Login

निरागस प्रेमाची गोड गोष्ट भाग 10

Love Story


( गेलया भागात शुभमच्या बोलण्याने सायलीचे आईबाबा त्यांच्या स्वप्नरंजनातून बाहेर कसे आले ते आपण पाहिलं. आपण सगळे निर्णय स्वतःच घेतले,घाई केली याची त्या दोघांना जाणीव झाली. त्यांनी  सायलीसोबत शांतपणे बोलण्याच ठरविलं. त्याप्रमाणे आई रात्री सायलीसोबत जाऊन बोलली. तिच्या मनाचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तिनेही बर्‍याच दिवसांनंतर न चिडता तिचं मन आईपाशी मोकळं केलं. समरविषयीही ती बोलली. आता आईबाबांना सायलीचं मत तरि कळलंय पण समरकडे काय चालू आहे सध्या काय माहित. पाहुया सायलीचे बाबा आता काय करतात.)

" हॅलो, कोण बोलतंय ?"  
"हॅलो, अॅडव्होकेट जहागिरदार ना ?"
" हो, बोलतोय आपण ?"
" नमस्कार, मी विश्वास भागवत सायलीचा बाबा बोलतोय "
" ओह...नमस्कार नमस्कार कसे आहात तुम्ही ? मागे समरच्या वाढदिवसाला आलेलात घरि तुम्ही. बरेच दिवस काही भेटच नाही आपली." समरच्या बाबांनी बोलायला सुरुवातच केली.
" हो हो " इकडून सायलीचे बाबा म्हणाले.
" बरं दिवाळीची तयारी कशी चाललीय ?" सायलीच्या बाबांनी काही बोलायला सुरुवात करण्याआधीच जहागिरदारांनी विषय काढला. आता काय बोलावं ते न सुचुन ते म्हणाले," हो, तयारी तर काय जोरात सुरु आहे.आमच्या घरात महिलाराज तुम्हाला माहितच आहे." हसत ते म्हणाले.
" हो हो, कसली चिंता नाही " जहागिरदारही हसले आणि थोडे भावूक झाले. ते विश्वासच्या लक्षात आलं.
" का हो, अचानक थांबलात हसता हसता, काय झालं ?" जहागिरदार आता समरबद्दल काहीतरी बोलतील, त्याच्या वागण्याबद्दल तक्रार करतील या आशेनं सायलीच्या बाबांनी विचारलं.
" काही नाही, सणसमारंभ असले ना कि घर खायला उठतं. घरात आम्ही दोघेच. " पलिकडून सायलीचे बाबा जहागिरदारांचं बोलणं कान देऊन ऐकत होते. ते लगेचच म्हणाले, " सर सुनबाई आणा कि मग " 
" होय हो, माझ्याही मनात तोच विचार आलाय. मी समरला बोललोही पण अलिकडे त्याचं काय बिनसलंय कळेना. एकटाच त्याच्या रुममध्ये काय बसलेला असतो, मला न सांगता बाहेर काय निघून जातो, कुणी मित्राने बोलावलं तर कामाचं कारण सांगून टाळतो. बेंगलोरहून आल्यापासून असंच चाललंय. खरंतर इतक्या वर्षांनी तो घरि आला म्हटल्यावर खूश असायला हवं ना ! " जहागिरदार पटापटा बोलून मोकळे झाले. दोन पालक मुलांच्या विषयांवर कुठेही बोलू शकतात हेच खरं. सायलीचे बाबा हे सगळं काळजीपूर्वक ऐकत होते. इकडे सायलीही अशीच वागते हे त्यांना सांगावंस वाटत होतं पण सावरुन ते म्हणाले.
" चालायचचं हो मुलांचे मूड वेगवेगळे. आता आमची सायली तिही अशीच वागते. लग्नाचा विषय काढला तरी चिडते. आम्ही जास्त मागे लागलो म्हणून नेहमीसारखं बोलणंही बंद केलं तिने ! "
 " रे देवा, मग समजावलंत का तिला ? तशी गोड मुलगी आहे हो ती " जहागिरदार म्हणाले.
" हो समजावलं आणि तिच्या मनात कोण आहे हेही कळालं."
" हो का, बरं झालं." जहागिरदार हसत म्हणाले
" हो, पण तुम्हाला चालेल का ती सुनबाई म्हणून " सायलीच्या बाबांनी सरळ विचारुन टाकलं. 
" अहो काय म्हणता ? म्हणजे समर नी सायली ! वा काय सांगता काय अहो मला कल्पनाच नव्हती." खूश होत जहागिरदार म्हणाले. त्यावर त्यांचा उत्साह आणि आनंद पाहून अजून काही गोंधळ व्हायला नको म्हणून सायलीच्या बाबांनी त्यांना समजावत आतापर्यंत घडलेली सगळी हकिकत सांगितली. सायलीचा उडालेला गोंधळ, तिची चिडचिड, ती आईला जे बोलली ते सगळं त्यांनी सांगितलं. त्यावर जहागिरदार म्हणाले,
" बरं, बरं असं आहे तर सगळं. मी मी समरशी बोलतो सविस्तर आणि कळवतो तुम्हाला. डोन्ट व्हरी." त्यांनी समरशी बोलण्याचा शब्द सायलीच्या बाबांना दिला त्यामुळे इकडे सायलीचे बाबा आता निश्चिंत झाले.

..........................

" समर अरे जेवायला येतोस ना" लॅपटॉपमध्ये डोक खुपसुन असलेल्या समरला बाबांनी विचारलं.
" हो बाबा झालं हे कम्पलिट करतो.एक दोन मेल करायचे होते. त्याने ' शट डाऊन ' वर क्लिक करुन काम संपवलं आणि मांडीवरला लॅपटॉप बाजूला केला.
" चलो " तो उठत म्हणाला तसे बाबा समोर येत म्हणाले,
" बस जरा, मला बोलायचं आहे " बाबांचा शांत आवाज आणि गंभीर हावभाव पाहून तो घाबरला. कदाचित बाबांनी लग्नाचा विषय खूपच मनावर घेऊन स्थळ वगैरे पहायला लागले की काय माझ्यासाठी असा विचार त्याच्या मनात आला.
" समर बसतोस ना " त्याच्या हात पकडत बाबा म्हणाले तसा तो खाली बसला.
" समर, मी गेले काही दिवस पाहतोय तुझ लक्ष नाही आहे कश्यातच. काय झालंय ?"
" क  काही नाही बाबा. मी मागे बोललो ना अॉफिसचं टेन्शन बाकी नथिंग." तो बाबांची नजर चुकवूत बोलला.
" ओके पण आता तर सुटी आहे दिवाळीची तर एन्जॉय."
" हं " 
" एक विचारु का ?"
" परमिशन कसली बाबा विचारा ना "
" तुला कोणी आवडतं का आयमिन मी उगीच स्थळ वगैरे पहायचो आणि तुझा चॉइस ठरलेला असायचा असं नको ना व्हायला. "
" नाही बाबा तसं काही पण तुम्ही खरंच स्थळं पहाणार आहात?" त्याने न राहून विचारलं.
" हो मग मला तर बुवा एकट्याला कंटाळा आला सुनबाई आली तर बोलायला येईल घरात कुणीतरी. तु तर तुझ्या कामातच बिझी असतोस." त्याचा अंदाज घेत बाबा बोलत होते.
" तसं नको आयमिन असं लगेच स्थळं वगैरे कश्याला ना !"
" हो पण आजचं एक स्थळ आलंय !" बाबांच्या या वाक्यावर भूकंप झाल्याचा फिल त्याला आला.
" काय ! केव्हा " त्याची हि प्रतिक्रिया पाहून बाबा म्हणाले,
" म्हणजे  मी काही कन्फर्म नाही सांगितलंय त्यांना म्हटलं त्याला विचारतो आधी. फोटोही आहे तिचा हा बघ." बाबांनी फोटो दाखवण्यासाठी मोबाईल त्याच्या समोर धरला. फोटो पाहताच त्याला धक्काच बसला हा तर सायलीचा फोटो बाबा हे काय बोलतायत ते त्याला समजेना.
" बाबा, उगीच मस्करी नको हे कसं शक्य आहे."
" का शक्य नाही ?" बाबांनी मोबाईल खिश्यात ठेवत म्हटलं.
" कारण तिच लग्न ठरलंय अॉलरेडी."
" शुभमशी होय ना .अरे हा विसरलोच मी भेटलोय नाही का त्याला आपल्याच घरी !" बाबांना कसं कळलं हे ! त्याला अजून एक आश्चर्य वाटलं.
" मी त्याला तुझा मित्र समजत होतो मग मला कसं समजलं हे होय ना !" बाबांनी डोळे मिचकावत विचारलं.
" करेक्ट " तो म्हणाला.
" बाकी छान मुलगा आहे हा तो! पण कसं आहे ना सायलीलाच तो पसंत नाही त्याला कोण काय करणार !" बाबा हलकसं हसत म्हणाले.
" का ? " समर आता थोडा रिलॅक्स झाला. मनातुन त्याला हे ऐकून आनंद होत होता.
" कसं आहे ना ! तिचा खूप गोंधळ उडालाय त्यात तिलाही एकजण आवडतो." हे ऐकुन मात्र त्याचा चेहर्‍याचा रंगच उडाला.
" हो का ओके " तो नाराजीनेच म्हणाला. यावर बाबांना आता अजून ताणून धरायला नको वाटलं ते त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले.
" अरे वेड्या मुला,She likes you. What're you doing ! " बाबांचे हे शब्द ऐकून त्याने अविश्वासाने त्यांच्याकडे पाहिलं. ते छानसं हसले. त्याला काय कसं अनेक प्रश्न पडलेत ते त्यांच्या लक्षात आलं. बाबांनी सकाळी सायलीच्या बाबांशी झालेलं बोलणं त्याला सांगितलं. सगळं ऐकल्यानंतर तो खूश झाला पण लगेच त्याने म्हटलं,
" बाबा पण आमची मैत्री आहे,हा आम्हाला एकमेकासोबत रहायला आवडतं पण......"
" अरे, मैत्रीच नातं पुढच्या टप्प्यावर जाणं हि काय वाईट गोष्ट नव्हे, हा पण प्रत्येक मैत्री हि प्रेम नसते हेही प्रत्येकाने लक्षात ठेवावं पण खरंच दोन जिवांना एकत्र ठेवणारी मैत्री एका नात्यात बांधली जात असेल,जर त्यांचे इंन्टरेस्ट जुळत असतील,ते एकमेकाला समजून घेत असतील, एकमेकाच्या इमोशन्सचा विचार करित असतील तर काय हरकत आहे. शेवटी नवरा बायकोच्या नात्यातही मैत्रीच महत्वाची असते तर ते नातं एव्हरग्रीन राहतं समजलं. सो आता कसले विचार मनात आणू नकोस. तुझ्या मनाचं ऐक." एवढं समजावून बाबा उठले. तसा समरही उठला. दोन तीन क्षण शांततेत गेले.
" बाबा, तुम्ही कळवा त्यांना."
" हा काय ते ?"
" हेच I also like her " तो बोलला तसे बाबा मागे वळले आणि हसले. " झालं की तुमच्या मनासारखं" बाबांनी त्याला मिठी मारत म्हटलं. खूप खूश झाला तो आणि बाबाही खूश झाले लवकरच सुनबाई येणार होती.

.....................
सकाळी विश्वाससोबत बोलताना ठरल्याप्रमाणे जहागिरदारांनी समरचा होकार त्यांना कळवला. समरचे बाबा त्याच्याशी बोलतो म्हणाले होते पण इतक्या लवकर हा प्रश्न सुटेल असं त्यांनाही वाटलं नव्हतं. समरच्या बाबांनी सायलीच्या बाबांचं अभिनंदन केलं. सायलीलाही हे कळवण्याचा निरोप दिला. दोन दिवसांवर दिवाळी आली होती. त्यामुळे दिवाळी दिवशी सर्वांनी घरि येण्याचं आमंत्रणही त्यांनी सायलीच्या बाबांना दिलं. इकडे सायलीच्या बाबांनी हि आनंदाची बातमी आधी सायलीच्या आईला सांगितली. सायलीला हे कळताच आभाळाएवढा आनंद झाला. त्या क्षणापासून कधी एकदा समरच्या घरी दिवाळीला जातो असं तिला वाटलं. ती त्याने स्वतःहून बोलण्याची वाट पाहत होती. शेवटी रात्री त्याने मेसेज केला. 
' निरोप मिळाला का' आणि पुढे खूप स्माईलीचे स्टिकर्स. ती आनंदित झाली. इतक्या दिवसांचा अबोला एकदाचा संपला. या सगळ्या वातावरणात दुसर्‍या दिवशी मात्र  आईने बाबांना शुभमच्या वडिलांना फोन करण्याची आठवण केली. शुभम त्यांच्याकडे येऊन त्याचा निर्णय सांगून गेला होता पण शुभमच्या बाबांशी सायलीच्या बाबांचं या विषयावर बोलणच झालं नव्हतं. आपण स्वतःहून त्यांची माफी मागावी. आपल्या अतिघाई करण्यामुळे शुभमला नाही म्हटलं तरि त्रास झाला असं सायलीच्या आईला वाटतं होतं. मग बाबांनी शुभमच्या वडिलांना फोन करुन दिवाळीच्या अॅडव्हान्स शुभेच्छांसह सायली आणि समरच्या निर्णयाविषयीही कळवलं. त्यांची माफीही मागितली. शुभमच्या बाबांनाही हे नातं पुढे गेल्याचा आनंद झाला. शुभमलाही आपण हि आनंदाची बातमी सांगतो असंही ते सायलीच्या बाबांना म्हणाले. शुभमने दोन जीवांचं प्रेम त्यांना मिळवून दिलं होतं म्हणून बाबांना लेकाचा अभिमान वाटला. इकडे आपल्या लाडाच्या लेकीला तिच्या मनासारखा जोडीदार मिळाला म्हणून सायलीचे आईबाबा देवाचे आभार मानत होते. आईविना वाढलेला आपला लेक मोठा झाला. आता घरात कितीतरी वर्षांनी लक्ष्मी येणार म्हणून समरचे बाबाही आनंदी होते. दिवाळीचा आनंद या नव्या गोड नात्यांनी द्विगुणीत झाला होता.

क्रमशः 

0

🎭 Series Post

View all