" बाबा, लवकर चला उशीर होतोय "
" हो हो आलो आलो "
" मला लवकर घरि यायला सांगितलंत आणि आता स्वतः फाईलीत डोकं खुपसुन बसलाय."
" हो आलो, चुकलो बाई " आतमधून बाबा शेवटी बाहेर आले. सायली केव्हाचीच तयार होऊन दारापाशी थांबली होती. बाबा आल्यानंतर सायलीची वाट पाहत राहिले तोपर्यंत थोडं काम आटोपून घ्यावं म्हणून रुममध्ये जाऊन बसले. उशीर झाल्याचं त्यांच्या लक्षातही आलं नाही. बाबांनी पायात चप्पल सरकवताच सायलीचं लक्ष नाही असं पाहून आई बाबांपाशी येत हाताचा अंगठा नाचवत हळू आवाजात ' अॉल दि बेस्ट ' म्हणाली. त्यांच्या खाणाखुणा पाहून सायलीला संशय आला पण काही विशेष नाही म्हणत बाबांनी वेळ मारून नेली.
शेवटी घरासमोरचा रस्ता क्रॉस करुन ते पार्काच्या दिशेने वळले. थोडं अंतर चालल्यानंतर तिनेच बोलायला सुरुवात केली.
" काय मग बाबा आज माझी कंपनी हवीशी वाटली तुम्हाला !"
" म्हणजे काय, आय लाईक युवर कंपनी. बरेच दिवस आपण इकडे फिरकलोच नाही म्हटलं जाऊया आज " उसनं हासू आणतं ते म्हणाले.
" अॉफिस काय म्हणतंय तुझं ?" बाबांनी उगीचच घुमवून फिरवून संवाद वाढवायचा म्हणून विचारलं.
" ठिक नेहमीसारखंच " अॉफिसचा आजचा दिवस नेहमीसारखाच होता पण संध्याकाळ सुंदर होती हे तिला म्हणायचं होतं ते मनातच राहिलं. तिच्या येस नो टाईप उत्तरांमुळे बाबांची चुळबुळ वाढली. विषय कसा काढावा, कुठुन सुरुवात करावी हे त्यांना सुचेना. बहुदा प्रत्येक बापाची पोरीच्या लग्नाचा विषय निघतो तेव्हा हिच अवस्था होत असावी या विचाराने ते स्वतःवर हसले.
" विश्वास " मागून हाक आली तसे दोघे मागे वळले. मागून काठी टेकत दामले आजोबा त्यांच्याकडेच येताना त्यांना दिसले तसे दोघं बापलेक तिथेच थांबले.
" काय म्हणता आजोबा ? कशी आहे तब्येत ?"
" मी मस्त मजेत. अॅडव्हान्स मिळालेलं आयुष्य पुरेपुर एन्जॉय करतोय " काठी उंचावत ते हसत म्हणाले.आजोबांची नुकतीच बायपास झाली होती.
" मी येणारच होतो तुम्हाला भेटायला बरं झालं आज भेट झाली."
" हो, मी मस्त ठणठणीत. काय सायली तू काय म्हणतेस?" सायलीकडे लक्ष देत ते म्हणाले. " काय मग यंदा कर्तव्य आहे की नाही ?" तिची चेष्टा करण्याचा चान्स आजोबांनीही सोडला नाही.
" हं बघु, आमच्या मॅडम मनावर घेतील तेव्हा " बाबांनीही चेंडू सायलीकडे भिरकावला.
" बरं बरं , चल मी निघतो तुम्ही बसा निवांत "
सायलीचं पुढचं काही ऐकुनही न घेता ते बाबांचा निरोप घेऊन चालू लागले. ते थोडं अंतर चालून गेल्यानंतर तिने रागाने बाबांकडे कटाक्ष टाकला तसे ते म्हणाले,
" बी काल्म, चल इकडे बसू " सायली जरी चिडली असली तरी दामले आजोबांनी एका रितीने बाबांची मदतच केली होती. आता कसं बरं बोलावं हि कोंडी तरि फुटली होती. ती घुश्य्यातच बाकावर बसली. बाबा म्हणाले,"काय झालं एवढं चिडायला ?"
सायली - " काही नाही "
बाबा - " काय गं, आईला सोडून न जाण्याचा निश्चय वगैरे नाही ना केलेला तू ! " बाबा हसले तशी ती अजूनच चिडली.
सायली - "म्हणजे मी लवकर जावं एकदाचं असं वाटतं का तुम्हाला "
बाबा - " नाही राजा, आम्हाला तरि तुझ्याशिवाय कोण आहे पण तु लग्नाचा विचारच करणार नाहीयस का ?"
सायली - " नाही हो बाबा असं काही नाही "
बाबा - " चल म्हणजे चिंता मिटली. माझ्या पाहण्यात एक"
सायली - "एक स्थळ आहे. आपण पुढची बोलणी करूया का ?असंच ना "
बाबा - " अगं ऐकून तर घे. माझ्या मित्राचा मुलगा आहे. स्थळ म्हणून नाही पण असंच भेटायला काय हरकत आहे. आता बघ तो आऊट अॉफ टाऊन आहे आला की जस्ट भेटून घे. तुमची फ्रेंडशीप तरी होईल. तुम्हाला बरं वाटलं तरच पुढची बोलणी करु काय ?"
सायली - " ओके, बघू "
इतका पोझिटिव्ह रिसपोन्स ही बाबांसाठी खूप होता. पार्कातून निघताना बाबा मनाने एकदम निर्धास्त झाले होते. सायलीला मात्र एका अनोळखी आणी भावी आयुष्यात 'पार्टनर' होण्याची शक्यता असलेल्या मुलाशी मैत्री नको होती. याच विचारात ती चालू लागली.
........................
तन्मय - " हॅलो समर "
समर - " हा, बोल तन्मय काय रे एनी प्रोब्लेम रात्री कॉल केलास आज "
तन्मय - " अरे, दिवसभर कामाच्या गडबडीत वेळच नाही मिळाला. म्हटलं विसरण्याआधीच आताच कॉल करु "
समर - " ओके "
तन्मय - " विकेंण्डला फ्री आहेस का पुण्याला येशील ?"
समर - " का रे ?"
तन्मय - " अरे माझ्या एका चित्रकार मित्राचं एक्झिबिशन आहे. सो मी जाणार आहे म्हटलं तुलाही बोलवावं. त्यानिमित्ताने तुझीही ओळख होईल त्याच्याशी."
समर - "आय एम सो सॉरी. मी आलो असतो पण जरा काम आहे "
तन्मय - ओके, पण फ्री असशील तर नक्की ये ."
समर - " हो, शुअर शुअर थँक्यु बाय "
तन्मय - " ओके चलो बाय "
समरने मोबाईल बाजूला ठेवला आणि पुन्हा विचारात हरवून गेला. कोणतंही काम नसताना आपण तन्मयशी खोटं बोललो याचं त्याला वाईट वाटलं. पण आपण इतके अस्वस्थ का होतोय हेच त्याला कळतं नव्हतं. त्याच्या बाबांच्या कानावर हे संभाषण पडलं होतं. बेंगलोरहून मुंबईला बदली झाली म्हणून खुश असणारा समर अचानक उदास का वागलाय लागलाय हे त्यांनाही समजत नव्हतं.
कॅफे भेटीनंतरचे पुढील चार पाच दिवस काहीच घडलं नाही. सायलीने त्या दिवशी संध्याकाळी पार्कमध्ये बाबांना शुभमला भेटेन असं सांगितल होतं त्यामुळे आई बाबा निर्धास्त होते. त्यानंतर त्यांनी सायलीकडे हा विषय काढलाच नाही. त्यानंतर सायलीही इतकी अस्वस्थ होती कि याबद्दल कुणाशी बोलावं हेच तिला कळत नव्हतं. तिने समरलाही फोन, मॅसेज केले नव्हते. तिच्या गप्प बसण्याने त्यालाही काही कळायला मार्ग नव्हता.
पाचव्या दिवशी एका शॉप मध्ये समर खरेदी करत असताना मागून हाक आली. त्याने मागे वळून पाहिलं तर जुई होती. समरला पाहताच ती धावत पुढे आली.
जुई - " ए हाय, कसा आहेस ? इकडे कुठे तू ?"
समर - " असंच नेहमीची खरेदी. तू ?"
जुई - " अरे मी याच रोडने घरी जाते. तुला पाठमोरं पाहिलं वाटलं तूच आहेस म्हणून हाक मारली. सायलीच्या पार्टिनंतर तू बिझीच झालास अगदि."
समर - " नाही गं, नवीन जॉईन्ट केलंय ना अॉफिस सो "
जुई - " ते राहू दे, तिच्यावरुन आठवलं. साऊसाठी स्थळ आलंय. सायलीच्या बाबांच्या मित्राचा मुलगा आहे शुभम साखरे. ते भेटले कि पुढचं फिक्स होईल सगळं."
समर - " व्हॉट ! अगं पण कधी ठरलं. ती बोलली नाही."
जुई - " तुला कसं सांगणार! अश्या गोष्टी मैत्रिणींना सांगतात आधी. " ती त्याला चिडवायच म्हणून म्हणाली.
" मला कॉल आला होता तिचा काल रात्री. अजून कुणाला माहित नाही. मी तुला सांगितल ते तिला नको सांगू हा, माझ्यावर चिडेल."
ती बडबडत होती. तो स्तब्धपणे ऐकत होता.
" समर, चल बाय मी निघते " ती त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली तेव्हा तो भानावर आला. ती आली तशी निघूनही गेली मात्र त्याचं मन दसपटीने अस्वस्थ झालं. त्याने वस्तू घेतल्या, यांत्रिकपणे बिल पे केलं आणि तिथून बाहेर पडला. समोर असंख्य प्रश्न उभे होते.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा