शुभमचे बाबा - " हॅलो विश्वास ना !"
सायलीचे बाबा - " हो बोलतोय "
शुभमचे बाबा - " हा विश्वास, विजय बोलतोय "
सायलीचे बाबा - " हा बोल विजय, कसा आहेस आणि शुभम काय म्हणतो ?"
शुभमचे बाबा - " आम्ही मस्त रे. हा तुला मी तेच सांगायला फोन केला मी सायलीविषयी शुभमच्या कानावर घातलंय. त्यानेही फार आढेवेढे न घेता भेटायची तयारी दाखवली. मी आणि त्याची आई इतके खुश झालो सांगू ! फार समजावण्याचा त्रास नाही पडला."
सायलीचे बाबा - " नशीबवान आहेस नाहीतर आमच्या सायलीमॅडम त्यांना समजावता समजावता नाकीनऊ आले."
शुभमचे बाबा - " चालायचंच रे. शेवटी मुलीला आपलं घर, फॅमिली सगळंच सोडून दुसरीकडे जायचं असतं. त्यांचं मन तयार व्हायला थोडा वेळ लागतोच."
सायलीचे बाबा - " हो तेही बरोबर आहे म्हणा."
शुभमचे बाबा - " बरं ऐक, शुभम घरि आलाय तर अनायासे आज रविवार आहे त्यांची भेट झाली असती तर...."
सायलीचे बाबा - " अरे वा ! बरंच झालं मग !"
शुभमचे बाबा - " हो पण त्यांची काही ओळख नाही म्हणून आज तो तुमच्या घरी आला तर चालेल का ? तुमच्या सगळ्यांशीच भेट होईल नंतर ते दोघे भेटतीलच."
सायलीचे बाबा - " हो, हो चालेल ना. येऊ दे त्याला आम्ही आहोत घरी."
.....................
" काय समर मग आज काय सण्डें प्लॅन ?"
" काही नाही बाबा " तो उदास चेहर्याने म्हणाला.
" अरे काही नाही काय, मस्त फ्रेंण्ड्स मिळून भटकायचं,खायचं एन्जॉय करायचं. काय तुम्ही लोक सारखे कामाच्या ओझ्याखाली असता रे ! " बाबा किचनमध्ये कॉफी बनवत उत्साहाने बोलत होते.
" मला ना कधी कधी समजतंच नाही "
" काय बाबा ?"
" हेच मी वकिल आहे कि तू ?" या स्वतःच्याच वाक्यावर ते खळखळून हसले आणि म्हणाले," अरे तुझ्यासारख्या चित्रकाराने आयुष्य कसं एन्जॉय करायला हवं मगच तो आनंद रेषांतून चित्रात उतरणार ना ! "
समर हॉलमध्ये बसला होता समोर बाबांनी कॉफीचा गरमागरम कप धरला.
" काय रे माझ्या बोलण्याकडे लक्ष आहे कि नाही ! काय झालंय ? काही बिनसलंय का ? "
" नाही बाबा तुम्हाला का वाटलं असं ?" त्याने चेहर्यावरची नाराजी लपविण्याचा प्रयत्न केला. पण बाबांना त्याचं उत्तर काही पटलं नाही.
" काही बोलायचं असलं तर यु कॅन शेअर विथ मी. तुझी आई नाही होऊ शकत पण फ्रेंण्ड तर नक्कीच होऊ शकतो ना !" बाबा त्याच्या खांद्यावर आश्वासकपणे थाप मारत म्हणाले.
...................
सुटीचा दिवस असला तरि समरला बाहेर पडण्याची इच्छा नव्हती. त्याचं मन सायलीभोवतीच घुटमळत होतं. त्यालाही कळत नव्हतं आपण तिच्या लग्नाविषयी एवढा का विचार करतो आहोत ! ती आपली बेस्ट फ्रेंण्ड आहे आणि तिच्या आईने तिच्या लग्नाचा विचार करणं यात काही चूक नाही. मग आपल्याला या गोष्टीने इतकं का वाईट वाटतंय! हो पण तीही असं का वागली ? चार पाच दिवस कॉल नाही, मेसेज नाही. नक्की काय झालंय. राहु दे आपणच बोलावं का असा विचार त्याच्या मनात आला. त्याने न राहुन शेवटी तिला मेसेज केला.
' हाय, हाऊ आर यु ? आज संध्याकाळी नेहमीच्या कॅफेमध्ये भेटुया का ? See u at 4pm '
ती रूममध्ये आली तेव्हा मोबाईलवरती मेसेज झळकत होता. त्याचा मेसेज पाहून ती एकदम खुश झाली. तो स्वतःहून भेटायला बोलावतोय म्हणजे काहीतरी विशेष असेल असं तिला वाटलं. तिने लागलीच ' Ok, See u ' असा रिप्लायही पाठवला आणि काही दिवसांपूर्वीची त्यांच्या भेटीची ती संध्याकाळ तिच्या नजरेसमोरून तरळून गेली.
...................
सायली - " आई, आई काय करतेस ?"
आई - " काही नाही, दुपारच्या जेवणाची तयारी"
सायली - "मी काही हेल्प करू का ?"
आई - "नको हा,मी करते " आई हसत म्हणाली.
सायली - "एवढं काय बनवतेस ? "
आई -"काही नाही. नेहमीचंच हा ते मसालाडोसा करणार आहे ."
सायली - "का ? आज सण्डे स्पेशल मेन्यु वाटतं मग सकाळी नाश्त्याला का केला नाहीस?"
आई - "हा, अगं हे संध्याकाळसाठी. शुभम यायचा आहे घरि."
सायली - "व्हॉट ! हे कधी ठरवलंत? ए तुम्ही दोघं मिळून परस्पर काही ठरवू नका आणि ठरवलंत तर अॅटलिस्ट मला सांगत तरि जा." ती मनातुन आईवर प्रचंड चिडली होती.
आई - " अगं हो हो, चिडतेस कशाला ? काही ' पाहण्याचा ' वगैरे कार्यक्रम नाही आहे आज. डोन्ट वरी ! आऊट अॉफ टाऊन होता तो काल आला. आज तसंही सण्डें आहे म्हटलं घरि आला तर आपली ओळखही होईल त्याच्याशी " आईबाबांनी केलेल्या या खोडसाळपणाचं आईने दिलेलं सविस्तर स्पष्टिकरण तिला पटलं नाही.
आई - " अगं बघतेस काय अशी ! खरंच तो जस्ट आपल्याशी ओळख करुन घ्यायला येणार आहे बाकी काही नाही."
सायली - " ओके.पण इथून पुढे जे काही ठरवाल ते सांगत जा प्लिज मला."
आई - " ओके बरं. तू आता कुठे बाहेर जाऊ नकोस हा जेवण झाल्यानंतर."
सायली - " हं " ती घुश्य्यात म्हणाली.
..................
दुपारची जेवणे आटोपली. सायली कुणाशीही फार बोलली नाही. ताटात वाढलेलं मुकाटपणे खाल्लं आणि आपल्या रूममध्ये जाऊन बसली. तिला सगळ्याच गोष्टींचा खूप राग आला होता आणि तिला जास्त वाईट या गोष्टीचं वाटतं होतं कि सगळे आपापल्यापरिने विचार करत होते. प्लॅन आखत होते पण या सगळ्यात तिचा विचार कुणीच घेत नव्हतं. तिला काय वाटतंय, हे लग्न करायचं आहे कि नाही, शुभमशी बोलायचं आहे कि नाही, मुळात तिचा लाईफ पार्टनर कसा असावा असं तिला वाटतंय या विषयी आजवर तिला कुणीही विचारलेलं नव्हतं. याचचं तिला वाईट वाटलं आणि नकळत तिचे डोळे पाणावले.
आपल्याला आज संध्याकाळी भेटायला येणं शक्य नाही हे समरला सांगायला हवं हे तिच्या लक्षात आलं. कॉल केला तर स्विचअॉफ येत होता. आता ह्याने फोन स्विचअॉफ का केला म्हणून ती त्याच्यावरही मनातून वैतागली. इतक्यात आईची हाक आली.
" साऊ, ए साऊ दरवाजावरती बेल वाजतेय. कोण आहे बघ."
" हा बघते आई " ती रुममधून पायर्या उतरत खाली आली तर आई किचनमध्ये होती. सायलीनेच दरवाजा उघडला.
" विश्वास भागवंतांच घर हेच ना ? " समोर उभ्या असणार्या मुलाने विचारलं. अॉक्टोबरच्या टळटळीत दुपारी,ट्रॅफिकमधून येऊनही त्याचा चेहरा इतका प्रसन्न कसा असा प्रश्न तिला मनातून पडला.
" हो, तुम्ही कोण ?"
" हॅलो, मी शुभम शुभम साखरे " त्याचं आनंदी चेहर्याने त्याने उत्तर दिलं. अश्या ' चार्मिंग पर्सनॅलिटी ' असणार्या मुलाला आपले आई बाबा नकार देऊ शकतील का हि शंका त्याला पाहताच तिच्या मनात डोकावली आणि आपल्याला न विचारता हे लग्न फिक्स होईल या कल्पनेनं ती उदास झाली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा