Login

निरागस प्रेमाची गोड गोष्ट भाग 7

Love Story

दारावरची बेल वाजत होती म्हणून समरचे बाबा खोलीतून त्याला हाका मारत होते." अरे समर, बघ कोण आलंय. मला क्लायंटकडे जायला उशीर होतोय." त्यांची कागदपत्रांची आवराआवर सुरु होती. पण बेल अजुनही वाजत होती. शेवटी कंटाळलेले बाबा स्वतःच पटकन सगळी कागदपत्रं टेबलवरुन आवरुन फाईलमध्ये ठेवत उठले आणि बाहेर आले. इकडे तिकडे त्यांनी नजर टाकली तर हॉलमध्ये कुणीही नव्हतं. वरच्या रुमच्या दिशेने पाहत ते स्वतःशीच पुटपुटले," देवा, काय चाललेलं असतं या मुलाचं कोणास ठाऊक." त्यांनीच जाऊन मग दरवाजा उघडला.
" हॅलो, कोण आपण ?"
" मी शुभम साखरे. आपण अॅडव्होकेट जहागिरदार राइट" 
" येस येस. या ना आपलं काही काम होतं का?"
" हो, अॅक्चुयली मी समरला भेटायला आलो होतो." हॉलमध्ये नजर टाकत तो म्हणाला. त्याची नजर समरला शोधते आहे हे बाबांच्या लक्षात आलं.
" या ना आत " ते त्याचं वेलकम करित म्हणाले.
" If you don't mind, मला अहो जावो नका करु सर."
" ओके ओके. ये बस ना " बाबा हसत म्हणाले आणि मोठ्याने त्यांनी, ' समर तुझा मित्र आलाय बघ ' अशी हाक मारली. तस शुभमची नजर झटकन बाबांकडे गेली. तो जरासा गोंधळला. तो बसणार इतक्यात समर वरुन खाली आला आणि समोर शुभमला पाहून चपापला. पुढे येत सावरुन तो म्हणाला, " हाय, मिट माय पप्पा " 
" अरे मघाशीच ओळख झाली आमची" समरकडे पाहत ते म्हणाले. "मला एका क्लायंटकडे जायचंय. अंधारही होईल आता मी निघतो. तुम्ही बसा गप्पा मारत. ओके बाय शुभम अँन्ड नाईस टु मिट यु " त्याच्याशी हस्तांदोलन करत बाबा म्हणाले आणि निघून गेले. त्यांच्या जाण्याने दोघांचाही जीव भांड्यात पडला.
" ये बस ना. काही काम होतं का ?" समर त्याला बसायला सांगत म्हणाला. 
"हा, म्हटलं भेटावं तुला सहजच. मी अॉफिसला गेलो होतो. तू आज रजेवर आहेस असं कळलं. मग तुझा नंबर घेऊन कॉल केला कुठे भेटूया विचारायला."
" हा, अरे बाबा आज संध्याकाळी घरी थांबणार नव्हते. म्हणून मग घरि ये म्हटलं." त्याने खुलासा केला. काही क्षण शांतता मग समरनेच बोलायला सुरुवात केली.
" बरं अचानक मला कसं भेटावसं वाटलं तुला ?" त्याने काहीश्या नाराजीच्या सुरात त्याला विचारलं.
" नथिंग असं खास काही नाही. काल सायलीच्या घरि गेलो होतो. आयमिन तिच्या बाबांनीच बोलावलं होतं." वाक्यांची जुळवाजुळव करत तो म्हणाला. 
" मग काय म्हणते सायली ? पुढची बोलणी पण झाली असतील ना ! " अजून काही समजेल या आशेने त्याने विचारलं. 
" नाही. काल आपलं असंच घरच्या सगळ्यांना भेटून आलो बाकी काही नाही आणि हो तुझी पेंन्टिंग्ज पण पाहिली." आठवल्यासारखं करित शुभम म्हणाला. त्यावर समरने त्याच्या चेहर्‍याकडे पाहिलं. जेलसी, राग,चीड कसलेच भाव त्याच्या चेहर्‍यावर समरला दिसले नाहीत. तो पुढे बोलू लागला. " सायली कौतुक करित होती तुझ्या चित्रकलेचं." या वाक्यासरशी त्याला मनातून आनंद झाला पण चेहर्‍यावर दाखवू न देता फक्त 'हं ' एवढंच रिअॅक्ट झाला.
" मलाही एक पेंन्टिंग हवं होतं तुझ्याकडून तिला गिफ्ट देण्यासाठी. म्हटलं इतर काही गिफ्ट देण्यापेक्षा एखादं छान पेंन्टिंग द्यावं." यावर समरला काय बोलावं तेच सुचेना. हा नाराजीने बोलतोय कि खरंच मनापासून बोलतोय ते ह्याला कळत नव्हतं. 
" हो शुअर. ये आत " समरने त्याला आपली पेंन्टिंग्ज ठेवलेल्या रुमकडे नेलं. बाहेर हळूहळू अंधार पसरु लागला होता. तरि खोलीत पुरेसा प्रकाश होता. रुमला मोठ्या खिडक्या होत्या. खिडक्यांचे रंगीबेरंगी पडदे दूर सारलेले होते. त्यामुळे बाहेरुन हवेची झुळुक आत येत होती. बाहेरच्या झाडांमुळे खेळती असलेली खोलीतली हवा, खोलीभर भरुन राहिलेला रंगांचा वास, कॅनव्हास, त्याशेजारी ठेवलेले वेगवेगळ्या आकाराचे ब्रश, आजूबाजूला व्यवस्थित लावलेली पेंन्टिंग्ज पाहून त्याला एका वेगळ्याच विश्वात आल्याचा भास झाला. इतक्यात खिडकीसमोर भिंतीला लागून असणार्‍या एका पेंन्टिंगकडे त्याच लक्ष गेलं. खूप सुंदर चित्र होतं ते ! एक मुलगा पियानो वाजवत बसला आहे आणि त्याच्यामागून एक मुलगी त्याच्या गळ्यात दोन्ही हात टाकुन उभी आहे. त्या मुलाची पियानोवर थिरकणारी बोटं ती पाहतेय. ते उभे आहेत त्याशेजारीच असणार्‍या खिडकीतून तांबूस लाल सुर्यास्ताची किरणं पियानोवर पसरली आहेत. एकमेकाच्या प्रेमात ओथंबलेलं ते जोडपं. एका सुखी समाधानी संसाराचं चित्र होतं ते! ते पाहून शुभम खुश झाला. त्या पेंन्टिंगकडे बोट दाखवत तो म्हणाला," दॅट्स सो ब्युटिफुल. आय वॉन्ट दॅट."
समरलाही शुभमचा चॉईस आवडला. त्याने लागलीच ते पेंन्टिंग त्याला द्यायला पॅक केलं आणि चकाकत्या गिफ्टपेपरवर एक छोटसं कार्ड चिकटवलं. शुभमकडे पाहत त्याने विचारलं," हं. डन. काय लिहु यावर ?" 
"नको, राहू दे नंतर विचार करुन लिहिन "
" ओके " हसत समर म्हणाला.
" बाय द वे असं विचारणं चुकीचं आहे पण याचे पैसे ?" अडखळत शुभम म्हणाला.
" नो नो मी मित्रांकडून पैसे नाही घेत." त्याने हसत ते पेंन्टिंग शुभमच्या हाती दिलं आणि त्याला काही वर्षांपुर्वीचा प्रसंग आठवला. सायलीने आर्ट गॅलरित त्याच्यासमोर त्याचचं पेंन्टिंग हट्टाने खरेदी केलं होतं. नंतर तिला वाईट वाटलं आणि घरी येउन माफी मागितली तेव्हा आपण तिला पेंन्टिंग विनामोबदला दिलं होतं. तेव्हापासुन आमची मैत्री झाली ती आजतागायत पण यापुढे !
" समर, कुठे हरवलास ?" शुभमच्या आवाजाने तो विचारांच्या गर्तेतून बाहेर आला. 
" काही नाही " 
" ओके, बरं निघतो मी आता " शुभम पेंन्टिंग घेऊन बाहेर आला. 
" सॉरी, चहा कॉफी काहीच घेतलं नाही तू "
" इट्स ओके, एक मोठ्ठ काम झालं माझं, बरं बाय "
" ओके बाय " समरने दारापाशी येत बाय म्हटलं.

.............................
काही दिवसांनंतर
" काकु, काकु आम्ही आलो " बाहेर पोरींचा गलका कानावर पडताच सायलीची आई किचनमधून बाहेर आली. दारात जुई, श्रद्धा,मीना उभ्या. त्या धावतच आत आल्या.
" अगं हळूहळू तुम्ही कश्या काय अचानक?"
" अहो काकु तुम्हीच तर श्रद्धाला फोन केलेलात ना, दिवाळी आहे पुढच्या आठवड्यात आणि सायली तोंड फुगवून बसलीय. मी एकटीनेच सगळं करतेय असं तुम्हीच बोललात म्हणून आम्ही आलो मदतीला. आम्हालाही दिवाळीची सुटी आहे तर म्हटलं येऊया तुमच्याकडे." मीना सविस्तर उत्तर देत 'हुश्श ' म्हणून सोफ्यावर टेकली.
" बरं झालं पण तुम्ही आलात, मला तर हल्ली घरात काय चाललंय आमच्या समजेनासंच झालंय." 
" काय झालं काकु? " श्रद्धा
" अगं हि सायली बघ ना, आता ह्यांच्या मित्राच्या मुलाचं स्थळ आलंय "
" हो म्हणाली होती ती मागे एकदा मला...काय त्याचं नाव बरं हा शुभम " जुई लागलीच म्हणाली
" हा पण हि बया आधीच स्थळं पहायला तयार नव्हती. ह्यांनी समजावलं म्हणून तयार झाली पण कश्यात इंटरेस्ट नाही कि कसला उत्साह नाही. त्या शुभमशी धड बोलायलाही तयार नाही हि मुलगी." आई इतक्या दिवसांतली तिच्या मनाची कालवाकालव सांगून मन मोकळं करत होती.
" हो पण कसा आहे हा शुभम म्हणजे हँडसम असेल ना !" जुईने थट्टेच्या सुरात विचारलं.
" हो मुलगा चांगला आहे. घरचेही ओळखीचे आहेत तसा काहीच प्रोब्लेम नाही. पण या मुलीच्या मनात काय चाललंय तेच कळत नाही. तश्यात तो शुभमही घरि आला होता."
" काय! तो इथे आला होता" सोफ्यावरुन ताडकन उठत मीना म्हणाली." मग आम्हाला बोलवायचंत नाही का सायलीची तयारी करायला."
" अगं कसलं काय अचानक यायचं ठरलं त्याचं.त्यादिवशीही या बाईसाहेब कुठेतरी बाहेर जायला निघालेल्या मग मी थांब म्हटलं तेव्हा थांबली.तो घरि येऊन गेल्यापासुन तर हि आपली शांत शांत असते.सकाळी उठते,अॉफिसला जाते,संध्याकाळी रुममध्ये असते, रात्री जेवून झोपते.आमच्याशी पहिल्यासारखं बोलत नाही. अख्य्या घरभर गोंधळ सुरु असायचा तिचा आता काही बोलत नाही,पहिल्यासारख माझ्याशी काही शेअर करत नाही.बरं तो शुभमही गायब,घरि येऊन गेल्यापासुन काही फोन नाही कि इकडे फिरकणं नाही. हिचे बाबाही शांतपणे सगळ बघत बसलेत." आई हळहळत म्हणाली.
" ओह, इतकं सगळं झालं आम्हाला काही कल्पना नव्हती याची." मुली काळजीने म्हणाल्या.
" बरं आता आम्ही आलोय ना बघु आपण काय ते " इतक्यात सायली बाहेरुन आली आणि सगळ्याजणींना पाहून एकदम खुश झाली. आई समोर आहे याकडे लक्ष न देता ती त्यांच्यात मिसळली. गप्पा मारु लागली. सगळ्याजणी मग तिच्या रुममध्ये गेल्या. कितीतरी दिवसांनी हि मुलगी हसली हे पाहून आईलाही जरा बरं वाटलं.

...............


" आमचे जिजू काय म्हणतात ?" श्रद्धाने मुद्दामहून विषय काढला.
" कोण शुभम ! " ती आश्चर्याने म्हणाली 
" नाही गं, अजून काही फिक्स नाही."
" का गं, तुला पसंत नाही का तो!" श्रद्धा
" तसं नाही, असो He is good-looking, Well-mannered guy पण माझं मन नाही तयार होत अजून या लग्नाला." ती एकटक भिंतीकडे पाहत म्हणाली.
" ओके, तू शांतपणे काय तो निर्णय घे." मीना तिच्या हातावर हात ठेवत धीर दिला.
" बरं, Lets change the topic. ए मीना अंकुश,तन्मय येणार आहेत ना! आपण सगळे भेटणार आहोत दिवाळीदिवशी लक्षात आहे ना " श्रद्धा मीनाकडे पाहत म्हणाली.
" हो, येणार आहेत.समरला सांग गं सायली " श्रद्धाने तिला आठवण करुन दिली.
" ए मला भेटला होता समर हल्लीच. तू मला शुभमबद्दल सांगितलंस फोनवरुन त्याच्या दुसर्‍या दिवशी भेटलेला. मी सांगितली त्याला हि गुड न्युज." जुई धडाधडा बोलून मोकळी झाली. 
" व्हॉट !!!! " सायली मोठ्याने म्हणाली पुढे तिला बरंच बोलायचं होतं पण सगळ्यांचा मुड अॉफ होईल म्हणून ती शांत झाली. पण मनातून ती जुईवर खूप चिडली होती. गेल्या काही दिवसात समर तिच्याशी अंतर ठेवून वागत होता त्याचा आणि या गोष्टीचा संबंध तर नसेल अशी शंका तिला आली. त्यापाठोपाठ गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनाही ती आठवू लागली.
क्रमशः

0

🎭 Series Post

View all