(दहाव्या भागात सायलीच्या बाबांनी समरच्या बाबांना सायलीचं समरविषयीचं मत कळवलं. ते सायलीच्या लग्नासाठी स्थळं पाहत होते पण त्यातून पुढे किती गोंधळ उडाला आणि सायलीला आपण कसं विचारात घेतलं नाही हे सगळ त्यांनी जहागिरदारना सांगितलं. समर इतके दिवस असा अस्वस्थ का होता याचं उत्तर त्यांनाही मिळालं. सायली आणि समरच्या मैत्रीविषयी त्यांना कल्पना होतीच पण सायली सुन म्हणून आपल्या घरी येईल असं त्यांना वाटलं नव्हतं. त्यांनीही समरच्या मनात काय आहे ते जाणून घ्यायचं ठरवल. समरला तर शुभम आवडला होता पण सायलीविषयी त्याच्या मनात नेहमीच एक वेगळी जागा होती. फक्त ते सांगण्याचं धाडस त्याने कधी केलं नव्हतं. आणि शुभम -सायलीच्या होऊ घातलेल्या नात्यात फूट पाडून तिला दुःखी नव्हतं करायचं त्याला. पण सायलीला आपण आवडतो हे समजल्यावर तोही या नात्यासाठी तयार झाला. आता पाहुया कथेचा शेवटचा भाग)
बर्याच दिवसानंतर घर पहिल्यासारखं हसत होतं. सायली आणि आईमधले रुसवे- फुगवे संपले होते. दोघी पुन्हा पहिल्यासारख्या बोलत होत्या, एकमेकीला मदत करत होत्या. सकाळी सायली पहाटेच उठली अगदी आईच्याही आधी. अभ्यंगस्नान आटोपुन तिने दारासमोर सुंदर रांगोळी रेखाटली. सगळ्यांनी मिळून फराळ केला. यंदा फराळ बनविण्यात आपण आईला फार मदत नाही केली याचं सायलीला वाईट वाटलं. पण सायलीच्या मैत्रीणींनी तर आईची खूप मदत केली होती. त्या आल्या होत्या तेव्हा त्यांच्यासोबत गप्पागोष्टी करण्याची मनस्थिती तिची नव्हती. आज मात्र तिनेच स्वतःहून श्रद्धा, जुई आणि मीनाला फोन केले. शुभमकडून सायली- समरच्या लग्नाच्या निर्णयाबद्दल श्रद्धाला आधीच समजलं होतं. पण फोनवरुन तिने तसं काही सायलीला कळू दिलं नाही. सायलीने मैत्रिणींना हि खुशखबर सांगण्यासाठी घरी बोलावलं. त्याही आपापल्या घरी घरच्यांसोबत बिझी होत्या. मग शेवटी संध्याकाळी भेटायचं यावर सगळ्यांचं एकमत झालं.समरच्या घरीही संध्याकाळी जाऊयात असं तिने आईबाबांना सांगितलं. त्याप्रमाणे तिने समरला कळवलं. इकडे समरनेही तन्मय आणि अंकुशला फोन करुन आज भेटण्याची आठवण करुन दिली. अंकुश आणी तन्मयला समरने स्वतःहून फोन केला हे पाहून आश्चर्यचकित वाटलं.पण त्याच्या बोलण्यावरुन आज तो एकदम उत्साही, प्रसन्न वाटला त्यांना. इतके दिवस त्याचं काय बिनसलय ते त्यांनाही कळतं नव्हतं. मुलांचा हा प्लॅन सुरु असताना समरच्या बाबांनी मात्र अंकुश आणि तन्मयला फोन केला आणी समरने सांगण्याआधीच हि गुडन्युज त्यांना दिली. ते तर इतके खूश झाले. लगेच समरला फोन करुन आम्हाला का नाही सांगितलं म्हणून त्याला खडसवावसं त्यांना वाटत होतं. पण समरच्या बाबांनी असं काही करु नका म्हणून सांगत एक वेगळाच प्लॅन त्यांना सांगितला. आता या सगळ्यात या दोघा मित्रांना मुलींचीही मदत हवी होती म्हणून अंकुशने आणि तन्मयने श्रद्धा,जुई आणि मीनाला संध्याकाळी लवकर सायलीच्या घरी पोहचण्यास सांगितलं. पण ते दोघं मात्र सायलीकडे न येता समरच्या घरी जाणार असं ठरलं.
