरला समजावले पण तो यशाच्या धुंदीत होता.
काहीही न ऐकता त्याने त्याचे प्रयोग, निष्कर्ष व्हायरल केले.
जगभरात हाहाकार माजला.
लोकांनी फक्त विषाणू वर लक्ष केंद्रित केले. त्याच्या धसक्याने लोक घरात बंदिस्त झाले.
अमर सांगत होता की भविष्य बघा, किती प्रगत आहे, विषाणूचा विचार करू नका. आणि देव धर्माचा तर मुळीच करू नका. देवाने सृष्टी निर्माण केलेली नाही, जीव निर्माण केलेला नाही.
पण सर्वसामान्य लोक अशांत झाले होते.
अमरच्या एका प्रयोगामुळे मानसिक स्थैर्य नष्ट झाले होते, मानसिक आणि सामाजिक अशांतता पसरली. अंदाधुंदी माजली आणि शेवटी मनाला शांत करण्याचा पर्याय म्हणून लोक देवाच्या देवळात ठाण मांडू लागले. देवपूजेतून मनाला शांत करू लागले.
हा अमरला बसलेला पहिला धक्का होता.
त्याच्या प्रयोगाने देवाचे अस्तित्व संपणे तर दूरच पण देवाचे महत्व वाढले होते.
त्याला कळेनासे झाले की असं का झालंय?
आणि विचार करता करता त्याच्याही लक्षात आले की यशस्वी झालो तरी मनाला समाधान लाभलेले नाही, मानसिक स्थिरता नाही, शांतता नाही.
सतत मनात विचारांचे काहूर उठलेले असते.
"प्रयोगातून मला स्थिरता, समाधान का नाही मिळाले सर? माझे ध्येय तर मी साध्य केले तरी मन अशांत का आहे?," अमर राकेश सरांना विचारत होता.
"याचे उत्तर तर मलाही देता येणार नाही बेटा. पण तुला जर मनःशांती हवी असेल तर एक सल्ला देतो. आपल्या मंदिरात संदीपभैयाचे प्रवचन सुरू आहे, ते एकदा तरी ऐक. माझा प्रयोग आहे असे समज. तुझ्या प्रयोगाला मी उपस्थित राहिलो तसे आता तू माझ्यासोबत चल."
"मी आणि देवळात? शक्य नाही सर, मला जमणारच नाही."
"बरं, देवळात नको येऊस पण माझ्यासोबत चल तर, फक्त सोबत म्हणून. तू देवळाच्या आवारातच थांब हवं तर, पण चल माझ्यासोबत."
रसायनशास्त्र संदर्भ: रसायनशास्त्राची पुस्तके
धन्यवाद!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा