Login

निरागस प्रेमाची गोड गोष्ट भाग 9

Love Story

गेल्या भागात सायली घरि आलेल्या मैत्रिणींची नजर चुकवून समरला भेटायला जाण्याचं ठरवते. पण समर तिला तो बिझी असल्याचं मेसेजवरुन सांगतो. त्यामुळे बरेच उलट सुलट विचार तिच्या मनात येतात. तिच्या मैत्रिणी दोन दिवस आईला मदत करुन निघून जातात. मात्र या दोन दिवसांत शुभम मात्र तिची मैत्रिण,श्रद्धाशी ओळख काढतो आणि तिला त्याचा प्लॅन सांगतो. आपल्याला हे लग्न करायचं नाही असं त्याने आधीच त्याच्या बाबांना सांगितलंय. तो सायलीच्या घरी येऊन तिच्या आईबाबांची समजूत घालून त्यांनी तिच्याशी बोलावं असं सुचवतो.आता पाहुया आईबाबा हि सगळी परिस्थिती कशी हाताळतात.)

" अहो काय बोलून गेला हा ! मला तर वाटतंय माझ्या ऐकण्यात चूक झाली." आई बाबांकडे पाहत म्हणाली. काय करायला गेलो अन काय झालं असे भाव तिच्या चेहर्‍यावरती होते.
" हो, चूक तर झाली. पण या मुलांची नाही आपली !" बाबा सुस्कारा टाकत म्हणाले. आपण फार घाई केली सगळ्याच गोष्टींची याचा पश्चात्ताप त्यांना झाला होता. 
" हो पण आपल्याला तरि कसं कळणार न सांगून." आईने 'आपली बाजू ' सेफ दाखवण्याचा वरवरचा प्रयत्न केला.
" अगं मुलं ती. आपण आईवडिल ना मग आपल्याला नको का समजायला ? सगळी मूलं सारखी नसतात गं. काही मुलांना आईवडिलांना काय वाटतं त्याच्याशी घेणदेणं नसतं स्वतःचं सुख बघतात, काहीजण आईवडिलांना त्यांना पटो वा न पटो आपले निर्णय सांगून मोकळे होतात.त्यांच्या लेखी ती फक्त औपचारिकता असते पण काहीजण असतात ना त्यांच्या मनात असते भिती,आदर त्यापेक्षा आपण असं वागलो तर आईबापाला काय वाटेल त्याचा विचार ती मुलं करतात."
" हं बरोबर आहे तुमचं "  आई मान हलवत म्हणाली
" बघ ना, आपली सायली एकुलती एक. सतत आपल्यासोबत राहिलेली, प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगणारी,विचारणारी.तिला नव्हतं जर लग्न करायचं तरि तिने आपल्याला सांगितलं असतं तुला वाटतं का ?" बाबा म्हणाले.
" खरंच, आपण परस्पर सगळं ठरवायला नको होतं. लग्नासारखी एवढी मोठी गोष्ट किती सहज आपण पालक निर्णय घेऊन टाकतो ना ! " आई
" हो, पण आता कसली घाई नको. तू बोलशील का तिच्याशी ?" बाबांनी विचारलं.
 " मी ! माझ्याशी कुठे नीट बोलतेय ती " आई 
" म्हणून म्हणतोय तू बोल तिच्याशी शांतपणे " बाबांच्या या बोलण्यावर आई तयार झाली.

..............................

सायली रात्री गॅलरीत एकटीच उभी होती. बरेचसे विचार मनात घोळत होते. समर तिच्याशी इतके दिवस बोलला नव्हता. तिला वाटलं आपली मैत्री संपली आता. शुभमकडून होकार आला तर आपण काय करणार आहोत हेही तिला माहित नव्हतं. आपण समरचा खूपच विचार करतो का ? तिनेच स्वतःला प्रश्न विचारला. ' मित्र आहे तो ' इतकंच उत्तर दुसर्‍या मनाने दिलं. आपल्या जागी जर तो असता आणि एखादी मुलगी त्याच्या आयुष्यात आली असती तर आपण काय केलं असतं ? ' डोन्ट  नो ' दुसर्‍या  मनाने म्हटलं. पण आपल्याला वाईट वाटलं असतं. तिचा दोन मनांचा हा  संवाद सुरु असताना आई पाठिमागून येऊन तिच्याजवळ उभी राहिली.
" कसला विचार करतेस ?" आईच्या बोलण्याने ती भानावर आली.
" कसला नाही " आईकडे न पाहता बाहेर पाहत ती म्हणाली.
" रागावलीस ? " आईने खांद्यावर हात ठेवत प्रेमाने विचारलं.
" का रागवू ? " 
तिच्या या प्रश्नावर ' आम्ही शुभमचं स्थळ सुचवलं म्हणून ' अस आईला म्हणायचं होतं पण लग्न म्हणताच हि पुन्हा चिडेल आणि काहीच बोलणं होणार नाही फक्त भांडण होईल हे आईच्या लक्षात आलं. तेवढ्यात सायलीच म्हणाली.
" हेच शुभमशी तुम्ही बोलणी सुरु केलीत म्हणून काय."
" हं " आई फक्त एवढंच बोलू शकली.
" नाही, तुमच्यावर का रागवू ? तुम्हाला जो योग्य वाटला तो मुलगा तुम्ही माझ्यासमोर आणलात आता यात आपल्याला तो पसंत आहे का नाही हे मलाच नाही ठरवता आलं. माझा ना खुप गोंधळ उडालाय." ती आईकडे पाहत म्हणाली.
" कसला ?" आईने विचारलं.
" हेच आपल्यासाठी कोण योग्य,आपल्याला कोणासोबत आयुष्य घालवायला आवडेल हे कसं ठरवायच." 
" बघ आमच्यावेळी गोष्ट वेगळी होती. आईवडिल जे म्हणतील तेच आपल्यासाठी बरोबर पण आता काळ बदललाय तशी प्रत्येकाची नात्याची व्याख्यासुद्धा बदलीय. आपल्या पार्टनरकडून असणार्‍या अपेक्षा,कमिंटमेन्ट ही बदल्यात."
" हुश्श " तिने एवढं सगळं ऐकून म्हटलं.आईने सोप्या शब्दात सांगायचा प्रयत्न केला.
" अगं, आपल्याला ज्या माणसासोबत नेहमी रहावंसं वाटतं. हसावंस वाटतं, ज्या माणसासाठी काहीतरी करावंसं वाटतं. त्याला त्रास होऊ नये असं वाटतं तेच प्रेम. तेच आपलं माणूस.तुझ्या लाईफमध्ये आहे का कुणी असं ?"आईचं बोलणं ती काळजीपुर्वक ऐकत होती आणि अचानक आलेल्या या प्रश्नाने ती कावरीबावरी झाली. काय उत्तर द्यावं तिला सुचेना, तिच्या तोंडी या वर्णनाला साजेसं एकच नाव येत होतं,' समर ' पण तिने ते घ्यायचं टाळलं. 
" काय गं कुठे हरवलीस ? "
" काही नाही " ती खाली पाहत म्हणाली.
" खरंच कोण आहे का असं ज्याच्यासोबत तुला राहायला आवडतं. ज्याची कंपनी तुला आवडते ?"
" आई खरं सांगू का ? तू मघाशी म्हटलंस त्याप्रमाणे एकच माणूस आहे समर. का कुणास ठाऊक but I like his company पण मैत्री आहे आमची फक्त या दृष्टीने मी नाही विचार केला कधी."
" मग आवडेल का करायला विचार ?" तिच्या चेहर्‍यावरचे बदलते भाव पाहत आई गालात हसत म्हणाली.
" हं बघु.......... पण त्याचं नाही माहीत." ती उदास होत म्हणाली.
" होईल सगळं ठिक आधी तुला नक्की काय हवंय ते तुझ्या मनाला विचार मग बाकी चित्र स्पष्ट दिसेल." आईने भिंतीवरल्या समरच्या पेंन्टिंग्जकडे पाहत म्हटलं. 
" चल झोप आता गुड नाईट " आई एवढं बोलून निघून गेली. 
................................

" काय मग काय म्हणतेय लेक " बाबांनी आजुबाजुला सायली नाही ना याची खात्री करुन घेत आईला हळू आवाजात विचारलं.
" हं अजून काही फिक्स नाही " आई विचार करित म्हणाली.
" फिक्स नाही म्हणजे काल बोलणं झाल ना तुमचं." बाबांनी अाश्चर्याने विचारलं.
" अहो हो, पण हा विचारच तिने आधी केला नव्हता. अचानक मी तिला कोणी आवडतं का असा विषय काढला. शुभमचा जप करणारी आई अचानक असं काय म्हणतेय म्हणून आधी ती गोंधळलीच. मग हळूहळू बोलायला लागली. समर तिला आवडतो हे मलाही लक्षात आलं पण ' आमची फक्त मैत्री ' हा विचार करुन ती गप्प राहते. त्यात समरचं या बाबतीतलं मतही माहित नाही."
" ओह, असं आहे तर " एखाद्या गुप्तहेरासारखा आर्विभाव आणून बाबा म्हणाले.
" हो पण समरच्या मनात काय आहे हे कळलं तर !" बाबा
" ते कसं ?" आई
" सोप्प आहे, आता बघ मी काहीतरी आयडिआ करतो." बाबा उत्साहाने म्हणाले.
" बरं, नीट काय ते करा." आईने सल्ला दिला.

क्रमशः

0

🎭 Series Post

View all