संध्याकाळी तिघी मैत्रीणी सायलीकडे पोहचल्या. गप्पा सुरु करण्याआधी आईने त्यांना फराळाचा आग्रह केला म्हणून सगळ्यांनी थोडा थोडा फराळही केला. तिच्या मैत्रीणींना तिच्या तोंडून खूशखबर ऐकु दे उगीच तू नको काही त्यांना सांगायला जाऊस असं बाबांनी आईला सांगून ठेवलं होतं. त्यामुळे मैत्रीणींसमोर आईने समरचा विषय काढला नाही. सगळ्या मैत्रिणी सायलीच्या रुममध्ये गप्पा मारत बसल्या. सायलीने त्यांना घडलेली सगळी हकिकत सांगितली. तिच्या तोंडून हे सगळ ऐकताना श्रद्धाला मनातून हसु येतं होतं पण तिने चेहर्यावर ते येऊ दिलं नाही. सगळं सांगून झाल्यानंतर सायली म्हणाली." हे सगळं शुभममुळे शक्य झालं.समरच्या बाबांकडून जेव्हा होकार आला तेव्हा आई म्हणाली, या सगळ्या आनंदाचं कारण शुभम आहे. त्याने स्वतःहून लग्नाला नकार दिला हे ऐकुन तर मला धक्काच बसला. पण आईबाबांना त्याने समजावलं. खरंच हि इज ग्रेट मॅन."
" हं " मैत्रीणीही एका सुरात म्हणाल्या.
" ए पण समरने तुला प्रपोज कधी केलं ?" अगदी मोक्याच्या वेळी जुईने प्लॅनप्रमाणे विषय काढला.
" प्रपोज...... नाही गं. का ?" सायली खट्टु चेहर्याने म्हणाली. तिच्याही लक्षात आली नव्हती हि गोष्ट!
" मग प्रपोज नाही केलं मग म्हणाला काय तो " मीनाने आता सुरुवात केली.
" काही नाही, त्याच्या बाबांनी त्याच्याशी बोलून आम्हाला कळवलं. नंतर ' निरोप मिळाला का ?' असा मेसेज आलेला त्याचा." ती हसत म्हणाली.
" बसं एवढंच ! " मीना बेडवर बसत म्हणाली.
" म्हणजे काय इतकंच आणि प्रपोज केलं म्हणजे प्रेम आहे एरव्ही नाही असं थोडी असतं." ती रागवायचं नाही असं ठरवत म्हणाली पण ती मनातून रागावली आहे हे मैत्रीणींच्या लक्षात येतं होतं मग तिला चिडवायची संधी त्यांनी सोडली नाही.
" साऊ समरना वेडाच आहे नाही थोडा बघ ना इतकं सगळं तुम्हा दोघांच्या आईबाबांनी जुळवून आणलं बरं इतके दिवस खरंतर इतकी वर्ष तू त्याला आवडतेस हे त्याने तुझ्यापासून लपवून ठेवलं.This is not fair ना ! " श्रद्धा हसत म्हणाली नी तिने पुन्हा मीनाला इशारा केला.
" हो ना, साऊ तो आता बोलायला समोर आला तर तू पण जरा भाव खाऊन घे." मीनाच्या या बोलण्यावर आपण समरवर खरंच रागवलं पाहिजे असं तिला वाटलं. त्याने याच्या त्याच्या करवी निरोप पाठवण्यापेक्षा स्वतःहून एकदा तरी 'तू मला आवडतेस 'असं बोलावं असं तिला वाटत होतं.
या सगळ्या गप्पांच्या नादात बराच वेळ गेला. आई निघण्याची तयारी केली का विचारायला रुममध्ये आली तेव्हा सगळ्यांना समरच्या घरी जायचंय याची आठवण झाली. मैत्रीणींनी मग समरचा विषय सोडला आणी सायलीने कशी तयारी करावी याच्या टिप्स द्यायला सुरुवात झाली. शेवटी मैत्रीणींच्या आग्रहाखातर लाल कलरची साडी तिने नेसली. लाल रंगाच्या साडीला नाजुकशी नक्षीदार बोर्डर, त्यावर छोटे टिपके, हातात नक्षीदार बांगड्या, मोकळे केस, हलकासा मेकअप खूपच सुंदर दिसत होती ती ! आईबाबा तिला पाहून खुश झाले. आईने लेकीची दृष्टसुद्धा काढली. बाबांनी समर आणी जहागिरदारांसाठी गिफ्ट्स घेतली होती. आईने हौशीने फराळसुद्धा घेतला. सगळे समरच्या घरी जाण्यासाठी निघाले.
