Login

निरागस प्रेमाची गोड गोष्ट भाग 6

Love Story


" कोण आहे गं ? " मागून बाबांची हाक आली तशी सायली विचारांच्या गर्तेतून बाहेर आली. 
" अ....शुभम आलाय " तिच्या मागे उभ्या असणार्‍या बाबांकडे वळत ती म्हणाली. तसे बाबांनी पुढे येऊन त्याचं स्वागत केलं.
" अरे ये ये " 
" हो " सायलीच्या नजरेसमोरुन तो आत आला तरि ती मघाच्याच विचारात होती. 
" अगं, शुभम आलाय " आईला ऐकु जाईल अश्या आवाजात बाबा म्हणाले. आई त्वरेने पाण्याचा ग्लास घेऊन हजर झाली. 
" ये बस बस " तो काहीसा संकोचून बसला. 
" सॉरी मी जरा लवकर आलो का ? तुमची वामकुक्षी माझ्या येण्याने डिस्टरब झाली." बाबांकडे पाहत तो हसला. 
" छे ! छे ! पावणेपाच झालेच की आता " बाबांच्या या शब्दांसरशी तिने भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिलं अरे देवा ! खरंच पावणेपाच झाले समर पोहचला असेल तिकडे एव्हाना. काहीतरी कारण सांगून बाहेर पडावं असंही तिच्या मनात आलं पण नाईलाज होता. आईने तर तिला या घडीला कुठेच जाऊ दिलं नसतं. 
"मग केव्हा आलास घरि टूरवरुन " उगीचच विचारायचं म्हणून तिच्या बाबांनी विचारलं. 
" कालच आज रविवार आहे म्हटलं बाबा किती दिवसांपासून पाठि लागले होते सायलीला भेट "
' सायलीला भेट ' या शब्दावर तिने पटकन चमकुन त्याच्याकडे पाहिलं त्यासरशी तो पुढे म्हणाला " आयमीन तुम्हा सर्वांना भेटायला सांगत होते ते. बाबा तुमच्याविषयी बोलत असतात नेहमी " सायलीच्या बाबांकडे नजर वळवत तो म्हणाला.
" हो ! " आश्चर्यचकित नजरेनं ते म्हणाले आणि समोरच्याच सोफ्यावर बसले. त्यांनी गप्पांनाच सुरुवात केली. 
" आठवण तर काढणारच ना ! गेली दहा वर्ष एका अॉफिसात काम केलंय आम्ही. एकमेकांची सुख दुःख शेअर केलीत." त्यांच्या अॉफिसच्या दिवसांबद्दल ते भरभरुन बोलू लागले. तिला वाटलं, शुभम बोअर होईल पण तोहि इंटरेस्ट दाखवून बाबांचे किस्से ऐकत होता. त्यांच्याशी बोलत होता आणि या दोघांशेजारी सायली मात्र गप्पपणे उभी होती. इतक्यात आई किचनमधून बाहेर आली. मघापासून बाहेर चाललेल्या गप्पा तिच्या कानावरही पडत होत्या. पण सायलीचे बाबा असेच बोलत राहिले तर हि आणि शुभम कधी बोलणार असा 'सुज्ञ विचार' तिच्या मनात आला.
" तुम्ही असेच बोलत बसणार आहात का कि शुभमला आपलं घर पण दाखवणार आहात?" आईच्या या बोलण्याकडे ती 'हे काय नवीन आता ' अश्या नजरेनं पाहत राहिली.
"हो हो " आईच्या बोलण्याला दुजोरा देत बाबा म्हणाले.
"सायली तूच दाखव ह्याला आपलं घर, तुझी फोटोग्राफि"
" वा ! तू फोटोग्राफी करतेस ?" आश्चर्याने तो म्हणाला
" प्रोफेशनली नाही पण आय लाईक इट" ती त्याच्याकडे न पाहताच म्हणाली.
" ओह. कॅन आय सी ?"
" हं ये " 
तो सोफ्यावरुन उठला. तिने बोटाच्या निर्देशानेच त्याला घरातल्या रुम,किचन दाखवलं बाकी काही सांगण्यात,दाखवण्यात तिला इंटरेस्ट नव्हता. ती सरळ रुमच्या पायर्‍या चढू लागली ते पाहून तोही तिच्यामागोमाग गेला. त्यांना एकमेकाशी बोललेलं पाहताना आईबाबा खूश झाले.
" कम, फायनली दिस इज माय रुम " तिने रुमचा दरवाजा लोटत त्याचं वेलकम केलं. तिच्या मागून तो आला. तिथल्या सगळ्या गोष्टींवरुन नजर फिरवताना तो अवाक झाला.चारचौघींसारखीच तिचीही रुम होती. बेडवर रंगीत बेडशिटस, उशांच्या शेजारी टेकलेले टेडी, शेजारी कपाट, ड्रेसिंग टेबल त्यावर परफ्युम, कॉसमेटिक्स. पण त्या रुमला चार चाँद लावले होते ते सजलेल्या भिंतींनी. निसर्गाच्या विविध छटा टिपलेल्या छायाचित्रांनी एक भिंत भरली होती. ते फोटोज पाहण्यासाठी तो थोडा पुढे सरकला आणि एकेक फोटो न्याहळू लागला.
" वाव! इट्स सो ब्युटिफुल. भारीच हौस आहे तुला फोटोग्राफीची " 
" थँक्स " मघापासुन ती प्रथमच त्याच्या नजरेला नजर देत मनापासून बोलली. त्याला बरं वाटलं. आपण असं अचानक आलेलं तिच्या पचनी पडलेलं नाही असंच त्याला मघापासून वाटतं होतं. पण आता ती मनापासून रुम दाखवतेय म्हटल्यावर त्यालाही बरं वाटलं. इतक्यात त्याचं लक्ष बेडच्या बरोबर समोरच्या भिंतीकडे गेलं. तिथं वेगवेगळी पेंन्टिंग्ज लावलेली होती. 
" ए ग्रेट म्हणजे तू चित्रंही काढतेस तर ! मॅडम अगदी कलावंतच दिसतायत !" त्याने चेष्टा सुरु केली.
