Login

ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मनोगत संघ कामिनी

ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या निमित्ताने संघ कामिनीतर्फे कप्तान या नात्याने लिहिलेलं हे मनोगत...
#मनोगत #ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
#संघ-कामिनी #कप्तान

सर्वात आधी तर ईराचे खूप खूप आभार! याशिवाय संघ कामिनीच्या प्रत्येक सदस्याला खूप खूप धन्यवाद!

खरंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहभागी होण्याची ही माझी पहिलीच वेळ. यानिमित्ताने लिखाण होईल या हेतूने स्पर्धेत आले आणि चक्क कप्तान झाले. हा कप्तान प्रवास पण फार रंजक ठरला. ग्रुप तयार झाला आणि अवघ्या काही मिनिटांत माझी कप्तान म्हणून निवड केली गेली. हा 'कप्तान' प्रवास बरंच काही देऊन गेला असं म्हणायला हरकत नाही. सुरुवातीलाच सर्वांनी जो विश्वास दाखवला तो अगदी शेवटपर्यंत किंबहुना आता निकाल जाहीर झाल्यानंतरही कायम राहिला याहून आनंदाची बाब काय असेल!

ईरा आणि अर्थातच संजना मॅडमने या स्पर्धेचं आयोजन केलं म्हणून ही अविस्मरणीय संधी मिळाली. मॅडम तर प्रत्येक वेळी न कंटाळता शंकांचं निरसन करून मार्गदर्शन करायला तत्पर असतात. लेखनाचा अनुभव तर बरेचदा येत असतो; पण इथल्या फेऱ्यांमुळे काहीतरी वेगळं करण्याची, लिहिण्याची संधी उपलब्ध होते. प्रत्येक फेरीत माझ्याकडून उत्तम लिहिलं जाईल असा प्रयत्न केला. त्यासोबतच यावेळी ऐच्छिक फेरी होती व्हिडिओची आणि मी फारशी व्हिडिओत न रमणारी! पण प्रयत्न करूयात हा विचार करून या फेरीत भाग घेण्याचा निर्णय घेतला. व्हिडिओसाठी सोबत यायला कोणी नाही म्हणून तेही रखडलंच होतं; पण मग अचानक शेवटच्या दोन दिवसांत दुसऱ्या संघाची कप्तान असलेली माझी खास मैत्रीण अश्विनी ताई आणि मी व्हिडिओ बनवण्यासाठी जायचा विचार केला. मग काय, दोघींनीही आपापल्या संघासाठी योगदान म्हणून छानसे व्हिडिओ बनवले आणि या खास स्पर्धेसाठी खास असा वेगळा एकत्रित व्हिडिओही केला. तिथल्या तिथे ते स्क्रीप्ट बनवणं फार मजेशीर होतं. सुरुवातीला तर कोणाला काही विचारायची भीतीच वाटत होती. हा व्हिडिओ काही बनणार नाही इथपासून झालेली सुरुवात शेवटी तीन वेगवेगळे व्हिडिओ बनवून समाप्त झाली. हा आगळावेगळा पण तितकाच सुंदर अनुभव केवळ या स्पर्धेच्या निमित्ताने मिळाला. त्यामुळे खरंच मॅडमचे खूप आभार!

संघातील प्रत्येक सदस्याबद्दल बोलायला बरंच काही असेल; पण आता थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक जण आपला वेगळेपणा जपून तरीही सहजपणे सर्वांसोबत रमणारे, रंगणारे आहेत. एक गोष्ट आवर्जून नमूद करेन की संघात भिन्न वयोगटातील लेखकांचा समावेश आहे. कोणी माझ्या आईवडिलांच्या वयाचे, कोणी दादा-ताई, कोणी समवयीन तर कोणी लहान भावंडांच्या वयाचे; पण तरीही संपूर्ण कालावधीत कोणीही माझ्या कोणत्याही वागण्याबोलण्यावर आक्षेप घेतला नाही, ना कधी आपापसात वादविवाद झाले. कदाचित सर्वांनी मला जास्तच झेललं असावं. सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी ज्या काही सूचना केल्या त्याच्या विरुद्ध कधी कोणी गेलंच नाही. मला हे असं हवंय बोलल्यावर तसं वागणारे, मला एखादी गोष्ट अजिबात व्हायला नको म्हटल्यावर कटाक्षाने ती गोष्ट टाळणारे; स्पर्धेच्या दृष्टीने काय लक्षात घेऊन लिखाण असावं, मांडणी, पोस्ट करताना घ्यावयाची काळजी,... सगळं काही सांगितल्याप्रमाणे करणारे हे गुणी सदस्य. इतकंच काय तर माझ्या व्याकरण शुद्धलेखनाच्या फेरतपासणीलाही सर्वांनी भरभरून सहकार्य केलं. त्यामुळे या सहकार्यासाठी मी जितके आभार मानावे तेवढे कमीच असतील.

स्मिता वडके-प्रकाशकर मॅडम म्हणजे वयाने आणि लेखन अनुभवानेही मोठ्या व्यक्ती. नावाजलेल्या मालिकांसाठी लेखन करणाऱ्या या मॅडमचा साधेपणा, नम्रपणा खरंच भुरळ घालणारा ठरला. लेखनातही स्वतःचं काम सांभाळून मॅडमने आवर्जून बऱ्याचशा फेऱ्यांमध्ये वेगळेपण जपणारं मोलाचं योगदान दिलं.

सुप्रिया जाधव ताई म्हणजे ईरावरील जुन्या हरहुन्नरी लेखिका. ताईंचं आणि माझं नातं खासच त्यामुळे त्यांच्या प्रत्येक फेरी सहभागाविषयी खात्री तर होतीच आणि घरी मुलीच्या लग्नाची घाईगडबड असूनही ताईंनी प्रत्येक फेरीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. वेगवेगळ्या तऱ्हेचे लेखन विषयच नाही तर व्हिडिओतही ताईंनी नेहमीप्रमाणे कमाल करून आपली छाप सोडली.

भालचंद्र देव सर म्हणजे उत्साही व्यक्ती. आपल्याला एवढं तरी लिहायचं आहे हां असं बोलून स्वतः भरपूर लिहिणारे अन् सर्वांना लिखाणासाठी प्रोत्साहन देणारे सर हटके विषय घेऊन प्रत्येक फेरीत झळकले. व्हिडिओ फेरीत 'जमतंय का बघू, प्रयत्न करेन.' म्हणणारे सर शेवटी जो धमाकेदार व्हिडिओ घेऊन आले तो मला वाटतं सर्वांनीच अनुभवला आहे. त्यामुळे सरांच्या स्पर्धा योगदानाबद्दल, मला दिलेल्या अमाप प्रोत्साहनाबद्दल बोलू तितकं कमीच असेल.

सेजल पुंजे म्हणजे वैविध्यपूर्ण दर्जेदार लेखनाची खाण. हिनेसुद्धा जवळजवळ प्रत्येक फेरीत भरभरून प्रतिसाद दिला. शेवटच्या दिवसापर्यंत या मॅडमच्या एकापेक्षा एक सरस कथा येतच राहिल्या. जलदकथा फेरीतील संघनिहाय विजेतेपद याची साक्ष देणारं आहे. या चुणचुणीत मुलीने कामाचं भरभरून कौतुकही केलं आणि वेळोवेळी प्रोत्साहनही दिलं.

आरती पाटील-घाडीगावकर मॅडम म्हणजे ईरावरील लाडक्या 'प्रो' लेखिका. मॅडमच्या कथांमधील सहजता, भरभर लेखन याचं फलित म्हणजे लघुकथा फेरीतील संघनिहाय विजेतेपद. आधीच इतक्या कथा गाजत असलेल्या या व्यक्तीचा स्वभाव तर अगदीच गोड. लहान बाळाला सांभाळून प्रत्येक फेरीतील मॅडमचा उल्लेखनीय सहभाग वाखाणण्याजोगा आहे.

निकिता पाठक-जोग म्हणजे हौशी व्यक्ती. मातृभाषा मराठी नसूनही हिने प्रत्येक फेरीत उत्तम असं योगदान दिलं. वेळोवेळी भाषेतील बारकावे समजून घेण्याची धडपड आणि तितक्याच उत्साहाने केलेलं सुरेख लेखन तिच्या भाषाप्रेमाची जाणीव करून देणारं ठरलं. हौशी म्हणण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे समूहाला बोलतं ठेवण्यातही हिचा मोलाचा वाटा आहे बरं!

रिषभ कोंडके सर म्हणजे ईरावरील जुन्या लेखकांपैकी एक उत्तम लेखक. ग्राफिक्समध्ये मदत करणारे, कामामुळे फार वेळ न मिळूनही बऱ्याचशा फेऱ्यांमध्ये वेगळेपण जपून स्वतःची खास लेखनशैली दाखवणाऱ्या सरांनी वेळोवेळी संघाला प्रोत्साहन दिलं.

मयुरी रासने-कोलपकर म्हणजे शांत तरीही बोलकी व्यक्ती. स्वभावाप्रमाणेच हिच्या लेखनातही स्वतःची खास छाप दिसून आली. प्रत्येक फेरीत आवर्जून सहभागी होणं असो किंवा मग समूहात चर्चा होणाऱ्या मुद्द्यांवर व्यक्त होणं, हिची उपस्थिती उल्लेखनीय आहे.

प्रणाली चंदनशिवे ही आणखी एक शांत तरीही चंचल व्यक्ती. इमेज बनवण्यात आपणहून पुढाकार घेणारी, प्रत्येक फेरीत हिरीरीने सहभागी होऊन वैविध्यपूर्ण लेखन करणारी ही गोड मैत्रीण स्पर्धेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रोत्साहन देण्यातही पुढे होती.

एकता माने मॅडम म्हणजे लिखाणात उत्साही व्यक्ती. प्रत्येक फेरीत आवर्जून सहभागी होऊन यांनी खूप छानछान लेखनाची मेजवानी दिली. एखाद्या बाबतीत सुधारणा करण्यास वाव आहे हे सांगितल्यावर लक्षात घेऊन पुढच्या वेळी ती पुनरावृत्ती न होऊ देण्याचा यांचा स्वभाव मला विशेष आवडला.

नेहा उजाळे मॅडम म्हणजे आणखी एक शांत तरीही बोलक्या व्यक्ती. तब्येतीच्या तक्रारीमुळे यांना फार गोष्टी शक्य नव्हत्या; पण तरीही यांचा प्रत्येक फेरीतील वैविध्यपूर्ण लेखन सहभाग उल्लेखनीय आहे. समूहातील यांचा वावरसुद्धा सर्वांमध्ये रमून जाणारा.

अभा बोडस म्हणजे मला वाटतं संघातील सर्वात जास्त शांत व्यक्ती. अभ्यास, परीक्षा, व्यवसाय असं सगळं सांभाळून या मॅडमने बऱ्याचशा फेऱ्यांमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवणारा सहभाग नोंदवला. आशयघन लेखन ही त्याचीच पावती असावी.

सर्वांबाबत एकत्रित बोलायचं म्हटलं तर माझ्या प्रत्येक बोलण्याचा आदर करणारे, माझ्या निर्णयांचा मान राखून उत्साहाने प्रत्येक फेरीत आणि चर्चांमध्ये भाग घेणारे, कप्तान म्हणून जबाबदारी घेण्यापासून ते तू बिनधास्त हे कर आम्ही सोबत आहोत म्हणणारे, समूहात अजिबात वाद निर्माण न करता खेळीमेळीने चैतन्य निर्माण करणारे, एकमेकांना समजून घेणारे, मदतीस तत्पर असणारे, भरभरून दर्जेदार लेखन करणारे आणि आणखी बरंच काही.... असे हे संघ कामिनीचे सदस्य म्हणजे संघ कामिनीचे आधारस्तंभ होते आणि आहेत. शेवटी हे सर्व जण होते म्हणून एक उत्तम संघ तयार झाला. संघाला उपविजेतेपद मिळवून देण्यात या प्रत्येकाचा मोलाचा वाटा आहे. मी एक उत्कृष्ट कप्तान म्हणून स्थान मिळवू शकले तेही निव्वळ या सर्वांमुळेच. या सर्वांनी योग्य ते सहकार्य केलं नसतं तर कदाचित आज मी एक कप्तान म्हणून कुठेतरी कमी पडले असते. त्यामुळे हा एकूणच अनुभव सुखावह वाटतोय तो माझ्या या संघ कामिनीतील सदस्यांमुळे. पुन्हा एकदा तुम्हां सर्वांचे खूप खूप आभार!

स्पर्धेचे दोन महिने अगदी लक्षात राहण्यासारखे होते. स्पर्धा सुरू असताना प्रत्येकाने मला जे कौतुक, विश्वास, प्रेम दिले ते तर खासच; पण ज्या दिवशी स्पर्धेचा अंतिम दिवस होता त्यादिवशी प्रत्येकाने मनापासून आणि भरभरून उधळलेली शब्दसुमनं नेहमीच माझ्यासाठी खास असतील. अगदी आता निकालानंतरही प्रत्येकाने या सर्व भावनांची लयलूट केली असं मी हक्काने नमूद करेन. कारण या स्पर्धेच्या निमित्ताने भेटलेल्या हक्काच्या माणसांसाठी एवढं तर व्यक्त व्हायलाच हवं.

स्पर्धेच्या निमित्ताने संघ-कामिनीकडून आलेल्या लेखनाला भरभरून प्रतिसाद देणाऱ्या सर्व वाचकांचेही मनापासून आभार. ईरा व्यासपीठ, संजना मॅडम, परीक्षक मंडळाला अनेकानेक धन्यवाद!
काही गोष्टी, नामोल्लेख राहिले असल्यास क्षमस्व. बाकी, असंच वाचत रहा...
धन्यवाद!
© कामिनी सुरेश खाने
संघ कामिनी
९ जानेवारी २०२६