.........................
इकडे समरच्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे अंकुश,तन्मय घरी लवकर आले होते. समरने त्यांना सायलीविषयी सांगितलं तेव्हा आपल्याला यातलं काहीच माहित नाही असं दाखवत त्यांनी त्याचं अभिनंदन केलं. मग दोघांनीही त्याला पिडायला सुरुवात केली.
तन्मय - " आता कळलं मला मी मागे एकदा विकेंण्डसाठी तुला पुण्याला बोलवत होतो आला नाहीस. हे सगळं सुरु होतं का तेव्हा! इतकं सगळं घडलं इकडे नी आम्हाला काही आयडियाच नव्हती. इन फॅक्ट सायलीचं लग्न वगैरे ठरवत होते हे पण आम्हाला माहीत नव्हतं.
अंकुश - " हा यार, हि मीना आमच्याच अॉफिसला आहे.शहाणी ती पण काही बोलली नाही मला !"
तन्मय - " असु दे आता झालं ते झालं त्यावर आता डिक्सशन नको. आता पुढे काय ?" त्याने समरकडे पाहत म्हटलं आणि हाताने अंकुशलाही इशारा केला.
अंकुश - " अरे, पुढे म्हणजे तु सायलीसोबत बोल्लास का ? "
समर - " काय ?" त्याने प्रश्नार्थक चेहर्याने विचारलं.
अंकुश- " हेच कि You like her "
समर - " नाही, म्हणजे आम्ही प्रत्यक्ष भेटलोच नाही आहोत बरेच दिवस. या सगळ्या गोष्टी इतक्या अचानक घडल्या ना !"
तन्मय- "चलो, मग आज प्रपोज करुन टाकच तू"
समर - " काय !!!!!! प्रपोज डिरेक्टली "
तन्मय- " मग काय मुहुर्त पाहणार आहेस ! ठरलं कि सगळं आता." तो हसत म्हणाला.
समर - "नको,नंतर भेटेन तेव्हा बोलेन सविस्तर"
अंकुश - " बोल दो यार, कुठलीही गोष्ट बोलून लवकर मार्ग निघतो आणि न बोलण्याने कसा गुंता होतो ते नव्याने सांगायची गरज नाही तुला"
तन्मय - " तू बोल्लास तर तिलाही बरं वाटेल."
इतक्यात खालून बाबांचा हाक मारण्याचा आवाज आला. सगळे घरी आले होते. अंकुश आणी तन्मयने समरला खाली न येण्यास सांगितलं. त्यांनी आखलेला प्लॅन त्याला सांगितलं नी बळेबळेच त्याला गच्चीवर पाठवलं.
" या या Welcome Sayali to our house " जहागिरदारांनी सर्वांचं स्वागत केलं. पाठोपाठ अंकुश, तन्मयनेही सायलीचं अभिनंदन केलं. आत पाऊल टाकताच समरशी ओळख झाल्यापासून ते आतापर्यंतचा सगळा पट तिच्या नजरेसमोर तरळून गेला. जहागीरदारांनी पुढे येत तिच्या डोक्यावर भावूक होत हात ठेवला. तिने त्यांना नमस्कार केला तसे ते अजूनच भावूक झाले. वातावरण थोड हलकं करावं म्हणून सायलीच्या बाबांनी आणलेली गिफ्ट्स त्यांच्या हाती दिली.
समरचे बाबा- थँक्यु, अहो कश्याला एवढं सगळं"
सायलीचे बाबा- " असु द्या हो, दिवाळी भेट "
सायलीची नजर त्याला शोधत होती. ते लक्षात येताच जहागीरदार अंकुशला म्हणाले,
" अरे, समर दिसत नाही. कुठे आहे ?"
" काका, गच्चीवर आहे तो "
" हो का बरं, सायली जा त्याला बोलवून आण. खाली वाट पाहतायत म्हणावं सगळे." भावी सासर्यांच्या आज्ञेसरशी ती धावतच गच्चीवर गेली तसे खाली सगळे हसु लागले.