" नाही नाही म्हणजे मी फक्त फोटोग्राफीच करते. बाकि हि चित्रं माझ्या कॉलेज फ्रेंन्डने काढलीत "
" वाव ! दॅट्स नाइस. भारीच असला पाहिजे तो !"
" हं " 
" बाय द वे कुठे असतो हा आता " त्याने उत्सुकतेपोटी लागलीच विचारलं.
" इथेच आयमिन कॉलेज संपल्यानंतर बेंगलोरला जॉब मिळाला त्याला आता तीन वर्षांनी इथेच ट्रान्सफर झालीय."
" ओके "
" का असं विचारलंस ?"
" नाही म्हटलं एवढ्या कलावंत माणसाची एकदातरी भेट व्हावी. आता इथेच आहे तर पुढे भेट होईलच." त्याच्या बोलण्याचा रोख तिच्या लक्षात आला.
"  बाकी हे चित्र आहे ना त्या मुलीचं सेम तुझ्यासारखं दिसतंय"  समरने तिला गिफ्ट दिलेल्या चित्राकडे बोट दाखवत तो म्हणाला.
" हा, अॅक्जुयली ते माझंच चित्र आहे. माझा एक फोटो तसा आहे. तो पाहून त्याने रेखाटलंय ते चित्र. बर्थडेला सरप्राईज दिलं." ती खुशीने म्हणाली.
" ओह. पण सुंदरच आहे ते ! " त्याने मनातली नाराजी दूर सारत बोलणं सुरु ठेवलं.
" त्याला आवडतात अशी सरप्राईजेस द्यायला. समोरचा माणूस खुश कि हा पण खुश! पण फार मोकळेपणाने बोलणार नाही, माणसांशी लगेच अॅटॅचमेंन्ट होते त्याची पण काही बिनसलं तरिही आम्हा लोकांना कळत नाही."
" हं, माणसाने जे वाटतं ते मनापासुन बोलून मोकळं व्हावं म्हणजे गुंता होत नाही.प्रोब्लेंम्सचाही आणि नात्यांचाही !" तो खिडकीतून बाहेर डोकावत म्हणाला.
" हो रे करेक्ट आहे. पण सगळ्यानांच गोष्टी एक्सप्लेन करायला नाही जमत कधीतरी आपल्या माणसांनी त्या समजूनही घ्यायला हव्या." रुक्ष, उदास स्वरात ती म्हणाली. तसं त्याने पटकन तिच्या चेहर्‍याकडे वळून पाहिलं.
" हं. समजून तर आपल्याच माणसांनी घ्यायला हवं! करेक्ट आहे." तो म्हणाला. काही मिनिटांपुर्वी ओळख झालेल्या माणसाला तरि आपलं म्हणणं पटलं याने तिला बरं वाटलं. इतक्यात खालून आईची हाक आली. तिने मसालाडोसे करण्याचा घाट घातला होता.त्याची चव चाखायलाच ती बोलावत असेल ते तिच्या लक्षात आलं. दोघेही खाली हॉलमध्ये आले.
" काय आई " खाली येत सायली म्हणाली
" अरे बराचवेळ झाला तू काही घेतलंस नाहीच. मी गरमागरम खायला केलंय. या बसा " तो पटकन डायनिंगटेबलच्या खूर्चीत जाऊन बसला. आईने किचनमधून गरमागरम डिश सर्हव केली.
" वाव ! छान झालेत डोसे आई " 
" थँक्यु " भावी जावयाने केलेल्या कौतुकाने आई आनंदली. 
" बाकी घर छान आहे तुमचं.सायलीची रूमही " सायलीकडे कटाक्ष टाकत तो म्हणाला.
" वा ! तुला आवडलं तर घर आणि आम्ही " बाबा म्हणाले
" म्हणजे काय बाबा.घर आवडलं म्हणजे त्यात माणसंही आलीच कि ! माणसांनीच तर घर बनतं." त्याने समर्पक उत्तर दिलं त्यावर बाबा खूश झाले. तसं आईने सायलीकडे पाहिलं. तिच्या चेहर्‍यावरचे भाव निर्विकार होते.
" चलो आई बाबा उशीर झालाय निघतो मी आता. भेटू पुन्हा" तो खूर्चीतून उठत म्हणाला.
आई बाबा त्याला बाय करण्यासाठी दारापर्यंत आले. तीही आई बाबांमागे जाऊन उभी राहिली. बाहेर पडताना तो दोघांना नमस्कार करायलाही विसरला नाही. 
" आणि हो सायली तुझी डेकोरेट केलेली रुम छान आहे. तुझ्या नव्या घरात फोटोज आणि चित्रं एकत्र लावलीस तर अजून छान दिसेल." तिने चेहर्‍यावर हासू आणत मानेन हो म्हटलं. " ओके बाय " त्याने गाडीपाशी जाऊन मागे वळून पुन्हा बाय केलं. तो बाहेर पडेपर्यंत आईबाबा कौतुकाने पाहत राहिले. तिने घड्याळात पाहिलं तर सहा वाजलेले समर कुठे असेल तिच्या डोक्यात पहिला विचार आला. ती रुममध्ये धावत गेली. मोबाईल इकडे तिकडे पाहिला तर पिलोशेजारी तिचं लक्ष गेलं. मघाशी दरवाजा उघडण्यासाठी आईची हाक आली तेव्हाच शुभम आला असेल अशी शंका तिला आली म्हणून मोबाईल सायलेंट मोडवर ठेवून ती खाली आली. शुभमसमोर अचानक समरचा फोन आला तर दोन्ही कडची सिच्युएशन सांभाळताना पंचाईत होईल म्हणून ' आय एम सॉरी' चा मेसेज पाठवून तिने मोबाईल सायलेंटवर ठेवला होता. एव्हाना त्याचे कॉल्स येऊन गेले असतील असंही तिला वाटलं पण त्याने एकही कॉल केला नव्हता. छे ! काय होऊन बसलं हे ! त्याने स्वतःहून बोलावलं होतं आणि आपण गेलो नाही. काय वाटलं असेल त्याला ! एकामागोमाग एक विचार तिच्या मनात येत होते. तिने लागलीच त्याला कॉल केला पण मोबाईल स्विचअॉफ येत होता. 

........................
कॅफे अरोमा
" साहेब, काही अॉर्डर द्यायची आहे का ?" वेटरने अदबीने विचारलं.
"नो थँक्स " त्याने तिसर्‍यांदा वेटरला हसून ' नको ' म्हटलं. दोन वेळा कॉफी घेऊन झाली होती. पण आज एकट्यानेच कॉफी घेताना काही दिवसांपूर्वीची संध्याकाळ त्याला आठवली. जागा कोणतीही असली तरी आपल्याला छान वाटणं न वाटणं हे आपल्यासोबतच्या माणसांवर अवलंबून असतं. असा एक विचार त्याच्या मनात आला.त्याने भोवतालच्या टेबल्सवरती एक नजर टाकली. प्रत्येक कपल आपापल्या विश्वात आनंदी होतं. या सगळ्यांपाशीच त्यांचं असं हक्काचं कुणीतरी आहे याचं त्याला कौतुक वाटलं आणि या सगळ्यांमध्ये आपण एकटेच आहोत याचं दुःखसुद्धा !  त्याच्या खिशातील मोबाईलची त्याला आठवण झाली. सकाळपासून आपण डिस्टर्रब होतो. त्यातून रविवार म्हणजे सकाळपासून फ्रेंड्सचे कॉल येणार त्यामुळे त्याने मोबाईल स्विचअॉफ केला. आता पाहिलं तर सायलीचे दोन मेसेज होते. 12.30 चा एक ज्यात तिने त्याच्या 'भेटूया का ' या मेसेजवर ' Ok See u' चा रिप्लाय पाठवला होता. त्यानंतरचा मेसेज 2.43 चा होता ज्यात ' आय कान्ट कम टुडे सॉरी ' म्हटलेलं होतं. लगोलग एक मिसकॉल होता आणि आता सहाला एक मिसकॉल होता. त्याला आपण इथे बसून वेळ वाया घालवला याचा राग आलाच पण त्याला जास्त या गोष्टीचं वाईट वाटलं कि सायलीने आयत्या वेळी प्लॅन कॅन्सल केला म्हणजे आपल्याशी बोलण्यात, आपल्याला भेटण्यात तिला रस नाही. त्याने कॉफीचं बिल पे केलं आणि तिथून निघाला. बाईक स्टार्ट करताच पुन्हा सगळे विचार डोक्यात धुमाकुळ घालू लागले.

.................
" काय रे समर अरे होतास कुठे तू दुपारपासून?" बाबांनी दरवाजा उघडताच समोर त्याला पाहून प्रश्नांचा भडिमार सुरु केला. 
" इथेच होतो " तो दारातून आत येत म्हणाला
" इथेच म्हणजे कुठे ? सांगून जाण्याची काही पद्धत आहे का नाही ! आणि सकाळपासून तुला कुठे जायचं नव्हतं. काही प्लॅन नव्हता आणि अचानक कुठे गेला होतास ?" बाबा पुन्हा म्हणाले.
" बाबा जस्ट रिलॅक्स. मी....... मी सायलीला भेटायला गेलो होतो." तो हॅल्मेट ठेवत म्हणाला.
" ओके. पण निदान सांगून तरि जायचंस ना. तन्मयचा फोन आला होता. तुझा मोबाईल स्विचअॉफ होता म्हणून घरि कॉल केला त्याने. त्याच्या मित्राचं चित्रप्रदर्शन होतं ना !"
" हं. म्हणाला होता तो! माझा मुड नव्हता सो नाही गेलो " तो बाबांची नजर टाळत म्हणाला आणि सरळ रुममध्ये निघून गेला. बाबा त्याच्या विचित्र वागण्याकडे पाहतच राहिले. समरचं नक्की काय झालंय पाहायला हवं बाबांनी या प्रकारात आता स्वतः लक्ष घालण्याचं पक्क ठरवलं.
रात्री तिने झोपण्याआधी त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला. आता मोबाईल स्विचअॉफ नव्हता पण पलिकडून कॉल रिसिव्ह होत नव्हते. शेवटी कंटाळून उद्या सकाळी लवकर निघू आणि समरच्या अॉफिसला पोहचून त्याला भेटू असं ठरवून ती झोपी गेली.

......................
सकाळी
" हॅलो मॅम व्हॉट कॅन आय हेल्प यु ?" रिशेप्शनिस्टने विचारले तशी सायली गोंधळली.
" अ....... हॅलो, आय वॉन्ट टु मिट मि.समर जहागिरदार"
" ओके मॅम, जस्ट ए मिनिट " तिने पटकन कॉल लावला आणि 'ओके ' म्हणत त्वरेने ठेवूनही दिला.
" सॉरी मॅम, हि इज अॉन लिव्ह " रिसेप्शनिस्टने सांगितले
" ओके, थँक्स " 
" वेलकम मॅम "

निराश मनाने ती तिथून बाहेर पडली. समरच्या घरी जाऊया का असा विचारही तिच्या मनात आला. पण तिचंही अॉफिस होतं. त्यातून घरि त्याचे बाबा भेटले तर त्यांना काय सांगणार हा प्रश्न होताच. त्यामुळे घरि जाण्याचा विचार तिने बाजूला सारला आणि तिच्या अॉफिसला जायला निघाली.

.........................
संध्याकाळ
    " ओ ऐका ना, शुभम आणि सायलीची जोडी किती छान वाटते ना !" नुकतंच अॉफिसमधून येऊन फ्रेश होऊन बसलेल्या बाबांना चहा देत आई म्हणाली.
" हो गं "
" अहो, विजयभावोजींचा काही फोन वगैरे आला का ?"
" नाही गं, बघू येईल. अगं कालच येऊन गेला ना तो !"
" हो ते आहेच. पण दिवाळीही जवळ आलीय. तुळसी विवाहानंतर साखरपुडा करायला काही हरकत नाही ना !"
" अगं हो हो, आधी या दोघांच्या मनात काय आहे ते तरि समजू दे. मग बघू पुढचं. तू उगीच घाई करु नकोस आणि तिच्या मागेही लागू नकोस " बाबांनी आईला दटावले.
" बरं पण दिवाळीची तयारी तरि सुरु करुया ना " आई तो विषय बाजूला ठेवत उत्साहाने म्हणाली.
" हो हो कर कि. सायलीला विचार काय काय करायचं ते ठरवा तुम्ही " बाबा तिच्या आणि लेकीवर जबाबदारी टाकून मोकळे झाले.
इतक्यात सायली आली. तिच्याकडे लक्ष जाताच आईने दारापाशी जाऊन तिची बॅग घेतली आणि आत जाऊन पाण्याचा ग्लास घेऊन आली.
" काय सायलीबाई आज दमलात वाटतं! चेहरा निस्तेज का असा ?" 
" काही नाही बाबा " सोफ्यावर टेकून बसत ती म्हणाली. पाण्याचा ग्लास ओठी लावते ना तोच आई म्हणाली," अगं आम्ही आता दिवाळीच्या खरेदीविषयी बोलत होतो. काय काय करायचं त्याचं प्लॅनिंग करु हा."
" बरं आई " ती म्हणाली
" यंदा माझ्यासोबत तू आहेस, शुभमही आहेच कि मदतीला" आईच्या या बोलण्यावर तिने हातातला ग्लास ट्रेवर आपटलाच आणि चिडून रुममध्ये निघून गेली. तिच्या या प्रतिक्रियेवर ते दोघेही अवाक होऊन पाहत राहिले. इतकं चिडताना त्यांनी पहिल्यांदाच तिला पाहिलं. काय झालं असेल याने तिचे आई बाबाही काळजीत पडले.
क्रमशः

0

🎭 Series Post

View all