Login

ईरा चॅम्पियन्स स्पर्धा २०२५ मनोगत

मनोगत
ईरावरील सर्वांना माझा, सौ. हेमा पाटीलचा नमस्कार.

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या ईरा चॅम्पियन्स २०२५ या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्या अनुषंगाने मनोगत व्यक्त करावेसे वाटले, म्हणून हा प्रयत्न. मी ईरावर नवीन आहे. मी इथे लिहायला सुरुवात केल्यानंतरची ही पहिलीच ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आहे ज्यात मी भाग घेतला.

खरंतर जूनमध्ये माझी आई गेली. तिच्या दुःखातून सावरणे माझ्यासाठी खूप अवघड होते. लिखाणात मन रमवावे म्हणून मी ईरावर जलदकथा लिहिण्याचा सपाटा लावला होता. यातच स्पर्धेची अनाउन्समेंट झाली, म्हणून भाग घेतला.

आमचा ग्रुप ठरला आणि ग्रुपची कॅप्टन ठरली अश्विनी! अतिशय संयमित व्यक्तीमत्व! सोबत होते सर्वेश सर, जे कायमच सर्वांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे जरा निर्धास्त झाल्यासारखे वाटले. शिल्पा सुतार, मिनाक्षी ताई यांच्याशी थोडाफार परिचय होता, बाकीचे सगळे लेखक ईरावर दिसायचे, पण प्रत्यक्ष परिचय या स्पर्धेच्या निमित्ताने अश्विनी टीममध्येच झाला.

ग्रुप तयार झाल्यावर शुध्दलेखन चेक करण्यासाठी कमिटी बनवली गेली, त्यात मला घेतले. शुध्दलेखन चेक करताना सर्वांच्या कथा हाताखालून गेल्या. प्रत्येकाची वेगवेगळी असलेली लेखनशैली मलाही नकळतपणे काहीतरी शिकवून गेली असेलच. आपण जेव्हा इतरांच्या चुका शोधतो तेव्हा आपल्या चुका ही आपल्याला ठळकपणे जाणवू लागतात, त्यामुळे आपोआपच आपल्यातही सुधारणा होते.

या स्पर्धेने काय दिले? आधी तर नवीन मैत्र लाभले जे आयुष्यात फार फार महत्त्वाचे असते. त्यानंतर आत्मभान दिले. या ग्रुपच्या माध्यमातून व्यक्त होण्याची, ग्रुपसोबत सांघिक कामगिरी करण्याची संधी मिळाली. आपण एकटे जेव्हा काही करत असतो, तेव्हा मनाचे मालक असतो. ग्रुपसोबत असताना आपल्यावर आपल्या ग्रुपची जबाबदारी येते. ही जबाबदारी समर्थपणे पेलून ग्रुपसोबत आपणही आपल्या ग्रुपला विजयाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न करण्यात कुठेही कमी पडू नये या भावनेने कष्ट घेण्यास बळ दिले.

सर्वेश सरांच्या व सर्व ग्रुपच्या प्रोत्साहनामुळे एकामागून एक कथा लिहित गेले. यातून आत्मविश्वास निर्माण झाला की, आपण इतके लिहू शकतो. पुढच्या मार्गक्रमणासाठी हा आत्मविश्वास नक्कीच उपयोगी पडेल.

क्रिकेटची मॅच पाहताना आपल्या अंगात जसे चैतन्य संचारते तसे चैतन्य त्यावेळी अंगात संचारले होते. विद्या कु़ंभार, अश्विनी, सर्वेश सर आणि मी शुध्दलेखन चेक करताना कधीकधी लेखनविषयक चर्चाही घडायची.

काय सुंदर होते ते दिवस! रोज रात्री ग्रुप वर सगळेजण चर्चेत सहभागी व्हायचे. मिनाक्षी ताईंच्या तब्येतीमुळे त्या कमी वेळ ऑनलाईन असत. चेतन सर, अश्विनी, शिल्पा सुतार, विद्या कु़ंभार, मधूनच डोकावून हास्याचे फवारे करून जाणारी खुशी, ऋतुजा, शिल्पा परूळेकर ताई, सुशांत सर, सर्वेश सर, जानकी आणि रेखाताई सगळेजण विजयाच्या दिशेने घोडदौड करत होते. मध्येच ग्रुपवर थांबून थोडा विसावा घेत पुढच्या टप्प्यावर जात होते. आणि विजयाची पताका फडकवली आमच्या अश्विनी टीमने! याचे सगळे श्रेय जाते आमच्या ग्रुपच्या एकीला आणि सामंजस्याला! बेस्ट कॅप्टनचा पुरस्कार हुकला याचे मात्र मनस्वी वाईट वाटतेय.

ईराच्या सर्वेसर्वा असलेल्या संजना मॅमचे खूप आभार! अशा स्पर्धेमुळे नेहमी मागच्या पावलावर असणाऱ्या माझा आत्मविश्वास इतका वाढला की, मी चक्क विडिओ बनवू शकले. भले त्याचा दर्जा जमला नसेल, पण मी प्रयत्न करू शकले हीच मोठी गोष्ट होती माझ्यासाठी!

मनात रूंजी घालणारी ही स्पर्धा माझ्या कायमच लक्षात राहील.
सर्व ग्रुप सदस्य व संजना मॅम, ईरा समूह, वाचक सर्वांचे खूप खूप आभार व धन्यवाद!
0