........................
ती गच्चीवर धावत आली. समोर पाहते तर लाल,पिवळ्या तोरणांच्या प्रकाशात सगळी गच्ची रोषणाईने झळाळून गेली होती. समरच्या हातातल्या तबकातील पणत्या तो प्रत्येक कोपर्यात लावत होता. ती काही क्षण तशीच स्तब्ध उभी राहिली. तिच्याकडे नजर जाताच तो पुढे आला. तिने त्याच्याकडे न पाहता मान दुसरीकडे वळवली. तबकात अजूनही काही पणत्या शिल्लक होत्या. त्याचा प्रकाश तिच्या चेहर्यावर पसरला होता. बाहेर सांज सरुन एव्हाना अंधार पसरला होता. आजूबाजुच्या इमारतींमधून आकाशकंदिल डोकावत होते. खाली फटाक्यांचे आवाज येत होते. तरीही त्यांना मात्र आजुबाजुचं अजिबात भान नव्हतं.
" रागवलीस " तिच्या चेहर्याकडे पाहत तो म्हणाला.
" हं " ती खाली मान घालून हाताच्या बोटांशी चाळा करत ती म्हणाली.
त्याने हातातलं तबक मध्यभागी असणार्या एका छोट्या टेबलवर ठेवलं. त्यावरती एक छोटा बॉक्स ठेवलेला होता. तो हातात घेऊन उघडला आणी तो पुन्हा लगेच तिच्यासमोर जाऊन उभा राहिला. तिने मात्र त्याच्या या वागण्याने दुर्लक्ष करित मान फिरवली आणि मागे वळली. तसा त्याने मागून हात पकडला. तिने गर्रकन मागे वळून पाहिलं. तिला क्षणभर काहीच समजलं नाही. त्याने त्याच्या मुठीतली अंगठी हळूच तिच्या बोटात सरकवली.
" I love you so much, Will you marry me?" तो तिच्या नजरेला नजर देत म्हणाले. तिने मानेनंच लाजत होकार दिला. इतक्यात टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला. तसे दोघं आश्चर्याने इकडे तिकडे पाहू लागले. गच्चीवर यायच्या शेवटच्या पायरीवर सगळे लपुन बसुन त्यांचं बोलणं ऐकत होते. सगळे समोर पाहून तिने झटकन हात त्याच्या हातून काढून घेतला.
" चला मिठाई वाटा " अंकुश मोठ्याने म्हणाला तसा सगळ्यांनी त्याला दुजोरा दिला. मैत्रीणींनी धावत जात सायलीच्या बोटातली अंगठी पहायला सुरुवात केली. तेवढ्यात मिठाईचा बॉक्स आणायला खाली गेलेला तन्मय हातात एक गिफ्ट घेऊन वरती आला.
" ए लिसन लिसन हे बघा "
" काय आहे ते " समरचे बाबा म्हणाले
" मेबी गिफ्ट असेल, कुरियर बॉय आला होता खाली."
" कधी आत्ता !" बाबांना आश्चर्य वाटलं.
" For Samar and Sayali असं लिहिलंय यावर " समरच्या हातात ते देत तो म्हणाला. सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली होती. समरने ते उघडलं तर ते एक चित्र होतं. त्या चित्रावर एक कार्ड लटकत होतं,' I wish you a happy& long life together', From Shubham' समरने ते कार्ड मोठ्याने सगळ्यांना वाचून दाखवलं. ते चित्र तेच होतं, ' एका समाधानी आनंदी जोडप्याचं चित्र जे शुभमने समरकडून घेतलं होतं. सगळ्यांनी ते चित्र पहायला नजरा पुढे केल्या. समर आणी सायलीने त्या पेंन्टिंगवरुन हळूवार हात फिरवला. आता आयुष्यभर या चित्रातल्या दोन जीवांसारखं त्यांना जगायचं होतं. तिने समरकडे पाहिलं. त्याचे डोळे हसत होते. एक सेल्फि काढूया एकत्र म्हणत जुई उड्या मारत पुढे आली आणी तिने मोबाईलचा कॅमेरा वरती केला. सगळ्यांनी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवत पोज घेतल्या आणि छान स्माईल दिली.
एक कुटुंब पुर्ण झालं होतं. एक प्रेमाची गोष्ट पुर्ण झाली होती.
The End.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा