निरागस प्रेमाची गोड गोष्ट भाग 3

Love Story

वाढदिवसानंतरचा पहिला दिवस

" गुड मॉर्निंग आई " सायलीने मंद पावलांनी आईच्या पाठिमागून येऊन तिचे डोळे बंद केले. आई किचनमध्ये नाश्ता बनवत होती. 
"गुड मॉर्निंग,पण हे काय नवीन लहान मुलांसारखं! डोळे का बंद केलेस."
" बघ सरप्राईज, ढँगटॅढँग " तिने डोळ्यांवरचा हात बाजूला करताच आई मागे वळली.
" हे काय,आज चक्क बाईसाहेब मी न उठवता उठल्यासुद्धा आणि तू तयार केव्हा झालीस!"
" आताच. आईसाहेब तुम्ही तुमच्या किचनच्या कामात मग्न होतात." 
" गप गं, थट्टा पुरे " आई म्हणाली
" अगं,कालच माझा पंचविसावा वाढदिवस झाला म्हटलं. आता नव्या वर्षाची सुरुवात करताना जरा शहाण्यासारखं वागावं म्हटलं. उदा. सकाळी स्वतःहून उठणे, तू न ओरडता तयारी करणे आणि स्वतःच्या नाश्त्याची प्लेट स्वतः घेणे " कढईतले गरमागरम पोहे प्लेटमध्ये वाढून घेत ती म्हणाली आणि डायनिंगटेबलच्या खुर्चीवर जाऊन बसली. आई मात्र आवासुन हे सगळं पाहत होती. 
" अरे वा! हा बदल कसा झाला म्हणायचा नाही, झालं ते चांगलंच आहे." आई पोळ्या लाटत म्हणाली."पण इतरही काही गोष्टी अश्याच मनावर घ्यायला हरकत नाही." बोलता बोलता तिच्याकडे न पाहताच आईने विषय काढला.
" आई, नॉट अगेन हा. आता ही चर्चा नको. चल मला लवकर डबा दे. राहू दे,थांब मीच भरून घेते." सायलीने नाश्याची प्लेट विसळून ट्रे मध्ये ठेवली आणि डबा भरला.
" चलो, ये तो हो गया. चल आई मी निघते आता नाहीतर उशीर होईल." आईचे गाल ओढत ती म्हणाली आणि आई पुढे काही बोलण्याआधीच तिने पर्स खांद्याला लटकवली,डबा घेतला आणि गेली. आई तिच्याकडे पाहत राहिली. सायलीच्या बाबांपाशीच हा विषय काढण्याचं तिने ठरवलं.

....................


सायली -  " हाय,गुड मॉर्निंग समर, कुठे आहेस ?"
समर  - "मी घरी आहे. अॉफिसची तयारी, तू ?"
सायली -  "मी पण अॉफिसलाच जातेय. टॅक्सीमध्ये आहे."
समर  -   "ओ के"
सायली - " ऐक ना संध्याकाळी अॉफिसनंतर वेळ आहे का?"
समर - "हो, का गं ?"
सायली -  "असंच,कुठे भेटशील?" तिने लागलीच विचारलं.
समर -     " कॅफे अरोमा, अॅड्रेस मॅसेज करतो."
सायली - " ओके. सी यु बाय "
समर -  " ओके. बाय बाय "

सायलीचा सकाळीच फोन म्हणजे तिने गिफ्ट पाहिलं असेल का त्याच्या मनात आलं. असेलही एक मन म्हणालं. 'नसेल,नाहीतर ती बोलली असती काहीतरी त्यावर ' दुसरं मन म्हणालं. काल दिलेलं गिफ्ट हे मी स्वतः काढलेलं चित्र आहे याचं तिला काहीच अप्रूप कसं वाटलं नाही! अशी शंकाही त्याच्या मनात आली. या विचांरातच त्याने अॉफिसला जाण्याची तयारी केली.

...................


" अहो, ऐका ना "
" हा बोल " न्युजपेपरमधून नजरही न हटवता बाबा म्हणाले.
" अहो....... पुरे झालं पेपरवाचन " आई कडाडली.
" अगं आता अॉफिसला गेलो कि कुठे वेळ मिळतोय पेपर वाचायला. न्युज पहायला. चल मी पण निघतो आता."
" झालं, काही बोलायचं म्हटलं कि बरं तुम्हाला काम आठवतं. तुम्ही पण तसेच आणि लेकही तशीच." आई वैतागली.
" अगं, अगं शांत हो. गेली ना ती अॉफिसला ते पण स्वतःची तयारी स्वतः करून." बाबा पेपर बाजूला ठेवत खुशीने म्हणाले.
" हं. कौतुक मलाही असतंच हो पण तुम्ही तिच्याशी बोलणार होता ना." आई आता शांतपणे बोलायला लागली.
" कशाबद्दल ? हा लग्नाचा विषय होय " आठवल्यासारखं करत बाबा म्हणाले.
" बोलूया ना. पण शांतपणे बोलायला हवं. माझा एक मित्र आहे विजय साखरे आधी आमच्याच अॉफिसमध्ये होता. त्याची बदली झाली गेल्यावर्षी. म्हटलं नव्हतं तुला."
" हा, त्यांचं काय ?"
" त्याचा मुलगा शुभम सायलीच्या वयाचा आहे तर...."
" खरंच " आई आनंदाने म्हणाली. "बरं होईल, आपल्या ओळखीतला असेल तर ना."
" हो हो, इतकी एक्साइट नको होऊस. आधी सायलीकडे नुसता विषय काढुया मग नंतर शुभम विषयी सांगु. मीही विजयला असंच सांगितलंय.
" बरं "  आई  समाधानाने म्हणाली. " पण तुम्ही फोन तरी करा तिला. आज तिचा मुड छान आहे. संध्याकाळी तुम्ही त्या पार्कात फेर्‍या मारायला जाता ना आज तिलाही सोबत न्या आणि विषय काढा जरा." 
" बरं बरं " आपली आता काही सुटका नाही अश्या नजरेनं त्यांनी सायलीचा नंबर डायल केला. पण पलिकडून तो उचलला गेला नाही.
" नाही रिसिव्ह करत नंतर करतो. चल, निघतो मी आता." बाबा अॉफिसची तयारी करायला निघून गेले.

..........................

कॅफे अरोमा
सायली - समरची भेट

" छान आहे ना कॅफे !"  सायली आजूबाजूला पाहत म्हणाली. येणार्‍या कपल्सनी कॅफे अगदी फुलून गेला होता. कॉफीचा सुवास, कॉफी आणि स्नॅक्स सव्र करणार्‍या वेटर्सची लगबग, भावगीतांचे वातावरणात दरवळणारे सुर हे सगळं पाहून तिला खुप शांत, आनंदी वाटतं होतं. प्रत्येक कपलकडे पाहताना तिला वाटतं होतं, हे काय बोलत असतील एकमेकांशी ! नव्याने नाती जोडलेली कपल्स एकमेकाचे रुसवे फुगवे दूर करित असतील. कुणी आपल्यासारखे ' फ्रेड्स ' असतील. तिचं लक्ष नवरा बायकोच्या एका जोडप्याकडे गेलं. तो काहीतरी बोलला त्यावर ती खळखळून हसली. ते पाहून तिला वाटलं, असे कितीतरी कपल्स 'क्वालिटी टाईम ' एकमेकासोबत घालवायला येत असतील नाही ! ती अश्याच विचारात हरवून गेली होती. समोर समर बसलेला आहे आणि ती इथे आहे या गोष्टीनेच तिला छान वाटत होतं. पण तिचं तिलाच कळत नव्हतं तिला या क्षणी काय वाटतंय ते ! 
" सायली ए सायली "  समरने तिच्या नजरेसमोर टिचकी वाजवली आणी ती भानावर आली.
" कुठे हरवलीस ? कॉफी थंड होईल "
" हं  "   तिने कॉफी प्यायला सुरुवात केली. दोन मिनिटं पुन्हा शांतता मग समरनेच विषय काढला.
" काय बोलायचं होतं का ? आय मिन सकाळी फोन...."
" हो, ' थँक्यु सो मच फोर ब्युटिफुल गिफ्ट " ती शांतपणे म्हणाली. हे शब्द कानावर पडताच त्याने चमकुन तिच्या डोळ्यांकडे पाहिलं. ती चमक त्याने यापुर्वी कधीच पाहिली नव्हती. तो वाट पाहत होता ती अजून काहीतरी बोलण्याची. 
"  समर, माझ्या लाईफमधलं सगळ्यात सुंदर गिफ्ट असेल ते नेहमीच "
" हं, थँक्स काय त्यात " तो चेहर्‍यावरुन उसने हसु आणत म्हणाला. 
इतक्यात तिचा मोबाइल वाजला. 
" हॅलो, कुठे आहेस ?"     बाबा
" हा, बोला बाबा मी निघाले अॉफिसमधून मघाशीच. का ?"
" अगं जरा बोलायचं होतं. आज माझ्यासोबत येशील पार्कमध्ये "     बाबा
" हो हो येईन कि "   तिला आईचं सकाळचं बोलणं आठवलं तरि ती ओके म्हणाली.
"  बरं, भेटू मग ये लवकर "    बाबांनी फोन ठेवला.
" ऐक ना, बाबांचा फोन होता. त्यांचं काहीतरी काम आहे लवकर घरि ये म्हणाले. निघू का मी ?"
" हो हो " तो निरच्छेनेच म्हणाला. ती फार न बोलता घाईतच उठली. पर्समधून कॉफीचे पैसे काढले.
"  अगं राहू दे "
"  माझ्याकडून ट्रिट समज "  पटकन काऊंटरपाशी तिने बिल पे केलं आणि कॅफेबाहेर पडली. तो बसल्या जागेवरुन ती दिसेनाशी होईपर्यंत पाहतच राहिला. रेडिओवरुन संजीव अभ्यंकरांच्या स्वरातील गोड गाण्याचे स्वर दरवळत होते.

 ' तू असतीस तर झाले असते
गडे नभाचे गोड चांदणे
मोहरले असते मौनातून
एक दिवाणे नवथर गाणे ' 

क्रमशः 

🎭 Series Post

View all